छत्रपती सूत्र आणि स्वराज्य समजायचं असेल तर शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यमय घटना बाजूला ठेवून त्यांच सेनापती, प्रशासक, पालक,लोककल्याणकारी राजा म्हणून रूप नेमक कस होत ते पाहायला लागतय.
मध्ययुगीन काळात सरदारांच्या, बादशाहांच्या पदरी असलेल्या सैन्याचे दोन प्रकार असत. अंगरक्षक वगैरे स्वरूपाचे कायम सैनिक आणि लष्करी मोहिमेवर जाणारे तात्पुरते सैनिक. हे तात्पुरते सैनिक मोहिमांचा काळ वगळता उरलेल्या काळात शेती किंवा आपापला परंपरागत व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे. मोहिमांच्या काळातही त्यांच उत्पन्न प्रामुख्याने लुटीचा वाटा हे असायचं.या मोहिमांमध्ये लढाया कुणामध्ये झाल्या तरीही रणभूमी स्थानिक असायची , सामान्य लोकांची घरदार, शेतीवाडी जाळणे हेही ठरलेलं असायचं.
शिवाजीराजे जिजाऊ साहेबांच्या सोबत पुण्यात प्रथम आले तेव्हा मुरार जगदेवाने पुण्याच्या वेशीत पहार ठोकून त्यावर चप्पल बांधलेली होती, गाव उध्वस्त केलेलं होत. हि उध्वस्त झालेली गाव, शेती पुन्हा रांगेला लावण हे महत्वाच होत.
शेतीला रानटी जनावरांचा उपद्रव होऊ नये म्हणून जंगली जनावर मारणार्यांना बक्षीस दिली. या मोहिमेतून अनेक धाडसी मावळे स्वराज्याला मिळाले. शिवाजीराजांनी स्वतः नांगर धरून जमीन शेती वहितीला आणली हे प्रतीकात्मक झाल, त्यापूर्वी मातोश्रींनी शेतकऱ्यांना अभय देऊन शेतीसाठी अवजार पुरवली, अनेक वर्षे शेतीतून उत्पन्न नसल्याने शेतसारा माफ करून उत्पन्न आल्यावर भरायला परवानगी दिली, बियाण पुरवल.मग शेती वहितीला आली तशी गाव वसली आणि सुबत्ता आली. हि आलेली सुबत्ता टिकवायला शेतकऱ्यांना दुष्काळात मदत केली गेली, त्यांना शेतसारा माफी दिली गेली. पाण्याची व्यवस्था करायला विहिरी, बारवा बांधल्या.
शिवाजी राजांनी सैनिकांना पगार सुरु केला, एवढच नव्हे तर सैन्याने आपल्याला लागणार धान्य, भाजीपाला, जळणासाठी लागणारा लाकूडफाटा हे सगळ स्थानिक लोकांकडून पैसे देऊन विकत घ्याव अशी सक्त ताकीद दिलेली होती. स्थानिकांना या किरकोळ का होईना व्यापारातून पैसे मिळायला लागले. राज्यासाठी लागणारे झाड मालकाला विनंती करून योग्य मूल्य देऊनच विकत घेऊन कापावे हे आज्ञापत्र स्वयंस्पष्ट आहे.
दिलेरखान आणि जयसिंग जेव्हा सामान्य रयतेची घर आणि शेत जाळून नष्ट करायला लागला तेव्हा केवळ प्रजेचा विचार करून कारकिर्दीत सगळ्यात मोठा पराभव पत्करणारा राजा वेगळाच.
छत्रपतींचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे स्त्रियांच्या बद्दल असलेल स्पष्ट धोरण.
रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा , हिरकणीचा केलेला सन्मान आणि दक्षिणेत सरदार स्त्रीची विटंबना झाली म्हणून आपल्या सरदाराना केलेली शिक्षा. जिंकलेल्या प्रदेशातील शत्रूच्या स्त्रियांना कुठलाही त्रास होणार नाही याची हमी देणारे आदेश आणि सैनिकांनी त्याची केलेली अंमलबजावणी. या राजाच्या राज्यात आपल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत हा विश्वास सामान्य कुटुंबाला मिळणे हि फार मोठी बाब होती. कायदा ,सुव्यवस्था कठोरपणे राबवल्याने लोकांना आपण सामान्य असलो तरी न्याय मिळताना सामान्य शेतकरी , नागरिक आणि वतनदार यांच्यात भेद केला जात नाही याची खात्री लोकांना पटली. हा राजा आपला आहे हे कृतीतून शेतकऱ्यांना समजल म्हणून शिवबा आणि शंभूबाळ अस प्रेमाने म्हणायला लोक घाबरली नाहीत.
हे राज्य आपल आहे हे शतकानुशतके कुणाच्या तरी राजवटीच्या जोखडाखाली निमुटपणे जगणाऱ्या रयतेला वाटण हा छत्रपती शिवाजी राजांचा सगळ्यात मोठा विजय. हीच सामान्य माणसांच्या मनातली प्रेरणा औरंगजेबाला इथल्या मातीत २७ वर्षे लढूनही पराभूत करायला कारणीभूत ठरली.
याआधीही आणि नंतरही शेकडो वर्षांच्या इतिहासात सेनापती, राजा लढाईत मेल्यावर सगळ सैन्य हाय खाऊन पळून पराभूत झालेलं जगाने पाहिलेलं होत मात्र दोन छत्रपती दहा वर्षाच्या आतमध्ये मृत्यू पावलेले असताना सैन्याने आणि रयतेने नेटाने झुंज देऊन आलमगीर म्हणवणारा बादशहा धुळीला मिळवला हा अभूतपूर्व विजय फक्त स्वराज्याच्या प्रेरणेचा. ज्या काळात मुगल साम्राज्यात आणि सगळ्याच भारतात राज्यासाठी बाप पोराला ,पोरगा बापाला अटकेत टाकून गादी बळकावत असताना मावळे मात्र आपल्या राजाच्या स्वप्नासाठी प्राण ओवाळून टाकत होते.
शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणारा राज्यकर्ता लोकांच्या जमिनीवर, संपत्तीवर नव्हे तर मनावर राज्य करतो.म्हणूनच शिवाजी महाराज हे नाव युगपुरुष म्हणून ओळखल जात.
सध्याच्या काळात हे जास्त प्रकर्षाने जाणवतय महाराजांनी माणसांना नेमक कस उभ केल ते.
जिथे सरकार नावाची संस्था सगळ काही करेल आणि आपण मात्र बाजूला काठावर बसून गंमत पाहू अशी मानसिकता असलेल्या काळात राज्यासाठी लोकांनी प्राण दिले हे कदाचित लोकांना समजणार नाही आणि समजल तरी पचणार नाही , झेपणार तर नाहीच नाही.
राष्ट्र मोठ होत ते सामान्य माणसांनी राष्ट्राला आपल म्हणून त्याच रक्षण करायला कृती केल्याने.
आजच्या काळात रक्षण करायला कुणाला ढाल तलवार घेऊन लढायला जायचं नाही तर हि लढाई आपल्याच मनात दडून बसलेल्या प्रवृत्तीशी आहे.
राष्ट्राची संपत्ती , राष्ट्राचा लौकिक, बौद्धिक संपदा हि आपलीच असून तीच जबाबदार नागरिक म्हणून वागून आपल्या कृतीने रक्षण केल तर ती वृद्धिंगत होईल हाच धडा आजच्या दिवशी घ्यायला हवा.
अन्यथा फक्त पुतळे उभारून ,स्मारक उभारून सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सगळ विसरून गेलो तर मग उपयोग नाही.
हि समज सगळ्यांना असेल तर कृतीत यावी , नसेल तर समज यावी ह्या शुभेच्छा !!
जोवर भारतातल्या माणसांच्या मनात रयतेच्या कल्याणकारी राज्याची आस आणि संकल्पना जिवंत राहील, जोवर इथल्या माणसांच्या मनात माणुसकी ,कणव, बंधुभाव राहील तोवर शिवाजी महाराज हे नाव मनामनात कायम राहील.
महाराष्ट्राच्या ह्या मानबिंदू आणि मार्गदर्शकाला मानाचा मुजरा, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आनंद शितोळे
No comments:
Post a Comment