विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 February 2024

उत्तर मराठेशाहीतील एक “भाई” ( "भाई राणेखान" !! )

 



उत्तर मराठेशाहीतील एक “भाई” ( "भाई राणेखान" !! )
संकलन:प्रमोद करजगी
मित्र हो, आजकाळ देशाच्या राजकारणात विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक "भाई" लोकांची गर्दी झालेली दिसते. ही भाई मंडळी पावसाळ्यात उगवणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे प्रकाशात येतात आणि त्याच वेगाने राजकीय पटलावरून अदृश्य सुद्धा होतात. या भाई लोकांचे आकर्षक व गोंडस (?) चेहेरे गावातील व शहरातील चौकाचौकात फ्लेक्सवर शोभून दिसतात आणि तो फ्लेक्स खाली उतरवला की त्याच क्षणापासून असे भाई जनतेच्या स्मृतीतून गायब होतात.परंतु उत्तर मराठेशाहीत एक भाई असा होऊन गेला, ज्याने जवळपास तीस एक वर्षे हिंदुस्थानच्या राजकारणात आपली न पुसता येणारी अशी छाप पाडली होती. उत्तरेतील राजकारणाच्या गुरुत्वमध्यभागी असलेल्या महादजी शिंदे यांची बहुतांशी खलबते या भाईंच्या उपस्थितीत तसेच सल्ल्याशिवाय पूर्ण होत नसत. एव्हढेच नव्हे तर महादजींना भेटायची परवानगी देणे वा नाकारणे हा निर्णय देखील या भाईंच्या हातात होता. थोडक्यात सांगायचे म्हणजे उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणाची चावी ज्या महादजी शिंदेंच्याकडे होती, तिची काळजीपूर्वक जपणूक करायचे नाजूक व जोखमीचे काम या भाईंच्याकडे होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा या भाईंचे नांव होते "भाई राणेखान" !! असे हे भाई राणेखान कोण होते, त्यांनी मराठ्यांच्या इतिहासात पार पडलेल्या कामगिऱ्या आणि त्यांचे स्मृतिस्थान याचा लेखाजोगा घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
प्रस्तावना :तारीख १४ जानेवारी साल १७६१, दुपारचा प्रहर! पानिपतच्या लढाईचा उत्तररंग सुरु झाला होता. मराठ्यांची सेना पराभूत होऊन सैरावैरा पळत सुटली होती. अशा या अनियंत्रित व गोंधळाच्या स्थितीत उमद्या घोड्यावर स्वार झालेला एक तिशीतील सरदार आपल्या अंगावरील आकर्षक अंगवस्त्रासह दक्षिणेकडे रपेट मारत परत जीवाच्या आकांताने निघाला होता. त्याच्या तरण्याबांड इराणी घोड्यावरून आणि अंगावरील राजभूषणावरून हा नक्कीच एक श्रीमंत व तोलामोलाचा हिंदू सरदार असावा हे निश्चित होते. तेव्हा त्याच्यावर एका अफगाण सशस्त्र घोडेस्वारांची नजर पडली. आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याचा पाठलाग सुरु केला. हा सरदार पुढे आणि अफगाण सैनिक मागे अशी ही स्पर्धा बराच वेळ चालू होती. त्याच वेळेस दैवाने घात केला आणि दुर्दैवाने एका खड्ड्यात पाय पडल्याने मुरगाळून हिंदू सरदाराचा घोडा खाली कोसळला. त्यामुळे त्याच्यावर स्वार झालेला मराठा सरदारदेखील खाली पडला आणि शरीराला इजा होऊन निपचित झाला. अशा वेळेस तो पाठलाग करणारा अफगाण सैनिक तेथे पोचला व त्याने निष्ठुरपणे त्याच्या तलवारीचा घाव सरदाराच्या पायावर घातला आणि त्याच्या अंगावरील होते नव्हते ते अलंकार ओरबाडून त्याने सूंबाल्या केला. आपला हा हिंदू सरदार बराच वेळ तेथे बेहोष पडून होता. तेव्हा तेथून जवळूनच जाणाऱ्या एका भिस्ती माणसाने त्याच्या दुःखावेगाने कण्हणारा आवाज ऐकला. तो भिस्ती लगोलग त्या जखमी व्यक्तीपाशी गेला आणि प्रथम दर्शनीच त्याने जाणले की हा जखमी पुरुष कोणी सामान्य सैनिक नसून हे कोणी मोठ्या घराण्यातील सरदार पुरुष असावेत.त्याने लगबगीने त्यांना आपल्या बैलावर घेतले आणि दक्षिणेचा रस्ता पकडला. पानिपतच्या या लढाईतून परतणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर साक्षात मराठ्यांचे पराक्रमी सरदार महादजी शिंदे होते आणि त्यांना लढाईतून वाचवून सुखरूपपणे आणणारे राणेखान होते.
महादजी शिंदे हे पानिपतच्या युद्धातून सुखरूप व सहीसलामत परतले याचे श्रेय भाई राणेखान यांनाच दिले पाहिजे. किंबहुना पानिपतच्या दारुण लढाईनंतरच्या काळात एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठ्यांनी मारलेली भरारी याचे श्रेय जसे महादजी शिंदे यांच्याकडे बहुतांशी जाते, त्याच महादजीं शिंदे याना सुरक्षितपणे व हुशारीने दक्षिणेत आणणाऱ्या राणेखानकडे अंशतः तरी दिले पाहिजे असे वाटते.अलिजाबहादूर महादजी शिंदे यांनी त्यांना "भाई" असा 'किताब दिला. राणेखान यांनी केलेल्या सुश्रूषेमुळे महादजी शिंदे बरे झाले. त्यामुळे राणेखान याचे हे उपकार महादजी शिंदे कधीच विसरले नाहीत.
राणेखान यांची पार्श्वभूमी: ८ऑगस्ट१७७८च्या एका इतिहासकालीन पत्रात राणेखान यांचे पूर्ण नाव राणेखान वलद फत्तेखान पठाण असे दिले आहे. त्या पत्रात महादजी शिंदे यांनी पिंपळवडी नावाचे एक गाव राणेखान यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व बेगमीस सन १७७६/१७७७ मध्ये जागीर दिल्याचा उल्लेख आहे. सध्या राणेखान त्यांची दोन घराणी नांदत आहेत, एक घराणे देवपूर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक) येथे व दुसरे घराणे ग्वाल्हेर येथे आहे. राणेखान यांनी आपणास अफगाणांच्या तावडीतून सोडवले हे जाणून अलिजाबहादूर शिंदे यांनी त्यास वर वर्णन केलेली जहागिरी इनाम देऊन आपल्या खवासखान्यात उजव्या बाजूस बसण्याचा मान दिला. त्यामुळे राणेखान यांचे घराणे ग्वाल्हेर येथे ‘खवाशिवाले’ म्हणून प्रसिद्ध आहे. राणेखान याना महादजी शिंदे यांचे अत्यंत जवळचे सल्लागार म्हणून एक सन्मान होता. राणेखान यांचा जन्म कधी झाला याची नोंद मिळत नाही तथापि राणेखान यांचा मृत्यू २२ डिसेंबर १७९१ रोजी चितोडजवळ झाला. ऐतिहासिक पुस्तकात एके ठिकाणी राणेखान व त्यांचे दोन बंधू हे पेशव्यांच्या पदरी भिस्ती (water carrier) म्हणून होते असा उल्लेख आढळतो.
अठराव्या शतकातील हिंदुस्थानातील भिश्ती
महादजीच्या अत्यंत निकवर्तीयांमध्ये भाई राणेखान यांचे नाव घेतले जात असे.अखेरपर्यंत प्रत्येक मसलतीमध्ये तसेच अत्यंत कठीण परिस्थितीत राणेखानच्या सल्ल्याशिवाय महादजी पाऊल पुढे टाकत नसत. राणेखान यांचे वंशज,देवपूरचे इनामदार,यांनी जी माहिती दिली त्यावरून पाहता राणेखान हा औरंगजेबाच्या पदरी एक फत्तेखान म्हणून सरदार होता त्याच्या वंशातील एक पुरुष होता. तो मूळचा नागोरचा राहणारा असून त्याने मराठ्यांच्या फौजेत चाकरी धरण्याआधी उदेपूरच्या राण्याकडे काही वर्षे शिपाईगिरी केली होती. त्यावरून त्याला मिळालेले इनाम त्याच्या वंशजांकडे अद्याप चालू आहे. पुढे तो शिंद्यांच्या फौजेत नोकरीस असून पानिपतचे लढाईत हजर होता. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झालेला पाहून त्याने जीव रक्षणासाठी भिश्ती माणसाचा वेष धारण करून दक्षिणेकडे पळ काढला. त्याने महादजी शिंदे याना ओळखून ग्वाल्हेरला आणले. त्यानंतर राणेखान यांचा खऱ्या अर्थाने उदय झाला असे म्हणावे लागेल.
भाई राणेखान यांची वंशावळ : राणेखान यांची वंशावळ येथे थोडक्यात दिली आहे. भाई राणेखान याना २ पुत्र झाले, त्यांची नावे समशेरखान व हसनखान. समशेरखान यास दोन मुलगे होते फतेखान व टिपूराजा उर्फ हुसेनखान. हसनखान यास दोन मुलगे होते, त्यांची नावे: नूरखान व जमालखान. फतेखान यास दोन मुलगे झाले राणेखान व डालेखान, पैकी राणेखान यास ५ पुत्र झाले ; हसनखान, फतेखान, मेहेताबखान,टिपूराजा उर्फ हुसेनखान, हयातखान. हसनखान यास दोन मुलगे होते, त्यांची नावे: नूरखान व जमालखान. फतेखान यास तीन पुत्र होते: सिकंदरखान, अश्रफखान,मगबूलखान. तसेच मेहेताबखान यास एक मुलगा त्याचे नाव मन्वरखान, हयातखान याच्या मुलाचे नाव राणेखान होते. टिपूराजा उर्फ हुसेनखान यास दोन पुत्र त्यांची नावे समशेरखान व शाबासखान तर हसनखान यास तीन मुलगे नावे याप्रमाणे: राणेखान, अजीमखान व आयमतखान.
भाई राणेखान यांचे योगदान: या आधीच सांगितल्याप्रमाणे भाई राणेखान हे महादजींचे उजवे हात म्हणून गणले जात असत. प्रत्येक मसलती मध्ये त्यांचा सहभाग असे. भाई राणेखान यांनी स्वतः जातीने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता व आपले शौर्य व मुत्सद्देगिरी दाखवली होती. त्यातील काही ठळक घटनांचा उल्लेख येथे केला आहे.१७८७मध्ये राजपूत, मारवाडकर व मोंगल यांच्या विरुद्ध झालेल्या लालसोटच्या लढाईत राणेखान महादजींच्या सेनापतीचे काम बजावत होता.या अटीतटीच्या युद्धात राणेखान भाई यांनी चांगली मर्दुमकी दाखवली होती. त्यावेळी ऐन लढाईत तोफेचा गोळा लागून त्यांच्या तलवारीची मूठ उडाली होती आणि शेजारी उभा असलेला त्यांचा मोतद्दार ठार झाला होता. पण राणेखान न भिता वा डगमगता आपल्या जागेवर टिच्चून उभे राहिले आणि त्यांनी शिंद्यांच्या सेनेचे हुशारीने नेतृत्व केले व त्यादिवशीच्या लढाईत सरशी मिळवून दिली होती. १७८८ च्या सुमारास गुलाम कादिर या दुष्ट व क्रूर मोंगल सरदाराने दिल्लीच्या बादशहाची व त्याच्या जनानखान्याची जी विटंबना केली, त्यास शिक्षा करण्याची कामगिरी राणेखान याजवर सोपवण्यात आली होती.गुलाम का‌‌दिनर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता. अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत त्याला पाटीलबाबांच्या चरणी आणले. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड होते, नजीबखान रोहिल्याने ते बदलले, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे असा उल्लेख इतिहासकार राजवाडे यांच्या पुस्तकात सापडतो.
राणेखान यांची नाशिकजवळ देवपूर येथील समाधी
राणेखान यांची देवपूर येथील समाधिस्थान:सिन्नर तालुक्यातील देवपूर या गावात राणेखान यांचे समाधीस्थळ आहे. समाधिस्थ:ळास ‘बडाबाग’ असे नाव आहे.राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत,पैकी एक आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती.हे समाधिस्थान पूर्वीच्या काळी सुस्थितीत असावे यात शंका नाही. सध्या समाधीची जागा सोडून इतर भागाची पडझड झालेली आहे. एका सामान्य भिस्तीपासून सरदार झालेला राणेखानाने देवपुराभवती कोट बांधत कोटात भव्य वाडावजा हवेली बांधली होती.कोटाला दोन दरवाजे आहेत परंतु दोन्हींची अवस्था दयनीय आहे. त्यातल्या त्यात पारासमोरचा उत्तरदरवाजा अर्थात सध्याचा महात्मा गांधी प्रवेशद्वाराची स्थिती बरी आहे. तर बडाबागेकडे तोंड करून असलेला पश्चि्म दरवाजा आता कोसळण्याच्या स्थितीत आहे. याची व हवेलीची सुंदर बांधणी मात्र खिळवून ठेवते. सद्यस्थितीत त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. सुंदर कबरीची इमारत, कोरीव काम केलेले दरवाज्यांच्या कमानी, खिडक्या व नक्षीदार घुमट, त्यावरील नक्षीकाम, मनोरे, इमारतींना जोडणारी दगडी पायवाट अन्‌ दुर्लक्षित कारंजे पाहून मन हेलावते.चारी बाजूला खुल्या जागेवर अनियंत्रितपणे रानटी झाडे वाढलेली आहेत. या जागेवर व्यवस्थित बागबगीचा करून या समाधीस्थळाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वास्तुशिल्पाचा एक चांगला नमुना असलेल्या या स्थानाची दुरावस्था झाली आहे.
आपल्या प्राणाची पर्वा न करता पानिपतच्या लढाईतून महादजीना सुखरूप परत आणण्याचे श्रेय भाई राणेखान याना दिले पाहिजे. या स्वामीसेवेबद्दल महादजी शिंद्यानी त्यांना पिंपळवाडी, निमगाव, जामगाव ही गावे व मोठ्या प्रमाणात संपत्ती बक्षिस म्हणून दिली होती.वरील सर्व गावांपैकी राणेखान यांनी वास्तव्यासाठी भागवत संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवनदीच्या तीरावर असलेल्या देवगाव या गावाची निवड केली.
सारांश :राणेखान हा भिस्ती होता असे माल्कम यांचे म्हणणे असले तरी काही इतिहासकारांच्या मते तो मुळात तो एक साधासुधा भिस्ती नव्हता. लढाईतून पराजय झाल्याने पळून येताना शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून त्याने भिस्ती मनुष्याचा वेष धारण केला असावा असे काहींचे म्हणणे आहे.त्याने शिंद्यांच्यावर कितीही उपकार केले असले तरी महादजी शिंदे त्याला आपल्या प्रमुख सल्लागारासारख्या उच्च पदावर एखाद्या भिस्त्याला चढवतील असे वाटत नाही. त्यामुळे राणेखान हा एक साधारण भिस्ती असावा हे विधान तर्काला न पटणारे वाटते. राणेखान अत्यंत मनमिळावू होता व कोणत्याही प्रकारच्या भांडणतंट्याशिवाय तसेच दोन्ही बाजूचे कमीतकमी नुकसान करून तो आपले काम करून घेत असे अशी त्याची ख्याती होती. त्यामुळे बऱ्याच वेळेस शत्रू पक्षाला ही तो जवळचा वाटे. त्यामुळे साहजिकच बऱ्याच वेळेस शिंद्याबरोबरची तहाची बोलणी राणेखान भाईच्या मार्फत होत असत. राणेखानच्या एखाद्या मसलतीला नाकारणे महादजींना कठीण जात असे.असा हा भाई राणेखान महादजी शिंद्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा जिवंत साक्षीदार आणि मराठेशाहीतील एक जबाबदार मुत्सद्दी होता, तो आज पुन्हा एकदा आपला इतिहास प्रकाशात येण्याची वाट तर बघत नसेल ना असे मनात आल्याशिवाय रहात नाही.
संदर्भ : ऐतिहासिक संकीर्ण निबंध १, पृष्ठ१३, त्रैमासिक २४:२(सन १९४३ ऑक्टोबर) लेखक: पटवर्धन पां.न., महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा , सिन्नर दिनांक २३ फेब्रुवारी २०१५,माल्कम११८-११९,चंद्रशेखर बुरांडे यांचा महाराष्ट्र टाइम्स मधील लेख, राजवाडे खंड. १२. ५०, ३६ संकलन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...