आज शाहू महाराजांना जाऊन बरोबर १०१ वर्षे झाली. या शतकभराच्या काळात शाहूकार्याची महती आणि महत्व वाढतच निघाल आहे. पण हे महत्व वाढत आहे याच एक प्रमुख कारण शाहूंचे कार्य , चरित्र अभ्यास करुन लोकांपर्यंत पोहचवणारे इतिहास अभ्यासक, संशोधक यांचे प्रयत्नही आहेत. अशाच शाहू चरित्राचा त्रोटक आढावा या लेखात घेत आहोत.
राजर्षी शाहू महाराजांची अनेक लोकांनी लिहलेली चरिञे आपल्या समोर आहेत. शाहू महाराजांवर जेवढे स्मारक ग्रंथ निघाले तेवढे आजपर्यंत कोणत्याही संस्थानिकावर किंवा शाहूकालीन व्यक्तीवर निघालेले नाहीत. शाहू चरित्र लिहण्याची सुरूवात ही शाहू महाराजांच्या काळातच आणि खुद्द शाहू महाराजांच्याच आज्ञेने झालेली होती हे खूप कमी जणांना माहित आहे. शाहू महाराजांना इतिहासाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे आणि शाहू महाराज जे काही कार्य करत होते त्या कार्याची व्यापकता आणि धोके हे त्यांना माहित असल्यामुळे पुढे जाऊन स्वतःचे चरित्र शेक्सपियरच्या नाटकातील ' यागी' या पाञासारखे होईल आणि जे मूळचे शाहू महाराजांचे कार्य आहे ते विकृत पध्दतीने रंगविले जाईल. अशी शाहू महाराजांना शंका वाटत असल्यामुळेच त्यांनी स्वतःच्या हयातीतच स्वतःचे चरित्र लिहण्याची जबाबदारी त्यांचे दिवाण , की जे शाहू महाराजांच्या लहानपणापासून प्रत्येक कार्यात , प्रत्येक गोष्टीत सहभागी होते त्या रावबहाद्दूर रघुनाथराव सबनीस यांना दिली होती. तसेच त्यांनी ' दोन व्यक्तींची १००-१०० रु. पगार देऊन चरिञाची साधने संकलित करण्यासाठी नेमणूक करावी.' असा शाहू महाराजांनी दिलेला आदेश ही आज आपणासमोर उपलब्ध आहे. पण दुर्दैवाने शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांचे चरिञ जे शाहू महाराजांना अपेक्षित होते सबनीसांनी लिहावे ते लिहले गेले नाही. शाहू महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या गादीवर राजाराम महाराज आले. काही काळातच दिवाण रावबहाद्दूर सबनीस यांनी दिवाण पदाचा राजीनामा दिल्यामुळे रावबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे हे कोल्हापूरच्या दिवाणपदी आले. आण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू महाराजांचे पहिले दोन खंडातील Memories of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja of Kolhapur , vol. I & II असे इंग्रजी मधील एक सुंदर चरिञ 1924 मध्येच प्रकाशित केले. आणि त्याचेच मराठीतही भाषांतर ' श्रीमच्छञपति शाहू महाराज यांचे चरिञ ' म्हणूनही 1925 मध्येच प्रकाशित केले. आण्णासाहेब लठ्ठेंनी लिहलेल्या या पहिल्या शाहू चरिञानंतर खूप वर्षे शाहू महाराजांच्यावर ग्रंथरुपाने काही लिहले गेले नाही अपवाद कुरणे, भास्करराव जाधव , भाऊराव पवार यांची लहान पुस्तके व आठवणी आणि सत्यवादी , विजयी मराठा, राष्ट्रवीर , हंटर सारख्या शाहू अनुयायांनी केलेले लिखाण. यांनी लिहले तेही स्वतंञ्यपूर्व काळत. स्वातंत्र्याच्या नंतर तब्बल दोन तीन दशके शाहू महाराजांचे कार्य हे एक प्रकारे दडपले गेले होते. ते पुन्हा वर येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात शाहूंची महती समजण्यासाठी 1970 चे दशक उजडावे लागले. सन 1970 मध्ये डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्राची निर्मिती केली त्याच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या चरिञाची साधने प्रकाशित करण्यास सुरूवात केली. आज त्याचे दहा खंड प्रकाशित झाले आहेत. हे डाॕ. अप्पासाहेबांनी केलेले कार्य शाहू महाराजांच्या विचारांचे पुनर्जीवन करणारे ठरले. 1974 मधे शाहू जन्म शताब्दी मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि पुन्हा एकदा शाहू विचार मांडण्याची जनू स्पर्धाच निर्माण झाली. यातूनच अनेक ग्रंथ निर्माण झाले. लठ्ठे यांनी लिहलेल्या चरित्रानंतर पुन्हा असे सुव्यवस्थित चरित्र हे धनंजय कीर यांनी लिहिले (1979). त्यानंतर कृ. गो. सूर्यवंशी यांनी (1984), डॉ. रमेश जाधव (1997), डॉ. जयसिंगराव पवार (2001)असे ग्रंथ निर्माण झाले. शाहू महाराजांची अनेक लहानसहान चरिञे, हजार हजार पानांचेभले मोठे स्मारक ग्रंथ, भाषणांची, ठरावांची पुस्तके , यात मी आणि इंद्रजित सावंत यांनी लेखन संपादन केलेले चिञमय चरिञ(2014). असे विविधअंगी साहित्य विविध भाषांत शाहूंच्या जीवन-कार्या वर निर्माण झाले. ते खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचले. या सर्व प्रयत्नामुळे आज शाहूकार्याचा डंका सर्व भारतभर गाजतोय. पण जसे डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे चांगदेव खैरमोडे यांनी तब्बल सहा खंडात जसे विस्तृत चरित्र लिहले तसे शाहू महाराजांच्या सर्व बाजू मांडणारे शाहू महाराजांचे खंडात्मक चरिञ लोकांपर्यत आलेले नाही. असे शाहूंना अपेक्षित असणारे शाहू चरिञ लवकरच वाचकांच्या भेटीला येईल अशी आशा या निमित्ताने करुया. धन्यवाद!
डाॕ.देविकाराणी पाटील
6 मे 2023
कोल्हापूर
No comments:
Post a Comment