विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 10 February 2024

दिल्लीदिग्विजयवीर

 


दिल्लीदिग्विजयवीर 🚩* -----------------------------------------------
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे दिल्लीवरील वर्चस्व संपुष्टात आले.उत्तरेत मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर दिल्ली पहिल्यांदा आपल्या ताब्यात घ्यावी लागेल हे मराठे चांगलेच जाणून होते.पानिपत युध्दाचा शिंदे घराण्याला जबर फटका बसला होता परंतु आलेल्या अपयशाने खचून न जाता मराठ्यांना पुन्हा संघटीत करून श्रीमंत महादजी शिंदे यांनी मराठासत्तेची मूळे उत्तर हिंदुस्थानात अधिक बळकट केलीच त्याचबरोबर मराठा साम्राज्याविरोधात एकजूट होणाऱ्या शक्तींना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले.
राजपुतांना वठणीवर आणून पाटीलबाबांनी दिल्लीकडे कूच केले.पानिपत युद्धानंतर नजीब खानाने दिल्लीवर आपला चांगलाच वचक बसवला होता, मराठ्यांच्या उत्तरेतील या हालचाली पाहून त्याने मोठी धास्ती घेतली.मराठ्यांची विजयी घोडदौड बघुन नजीबाने आपले हातपाय गाळले.व आपल्या कपटबुद्धीने तह करण्याचा तगादा लावला परंतु 'नजीबाच्या नरडीचा घोट घेऊनच माझी समशेर मी म्यान करेल'असा प्रण पाटीलबाबांनी पूर्वीच केला होता.काही राजकीय कारणांमुळे नजीबाला उघडपणे गाठून ठार करणे महादजीबाबांना शक्य नव्हते.पाटीलबाबांचा उत्तरेतला वाढता प्रभाव पाहून काहींना त्यांच्याविषयी ईर्षा उत्पन्न झाली.आपले जुने लागेबंध उकरून काढून नजीबाने काहींना आपलेसे केले.नजीबाच्या खानदानांचा सर्वनाश करण्याचा निश्चय केलेल्या महादजीबाबांनी मराठ्यांच्या गनिमीकाव्याचा उपयोग करून नजीबाला संपवले.मराठा छावणीत मसलत करण्यासाठी आलेला नजीब खान रोहिला पठाण आपल्या छावणीत पोहचेपर्यंतच पालखीत गतप्राण झाला होता.
नजीबाच्या मृत्यूनंतर जाबेता खान याने आपल्या बापाचीच कपटनीती अवलंबून दिल्लीवर जबरदस्तीने कब्जा केला.रोहिल्यांच्या कपटी डावपेचांमुळे गाफील असलेल्या मराठ्यांना जाबेता खानाने अचानक आक्रमण करून पहिला फटका दिला.या पहिल्या घातपाताने खडबडून जागे झालेल्या मराठ्यांनी पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे व त्यांना सहकार्य करण्याचे कबुल केले.पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठ्यांनी अनेक ठिकाणी जाबेता खानाच्या फौजेचा सपाटूनपराभव केला.जाबेता खानाच्या फौजेचे अनेक मोठे मोठे सरदार या लढायांमध्ये मारले गेले.पठाणांच्या ताब्यात असणाऱ्या अनेक किल्ल्यावर मराठ्यांचे जरीपटक्याचे निशाण लागले.
रोहिलखंडामध्ये मराठयांच्या घोड्यांच्या टापा चौफेर धुराळा उडवू लागल्या.या मोहिमेत रायाजीराव पाटील शिंदे,शंकरबुवा शिंदे,भगीरथराव शिंदे,धारराव शिंदे,रानेखान,खंडेराव हरी भालेराव,अंबाजीराव इंगळे,जिवाजी केरकर,विठोजी इंगळे,माधवराव फाळके यांनी पाटीलबाबांच्या खांद्याला खांदा लावून मोठा पराक्रम गाजविला.रोहिलखंडावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून पाटीलबाबांनी दिल्लीसंबधी हालचालींना वेग दिला.
बादशहा शहाआलम आधीच अलाहाबादला इंग्रजांच्या वळचणीला जाऊन बसला होता.बादशहाला २६,००,००० लाखांची पेन्शन देऊन इंग्रजांनी आपला हेतू स्पष्ट केला होता.दिल्लीच्या बादशहावर वर्चस्व प्रस्थापित करून इंग्रजांना पूर्ण भारतभर आपली पाळेमुळे घट्ट करायची होती.इंग्रजांनी आपल्याला अनुकूल अशी काही माणसे दिल्ली दरबारात पेरली होती.महादजीबाबांच्या उत्तरेतील वाढत्या प्रभावाच्या बातम्यामुळे बादशाह शहाआलम गुप्तपणे पाटीबाबांकडे संदेश पाठवत होता.याची भनक इंग्रजांना लागताच त्यांनी आपल्या गोड बोलण्याने बादशहाचे मन आपल्याकडे पुन्हा वळवून घेतले.बादशहाचा हा तळ्यात-मळ्यात स्वभाव बघून महादजीबाबांनी संयम दाखवत आपला मुत्सद्देपणाची चुणूक दाखवायला सुरवात केली.
पाटीलबाबांनी दिल्लीच्या किल्ल्यावर त्वरित हल्ला केला किल्लेदार कासीम खानाला धूळ चारून मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर १० फेब्रुवारी १७७१ ला मोठ्या दिमाखाने फडकविला. खऱ्या अर्थाने छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्वप्न महादजीबाबांनी पूर्ण केले.परंतु लाल किल्ला घेऊन हि मोहीम पूर्ण होणार नव्हती.बादशहाला इंग्रजांच्या छावणीतून बाहेर काढून आपल्या ताब्यात आणण्याचे महत्वपूर्ण काम पाटीलबाबांनी देवासच्या(मोठी पाती) पवार राजघराण्याचे श्रीमंत कृष्णाजीराव पवार यांच्या साथीने मोठ्या चलाखीने केले.तीन-चार महिन्यात मराठ्यांनी पूर्णपणे दिल्लीवर कब्जा मिळवून चौक्या-पहारा मजबूत केला.
इंग्रजांचा बादशहावरील असणारा प्रभाव लक्षात घेऊन महादजीबाबांनी संयमाने त्याच्याशी बोलणी चालू ठेवली.परंतु बादशहाचा लहरी स्वभाव असल्यामुळे आपली रणनीती त्यांनी बदलून बादशहावर दबाब टाकण्यास सुरवात केली.बादशहाचे विरोधक असणाऱ्या व्यक्तींशी मुद्दामहून जवळीक दाखविण्याचा प्रयत्न केला.एवढयावरच न थांबता बादशहाला सज्जड दमच भरला की 'आपण दिल्लीला येऊन आमच्या अधीन होणार नसताल तर आम्ही दुसरा बादशाह बनवू'.पाटीलबाबांचा हा संदेश बादशाह शहाआलमला मिळताच तो खडबडून जागा झाला व त्याने उत्तरेत असणारा मराठ्यांचा प्रचंड प्रभाव लक्षात घेऊन दिल्लीला येण्याचे कबुल केले.बादशहाला अनुकूल करून घेतल्यावर मध्येच आडकाठी बनून राहिलेल्या इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी मराठ्यांनी कंबर कसायला सुरवात केली.
बादशहाला इंग्रजांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी वेगवान हालचाली चालू केल्या.जनरल रॉबर्ट वॉरकरच्या नेतृत्वाखाली दोन शिस्तबद्ध पलटणी होत्या त्यामुळे इंग्रजांसोबत युद्ध करण्यापूर्वी पाटीलबाबांनी अभ्यासपूर्ण नियोजन केले.या युद्धात महादजीबाबांचे काही प्रमुख उद्देश होते ते म्हणजे इंग्रजांना पराभूत करून त्यांची भारतावर मजबूत होत चाललेली पकड ढिली करायची.तसेच इंग्रजांच्या मनात आपल्याबद्दल दहशत बसवावी.अलाहाबादजवळ इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत मराठ्यांनी विजय मिळविला व आपल्या सूचक नियोजनाच्या आधाराने इंग्रजांच्या बऱ्याच सैन्याची खराबी केली.अखेर २७ डिसेंबर १७७१ साली बादशहाला दिल्लीला आणण्यात आले त्याला गादीवर बसवून पाटीलबाबांनी आपल्या अधीन ठेवले.
पुढील काही महिन्यांमध्ये पाटीलबाबांनी पत्थरगडावर हल्ला करून रोहिला पठाणांवर शेवटचा वार केला.पत्थरगडावर मिळालेला विजय पानिपतचा बदला मानला गेला.तसेच पत्थरगडाच्यापासून काही अंतरावर असलेल्या नजीबाबाद या नजीबाने वसवलेल्या शहरावरून गाढवाचा नांगर फिरवून शहर पूर्ण बेचिराख केले.नजीबाची कबर फोडून त्याची हाडे जाळण्यात आली.दिल्लीवरील विजय आणि पत्थरगडावरील विजयाने अनेक सत्ताधीशांना चांगलीच दहशत बसली.श्रीमंत महादजीबाबांनी स्वराज्य हा उदात्तविचार पानिपतच्या अपयशानंतर मरगळलेल्या मराठ्यांच्या मनात नुसता पुनर्जीवितच केला नाही तर बुलंद ही केला.पुढील काही दशके मराठ्यांनी उत्तरेत पाटीलबाबांच्या नेतृत्वाखाली आपला इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला.
----------------------------------------
©प्रसाद शिंदे सरकार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...