आतषबाजी हा इराणी-फारसी शब्द आहे. आपला मराठी नाही. मराठीत आपण ह्याला 'अग्निक्रिडा' असे म्हणतो.
इंग्रजीत आतषबाजीला आपण Firework असे म्हणतो.
आतषबाजी, आतस्बाजी, आतिश्बाजी ह्या तिन्ही फारसी शब्दांचा उच्चार भलेही वेगवेगळा असला तरी अर्थ एकच आहे.
दारू हा शब्दही आपला नाही. हा पर्शियन शब्द आहे. मद्य हा आपला हा शब्द आहे. अर्थात इथे दारूकाम हा शब्द आतषबाजीशी संबंधित आहे.
असो.
लोकांनी आपली करमणूक आणी मनोरंजन करण्याकरिता नानाप्रकारच्या कल्पना शोधून काढलेल्या आहेत. आतषबाजी हाही त्यातलाच एक प्रकार आहे. हिलाच जुन्याकाळी 'अग्निक्रिडा' असेही म्हणत.
पुढे जाऊन ह्या अताषबाजीला लोकांनी आपल्या सण उत्सवांनाही जोडले.
काहींच्या मते १२ व्या शतकात तर काहींच्या मते १४ व्या
शतकामध्ये बौद्ध धर्मगुरुंनी चीनमधली आतषबाजीची संस्कृती भारतात आणली असावी. चीन, तिबेट आणि पूर्व आशियातून त्यांनी हे ज्ञान आत्मसात केल असावे.
दिवाळीत आतषबाजी करणे किंवा फटाके फोडणे हे का केले जाते याचे उत्तर आजही मिळालेले नाही. दिवाळीत फटाके फोडण्याची हि परंपरा नक्की कुठे आणि कधी सुरु झाली हे पण निश्चित पुराव्यांच्या अभावी सांगणे अवघडच आहे. दिवाळी सण हा मोठा उत्सवाचा असल्याने लोक मनोरंजनाकरिता आतषबाजी करायला लागले असावेत.
लग्नसमारंभात आतषबाजी करत असा एक जुना उल्लेख आहे.
महत्वाचे: सामान्य लोकांनाही आतषबाजी करता येत असे. १५१८ साली 'दुआर्ते बार्बोसा' नावाचा पोर्तुगीज प्रवासी गुजराथमधून प्रवास करत असताना त्याने एक लग्नाची मिरवणूक पहिली ज्यात सगळे लोक नाच गात होते आणि फटाके (Fire Bomb) फोडून आणी अग्निबाण (Rockets) सोडून ते पाहण्याचा आनंद घेत होते.
ह्यावरून असे दिसते कि 'आतषबाजीने सामान' लोकांना पूर्वी सहज उपलब्ध होत असावे.
अग्नि, ज्वालाग्राही पदार्थ आणी स्फोटक द्रव्याच्या संयोगाने दृष्टीस आनंददायक व मनाची काही वेळ करमणूक करणारी अशी ही आतषबाजीची कल्पना आहे.
इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
हिंदु लोकांच्या चौसष्ट कलांच्या यादीत अग्निक्रीडेचा निर्देश नसल्याने दारुकाम तयार करण्याची कला आपले देशात केंव्हा व कोणी सुरु केली हे निश्चित सांगता येणे कठीण आहे.
बंदुकीची दारु तयार करण्यास जी द्रव्ये लागतात त्याच द्रव्यांत फेरफार करुन आतषबाजीचे प्रकार तयार करतात.
महाभारतात शतघ्नी, युद्धयंत्रे वगैरे शब्द आढळून येतात. परंतु शतघ्नी म्हणजे आधुनिक काळी ज्यास तोफ किंवा मशीन गण म्हणतात त्याच तत्त्वावर तयार केलेले यंत्र होते किंवा कसे ह्याची खात्रीलायक माहिती आपल्यास समजून येत नाही.
आपल्या देशात सुसंगत व विश्वसनीय इतिहास किंवा बखरी लिहून ठेवायचा प्रघात नसल्यामुळे पुष्कळदा आपल्याला कल्पनाशक्तीवरच अवलंबून रहावे लागते.
बंदुकीची दारु, फटाके वगैरे करण्याची कला चिनी लोकांनी प्रथम शोधून काढली व त्यांचेपासून इतर देशांत पसरली असा साधारण समज आहे.
रोमन लोक सर्कशीत दारुकाम उडवीत असत.
ग्रीक लोक समुद्रातील युद्धाच्या वेळी शत्रूच्या जहाजांना जाळण्याकरिता आपल्या जहाजांवर ज्वालाग्राही पदार्थ भरून ती जहाजे पेटवून देऊन शत्रूच्या जहाजांवर आदळून विस्फोट करीत असत. ह्या ग्रीकांच्या कारामतीमुळे शत्रूच्या जहाजांचे मोठे नुकसान होत असे त्यामुळे युद्धप्रसंगी शत्रूची जहाजे ग्रीक जहाजांच्या जवळ जाण्यास घाबरत असत.
लुसियस तारक्युनियस ( Lucius Tarquinius) आणी डियो कसियस (Dio Causas ) या दोन रोमन बादशाहांच्या सन्मानार्थ दारुकाम उडविण्यात आले होते अशी वर्णने आहेत.
तसेच रोमन इतिहासकार क्लाडिअयन (Claudian ) याच्या ग्रंथावरुन असेही दिसते की, चक्राप्रमाणे फिरणारे, व पावसाप्रमाणे देखावा दाखविणारे दारुकाम इ. सनाच्या चौथ्या शतकांत तयार होत असे. समुद्रातील आणी जमिनीवरील युद्धप्रसंगी अग्नीचे गोळे शत्रुसैन्यात फेकण्याची युक्तीही त्या काळी निघाली होती.
ग्रीस, रोम अश्या मुख्य राष्ट्रांचा ह्रास झाल्यानंतर काही काळपर्यंत ही कला युरोपखंडात नामशेष झाली होती. परंतु क्रूसेडर्स (ख्रिस्ती धर्मयुद्धांतील वीर) यांनी पूर्वेकडील लोकांपासून बंदीकीची दारु व इतर स्फोटक द्रव्ये करण्याची कला शिकून आपल्या देशांत त्याची माहिती नेल्यावर पुन्हां युरोपमध्ये आतषबाजीच्या कलेचा प्रसार झाला.
हिंदुस्थानात जसे काही ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी रावणाची मोठाली बांबूची कागदाने मढविलेली चित्रे करुन त्याचे आत दारु घालून त्यास पेटवून देतात त्याचप्रमाणे फ्लोरेन्स वगैरे शहरी सन १५४० पर्यंत बायबलातले काही प्रसंगास साजेल अशा तऱ्हेची लाकडी किंवा कागदी मोठी चित्रे करुन त्या चित्रांत दारु घालून पेटवून देत असत. याच धर्तीवर इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांतही (Festivals) होळ्या किंवा अग्निउत्सव करीत असत.
छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव असलेले दुसरे छत्रपती शिवाजी (टोपण नाव पहिले शाहू छत्रपती) यांच्या काळात आतषबाजीस बरेच उत्तेजन मिळत असे असे तत्कालीन पत्रांवरून दिसून येते. दरबार, लग्नसमारंभ किंवा इतर महत्त्वाचे प्रसंगी आतषबाजीने दारुकाम झाल्यावरच तो समारंभ पुरा झाला असे मानण्याचा प्रघात होता.
*महादजी शिंदे यांनी सवाई माधवरावासाठी 'आतषबाजीची दारूची लंका' दाखविण्याचा एक कार्यक्रम पर्वतीच्या तळ्यावर केला होता. पेशव्याने हा कार्यक्रम पर्वतीवरून पहिला होता.*
पहिल्या शाहू छत्रपतींच्या वेळेस पुण्यात दारुकाम होत असे त्याची यादी मिळाली आहे. त्या माहितीवरुन पहिल्या शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीत सुद्धा या कलेत महाराष्ट्र पाठीमागे नव्हता असे सिद्ध होते. पुण्यात सवाई माधवरावाच्या लग्नाच्या वेळच्या आतषबाजीचे (अग्निक्रीडेचे ) खालील प्रमाणे वर्णन आहे.
तावदाणी रोषणी - यात काचेच्या कमानीस भिंगे लावून त्यात दारुकाम करण्याची व्यवस्था होती.
आकाशमंडळ किंवा तारागण - हे दारुकाम बाणाप्रमाणे असून ते आकाशात उंच फेकल्यानंतर चित्रविचित्र रंगाचे तारे दिसत असत.
नारळी झाडे - ह्यास आग लावल्याबरोबर तोफेसारखा मोठा आवाज होऊन त्यातून रंगीबेरंगी सर्पाकृति देखावे वगैरे निघत असत.
प्रभा चमक - ह्यात फिरती चित्रे असून सोनेरी व रुपेरी रंगांमुळे हे काम फार शोभिवंत दिसत असे.
चादरी दारुकाम, प्रभाचमक, कैचीची झाडे, बादलगर्ज, बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळे, फुलबाज्या, महताफा या खेरीज पुष्कळ प्रकारचे बाण, पांखरे, फुले, झाडे इत्यादि प्रकारची रंगीबेरंगी रोषणाई दिसत असे.
पहिल्या शाहू छत्रपतींच्या वेळेस मराठा साम्राज्यातील आतषबाजीमध्ये जी काही नावे आढळून येत ती अशी होती.
घडेबाजी, भुईनळ, नळा, चंद्रजोत, तारा, चापा, चिचुंदरी, जातीण, पेठी, फुलझाडी, फुलझाड, फुलबाजी, मेहताब, बाजा, चक्र, शिंगर, सुरसुरी, हातनळा, लंका, दारुचा डल्ला वगैरे.
हिंदुस्थानात फटाके हे मुघल घेऊन आले हे पूर्णतः खोटे आहे. मुघलांच्याही पूर्वी हिंदुस्थानात फटाक्यांचा वापर होत असे. कौटिलीय अर्थशास्त्रात एका अत्यंत वेगाने जळणाऱ्या चूर्णाचा उल्लेख मिळतो. हे चूर्ण मोठी आग निर्माण करत असे. ह्या चूर्णाला एखाद्या नळीत घातले तर त्याचा फटाक्यासारखा आवाज येत असे.
गजपती प्रतापरुद्रदेवा लिखित (१४९७-१५३९) संस्कृत ग्रंथ कौतुकचिंतामणी ह्यात कल्पवृक्षबाण, चामरबाण, चंद्रज्योति, चंपाबाण, पुष्पवर्ति, छुछुंदरीरसबाण, तीक्ष्णबाण, पुष्पबाण अशी फटाक्यांची नावे दिलेली आहेत. या ग्रंथात फटाक्यांच्या नावांच्या बरोबर ते तयार करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे घटक यांचीही नावे दिलेली आहेत.
गंधक म्हणजे सल्फर, यवक्षार म्हणजे सल्फेट, अंगार म्हणजे कोळसा अशा विविध रासायनिक पदार्थांची आणि वर्तिका म्हणजे वात, नालक म्हणजे बांबूचा पोकळ तुकडा, अन्नपिष्ट म्हणजे भाताची खळ अशा इतर घटकांचीही नावं दिलेली आहेत.
फटाक्यांतील ज्वलनशील पदार्थ इतके ज्वलनशील नसत कि ते शत्रूला मारू शकतील. अश्या ज्वलनशील स्फोटकांचा पहिला उल्लेख आपल्याला १२७० साली सीरिया देशातील रसायणशात्री असलेले हसन अल रम्माह ( Hasan al-Rammah) यांच्या पुस्तकात आढळून यतो. ज्यात त्यांनी असे लिहिले आहे कि बारुदाला गरम पाण्याने शुद्ध करून जास्त शक्तिशाली विस्फोटक बनवता येते.
हसन अल रम्माह हा खूप भन्नाट अवलिया संशोधक होता. भविष्यात ह्याच्यावर एक लेख लिहील
१५२६ साली काबूलचा सुलतान बाबर याने दिल्लीच्या सुल्तानावर हल्ला केला तेंव्हा बारुदी तोफांच्या आवाजाने घाबरून जाऊन दिल्लीच्या सुलतानाची फौज मैदानातून पळून गेली होती.
औरंगजेबाचा मुलगा दारा शिकोहच्या लग्नातही फटाक्यांची आतषबाजी केल्याची माहिती आपल्याला त्याच्या एका चित्रातून मिळते.
(हे चित्र खाली आहे.)
विजयनगरचा राजा देवराया याच्या राज्यातील महानवमी उत्सवात आतषबाजी करत असत असे इराणचा तीमरुद सुलतान शाह शाहरुख याचा राजदूत असलेल्या अब्दुल रझ्झाक याने लिहून ठेवलेले आहे.
विजापूरचा इब्रामहिम आदिलशहा ह्याने १६०९ साली आपली मुलगी अहमदनगरच्या निजामशहाला दिली होती. ह्या लग्न समारंभात त्याने ८० हजार रुपयांची आतषबाजी केली होती. हि रक्कम त्या वेळेस फार फार मोठी अशी होती.
संत एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरात रुक्मिणीचे कृष्णाशी लग्न करताना वेगवेगळ्या प्रकारची फुलझडी प्रकारातील आतषबाजी केली असे उल्लेख आहेत. या ग्रंथात अग्नियंत्र, हवाई, सुमनमाळा, चिचुंद्री, भुईनळा, हातनळा आणि बाण असे शब्द आलेले आहेत.
मुघलकालीन दिवाळीची माहिती आपल्याला मुघलकालीन पत्रांतून मिळते. लोक आपल्या घरांवर दिवे लावून दिवाळी साजरी करत असत त्यामुळे धर्मवेड्या औरंगजेबाने त्याच्या शासनकाळात दिवाळी साजरी करण्यावर बंदी घातली होती.
फटाक्यांची पहिली फॅक्ट्री १९ व्या शतकाच्या सुरवातीस कलकत्ता येथे सुरु झाली. आपल्याकडे तामिळनाडू मधील शिवकाशी येथील फटाके प्रसिद्ध आहेत. शिवकाशी येथे पी अय्या नादर आणी त्यांचा भाऊ शनमुगा नादर यांनी १९२३ साली अनिल या नावाने फटाक्यांची फॅक्ट्री सुरु केली होती.
आता फटाके सगळीकडे सहज उपलब्ध होतात म्हणून सर्वजण त्याचा आनंद घेतात. पण पूर्वी असे नव्हते. केवळ राजकीय सणसमारंभातच फटाक्याची आतषबाजी पहायला मिळायची.
तर असा हा आतषबाजीचा इतिहास.
साभार सतीश शिवाजीराव कदम, इतिहास अभ्यासक
No comments:
Post a Comment