विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 February 2024

धर्मसिंधू कर्ते प्रकांड पंडित काशीनाथशास्त्री उपाध्ये.

 धर्मसिंधू कर्ते प्रकांड पंडित काशीनाथशास्त्री उपाध्ये.

 लेखन ::# Prakash Lonkar Articles



समस्त हिंदू धर्मीयांचे काशी हे परम पवित्र धार्मिक स्थळ आहे. काशी नगरी हिंदूंची विविध मंदिरे,गंगा नदी,तीवरील घाट, विविध पंथ, संप्रदाय, इत्यादीसाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध तर आहेच शिवाय हिंदू धर्मातील असंख्य विद्वान, ज्ञानपिपासू व्यक्तींचे ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र राहिली आहे.महाराष्ट्रातून बरीच मंडळी काशी नगरीत अध्यापन, मराठ्यांचे वकील, प्रतिनिधी, व्यवसाया निमित्ताने काशीला स्थायिक झाली होती. छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक विधीचे प्रमुख गागा भट्टानचे पूर्वज पैठणचे होते पण विध्यार्जनासाठी काशीला गेल्यावर पुढील पिढ्या तिथेच स्थायिक झाल्या.मराठ्यांच्या धाकामुळे तेथील इस्लाम धर्मीय राज्यकर्त्यांनी ह्या मंडळीना नेहमीच आदराची वागणूक दिल्याचे इतिहासात दाखले आहेत.
आजच्या लेखात अशाच एका प्रकांड पंडित महाराष्ट्रीयन व्यक्तीचा परिचय करून घेऊ जिने लिहिलेला `धर्मसिंधू `नावाचा ग्रंथ ज्याचे महत्व आजही अबाधित राहिले आहे, काशी नगरीतील समस्त लहान थोर विद्वान मंडळीनी डोक्यावर घेतला होता,पालखीत ठेवून त्याची काशी नगरीतून मिरवणूक काढली होती.हा ग्रंथ इ.स.१७९०-९१ च्या सुमारास काशीनाथशास्त्री पाध्ये ह्यांनी लिहिला.ह्या ग्रंथात हिंदू धर्मातील सुमारे ७८० धार्मिक बाबींवर धर्मशास्त्रीय निर्णय दिले आहेत.
ह्या ग्रंथाविषयी अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर धर्म सिंधू कर्ते काशीनाथशास्त्री उपाध्ये यांच्या घराण्याविषयी जाणून घेऊ या.मराठेशाहीच्या उत्कर्षाच्या परमावधी काळात नानासाहेब पेशव्यांनी दिलेल्या अनेक न्याय निवाड्यातील अत्यंत गाजलेला निवाडा म्हणजे कोकणातील जोशी आणि पाध्ये यांच्यातील वृत्ती वादात जोशांच्या बाजूने दिलेला निकाल हा होय. रत्नागिरी जिल्ह्यातील गोळवली गाव पाध्याना इनाम होता.संगमेश्वर तालुक्यातल्या ७२ गावांची ज्योतिष, धर्माधीकरण, उपाध्येपण, पुजारीपण यांची वृत्ती(अधिकार)पण पाध्यांकडे पुरातन वेळेपासून चालत आली होती. पाध्ये घराण्याचा ज्ञात मूळपुरुष भास्कर होते. त्यांच्या नंतर नारो,अंतो,काशी अशी वंशावळ आहे. पाध्ये मंडळीनी त्यांच्याकडे विध्याभ्यासासाठी वास्तव्यास असलेल्या संगमेश्वर निवासी जोशी आडनावाच्या विद्यार्थ्यास आपल्या कारभारात मदत करण्यासाठी नियुक्त केले. काशी पाध्येंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र यज्ञेश्वर आणि अनंत पाध्ये आपल्या वृत्तीचा कारभार पाहू लागले.त्यावेळी जोशांकडील कृष्ण जोशी ह्या व्यक्तीने पाध्यांच्या वृत्तीवर आपला अधिकार असल्याचा दावा केला.हा वाद पुण्याला नानासाहेब पेशव्यांकडे गेला.आपली बाजू मांडण्यासाठी यज्ञदत्त सुमारे तीन वर्षे पुण्यास राहिले.ह्या काळात त्यानी कर्ज काढून, कोरडी भिक्षा मागून दिवस काढले.नानासाहेबांनी जोशी पाध्ये वादाची तड लावण्यास रामशास्त्री प्रभुणे यांस सांगितले. रामशास्त्रीनी १४ जानेवारी १७६० रोजी पाध्यांच्या विरोधात निकाल दिला. जोशी पेशव्यांचे नातेवायिक असल्याने पेशव्यांनी आपली बाजू न्यायाची असूनसुद्धा आपल्यावर अन्याय केल्याचा यज्ञदत्तांचा ग्रह होऊन ते अतिशय निराश होऊन आपल्या गावी परतले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची सल त्यांना सदोदित बोचत राहिली आणि एक दिवस त्यांनी पराकोटीच्या निराशा,हतबलतेतून गोळवली येथील आपल्या घरास स्वतः आग लावून त्याची राख रांगोळी होऊ दिली.हि राख घेऊन यज्ञदत्त एके दिवशी पुण्याला नानासाहेब पेशव्यांना भेटण्यास आले.त्यावेळी नानासाहेब हिराबागेत विश्रांती घेत होते.यज्ञदत्त/अनंत पाध्ये तिथे गेले आणि बागेच्या दारासमोर ‘’आम्हाला जमीनदोस्त करणाऱ्या पेशव्यांचे वाटोळे होईल,त्यांचा निर्वंश होईल,हाय हाय करत पेशवे मरतील..’’अशी शापवाणी करून आपल्या मुठीतील राख नानासाहेबांच्या पालखीत टाकून तिथून सातारच्या हद्दीतील क्षेत्र पंढरपूर इथे निघून आले. कर्मधर्मसंयोगाने एक वर्षांनी तृतीय पानिपत युद्धात पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेचा पराभव झाला. नानासाहेब पुत्र विश्वासराव आणि पुतण्या सदाशिवरावभाऊ यांना सुद्धा ह्या संग्रामात वीरगती मिळाली. त्यामुळे काही काळ मराठा साम्राज्य डळमळीत झाले होते. आपल्या न्यायदानामुळे मराठ्यांच्या दौलतीवर महासंकट ओढवले असे रामशास्त्री प्रभूण्याना पण वाटायला लागले होते आणि ह्या अपराधी भावनेतून ते न्यायदानाचे कर्तव्य बजावीत राहिले.
वतन वादामुळे अनंत पाध्येना संसाराची एकूणच विरक्ती येऊन ते भक्तिमार्गाकडे वळले. अनंत सुद्धा खूप विद्वान शास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. अनंत पाध्याना काशिनाथ (धर्मसिंधू ग्रंथ कर्ते)आणि विठ्ठल असे दोन पुत्र होते. शके १६९६ मध्ये अनंत पाध्ये मृत्यू पावले. ज्येष्ठ बंधू काशिनाथबाबा (बाबा) यांनी धाकटा भाऊ विठ्ठल याचा सांभाळ केला. बाबांनी पंढरपूर इथे संस्कृत पाठ्याशाला काढली. ते अतिशय विद्वान आणि सदाचरणी असल्यामुळे त्यांच्या पाठ्शालेचा लौकिक अल्पावधीत दूरदूर पसरून असंख्य विद्यार्थी त्यांच्या पाठशाळेत येऊ लागले.बाबांनी पुढे क्षेत्र संन्यास घेतला.त्यामुळे ते पंढरपूर बाहेर जात नसत.पेशवे श्रावण महिन्यात विद्वान व्यक्तींना त्यांच्या ज्ञानापोटीच्या आदर भावनेतून दक्षिणा वाटप करत असत.बाबांच्या क्षेत्र संन्यासामुळे पेशवे त्यांना सालीना १२०० रुपये दक्षिणा पाठवीत असत. बाबा विठ्ठलाचे परम भक्त होते. त्यांनी संस्कृतमध्ये रचलेल्या विठ्ठलाच्या आरत्या रोज विठ्ठलापुढे म्हटल्या जातात असे य.न.केळकर यांनी बाबांच्या चरित्रात म्हटले आहे.मराठेशाहीतील बरेच सरदार बाबांना मानत असत.बाबा निःस्पृह आणि असंग्राहक वृत्तीचे असल्याने ते आपल्याला मिळालेल्या सर्व भेट वस्तू, द्रव्य विठ्ठल चरणी अर्पण करत असत.बाबांची पांडुरंग पूजा व प्रार्थना चालू असते वेळी गाभाऱ्यात बाबांशिवाय अन्य कुणीही नसायचे..अगदी बडवे पण गाभाऱ्या बाहेर उभे राहत.
धर्म सिंधू ग्रंथाविषयी: काशिनाथबाबा उपाध्यायांनी शके १७१२ म्हणजे इ.स.१७९०-९१ साली धर्म सिंधू नावाचा हिंदू धर्मातील विविध संस्कार,प्रथा,परंपरा,नियम,अपवाद याविषयी सखोल माहिती असलेला संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला.यासाठी त्यांनी निर्णयसिंधू,पुरुषार्थ चिंतामणी,कालमाधव,हेमाद्री,कालतत्व विवेचन,स्मृत्यर्थसार आदी प्राचीन हिंदू धर्म ग्रंथांचा आधार घेऊन त्यावर विध्वत्तापूर्ण टीका लिहिली.ह्या ग्रंथात हिंदू धर्मातील सुमारे ७८० बाबींविषयी उहापोह करण्यात आला आहे.वर उल्लेख केलेल्या प्राचीन ग्रंथात ज्या ठिकाणी संदिग्ध भूमिका बाबांना आढळली त्या त्या ठिकाणी बाबांनी आपली भूमिका स्पष्ट करून संदिग्धता दूर केली.बाबांनी लिहिलेल्या धर्म सिंधूस रामेश्वर पासून काशी पर्यंत सर्वत्र मान्यता मिळाली,कौतुक झाले. बाबांचा धाकटा भाऊ विठ्ठलपंत काशीस अध्ययना साठी गेला होता. तिथे कृष्णंभट आरडे यांच्याकडे अत्यंत निष्ठापूर्वक,कष्टाने शिक्षण घेऊन व्याकरण प्रवीण झाला. त्याने बाबांनी लिहिलेला धर्म सिंधू ग्रंथ काशी येथील पंडितांकडे परीक्षणासाठी दिला. तो ग्रंथ तेथील मंडळीना इतका आवडला,पसंत पडला कि त्यांनी त्याची पालखीतून अवघ्या काशी नगरीत मिरवणूक काढली! सदरहू ग्रंथाची रचना तीन भागात केलेली आहे.पहिल्यात सामान्य कालनिर्णय सांगितले आहेत तर दुसऱ्या भागात चैत्रापासून पुढील फाल्गुना पर्यंत बारा महिन्यातील व्रते व इतर धर्म कृत्ये यासंबंधी विवेचन केले आहे.तिसऱ्या परिच्छेदात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन उपविभाग आहेत. पूर्वार्धात नित्यकर्मे, सोळा संस्कार, अग्निहोत्र, देवप्रतिष्ठा, देवपूजा, गृह बांधणीस प्रारंभ,गृह प्रवेश, वास्तुशांती, वर्ज्य, अवर्ज्य गोष्टी वगैरेंविषयी धार्मिक नियम सांगितले आहे. उत्तरार्धात माणसाच्या अंतिम प्रवासाशी निगडीत गोष्टींवर निर्णय दिले आहेत जसे कि श्राद्ध, श्राद्धाधिकार, श्राद्ध पद्धती, जनन/मृत्यू शौच, दुर्मरण, अंत्येष्टी, संन्यास ग्रहण, संन्यास धर्म इत्यादीविषयी निश्चित शब्दात निर्णय सांगितले आहेत.
काशिनाथ बाबा शके १७२७ म्हणजे इ.स.१८०५ मध्ये पंढरपूर इथे मृत्यू पावले. मरण्यापूर्वी त्यांनी संन्यास घेतला होता.बाबांच्या पश्चात धाकटे बंधू विठ्ठलपंत पाध्ये यांनी संसार चालवला.बाबांच्या कीर्ती, विध्वत्ता यामुळे कोणीही राजेरजवाडे,सरदार मंडळी पंढरपूर इथे आल्यावर विठ्ठल दर्शना नंतर प्रथम पाध्यांच्याच भेटीस जात. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पण पाध्ये मंडळींचा मान मरातब कायम ठेवला होता. शितोळे, मिरजकर. सांगलीकर, रामदुर्गकर, निपाणीकर, फत्तेसिग भोसले, जमखिंडीकर, निजाम वगैरे संस्थानिक, जहागीरदार यांच्याकडून पण विठ्ठलपंतांना वार्षिक देणग्या मिळत असत. त्यांचे शिष्य आप्पाचार्य बडोद्याला गेले होते तेव्हा त्यांना बडोदा नरेशांनी पंचवीस हजार रुपयांची दक्षिणा दिली होती. आपाचार्यानी ती दक्षिणा गुरुदक्षिणा म्हणून आपले गुरु विठ्ठलपंत यांना पाठविली. पण तत्पूर्वीच विठ्ठलपंतांचे निधन झाले होते.
# Prakash Lonkar Articles
आधार :१-काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे—ले.य.न.केळकर
२-पेशवे-ले.श्रीराम साठे.
३-मोरोपंत चरित्र आणि काव्य विवेचन—ले. ल.र.पांगारकर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...