विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 February 2024

छत्रपती शिवराय

 


छत्रपती शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असे असाधारण व्यक्तिमत्व जे पुन्हा कधीच जन्मास येणार नाही आणि तसे कोणी होणार सुद्धा नाही. छत्रपती शिवाजीराजे हे केवळ राजेच नव्हते तर ते तमाम रयतेचे मायबाप होते, आया बहिणींचे रक्षणकर्ते होते, मराठी मुलुखाचे सर्वतोपरी हित जपणारे होते, शेतकऱ्यांचे बळीराजा होते, सर्व धर्माचे रक्षणकर्ते व आदर करणारे होते, रयतेच्या धनसंपत्तीचे रक्षणकर्ते होते, अन्यायाचे कर्दनकाळ होते, आईच्या शब्दाचे पालन करणारे होते. त्यांच्यात स्वराज्याची जिद्द होती आणि त्यांनी ते स्वबळावर उभारले सुद्धा!
सर्व जातीजमातींना सन्मानाने वागणूक देऊन त्यांनी तळागाळातील सर्व जाती जमातीच्या युवकांना स्वराज्याचे शिलेदार बनवले. आपला मराठी मुलुख वाचला तर सर्व काही वाचेल या विचारांनी गडकिल्ल्यांची निर्मिती आणि संवर्धन करणारे ते होते, भविष्यातील संभाव्य धोका ओळखून वेळीच त्याची उपाययोजना करणारे ते दूरदृष्टीचे प्रतीक होते, अफाट मुघल सैन्यासमोर निधड्या छातीने स्वराज्याची सिंहगर्जना करणारे ते होते. म्हणूनच तर त्यांना जाणता राजा म्हणून सर्व विश्वात संबोधले गेले आणि आज पण ते सर्व विश्वाच्या विद्यापीठात संशोधनाचे विषय होऊन बसले आहेत.
काय होतं असं या जाणत्या राजाजवळ? का होते ते जाणता राजा? हे खालील मुद्यांवरून स्पष्ट होते.
उत्तम संघटन कौशल्य:
शिवाजी राजांना त्यांच्या बालपणीच उमगले होते की मराठे राजे हे मुघल दरबारी नतमस्तक झाले आहेत आणि त्यांच्या आधीन राहूनच ते आपला राज्य कारभार चालवत आहेत, म्हणून ते कधीच मुघल साम्राज्याच्या विरोधात जाणार नाहीत; त्यामुळे नवीन संघटन करणे गरजेचे आहे. या स्वराज्याच्या लढ्यात मुघल साम्राज्यासमोर संघटन उभारणे सहज शक्य नव्हते आणि त्यांना कोणतेच मराठी सरदार पाठिंबा देणार नाहीत हे महाराज पुरते जाणून होते. म्हणून त्यांनी तळागाळातील सर्व जाती जमातीच्या तरुणांना एकत्र करून स्वराज्याची कल्पना देऊन “मावळा” असे संबोधून त्यांची मोट बांधण्याचे काम केले. ज्यांना कोणी कधीच कसलीच किंमत दिली नाही, कसले महत्त्व दिले नाही अश्या दुबळ्या समाजाला सुद्धा त्यांनी हातात तलवार देऊन स्वराज्याचे शिलेदार बनवले, त्यांची फौज तयार केली. या फौजेत त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पेरले. त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी निष्ठेचे बळ दिले आणि स्वराज्यासाठी भारावून गेलेल्या मावळ्यांना त्यांनी नेतृत्वाची झालर देऊन स्वराज्याच्या शामियाना उभारला. कोणत्याही पशू-पक्ष्याची बळी न देता स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा म्हणून त्यांनी सर्व मावळ्यांचा विश्वास संपादन केला. हे सर्व त्यांनी त्यांच्या उत्तम संघटन कौशल्याने साक्षात घडवून स्वराज्याचा पाया रचला.
उत्तम दृष्टिकोन:
कोणतेही संघटन निर्माण झाले तर त्या संघटने समोर पारदर्शी दृष्टिकोन असायला पाहिजे हे राजे बखुबी जाणत होते. म्हणून त्यांनी स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, आपले राज्य, मराठी मुलुखाचे राज्य निर्माण करण्याचा दृष्टिकोन आणि ध्येय त्यांनी सर्व मावळ्यांमध्ये निर्माण केले. आपल्या मायभूमीचे जतन करण्याचा, आपल्या आया बहिणींच्या आब्रूचे आणि तमाम रयतेचे रक्षण करण्याचा दृष्टिकोन त्यांनी सर्व मावळ्यांना पटवून दिला. गंगेच्या पवित्र पाण्यासारखे पवित्र असणाऱ्या या दृष्टीकोणाला सर्वच मावळ्यांनी प्राणपणाची साथ दिली. राजे जाणून होते की संघटनेत शुध्द दृष्टिकोन असणे महत्वाचे असते.
उत्तम व्यवस्थापन:
एकदाका एखादी संघटना, फौज एका उद्देश्याने वव दूरदृष्टीकोनाने निर्माण झाली तर ती टिकून राहण्यासाठी त्याचे व्यवस्थापन उत्तमोत्तम असायला हवे हे राजे जाणत होते. म्हणून त्यांनी आपल्या फौजेमध्ये चोख व परखड व्यवस्थापन निर्माण केले. व्यवस्थापनाची निर्मिती करताना क्षमतेनुसार निवड करण्याची कसोटी पणाला लागते आणि ती कसोटी राजे उत्तम प्रकारे जाणत होते. प्रत्येकाच्या अंगी असलेले कौशल्य ओळखून त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांनी जबाबदारीचे वाटप केले. युध्दात पटाईत असणाऱ्या मावळ्यांना स्वराज्याचे शिलेदार तर केलेच शिवाय उतम जेवण बनविणारे होते त्यांना खानसामा बनविले, उत्तम सोंग आणणाऱ्यांना गुप्तहेर बनिविले, उत्तम लोहार काम करणाऱ्यांना हत्यार निर्मितीची जबाबदारी सोपवली, अश्या अनेक प्रकारे त्यांनी जबाबदारीचे वाटप करून त्यांनी पदनिर्मिती केली. कारण ते जाणून होते की जबाबदारी बरोबर जर पद बहाल केले तर पद धारण करणारा त्या जबाबदारीचे ओझे आनंदाने आणि मोठ्या निष्ठेने पार पडतो. म्हणून आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा महाराजांचे व्यवस्थापन एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे.
समय सूचकता:
महाराजांकडे वेळेचे नियोजन आणि समय सूचकता अगदी बिनचूक होती. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात पारंगत होते. वेळेनुसार संकटावर मात करण्याचे नियोजनाचे कौशल्य त्यांच्याकडे अचूक होते. त्याची प्रचिती म्हणजे आग्र्याहून सुटका असो, अफजल खानाचा वध असो की शाहिस्तेखानाची फजिती असो यावरून दिसून येते. निसर्गाने जे आपल्याला वेळेनुसार दिले आहे त्याचा पुरेपूर उपयोग त्या वेळेस करून घेतला पाहिजे या विचाराचे महाराज होते. म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व चढाया आमावसेच्या काळ्याकुट्ट अंधारात यशस्वी केल्या, मुसळधार पावसाचा फायदा घेत पन्हाळ गडावरून ते सुखरूप निसटले. कोणत्या समयास कोणती कामगिरी कोणत्या शिलेदरास दिली पाहिजे हे महाराज पुरते जाणून होते आणि याच बिनचूक समय सूचकतेच्या कौशल्यावर महाराज नेहमी यशस्वी राहिले.
उत्तम रणनीती:
महाराजांची रणनीती अगदी उत्तोमोत्तम होती. महाराज जाणत होते की उघड्या मैदानात आपण तोकडे सैन्य व हत्यार घेऊन अफाट मोघल सैन्याचा सामना करू शकत नाही म्हणून त्यांनी “गनिमी कावा" ही रणनीती अवलंबली होती. गनिमी काव्यानेच त्यांनी मुघल सल्तनत दणाणून सोडली होती, जेरीस आणली होती. अचानक गुप्तपणे येवून आक्रमण करणे, शत्रू सैन्यात संभ्रम निर्माण करणे, शत्रू मध्ये पळापळ आरडाओरडा निर्माण करून त्यांना चकवा देवून त्यांची दिशाभूल करणे, लढाईत सर्व प्रथम शत्रूचा दारूगोळा नष्ट करणे किंवा काबीज करणे, जेथून अवघड वाट आहे शत्रू कधी अश्या वाटेचा विचार करणार नाही अश्या अवघड वाटेने गड सर करून हल्ला करणे, गुप्तहेरांकडून अचूक माहिती मिळवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोपनियता ही छत्रपतींची रणनीती होती. याच रणनीतीने आपण यशस्वी राहू हे महाराज जाणून होते .
उत्तम संदेशसेवा:
संदेशसेवा यालाच आपण आज माहिती व तंत्रज्ञान असे म्हणतो. परंतु याची सुरुवात छत्रपतींच्या काळातच त्यांनी सुरू केली होती. त्यांची संदेशसेवा त्या काळात सुद्धा अती जलद होती. संदेशसेवे साठी त्यांनी अत्यंत तरबेज असे स्वार नेमले होते जे वाऱ्याच्या वेगाने संदेश पोहचवण्याचे काम करत होते. या खेरीज गुप्त संदेश पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी त्यांनी बहुरूपी, दरवेशी, गोसावी, गोंधळी अश्या जमातीतील हुशार युवकांची फळी त्यांनी आपल्या सैन्यात निर्माण केली होती. केवळ हाताच्या बोटांच्या इशाऱ्यावरून गोंधळी शत्रूच्या गडाची अचूक माहिती देत असे. दूरवरचा इशाऱ्याचा संदेश तर महाराजांना धुरावरून मिळत असे. गवत पेटवून त्याचा धूर मोठ्या प्रमाणात केला जात असे त्या वरून एका गडाची माहिती दुसऱ्या गडापर्यंत ताबडतोब पोहचत असे व तश्याच पध्दतीने ती माहिती पुढील गडापर्यंत पोहचवली जात असे व शेवटी माहिती महाराजांपर्यंत येत असे. यात धुरांचे प्रकार असतं. काळा धूर, पांढरा व पिवळा धूर असे आणि या धुरांचे वेगवेगळे संकेत असत. शिवाय सांकेतिक भाषेत पत्र पाठवून संदेश पोहचवण्याचे महत्त्वाचे कार्य बिनचूक होत असे. महाराज जाणून होते की उत्तम संदेशसेवा स्वराज्याला संजीवनीच ठरणार आहे.
उत्तम सुरक्षा यंत्रणा व शस्त्र निर्मिती:
छत्रपती पूर्णपणे हे जाणून होते की सैन्याला लढण्यासाठी उच्च प्रतीचे शस्त्र आणि त्याच बरोबर त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा असणे गरजेचे आहे म्हणून त्यांनी स्वराज्यातच शस्त्र निर्मितीचे उद्योग निर्माण केले, शस्त्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून ती हलकी व मजबूत केली. तलवारीचे वजन कमी केले जेणे करून ती अती चपळाईने फिरवता येईल, त्या तलवारीने बावन्न कला खेळता येतील याची काळजी घेतली. ढाल, तोफा, दारूगोळा यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली. काही निवडक शस्त्रे त्यांनी पर मुलुखातून आयात केली. पोलाद व लोखंडाचे ओतीव काम करण्यासाठी कारखाने उभे केले. स्वराज्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यासाठी त्यांनी मजबूत तटबंदी, दारूगोळा, धान्याची कोठारे, पिण्याचे पाणी, सांडपाण्याचे नियोजन केले. शिवाय धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाला मानसन्मान सोबत योग्य मोबदला अशी सर्व सुरक्षा कवचे त्यांनी निर्माण करून आपल्या मावळ्यांना सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण केला. गड गेला तरी चालेल पण माणूस गमावता कामा नये असे त्यांचे धोरण होते. म्हणूनच तर त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे मावळे त्यांना लाभले.संरक्षणावर खर्च करताना त्यांनी कधीच आकडता हात घेतला नाही. उलट संरक्षणावर त्यांनी राजकीय खजाना नेहमी रिताच केला होता. कारण ते जाणून होते की मावळे सुरक्षित तर आपले स्वराज्य आणि रयतेचा खजिना सुरक्षित राहील.
उत्तम पाणी व्यवस्था:
महाराजांनी त्या काळात पाण्यावर खूप नियोजन व नियंत्रण ठेवले होते. गडावर पाणी बाराही महिने उपलब्ध राहण्यासाठी त्यांनी गडावर पडणारे पावसाचे पाणी गडावरच अडवून ते तेथेच जिरवण्याची योजना निर्माण केली होती. गडावरच मोठं मोठे बाव त्यांनी निर्माण केले होते. त्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून त्या काळात सुध्धा अंतर्गत भुयारी गटारे, नाले यांचे नियोजन करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. शिवाय स्वराज्याच्या खर्चातून दुष्काळ निवारण योजना त्यांनी रयतेसाठी राबवल्या. राज्याच्या खर्चातून त्यांनी संपूर्ण राज्यात शेतीला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घेतली होती. अनेक ठिकाणी बंधारे निर्माण केले होते. आजपासून साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराजांनी पाण्याचे महत्त्व जाणले होते
उत्तम शेती व्यवस्थापन:
शेतकरी हाच रयतेचा खरा पोशिंदा आहे आणि तो सुखी तरच राज्य सुखी हे महाराजांनी वेळीच हेरले होते. म्हणून त्यांनी शेतकरी आणि शेती यास प्राधान्य दिले होते. शेतकऱ्यांसाठी गडावर बाजारपेठा निर्माण करून त्यांनी शेतमालाला बाजार उपलब्ध करून दिला होता. दलाल आणि सावकार यातून शेतकऱ्यांची सुटका करून त्यांना जणू नवे जीवनच त्यांनी दिले होते. सावकारी पाश काढून त्यांनी शेतजमिनी शेतकऱ्याच्या नावे केल्या, वारसाहक्काने शेतजमिनी मिळाव्यात म्हणून आणेवारी सुरू केली, ज्यांना शेतजमिनी नाही अश्या भूमीहिन जाती जमातींना त्यांनी इनामी शेतजमिनी दिल्या, वतनवारीने सुध्धा जमिनी दिल्या, शेतजमिनीत सर्व वारसांना समान हक्क त्यांनी प्रधान केला, कोणत्याही मावळ्याने शेतकऱ्यांकडील शेतमाल फुकटात घेऊ नये व शेतमालाचे नुकसान करू नये असा वटहुकूम त्यांनी जारी करून राज्यातील बळीराजा सुखी केला होता. दुष्काळात स्वराज्यातील संग्रहित धान्य देऊन त्यांनी शेतकरी बिकट परिस्थितीसुद्धा आनंदी ठेवला होता. धान्याचे कोठार ठीक ठिकाणी उघडून त्यांनी एक प्रकारे धान्य बँक स्थापित केली होती. कारण ते जाणून होते की दुष्काळात हीच कोठारे तमाम रयतेस व स्वराज्यास संजीवनी ठरणार आहेत.
उत्तम न्यायव्यवस्था:
आपल्या स्वराज्यात कोणावरही अन्याय होऊ नये हा महाराजांचा स्पष्ट हेतू होता. त्यासाठी न्यायव्यवस्था पारदर्शी व निपक्षपाती असली पाहिजे म्हणून न्यायव्यवस्था त्यांनी पूर्णपणे स्वत:च्या अखत्यारीत ठेवली होती. न्यायासाठी दरबारात स्वतंत्र न्यायनिवडा करण्यासाठी वकील आणि प्रत्येक गुन्ह्याची काय सजा द्यायची याची घटनाच त्यांनी निर्मित केली होती. सर्व प्रांतात न्यायनिवाड्याचे आधिकार प्रधान करून तशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून न्यायाचे जाळे त्यांनी अगदी तळागाळापर्यंत पोहचवले होते. शिवाय एखादी व्यक्ती जर त्या न्यायाने समाधानी नसेल तर त्यास राजदरबारात दाद मागण्याची मुभासुध्धा बहाल करण्यात आली होती. आज त्याच धर्तीवर न्यायदानाचे काम अगदी स्थानिक न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालले आहे. आज सुद्धा न्यायप्रविष्ठ राजा म्हणून सारे जग छत्रपतींचा आदर करत आहेत. शिवशाहीतील ही लोकशाही आज सुध्धा संपूर्ण देशात आनंदाने नांदत आहे. लोकशाहीचा पाया महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वीच घातला होता असे जाणते महाराज होते.
भविष्यातील धोक्याचे नियोजन:
महाराज नेहमी दूरदृष्टीने विचार करायचे. भविष्यात आपल्याला काय धोका होऊ शकतो, कोणाकडून दगाफटका होऊ शकतो, कोणत्या दिशेने शत्रू हल्ला करू शकतो याचा अभ्यास करूनचमहाराज योग्य उपाययोजना करीत असत. म्हणून त्यांनी गडकिल्ले अगदी भक्कमपणे उभारले होते. त्यांची डागडुजी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. स्वराज्यास संभाव्य धोका ओळखून त्यांनी अनेक नवे गडकिल्ले निर्माण केले होते. परकीय मुलुखाचा गनीम समुद्रीमार्गे येऊ शकतो म्हणून त्यांनी सागराच्या छाताडावर भक्कम असे दुर्ग उभारून सागरालाही कवेत घेतले होते. केवळ सागरावर दुर्ग उभारून काहीच होणार नाही म्हणून त्यांनी सागराला वेसण घालण्यासाठी जहाज बांधणीचे कारखाने उभारले. स्वतःचे आरमार निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराज. केवळ आरमार उभारले नाही तर त्या आरमारावर पुरेसा दारूगोळा आणि स्वराज्यात निर्माण केलेल्या तोफा सज्ज केल्या. काही वेळेस आयात करून स्वराज्यात दाखल केल्या. येणाऱ्या प्रत्येक वाटेवर टेहळणी बुरुज तयार केले. मराठी मुलुखास केवळ समुद्रमार्गे धोका आहे हे छत्रपतींनी तीनशेपन्नास वर्षापूर्वीच जाणले होते जे आज सत्य साबित होत आहे. कसाब नावाचा आतंकवादी याच मार्गाने आला हे जिवंत उदाहरण आहे.
स्त्री सन्मानाचा आदर्श:
भारतातीलच नव्हे तर जगातील छत्रपती महाराज असे एकमेव राजे आहेत की ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही की नासली नाही की नाडली नाही. महाराजांची शिकवण होती की स्वराज्य आया बहिणींच्या रक्षणासाठी आहे आणि याच स्वराज्यात जर तिचा अपमान होत असेल, तिच्यावर अन्याय होत असेल तर ते स्वराज्य काय कामाचे? त्यांनी स्त्रीला नेहमी उच्च व आदर्श दर्जा दिला मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून का होईना. त्यांनी जेथे जेथे छापे टाकले तेथे केवळ धन हस्तगत केले पण स्त्रिधनाला त्यांनी कधीच हात लावला नाही की कोणाला हात लावू दिला नाही आणि असे कृत्य करणाऱ्याला त्यांनी कधीच दया दाखवली नाही. आपल्या आईच्या पदरात स्वराज्य टाकणारा एकमेव राजा म्हणजेछत्रपती शिवाजी महाराज.
विस्तार:
स्वराज्य नुसतेच स्थापन करून चालणार नाही तर ते विस्तारले पाहिजे. या स्वराज्याच्या सीमा रुंदावल्या पाहिजेत, या स्वराज्याचे पडघम दूर दूरवर निनादले पाहिजेत म्हणून त्यांनी स्वराज्य अगदी गुजरातच्या सुरते पासून कर्नाटकच्या विजापूर पर्यंत आपल्या अभेद सामर्थ्याने प्रस्थापित केले होते. ते जाणून होते की जेवढ्या दूरपर्यंत स्वराज्य विस्तरेल त्यापेक्षा दसपट आपली ख्याती व स्वराज्याची वचक निर्माण होईल.
स्वराज्याचा वारस:
एवढ्या सामर्थ्याने आपण रयतेचे राज्य उभे केले आहे. या रयतेस जपणे आपले कर्तव्य आहे आणि हे स्वराज्य जपण्याचे काम करणारा अगदी सर्वगुणसंपन्न असला पाहिजे, त्यास रयतेची कणव असली पाहिजे, त्यास न्यायनिवडा करता आला पाहिजे, तो युद्धनितीमध्ये पारंगत पाहिजे, तो शिलादरांचा जिव्हाळ्याचा पाहिजे, आया बहिणींच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा पाहिजे, रयतेचा खजिना जपणारा पाहिजे या सर्व कल्पनेतून त्यांनी संभाजी राजेंना तयार केले होते. जणूकाही ते जाणत होते की आपला काळ केव्हाही संपेल म्हणूनच तर त्यांनी त्यांची पूर्ण छबी संभाजी राजामध्ये उतरवली होती.
मृत्यूलाही जाणून घेऊन रयतेसाठी पुढील उपाययोजना करणाऱ्या या जाणत्या राजाला कोटी कोटी मानाचा मुजरा.
माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या सर्वांना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मा. श्री सचिनदादा पवार
अध्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटील युवा आघाडी ब्रिगेड शेतकरी संघटना इंदापूर तालुका
शिवशाही स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र
आधार गृप फौंडेशन NGO

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...