मित्रानो,१७९२ ते १७९३च्या दरम्यान मराठेशाहीत असाच एक भीषण दुष्काळ पडला होता. जवळ जवळ वर्षभर पुण्यात व भोवतालच्या प्रदेशात पावसाचे नाव नव्हते. शेतीला पाणी नसल्याने शेती पूर्णपणे बुडाली होती. पाण्याविना लोक गाव सोडून निघून जात होते आणि गुरेढोरे तहानेने व्याकुळ होऊन जागेवरच प्राण सोडता होती. त्या काळातील दुष्काळ एव्हढा गंभीर स्वरूपाचा होता की त्याचे भीषण वर्णन पेशवे दप्तरातील एका खंडात आले असल्यास नवल ते काय! पेशवे दप्तरातील त्या वेळेचे आलेले वर्णन आजच्या काळात सुद्धा चित्तवेधक आहे यात शंका नाही.राज्यात सर्वत्र अन्नधान्य महाग झाले. अन्नपाण्याशिवाय व महागाईमुळे गोरगरिबांचे हाल होऊ लागले.त्यावेळी पेशवे सरकारांनी पर्जन्य पडावा म्हणून महादेवाला साकडे घालून अभिषेक वगैरे धार्मिक विधी सुरु केले. त्या संबंधी माहिती देणारे पेशवे दप्तरातील एका पत्रातील मजकूर.
इकडील पुण्याकडची बातमी म्हणजे महागाईमुळे व दुष्काळामुळे सर्व लोक गडबडून गेले आहेत. पेशवे सरकारांनी राज्यात पाऊस पडावा म्हणून सात दिवस समग्र ब्राम्हण वर्गास अनुष्ठानास बसविण्याचा निश्चय केला आहे. काही ब्राम्हणांनी ओंकारेश्वरजवळ बसून सतत जलाभिषेक करून महारुद्रास आरंभ केला तसेच काही ब्राम्हणांनी शंकराला जलाभिषेक देऊन नदीच्या पात्रात उभे राहून पर्जन्यसुक्ताचे पठण सुरु केले आहे. दुसऱ्या काही ब्राम्हणांनी श्री नागेश्वरास जल अर्पण करून पर्जन्यसूक्ताचे पठण सुरु केले. अशारीतीने दोन्हीकडे मिळून एकंदरीत चार हजार ब्राम्हण अनुष्ठानास बसले आहेत.अनुष्ठानास सुरुवात होऊन चार दिवस गेल्यानंतर पाचवे दिवशी दोन्हीकडील दोन ब्राम्हण स्वर्गात पोचले. तेंव्हा एका बाजूस पावसासाठी चाललेले अनुष्ठान तर दुसरीकडे स्वर्गवासी ब्राह्मणांचे शांतिपाठ असे कार्यक्रम एकाच वेळेस सुरु झाले. एव्हढे करून ही पर्जन्याचे अद्याप नाव नाही. राज्यावर मोठे अरिष्ट आलेले आहे. यापूर्वी दक्षिणेत माणसे विकत नव्हती. हल्ली किसान लोक धडधाकट पोरे विकून गुजराण करू लागले आहेत. कर्नाटकात घोड्यांचा संहार झाला, यामुळे शिलेदार लोक भिकेस लागले.
नागेश्वर मंदिर,पुणे
(दुष्काळावर मात करण्यासाठी म्हणून)नोव्हेंबर महिन्यातील एका पत्रात इंग्रजांकडून पुण्यामध्ये धान्य आणल्याची नोंद आहे. या पत्रात लिहिले आहे,' हल्ली अवर्षणामुळे चहूकडे महागाई झाली आहे. मुंबईहून इंग्रजांकडील धान्यसाठा आणविला. ते धान्य जुनाट होते. त्यामुळे ते खाणाऱ्या माणसांना व घोडयानासुद्धा त्रास होतो. (१९७१च्या सुमारास हिंदुस्थानात सुद्धा असाच दुष्काळ पडला असता अमेरिकेने देखील दयाळू वृत्तीने (?) असेच अत्यंत निकृष्ट प्रतीचे अन्नधान्य पुरविले होते याची काही लोकांना आज सुद्धा आठवण असेलच).आता इंग्रजांचे बोलणे आहे की मराठ्यांनी एक वर्षाचा काळ आम्हास द्यावा. शहरात आमच्या हुकूमाशिवाय कोणी धान्याची विक्री करू नये. तेव्हा सरकारातून सुरुवातीला ही गोष्ट मान्य केली गेली. लोकांना नियमित लागणाऱ्या अन्नधान्याची यादी तयार लिहिलेली आहे. त्यानंतर इंग्रजांची अट लक्षात घेऊन कारभाऱ्यांचा फेर विचार पडला की इंग्रजांशी असा व्यवहार करू नये.
दुष्काळाच्या या संकटसमयी इंग्रजांनी मराठ्यांना अन्नधान्याची मदत देण्याचे कबुल केले होते पण त्या बदल्यात धान्याच्या एकाधिकार व्यापाराची अट घालून आपला दुष्ट असा व्यापारी स्वार्थ साधायचा प्रयत्न करून बघितला होता. इंग्रजांनी त्यासमयी पेशव्यांना सांगितले की आम्ही अन्नधान्याची मदत करायला तयार आहोत, पण पुढे एक वर्षभर आमच्याशिवाय (राज्यात) कोणी अन्नधान्याचा व्यापार करू नये. या व्यवहारांमध्ये इंग्रजांची कोती व्यापारी दृष्टी दिसून आली व साहजिकच पेशव्यांनी या व्यवहाराला मान्यता दिली नाही.
संदर्भ : पेशवे दप्तर खंड २४ वा (चूक भूल देणे घेणे)
संकलन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment