मराठ्यांच्या इतिहासातील महादजींच्या कर्तृत्वाचा आढावा
भाग २
महादजींच्या उत्तर भारतातील कामगिरीचे मूल्यमापन एक राजकारणी कूटनीतीज्ञ म्हणून महादजींना त्यांच्या जयपूरवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या इच्छेबद्दल दोष देता येणार नाही. कारण नजीबखान रोहिल्यानेही यापूर्वी अशीच इच्छा व्यक्त केली होती,महादजींनी लालसोट येथे धैर्याने तोंड दिले असले तरी त्यांना घ्याव्या लागणाऱ्या माघारीमुळे महादजी विषयी रजपूतांना वाटणारी भीती मात्र नष्ट झाली,रजपुतांना महादजींच्या अडचणीची जाणीव झाली होती. म्हणून त्यांनी महादजींना लालसोट येथे कोंडीत पकडले होते,लालसोटच्या युद्धातून महादजींनी माघार घेतल्यामुळे उत्तर भारतातील त्यांचा प्रभाव व प्रतिष्ठा बरीच ओसरली,मोगल सैनिकांचा विश्वासमात,वेलंगणा सैन्याचा विद्रोह व आर्थिक संकट या सर्व संकटाला मोठया धैर्याने तोंड देत आपल्या संपूर्ण सैन्यासह व सामानासह लालसोटच्या रणभूमीवरून सुरक्षितपणे माघार घेण्यात महादजींचे युद्धनीती कौशल्य दिसून येते.याकरिता महादजी शिंदे प्रशंसेला पात्र ठरतात.महादजी रजपूत संबंधात आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाना फडणीसांनी महादजी रजपूत संघर्षात विशेष रूची दाखविलेली नाही,रजपूत संबंधात नानांनी टोकाची भूमिका घेवून स्वतःला अधिक न गुंतविण्यासंबंधी सरदारांना ( शिंदे - होळकर ) सूचना दिल्या होत्या,या सूचनेचे तुकोजी होळकरांनी पालन केल्यामुळे व त्यांनी तडजोडीचे व हस्तक्षेप न करण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे तुकोजी होळकर रजपुतांमध्ये महादजी पेक्षा जास्त लोकप्रिय झाले होते,महादजींनी लालसोटच्या लढाईत माघार घेतल्याचा कलंक धुवून काढण्यात यश प्राप्त केले. जोधपूरचा राजा विजयसिंगावर इ स १७९० मध्ये पटना व मेडता येथील युद्धात निर्विवाद विजय मिळविला आणि जयपूरकरांना नमविले,त्यामुळे रजपुतांवर मराठयांचा प्रभाव पूर्ववत कायम झाला,अर्थातच राजपुतान्यातील मराठयांची गेलेली प्रतिष्ठा पुनः महादजींनी परत मिळविली,या ठिकाणी दुसरी बाब स्पष्ट होते ती अशी की,इ स १७९० मधील पाटण व मेडता येथील युद्धामागे रजपुतांचा उद्देश महादजींची प्रदेशांची मागणी नाकारण्याचा असला तरी आंतरिक उदेश दिल्लीतील महादजींच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा होता कारण रजपुत स्वतःला उत्तरेतील राज्यकारभारांचे आधारस्तंभ म्हणवून घेत होते व महादजींचे प्रभुत्व नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होते,वास्तविक पाहता महादजींनी रजपूतविषयक जे धोरण अवलंबिले होते ते चुकीचे होते,असे नाही कारण ४० वर्षापूर्वी मराठ्यांनी जे कार्य हाती घेतले होते तेच कार्य महादजींनी शेवटास नेले,रजपूत स्वतःला मोगल बादशहाचे मनसबदार म्हणवून घेत होते,परंतु महादजींनी बादशहाला आपल्या मुठीत ठेवून कार्य प्रमुख म्हणून कारभार सुरू केला होता,त्यामुळे रजपुतांच्या भावनांना धक्का बसला,महादजी रजपुतांशी मोगल सम्राटाचा हस्तक या नात्याने वागत होते,नेमके हेच रजपुतांना सहन झाले नाही, त्यामुळे रजपूत महादजी संघर्ष अटळ होते,रजपूत राजे विशेषतः जयपुर व जोधापुर येथील शासक आपल्या भूतकाळातील वैभवांच्या आठवणी विसरले नव्हते,एके काळी ते उत्तरेचे मालक होते,अजमेर हे त्यांच्या वैभवाचे प्रतीक,अजूनही ते अस्तित्वात होते, म्हणूच जोधपूरच्या विजयसिगानी अजमेरवर आपले नियंत्रण कायम ठेवण्याकरिता शक्य तेवढे प्रयत्न केले,किंबहुना त्याकरिता आपले सर्वस्व पणाला लावले,लालसोट पासून ते पाटण,मेडत्यापर्यतचे युद्ध हे अजमेर करीताच लढल्या गेल्याचे दिसून येते,जयाप्पा शिद्यांना अजमेर करिताच प्राण गमवावा लागला,या दृष्टीने विचार केल्यास पाटण व मेडत्याचे युद्ध अपरिहार्यच होते असे दिसून येते,महादजी रजपूत संबंधाने आणखी एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे शिंदे - होळकर यांच्यातील मतभेद अधिकच वाढले,त्यातही विशेष म्हणजे शिंदे-होळकर यांच्यातील मतभेदाचे रूपांतर शत्रुत्वात झाले,लालसोटवरील माघारामुळे महादजी संकटात सापडले होते,महादजींच्या मदतीसाठी इ स १७८७ मध्ये नाना फडणीसांनी अलीबहादर आणि तुकोजी होळकरांना उत्तरेत पाठविले होते,त्या दोघांनी महादजींच्या वाढत्या प्रतिष्ठेला व वर्चस्वाला आळा घालण्याच्या दृष्टीने कार्य केले,तुकोजी होळकरांनी अलीबहादरांना महेश्वरला जवळ जवळ दोन महिने अडकवून ठेवले.परिणामतः महादजींच्या मनात तुकोजी होळकराबद्दल द्वेषाची आणि सूडाची भावना निर्माण झाल्यास नवल नव्हते. तुकोजी होळकर आणि अलीबहादरांच्या विरोधी कृत्यामुळेच रजपुतांचा बंदोबस्त करण्यास महादजींना विलंब लागला,तुकोजींच्या वाटणीच्या मागणीवरून उद्वभवलेल्या कटकटी व गोसावी प्रकरणातील अलीबहादरांची दुरागही भूमिका ; शिवजी विठ्ठल व तुकोजींचा त्यांना असलेला पाठिंबा ; पुण्यावरून नाना फडणीसांनी त्यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे महादजींच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला काही काळ का होईना चांगलाच धक्का लागला, याकरिता प्रामुख्याने नाना फडणीस जबाबदार होते,तिघा सरदारातील मतभेदाचा रजपुतांनी पुरेपूर फायदा घेतला, तरीही महादजी डगमगले नाहीत. लालसोटच्या लढाईतील पराजयाचा वचपा महादींनी इ.स १७९० च्या पाटण मेडत्याच्या युद्धात विजय प्राप्त करून काढला व रजपूतांना धडा शिकविण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
एकंदरीत छ शाहूंच्या उत्तर भारतात आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्णत्वास नेण्याचे, पानिपतातील मराठयांच्या पराभवाचा कंलक दूर करण्याचा व कुटुंबाच्या प्रचंड हानीचा वचपा काढण्याचा महादजींचा उद्देश त्यातच दिल्लीच्या बादशहाचे मुख्य कारभारी या नात्याने रजपुतांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे महादजींचे प्रयल यशस्वी ठरले. तर दुसरीकडे रजपुतांची वैभवशाली परंपरा,यांच्यातील स्वतंत्र प्रवृत्ती व उत्तरेचे अनियंत्रित शासक म्हणून कायम राहण्याची तीव्र इच्छा यामुळे महादजी रजपूत संघर्ष निर्माण झाला,या संघर्षातून स्पष्ट झालेले रजपुतांचे शत्रूविरूद्धचे ऐक्य व आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी दिलेला निकाराचा लढा,उलट मराठा सरदारातील,विशेषतः शिदे - होळकर यांच्यातील उघड झालेली अंतर्गत दुही त्यांचा महादजींच्या कार्यावर व उत्तर भारतातील मराठी सत्तेच्या अस्तित्वावर झालेला अनिष्ट परिणाम या बाबी महादजी शिंदे - रजपूत संबंधातून स्पष्ट होतात. नाना - महादजी स्पर्धा हा महादजींच्या उत्तरेतील कार्याच्या मार्गातील एक मोठा धोंडा होता. केवळ स्वार्थी मत्सरापोटी नानांनी महादजींना पुणे दरबारपासून दूर ठेवले.महादजी हे जर बलिष्ट झाले तर आपले महत्व कमी होईल हा धाक नानांना सतत वाटत असल्याने महादजींना कारभारापासून जितके दूर ठेवता येईल तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.तरीही नानांची कारस्थानी भूमिका महादजी पूर्णपणे ओळखून होते,त्यांच्याशी विरोध करताना एकंदर राज्याचे ज्यात नुकसान होईल असे वर्तन महादजींनी केले नाही,
उत्तरेतील चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता नाना फडणीसांनी अलीबहादरांची महादजींच्या मदतीसाठी केलेली नेमणूक ही दोघातील वैमनस्यात भर टाकणारी बाब ठरली,महादजी शिंद्यांनी अलिबहादरांचे स्वागतच केले,परंतु त्यांच्या कार्याविषयी लवकरच सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते,अलीबहादरांचे वादग्रस्त व्यक्तित्व ठाऊक असूनही नानांनी त्यांना उत्तरेत कायम ठेवले ते महादजींच्या स्वैर कार्यास थोडा पायबंद व्हावा याकरिताच. हिंमतबहादूर गोसावी जादू टोण्याबद्दल विशेष प्रसिद्ध असल्यामुळे त्यांनी अलीबहादरावर आपला प्रभाव निर्माण केला होता,हिंमत बहादूर गोसाव्यांनी जादूटोणा करून आपणास ठार मारण्याचा कट केल्याचा महादजींचा त्यांच्यावर आरोप होता,गोसावी याणे प्रयोग केला तेणे करून शरिरास उपद्रव होऊन दोन तीन महिने शरिर स्वस्थ नव्हते,गोसावी याणे प्रयोग करून आम्हास मारावयाचा विचार केला " महादजींनी आपली माणसे गोसाव्यास पकडण्यास पाठविली,तेव्हा गोसाव्यांनी अलीबहादरांचा आश्रय घेतला. कोणत्याही परिस्थितीत गोसाव्यास महादजींकडे देण्यास अलीबहादर तयार होईना. त्यामुळे गोसाव्यांच्या प्रकरणावरून अलीबहादर महादजी संबंध चांगलेच ताणले गेले,यावेळचे अलीबहादरांचे उद्दाम वर्तन लक्षात घेतले असता त्यांना नाना फडणीसांची फूस असावी हा महादजींचा अंदाज खरा मानावा लागतो,अखेर नानांनी गोसाव्यास महादजींच्या ताब्यात द्यावे म्हणून अलीबहादरास लिहले पण अलीबहादरांनी नानांचीही आज्ञा मानलेली नाही,तेव्हा आपण चुकीच्या माणसावर उत्तरेकडील कामगिरी दिल्याची जाणीव प्रथम नानास झाली,पण त्याबद्दल दोष मात्र त्यांनी महादजींनाच दिलेला आढळतो,नाना-महादजी यात मतभेद असल्यामुळेच नानांनी आपला पाठिंबा अलीबहादराना दिला असा अभिप्राय ब्रिटिश रेसीडेंट पामर यांनी व्यक्त केला आहे,हिंमतबहादूर गोसाव्यांच्या प्रकरणी नानांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा वचपा शिवाजी विठ्ठल,कृष्णराव पवार, माधवराव गंगाधर आदी नाना पक्षीय पंडळीवर महादजींनी काढला आहे, महादजींना दिल्लीच्या बादशाहीत मुखत्यारीने कारभार करण्याची संधी मिळाली,त्यामुळे महादजीकडे भरपूर पैसा असेल अशी नानांची अपेक्षा होती,पण प्रत्यक्षात ती साफ चुकीची निघाली. महादजींची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सदाशिव दिनकरांनी लिहूनही नानांनी महादजींना कोणतीही मदत केली नाही,पुणे येथे बसून ८०० मैल दूर असलेल्या महादजींच्या संकटाचे आकलन नानांना झाले नाही,महादजीपासून कामगिरी तेवढी करवून घ्यावी असे नानांचे धोरण होते,त्यामुळेच नाना महादजींचे वैमनस्य वाढतच गेले.
इ.स १७९२ मध्ये महादजी शिंदे पेशव्यांचे भेटीस पुण्यास आले. महादजींच्या दक्षिण आगमनामुळे नाना - महादजी संघर्ष अखेरच्या टप्प्यास आला यावेळी नाना फडणीसांनी,दुय्यम अधिकाऱ्यावर उत्तरेकडील कारभारांचा व्याप सोडून आपण दक्षिणेत येऊ नये असा सल्ला महादजींना दिला होता.परंतु महादजींनी या नानांच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले, महादजींचा दक्षिणेत येण्याचा खरा उद्देश नानांशी सडकून भांडावे एवढाच होता,असा चुकीचा अर्थ इतिहासकार खरे शास्त्री लावतात,परंतु अलीबहादर आणि तुकोजी होळकरांच्या उत्तरेकडील उपद्व्यापांना कोणी आवर घालणार आहे की नाही ? तरूण पेशवे पण गाजवणार आहेत की नाही ? हे महादजींना सतावणारे खरे प्रश्न होते त्यांची उत्तरे त्यांना हवी होती,पेशव्यांनी बादशाही मरातब वकील - ए - मुतलिकीची वस्त्रे स्वीकारताना नानांनी उपस्थित केलेला मुद्दा तांत्रिकदृष्टया योग्यच म्हणावा लागतो,तथापि महादजींच्या दडपणामुळे यावेळी नानांना माघार घ्यावी लागली,महादजी पुण्यास आल्यापासून दरबाराच्या कारभारात लक्ष घालू लागल्यामुळे नाना त्यांच्यावर नाराज होते,विशेषतः सचिद प्रकरण ,गायकवाड प्रकरण या निमित्तांनी दोघांच्या परस्पर विरोधी भूमिका जग जाहीर झाल्या.
त्याचप्रमाणे सातारकर छत्रपती विषयी नानांनी ठेवलेले धोरण नाना - महादजी मतभेद तीव्र होण्यास कारणीभूत ठरले,मराठा राज्यांचा मालक या नात्याने सातारकर छत्रपती विषयी महादजींना आदर वाटे,नाना फडणीसांनी त्यांची राजकारणातील केलेली दुरावस्था पाहून महादजींना हळहळ वाटे, नानांना नेहमीच मराठा सरदार, छत्रपतींना ताब्यात घेतील अशी भीती वाटत असल्याने नाना, महादजी विषयी विशेष सावध होते,महादजींनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून सातारकर महाराजांना माहुली संगमापर्यंत फिरावयाची मोकळीक करवून दिली,परंतु महादजींना राजदर्शनास जाण्याची परवादंगी मात्र नानांनी कधीही दिली नाही,शिंदे - होळकारांच्या वैमनस्याला नानांनी हेतूपूर्वक जोपासले यात शंका नाही. लाखेरीच्या रणागणावर महादजींच्या अनुपस्थितीतही होळकरांना सडकून मारखावा लागल्याने नानांची महादजींबद्दल भीती जास्तच वाढलेली दिसते. महादजींना जहागिरीचे हिशोब मागणे,भरदरबारात त्यांचा अपमान करणे आदी गोष्टी नानांना शोभणाऱ्या नव्हत्या. उलट नानांच्या या वागण्यामुळे महादजी व नाना यांचे आपसातील संबंध बिघडले व एकमेकांना दुरावले,शिंदे -होळकर यांच्यातील परंपरागत वैरामुळे उत्तरेतील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेली,वास्तविक नानांनी पुढाकार घेवून त्यांच्यातील वैर मिटवणे आवश्यक होते,परंतु नाना फडणीसांनी नेमके उलट केले तरूण पेशवे सवाई माधवरावांना जेवढी कारभारी म्हणून नानांची गरज होती तेवढीच महादजींची होती,पेशवे व हरिपंत फडके यांनी पुढकार घेऊन नाना महादजीत इ स १७९३ मध्ये समेट घडवून आणला,एकमेकास न दुखवता पण स्वतंत्रपणे दोघांनी मराठा राज्याची सेवा करावी असे त्यावेळी ठरले,या दोन पुरूषातील मतभेद संपल्यामुळे मराठा राज्यातील सुवुद्ध सरदार मंडळींना हायसे वाटले,परशुराम भाऊ एका पत्रात लिहितात,
नानांचा शिंद्यांचा ऋणानुबंध चांगला तें स्वच्छतेने आहेत.ते पक्षी सर्व नीटच होईल उगाच आभाळे येतात जातात इतकेच. गोविंदराव काळे नानास लिहितात , “ पत्र पहाताच रोमांच उभे राहून अति संतोष जाला, याचा विस्तार किती लिहू ? श्रीमंतांचे पुण्यप्रतापे करून सर्व घरास आले,प्राप्त झाले,तेणे करून सुलभता वाटली असभ्य गोष्टी घडल्या.त्याचा बंदोबस्त शककर्त्याप्रमाणे होऊन , उपभोग घ्यावे ते पुढेच आहे.ज्या त्या गोष्टी यात मुलूख राज्य प्राप्त इतकेच नव्हे तर देशास्त्र रक्षण धर्म संस्थापना गो - ब्राम्हण , प्रतिपालन सार्वभौम हाती लागणे किर्ती याचे नगारे वाजणे इतक्या गोष्टी आहेत,संशय दूर झाले हे अति चांगले चैन नव्हते आपण लिहल्ल्यावरून चित्त स्वस्थ झाले.
नाना फडणीसांच्या हातून राज्याचा कारभार काढून मराठयांची सार्वभौम सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी व आपण मराठा राज्याचे सूत्रधार व्हावे अशी महादजींची इच्छा होती असाही त्यांच्यावर आरोप करण्यात येतो,परंतु त्यात काही तथ्य नाही,पुण्याच्या प्रशासकीय कारभारात महादजींना पुढारीपण हवे होते,कारण पुढारीगपण हाती नसल्यामुळे लष्करी मोहिमा बिघडतात,नाना प्रकारची संकटे उपस्थित होतात , निरनिराळे सरदार जबाबदारीने काम करीत नाहीत , पैशाचा अपव्यय होऊन राज्याचे नुकसान होते असे महादजीचे म्हणणे होते,परंतु नानांनी महत्वाच्या प्रश्नावर आपले मत घ्यावे राज्यकारभारात अंशमात्र आपल्यालाही भाग मिळावा,नानांनी एकटयांच्या मताने पुण्याला निर्णय घेतू नये अशी महादजींची धारणा होती. एकंदरीत नाना फडणीस व महादजी शिंदे यांचे संबंध हे असे एकमेकांवर अवलंबून असूनही नानांच्या अंतरंगात महादजीविषयी मत्सर ,इर्षा व त्यातून निर्माण झालेली भीती होती.
परंतु दोघांनाही एकमेकांच्या मदतीची गरज शेवटपर्यंत होती म्हणूनच त्यांच्यातील वैमनस्य टोकाला जावू शकले नाही. पेशव्यांची मध्यवर्ती सत्ता दुर्बल झाल्यामुळे कारभारी आणि सरदार यांच्यात तुम्ही श्रेष्ठ की मी ? असा वाद निर्माण झाला या वादामुळे मराठा राज्याचे अतोनात नुकसान झाले यात शंका नाही,महादजींच्या मृत्यूमुळे उत्तरेतील मराठा सत्ताच घोक्यात आली,कावेबाज इंग्रजांच्या राजकारणाला प्रतिशह देण्याची मराठयांची शक्ती महादजींबरोबरच नाहीशी झाली. महादजी जसे रणशूर तसे स्वामीनिष्ठही होते,मराठाराज्याप्रती महादजींची स्वामीनिष्ठा नेहमीच अभंग राहिली,महादजी शिंदे जसे शूरव पराक्रमी होते तसेच ते आपल्या मधुर वाणीने दुसऱ्यांना प्रभावित करीत असत,महादजींचा पराक्रम ,गोड वाणी व समोरच्या व्यक्तीला त्यांच्याप्रती वाटणारा विश्वास यावरूनच बादशहांनी त्यांना आपल्या दरबारात प्रमुख म्हणून तर नेमलेच,परंतु त्यांचे कार्य पाहून त्यांना यार,वफादार , सिपेदार,रूस्तमेहिन्द ,महादजी शिंदे मुंर्जद ,अर्जमंद ,महादजी शिंदे अलीजाबहादर , मुजफरजंग इत्यादी किताव देवून वेळोवेळी महादजींचा सन्मान केला,
संदर्भ :- द ग्रेट मराठा एन जी राठोड
#द ग्रेट मराठा
#स्मृतिदिन विशेष
No comments:
Post a Comment