भाग १
लेखन :शेखर शिंदे
मराठेशाहीच्या उत्तरकाळात कर्तृत्ववान मराठा सरदारांची संख्या बोटावर मोजता येण्यासारखी होती.त्यातही बरेचशे सरदार आपआपली जहागीर व वतने सुरक्षित ठेवण्यासाठीच प्रामुख्याने घडपड करीत होते.त्यांच्या एकंदर वर्तणूकीवरून व कार्यवाहीवरून असे स्पष्ट दिसून येते की त्यांची बांधिलकी,मराठयांच्या राज्याशी नसून ती प्रामुख्याने त्यांच्या जहागिरीशी होती.त्या जहागिरी सुरक्षित ठेवण्यासाठी ते वेळप्रसंगी मराठा राज्याच्या शत्रुशीही संधान बांधण्यास कचरत नसत.परंतु याला अपवाद महादजी शिंदे होते.
मराठा राज्याला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य महादजींच्या हातून घडले नाही. महादजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमा बरोबरच मराठाराज्याबद्दल अढळ निष्ठेमुळे मराठयांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व प्राप्त केले आहे.
पानिपतच्या भीषण रणसंग्रामातून जिवंत परत आलेले महादजी शिंदे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ बनले.त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पानिपतात नामशेष झालेली मराठयांची सत्ता व दरारा उत्तर भारतात पुन्हा पूर्ववत प्रस्थापित केला.माधवराव पेशव्यांच्या समावेत त्यांनी उत्तरेत बजावलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. इ.स१७७२ मध्ये महादजींनी इंग्रजांच्या आश्रयाला असलेल्या बादशहा शहाआलमला दिल्लीच्या तख्तावर पुन्हा आणून बसविले. तसेच पानिपतच्या पराभवाला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या नजीबखान रोहिल्याचा सूड घेऊन पानिपतांतील पराभ वाचाकलंक घुऊन काढला.३० ऑगस्ट १७७३ रोजी झालेल्या नारायणराव पेशव्यांच्या खुना नंत रमराठा राज्यावर जी संकटाची परंपरा कोसळली त्या संकटातून मराठा राज्याला उर्जितावस्थता प्राप्त करून,देण्यासाठी ज्या प्रमुख सरदारांनी अमूल्य कामगिरी केली,त्यात महादजी शिंदे यांचा क्रम प्रथम लागतो.पानिपतच्या आघातातून मराठेशाही सावरते न सावरते तोच मराठयांना इंग्रजांशी युद्ध करावे लागले. इ.स१७७५ - १७८२ या काळात झालेल्या इंग्रज - मराठा युद्धात उत्तरेतील लष्करी धुरा महादजींनी यशस्वीपणे आणि खंबीरपणे सांभाळली.१७ मे १७८२ रोजी झालेल्या सालबाईच्या तहाच्या वाटावाटीत मराठयांतर्फे महादजींनी घेतलेल्या पुढाकारामुळे भारताच्या राजकारणात महादजींची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढला.उत्तर भारतात मराठयांचे वर्चस्व कायम टिकविण्यासाठी दिल्लीवर मराठयांचा अधिकार असणे अत्यंत आवश्यक आहे हे महादजींनी अचूक ओळखले होते.
दिल्ली जर मराठयांच्या आधिपत्याखाली आणावयाची असेल तर माळवा आणि बुंदेलखंडात मराठयांचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे याची जाणीव महादजींना होती. त्यामुळे ग्वाल्हेर व गोहद ही स्थळे हाती,आल्यानंतर महादजींनी आपले लक्ष दिल्लीच्या राजकारणाकडे वळविले. पहिल्या पायरीवर पाय पक्के रोवल्यानंतरच पुढे पाऊल टाकावे अशी महादजींची सावध नीती होती.इ स१७८४ च्या डिसेंबर महिन्यात बादशहा शहाआलम याला सर्वतोपरी सहाय्य देऊन दिल्लीवर मराठयांचे वर्चस्व महादजींनी प्रस्थापित केले व बादशहाकडून " वकील ए मुतालिक हा सर्वोच्च किताव प्राप्त केला. यावरून त्यांची मराठयांच्या त्यावेळच्या केन्द्रीय सत्तेविषयी प्रति निष्ठा प्रकट होते. या अत्युच्च वितावामुळे महादजी पुढे काहीशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली. चमत्कारिक या अर्थान की मुतालिकीचा किताब मिळाला होता. पण त्याच्या अंमलबजावणीचे उत्तरदायीत्व मात्र पूर्णतः महादजींवर होते. शिवाय नानांशी त्यांचे फारसे सूत नसल्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सहाय्य मिळण्याची संभावना कमीच होती टिल्लीच्या बादशहाचा संपूर्ण कारभार करण्याची जबाबदारी यामुळे त्यांच्यावर आली.त्यावेळी पैशाची टंचाई ही त्यांना भेडसावणारी प्रमुख समस्या होती.
साधने अत्यंत अल्प व शत्रु मात्र भरपूर अशी महादजींची मोठी बिकट स्थिती होती.दिल्ली दरबारात मिळालेले मानाचे स्थान व दर्जा यामुळे त्यांना अनेक शत्रु निर्माण झाले,मोगल बादशहा अडचणीत व संकटात आले असता,त्यांना दिलेल्या आश्वासनासाठी महादजींनी आपल्या कर्तव्याला जागून बादशहाच्या शत्रूशी मराठेशाहीच्या परंपरेला शोभेल असा लढा दिला.या प्रसंगी स्वतःचा स्वार्थ न पाहाता बादशहाला शेवटपर्यंत सुरक्षित ठेवून त्यांचे दिल्लीतील स्थान स्थिर राहावे याकरिता त्यांनी कसून प्रयत्न केले;हे करीत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव सतत बाळगली.इंग्रजांशी सलोख्याचे संबंध ठेवून आपण स्वतंत्रपणे उत्तर भारताचा कारभार करावा असा महारजींचा विचार होता असा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो.परंतू हा आरोप निरर्थक आहे.कारण इंग्रज मराठा युद्धात उत्तर भारतात मराठ्यांचे लष्करी आधार प्रामुख्याने महादजीच होते.इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांच्या डोळ्यात सलणारा काटा म्हणजे महादजी. उत्तर भारतात मराठयांची सत्ता महादजींच्या दलावर टिकून आहे हे इंग्रज पुरेपूर ओळखून होते. आणि म्हणूनच पुणे दरबारपासून महादजींना फोडण्याचे प्रयत्न ग.ज.वॉरन हेस्टिाजने अनेकदा केले.पुणे दरबार आणि महादजी यांच्यात फूट पाडून दोहोंनाही दुबळे बनवायचे आणि नंतर दोहोंनाही वेगवेगळे गाठुन खच्ची करायचे ही इंग्रजांची कुटनीती होती.परंतु त्यात त्यांना यश आले नाही.इंग्रजांचे वर्चस्व महादजींना मान्य करायचे असते तर डी - बायन सारख्या फ्रेंच सेनापतीला चाकरीत ठेऊन कवायती लष्कर पदरी बाळगण्याची त्यांना काहीच गरज नव्हती,
प्रथम इंग्रज मराठा युद्धात महादजींच्या कर्तृत्वाचा व लष्करी सामर्थ्याचा परिचय वॉरन हेस्टिाजला झाला होता,एवढेच नव्हे तर महादजी शिंदे ही व्यक्ती मराठा राजकारणात किती महत्वाची आहे याची ओळख वॉरन हेस्टिग्जला पुरेपूर झाली होती.१७ मे १७८२ रोजी महादजी शिंद्यामार्फत ठरलेल्या सालबाईच्या तहानंतर मराठयां विरूद्ध युद्ध करण्याचा विचार सुद्धा महादजी जिवंत असेपर्यंत इंग्रजांच्या मनात गाला नाही,वॉरन हेस्टिंग्ग नंतर मॅकफरसन , लॉर्ड कार्नवालीस , सर जॉन शोअर गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले,त्यांनी सुद्धा मराठयांशी सौम्य धोरण ठेवून मराठयांबरोबर वैमनस्य येणार नाही याची पुरेपूर दखल घेतली व भारतातील कोणत्याही राज्यकर्त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचे टाळले.या प्रमुख इंग्रज अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा विचार केल्यास इंग्रज महादजींना किती वचकून होते हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. यावरून महादजी संबंधी इंग्रजांना वाटणारा वचक दिसून येतो.
सालबाईच्या तहानंतर महादजींच्या उत्तरेच्या राजकारणात आपण हस्तक्षेप करणार नसल्याचे आश्वासन इंग्रजांनी दिलेले होते.तरीही ग.ज वॉरन हेस्टिग्जने आपला खास वकील मेजर ब्राऊन ह्याला इ. स १७८३ च्या अखेरी दिल्ली दरबारात पाठवून बादशहा शहाआलमला आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला.ह्याशिवाय शहजादा जवानबख्ताला लखनौला बोलावून कारस्थान केले. ग.ज. वॉरन हेस्टिगज आणि शहजादा ह्यांच्यात खलबते होत असल्याचे कळताच बादशहाचे धाबे दणाणले.त्यांचे संरक्षण करू शकेल असा महादजी शिवाय दुसरा कोणताही समर्थ लष्करी नेता नसल्याने स्वतः बादशहा दिल्लीहून आग्र्यास आला आणि त्यानी महादजींना लवकर येऊन भेटण्यास निरोप पाठविला.दि.४ डिसेंबर १७८४ रोजी साम्राज्यातील सेवक वर्गाना देण्यात येणारी सर्वश्रेष्ठ पदवी " वकील ए मुतालिक ” त्याने महादजींना प्रदान केली.ह्यामुळे नाना फडणीस,तुकोजी होळकर, हरिपंत फडके यांचे मन महादजीं विषयी कलुपित झाले,ह्या पदावर महादजींची नियुक्ती झाल्यानंतर अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले.महादजींची मुख्य अडचण आर्थिक होती,त्यामुळे त्यांना अनेक मोहिमा हाती घ्याव्या लागल्या दि२७ मार्च १७८५ रोजी त्यांनी आग्र्याच्या किल्ला जिंकला दि २० नोव्हेंबर १७८५ रोजी अलीगडच्या किल्ल्यावर ताबा मिळविला.त्यानंतर महादजींनी दिल्लीचा आणि शिखांचा बंदोबस्त केला, इ.स. १७८५ मधील राघोगडची आणि बुंदेलखंडाची मोहिम महादजींच्या दृष्टीने अतिशय तापदायक ठरली,महादजींनी इंग्रजांकडून बंगालच्या चौथाईची मागणी केल्यामुळे इंग्रज हबकलेच.त्यात महादजींना यश आले नाही ही गोष्ट वेगळी.पुण्याला इंग्रजांचा वकील नेमण्याकरिता महादजींचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. त्यात इंग्रजांना यश येऊन मॅलेटची नियुक्ती झाली.पुणे दरबार हे मराठा सत्तेचे त्यावेळचे केंद्रस्थान.तेथे मॅलेटने आपला जम व्यवस्थित बसविल्यामुळे लवकरच पुणे दरबाला इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले,त्या प्रमाणात साहजिकच महादजी जवळील इंग्रज वकीलाचे महत्व कमी झाले,मॅलेटने महादजीविरुद्ध नानांना प्रोत्साहनच दिले,आर्थिक अडचणींना तोंड देवून बादशहाच्या शासनाची घडी महादजींनी मोठया कौशल्याने बसवून दिली,आलेल्या संकटाला न डगमगता त्यांचे निवारण करण्याची विलक्षण कसोटी महादजींमध्ये होती,आपल्या शांत आणि समतोल स्वभावाने महादजींनी स्वबळावर शत्रु मित्रांवर मात केली,ह्यामुळे महादजींची कीर्ति उत्तर भारतात सर्वत्र पसरली,ग.ज.वॉरन हेस्टिग्ज महादजी विषयी आपले मत व्यक्त करतात की
"महादजी हा कपटी व पाताळयंत्री आहे,तो इंग्रजांचा व अर्काटकर यांचा अत्यंत द्वेष करतो ; असे पुष्कळ लोक मला सांगतात.पण महादजी विषयी हे बिलकूल खरे वाटत नाही.माझा त्यांचा एवढया वर्षाचा संबंध आहे त्यात लबाडीचे एकही उदाहरण मला आढळले नाही.गोहदचा राणा लबाड होता.शेवटी उगाच अविश्वास दाखवून शिंद्यास आपण दुखवू नये असे मला वाटते,इग्रज मराठयांचे शत्रु , एका मुत्सद्दी व्यक्तीने आपल्या शत्रुविषयी व्यक्त केलेल्या वरील मतावरून महादजींचा थोरपणा व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.
इ स१७८२ - १७९४ या कालखंडातील महादजी इंग्रजांच्या संबंधाचा सूक्ष्म अभ्यास केल्यास असे आढळून येते की,महादजींचे इंग्रजांशी संबंध सीमित होते.त्यात महादजींचा प्रमुख उद्देश मराठा हित हे होते.महादजी व्यक्तीचा विरोध करीत नव्हते तर मराठयांच्या बाबतीत विरोधी कारवायांचा खरा विरोध करीत होते,इंग्रज व महादजी एकमेकांना मनातून भीत असल्यामुळे कोणताही निर्णय घेतांना प्रथम परस्परांच्या बळाचा योग्य विचार दोघेही करीत होते.महादजी इंग्रज संबंध वरून सलोख्याचे वाटायचे परंतु तेवढेच आतून तीव्र शत्रुत्वाचे होते; हे अगदी सत्य आहे. जगातील बुद्धिमान व राजकीय मुत्सद्दी म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या व्यक्तीचे कोणत्याही स्तरावरील संबंध पाहता आपणास हेच लक्षात येईल की त्यांचे परस्पर विरोधी संबंध बाहांगाने तीव्र कधीच नसतात,महादजी शिंदे मराठे शाहीतीलच नव्हे तर त्या काळात संपूर्ण हिंदुस्थानात इंग्रजांना शह देणारे एकमेव प्रभावी व सामर्थ्यशाली मुत्सद्दी होते.
महादजी व इंग्रज यांच्या संबंधाचा आढावा घेतल्यास महत्वाची बाब प्रखर पणे जाणवते ती ही की जेव्हा महादजी इंग्रज संबंध आले त्याकाळी इंग्रजांनी हिंदुस्थानातून आपले पूर्ण उच्चाटन न होऊदेता आपले स्थान कायम ठेवले. याउलट इंग्रजांसारख्या परकीय शक्तीचा व्याप वाढत असताना महादजींनी पतनाच्या गर्तेत जाणाऱ्या मराठेशाहीला बाहेर काढून पुनर्जीवन दिले.मराठा साम्राज्याच्या सभोवताल इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूचा संचार असताना सुद्धा मराठेशाहीला हिंदुस्थानात कायम ठेवण्याचे महान कार्य महादजींनी केले.महादजींच्या मृत्यूनंतर मराठयांचे स्वातंत्र्य अल्पावधीतच नष्ट होऊन मराठेशाही नष्ट झाली,खरोखरच महादजींच्या मृत्युमुळे मराठा साम्राज्याचे भरून न निघणारे नुकसान झाले. महादजींचा मृत्यू हा निश्चितच मराठेशाहीला व तिच्या हिताला त्या काळात आणि भविष्यकाळातही अत्यंत दुःखद ठरला ह्यात शंका नाही.
महादजींच्या मृत्यूपासून मराठा सत्तेच्या ऱ्हासाला सुरूवात झाली.महादजी जर पुढे ५ ६ वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त जगले असते तर इंग्रजांचे कूट डावपेच इतक्या अल्पावधीत यशस्वी ठरले नसते आणि मराठेशाहीचा अस्त इतक्या लवकर झाला नसता,डी - बायन या फ्रेंच सेनापतीला आपल्या नोकरीत रूजू करून आधुनिक पद्धतीचे कवायती सैन्य महादजींनी तयार केले. पारंपारिक पद्धतीची लष्करी व्यवस्था इंग्रजांविरूद्ध लढा देण्यास असमर्थ आहे म्हणून आधुनिक पद्धतीची कवायती लष्कर व्यवस्था मराठेशाहीत पाहिजे,अशी दूरदृष्टी असलेले आणि परिस्थितीनुरूप यथायोग्य निर्णय घेणारे पहिले दूरदृष्टीचे मराठा सरदार म्हणजे महादजी शिंदे होते.रजपूत राजांवर मराठयांची खंडणी पहिल्या बाजीरावांच्या वेळेपासून बाकी राहिली होती,इ स १७६९ पासून रजपूत राजांनी बादशहा शहाआलमला द्यावयाची खंडणी दिलेली नव्हती,या दोन्ही रकमा वसूल करण्याचा हक्क वकील - ए - मुतालिक हे नायबगिरीचे पद मिळताच महादजींना सहाजिकच प्राप्त झाला, तो बजावल्याखेरीज महादजींचा अधिकार खऱ्या अर्थाने,प्रस्थापित झाला नसता. बादशाहीत महादजींचे स्थान स्थिर व्हावे अशी रजपूत राजांची मुळीच इच्छा नव्हतो,आर्थिक संकटातून सुटका होण्याकरिता महादजींना जयपूरवर आक्रमण करावे लागले, इ स १७८६ च्या मार्च ते जून महिन्यातील महादजींच्या जयपूरवरील आक्रमणापासून जयपूर राज्यांचे संरक्षण मुख्यतः खुशालीराम बोहरामुळे झाले.
महादजींनी आपले दुसरे आक्रमण जयपूरवर मार्च १७८७ मध्ये केले,रावराजा प्रतापसिंग व खुशालीराम बोहराच्या स्वार्थी धोरणामुळे महादजींना २८ जुलै १७८७ रोजी रजपुतांशी युद्ध करावे लागले,जयपुरच्या प्रदेशात महादजींचा पराभव करून जोधपूर राज्य सुरक्षित ठेवणे हे जोधापूरचा राजा विजयसिंगाचे मख्य ध्येय होते,महादजी विरूद्ध दोन हात करण्याकरिता जोधापूरच्या विजयसिंगानी जय्यत तयारी केली,"पाटील बावांचा मुख्य उद्देश जमिनी जप्त करण्याचा आहे,त्याकरिता त्यांनी खेचीवाडा व गोहद या दोन राज्यांचा नाश केला,जर जयपूरही नष्ट केले तर त्यांची दृष्टी आपल्याकडे वळेल,त्यांचा पराभव होणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला शांती व सुरक्षितता लाभणार नाही,असे आवाहन विजयसिंगांनी लहान मोठया रजपूत राज्यांना केले,या आवाहनाचा योग्य परिणाम झाला,स्त्रीवेष धारण करून नृत्य ' गायनात वेळ घालविणारा व आपले नशीब आपल्या सरदारांच्या स्वाधीन करणारा जयपूरचा राजा सवाई प्रतापसिंग एका वर्षापूर्वी जयपूर राज्यांच्या संरक्षणास असमर्थ ठरला होता. परंतु यावेळी जवळ जवळ ५० हजार सैन्यानिशी महादजींना जयपूरच्या प्रदेशातूनच नव्हे तर दिल्लीच्या राजकारणातूनही दूर करण्याचा दृढ संकल्प त्याने केला होता,
इ स१७८७ मध्ये झालेल्या लालसोटच्या युद्धातून महादजींना माघार घ्यावी लागली, लालसोटवरील महादजींची पिछेहाट त्यांच्यातील शौर्याच्या अभावामुळे झाली नव्हती.तर त्यांच्याकडील साधनांच्या तुटवडयामुळे,फितुरीमुळे व मोगल सैनिकांच्या विश्वास घातकीपणामुळे त्यांची पिछेहाट झाली,रजपूत संबंधात महादजींनी टोकाची भूमिका घेतली नाही तर कार्यवाही करण्यास त्यांनी आवश्यकतेपेक्षा अधिक घाई केल्याचे दिसून येते. कारण त्यावेळची परिस्थिती कोणत्याही प्रकारच्या लष्करी कार्यवाहीकरिता अनुकूल नव्हती,महादजींना आपल्या कुटुंबियांच्या हत्येचा सूड घेण्याची घाई झालेली असल्याने ते विलक्षण अस्वस्थ होते,लालसोट येथुन घेतलेल्या यशस्वी माघारात महादजींचे शहाणपणच दिसून येते.शेवटी महादजींनी दि २० जून १७९० पाटण आणि १० सप्टेंबर १७९० रोजी झालेल्या मेडत्याच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून लालसोटच्या अपयशाचा कलंक धुवून काढला,गेलेली सत्ता आणि प्रतिष्ठा त्यांनी स्वयंप्रयत्नांनी परत मिळविली हे उल्लेखनीय आहे.
क्रमशः..
No comments:
Post a Comment