=====================
लेखन :मनोज दानी
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.
अमेरिकेतील व्हर्जिनिया म्युझियम इथे मला ही पगडी आढळली. गुलाबी रंगाच्या रेशमी कापडाने ती बनवली आहे. पगडी बनवताना सोन्याची तार, लाकूड, चांदी वापरली आहे. पगडीत एकूण २२३ हिरे आहेत. हिऱ्यांचे एकूण वजन २५ कॅरॅट आहे. एकूण १७ मोठे हिरवे पाचू ज्यांचं वजन १७३ कॅरॅट आहे ते सरपट्टीवर वापरले आहेत. असंख्य मोती सोन्याचा तारेने ओवले आहेत. हिरे आणि मोती सोन्या-चांदीच्या तारेने सुबकपणे सरपट्टीच्या खोबणीत बसवलेले आहेत. डोके जिथे बसते ती जागा साधारण २८ सेंटीमीटर व्यासाची आहे.
म्युझियमकडे असलेल्या नोंदींवरून असं कळतं की ही पगडी पुण्याजवळच्या एका मराठा दरबारातील आहे. पगडीच्या ठेवणीवरून ती पेशवेकालीन ब्राह्मणी पद्धतीची नाही हे दिसते. पेशवेकालीन ब्राह्मणी पगड्या आपल्याला बहुतेक सगळ्या पेशव्यांच्या चित्रात दिसतात. विसाव्या शतकात बाळ गंगाधर टिळकांचे फोटो अथवा चित्रे पाहिली तर नंतरच्या पुणेरी पगड्या कश्या दिसत ह्याचा अंदाज येतो. ही अमेरिकेतील पगडी तशी दिसत नाही.
कोल्हापूर छत्रपतींचे राज्य १८५० साली होते. त्यांच्या पगडया कश्या होत्या त्याचा तपास मी केला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा खालील फोटो पाहिला म्हणजे कोल्हापूरची पगडी कशी दिसत होती याचा अंदाज येतो.
ही अमेरिकेतील पगडी कोल्हापूर पगडीसारखी दिसत नाही.
म्युझियमच्या क्युरेटरच्या म्हणण्यानुसार मी सातारा छत्रपतींचे चित्र तपासले. खालील चित्रात आपल्याला जवळजवळ अशीच पगडी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दत्तक पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी घातलेली दिसते. चित्रात आपल्याला "श्री शाहू महाराज छत्रपती श्री प्रतापसिंह माहाराजयारीII कासी मुकामी दतक घेतलेल्याची तसवीर संस्थान सातारा" असं मराठीत लिहिलेलं आणि "Shree Shahoo Maharaj Chattrapati The adopted son of the late Maharajah Partap Singh of Sattara" असं इंग्रहीत लिहिलेलं सापडतं.
छत्रपतींच्या चेहेऱ्याचा भाग मोठा करून पहिला म्हणजे आपल्याला हे साम्य अधिकच जाणवते.
सातारा छत्रपती श्री प्रतापसिंह महाराज यांची कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांना ब्रिटिश सरकारने अन्यायाने पदच्युत केले. चित्रात दाखवलेले छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे दत्तक पुत्र. दुसरे समोर असलेले अप्पासाहेब छत्रपती हे प्रतापसिंहाचे बंधू. ब्रिटिश सरकारने छत्रपती शाहू महाराज यांना साताऱ्याच्या गादीचे वारस मानायला नकार दिला आणि साताऱ्याचे राज्य खालसा केले. रंगो बापूजी यांनी इंग्लंडला जाऊन याविरुद्ध बराच लढा दिला पण दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.
साताऱ्याचे राज्य खालसा झाल्यानंतर छत्रपतींच्या उत्पन्नाचे साधन काही राहिले नाही. १८५७ च्या उठावानंतर परिस्थिती अजूनच बिकट झाली. साहजिकच छत्रपतींच्या संग्रहातील अनेक मौल्यवान वस्तूंची विक्री झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार इतिहास संशोधक द. बा. पारसनीस यांनी छत्रपतींच्या संग्रहातील काही चित्रे आणि इतर वस्तू विकत घेतल्या. पारसनिसांच्या मृत्यूनंतर हा संग्रह इतर ठिकाणी विखुरला. तो आज आपल्याला पुण्यातील डेक्कन कॉलेज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी पाहावयास मिळतो. माझा तर्क असा आहे की याच काळात इ. स. १८५० नंतर ही पगडी साताऱ्यातून कुणा इंग्रज अधिकाऱ्याने विकत घेतली असावी. तो अधिकारी इंग्लंडला परतल्यावर त्याच्या संग्रहात ती असावी. या अधिकाऱ्यांच्या वंशजांनी ती व्हर्जिनिया म्युझियमला सुपूर्द केली असावी. यासंबंधी ठोस पुरावा असा काही माझ्याकडे नाही, पण इतर कागदपत्रे अभ्यासून जर काही हाती लागले तर ते मी नंतर प्रसिद्ध करेन.
पगडीचा फोटो Virginia Museum of Fine Arts, Richmond यांच्यातर्फे साभार.
इतर ठिकाणी फोटो टाकताना खालील माहिती जोडणे आवश्यक आहे.
Photo: Katherine Wetzel © Virginia Museum of Fine Arts
Image must be credited with the following collection and photo credit lines:
Virginia Museum of Fine Arts, Richmond. Gift of Col. Henry W. Anderson, Mr. Raymond Aronian, Dr. and Mrs Frank L. Call, II, Mrs. Harvey Archer Clopton, Robert A Fisher, Mr. and Mrs. Mark Fratti, Dr. William M. Patterson, Mrs. E. A. Rennolds in memory of Mr. and Mrs. John Kerr Branch, Mr. Charles B. Samuels, Mr. George Green Shackelford, and William A. Willingham, by exchange; Robert A. and Ruth W. Fisher Fund
No comments:
Post a Comment