फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांचा वाडा महाराष्ट्रात असणाऱ्या इतर वाड्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. हा वाडा म्हणजे एक प्रकारची गडीच म्हणता येईल. या ठिकाणी केवळ असा एकच वाडा नाही तर वेगवेगळे नऊ मोठे वाडे व दोन मंदिरे आहेत. या सर्व वास्तू मुख्य एकाच तटबंदीच्या आतमध्ये सामावल्या आहेत. हे ठिकाण फलटणपासून आठ ते नऊ किमी अंतरावर आहे. वाठार आणि वाठार निंबाळकर ही दोन्ही ठिकाणे पूर्णपणे वेगळी आहेत. वाठार निंबाळकर गावात एका नदीच्या काठावर हे वाडे असून ,हे पूर्णपणे 23 एकरात आहेत. वाड्याच्या तटबंदी बुरुजांचे बांधकाम आणि वाड्याचे दरवाजे अतिशय भव्यदिव्य स्वरुपाचे आहेत.
मुख्य तटबंदीतून आतमध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस राम ,लक्ष्मण आणि सितामाईंचे मंदिर पाहायला मिळते. मंदिराला स्वतंत्र तटबंदी आणि मुख्य एक दरवाजा आहे.मंदिराच्या आतमध्ये तीन शिलालेख आहेत ,तसेच मंदिरासमोर लाकडी सभामंडप आहे.सभामंडपातील लाकडांवर कोरीव नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. तिथेच समोर दोन घुमटी आहेत. मंदिराच्या शेजारी एक विहीर आहे ,या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना खूप छान केलेली दिसते.
मंदिरामधून बाहेर पडल्यावरती समोर एक टोलेजंग वाडा दिसतो. सध्या या वाड्याची पडझड झालेली दिसते , परंतु या वाड्याच्या बांधकामावरून हा वाडा तीन मजली असावा असे वाटते..वाड्याच्या दारांवरून वाड्याची भव्यता लक्षात येते.भल्यामोठ्या दारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने वाड्याच्या वरती जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. वाड्याची तटबंदी आजही पूर्णपणे सुस्थितीत असून पूर्ण वाड्याला फेरा मारता येतो...परंतु तटबंदीच्या आतील भागातील वाड्याचे अवशेष पूर्णपणे कोसळलेले आहेत. वाड्याच्या तटबंदीत आठ बुरुज आहेत. आतमध्ये वाड्यात एक चौकोनी दगडी बारव आणि त्या बारवात जाण्यासाठी आयताकृती पायऱ्या पाहायला मिळतात. सध्या या वाड्याच्या पडझड झालेल्या ठिकाणचे कामकाज चालू आहे.
महाराष्ट्रातील राजघराण्यामध्ये फलटणचे निंबाळकर घराणे खूप जुने असून सुमारे साडेसातशे वर्षांपासून हे घराणे महाराष्ट्रात आहे.
सुहास साखरे ...
No comments:
Post a Comment