विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

आद्य नाटककार

 

आद्य नाटककार

 

तंजावरचे शाहराज भोसले हे केवळ मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार नाहीत, तर ते तमिळ रंगभूमी आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार आहेत. 

 त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

 नाट्य संमेलन आणि तंजावरचा काय संबंध? आणि ज्यांना मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार म्हटलेय, ते शाहराज राजे भोसले कोण? वाङ्मयाच्या जाणकारांना हा प्रश्न पडणार नाही; पण सर्वसामान्य मराठी मनाला तो प्रश्न पडणार आहे, पडलेला आहे. या कारणामुळे शाहराज राजे भोसले यांच्याविषयी लिहिणे अगत्याचे आहे.

तर थोडे इतिहासात जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगडावर इ. स. १६७४ रोजी झाला. त्यानंतर बरोबर दोनच वर्षांनी तंजावर येथे आणखी एका मराठी माणसाचा राज्याभिषेक इ. स. १६७६ मध्ये झाला. कोण बरे हा मराठी माणूस? तर हा मराठी माणूस म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले. या व्यंकोजींना तीन पुत्र होते. यातला जेष्ठ पुत्र शाहराज उर्फ शहाजीय व्यंकोजीराजे व दीपाम्बा यांचे पुत्र शाहराज इ. स. १६८४ मध्ये राज्यावर आले. शाहराज अत्यंत शूर, राजकार्यधुरंधर, रसिक, कलाभिज्ञ, अनेक भाषाविद, कवी व नाटककार होते; शिवाय ते विविध विषयांवर संस्कृत, मराठी, तेलगू, तमीळ व हिंदी या भाषांत ग्रंथ रचणारे संगीततज्ज्ञ व नृत्यकलेचे जाणकार होते; म्हणून त्यांना ‘दक्षिणेतील भोज’ म्हणून गौरविले जाते. ते ललितकलांप्रमाणे युद्धकला व राजकारण यातही अत्यंत निष्णात होते. त्यांच्या जीवनावर तत्कालीन व उत्तरकालीन अनेक विद्वान कवींनी अनेक काव्यग्रंथ व नाटके लिहिली आहेत. यावरून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाची ओळख पटते.

 शहाजीराजांच्या राजकीय व वाङ्मयीन कर्तृत्वासंबंधी माहिती देणारी बहुविध साधने उपलब्ध आहेत. शाहराज हे रसिक आणि गुणग्राहक असल्यामुळे त्यांनी वाङ्मयीन व कलात्मक प्रवृत्ती जोपासल्या. कवी आणि विद्वानांना आश्रय दिला. त्यांचे संस्कृत, तमीळ, तेलगू, मराठी व हिंदी या भाषांवर प्रभुत्त्व होते. संगीत, नृत्य, नाटक या कलांचे त्यांना विशेष ज्ञान होते. तेलगू ही त्या काळी सांस्कृतिक महत्त्व पावलेली भाषा, तमीळ ही भोवतालच्या लोकांची भाषा व व्रज हिंदी ही उत्तरेशी दुवा जुळवणारी अशी भाषा. मातृभाषा मराठी खेरीज या सर्व भाषांत ग्रंथचरना करण्याएवढी पारंगतता या राजाजवळ होती. ‘पंचभाषाविलास’ हे नाटक त्यांनी पाच भाषांत लिहिले आहे. या नाटकाची कथावस्तू श्रीकृष्ण व त्याच्यावर अनुरक्त असलेल्या चार राजकन्यांवर आधारीत होती.

 शाहराज यांनी १६८४ ते १७११ या काळात २२ मराठी नाटके लिहिली. या शाहराजराजे यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी २२ मराठी, २० तेलगू, एख संस्कृत, तीन हिंदी, एक तमीळ अशी विपुल नाट्यरचना केली. ही सर्व नाटके देवादिकांच्याशी संबंधित असून पौराणिक आहेत व धार्मिक उत्सव प्रसंगी सादर केली जात. शाहराज भोसले हे केवळ मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार नाहीत, तर ते तमीळ रंगभूमी आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार आहेत. शाहराजराजे विद्वान आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारेही होते; याशिवाय ते काव्यभाषाशास्त्राचे अभ्यासक होते. ‘बारामास’ आणि ‘षड्ऋतवर्णन’ ही काव्येही त्यांनी लिहिली असून ‘बारामास’मध्ये सणांची वर्णने आहेत, तर ‘षडऋतुवर्णना’त शृंगाराविषयी लिहिले आहे. वीणावादनातही ते प्रवीण होते. थोडक्यात तंजावरच्या राजघराण्यातील हा पुरूष पराक्रम, विद्वत्ता व रसिकता या गोष्टी मनापासून जपत होता. हे सारे तेव्हा महाराष्ट्रात मराठी मनाला ठाऊकच नव्हते. सांगलीत विष्णूदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ (१८४३) लिहिले त्या आधी दीडशे वर्षे तिकडे तंजावरात मराठी नाटक लिहिले गेले होते. त्याचे प्रयोग घडत होते; 

 (संदर्भ ः मराठी नाटकाची गंगोत्री (संपादन ः डॉ. सरोजीनी शेंडे, १९८६), ‘मराठी रंगभूमीचा उष:काल’ (संपादन ः प्रा. माया सरदेसाई, प्रकाशित १९७२)

 

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...