विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 February 2024

करवीर गादीच्या चौथ्या छत्रपतींचा-छ.संभाजी महाराज( दुसरे)उर्फ आबासाहेब यांचा खून.

 

१६ जुलै १८२१-करवीर गादीच्या चौथ्या छत्रपतींचा-छ.संभाजी महाराज( दुसरे)उर्फ आबासाहेब यांचा खून.
करवीर गादीच्या छ.शिवाजी महाराज (दुसरे) यांनी सन १७६२ ते १८१३ म्हणजे पन्नास हून अधिक वर्षे करवीर राज्याचा कारभार बघितला.एप्रिल १८१३ मध्ये त्यांचे निधन झाले.नंतर २४ एप्रिल १८१३ रोजी त्यांच्या वय वर्षे बारा असलेल्या ज्येष्ठ पुत्र शंभूराजे उर्फ आबासाहेब यांना राज्याभिषेक झाला.
आबासाहेब(महाराज) करवीर राज्याचा कारभार फक्त आठ वर्षे दोन महिने पाहू शकले.त्यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत अनपेक्षित आणि विपरीत प्रकारे झाला.सयाजी मोहिते नावाच्या एका इसमाने व्यक्तिगत पूर्वग्रहातून आबासाहेब महाराजांचा १६ जुलै १८२१ रोजी खून केला.स.मा.गर्गे लिखित करवीर रियासत ग्रंथात आबासाहेबांच्या दुर्दैवी मृत्यूची सविस्तर माहिती दिली आहे.खुनी इसम सयाजी मोहिते कऱ्हाडकर प्रतिनिधींच्या पदरी नोकरीला होता.बाजीराव पेशवे द्वितीय यांनी सन १८११ मध्ये प्रतिनिधीचा सर्व मुलुख आपल्या ताब्यात घेतल्याने त्यांच्या नोकरीत असलेला सयाजी मोहिते कोल्हापुरास येऊन महाराजांच्या पदरी नोकरीस राहिला.महाराजांनी सयाजीला भोगाव आणि केरली हि दोन गावे इनाम दिली होती.काही दिवसांनी महाराजांनी केरली गावातील पाच बिघे जमीन आपल्या एका सेवकाला इनाम करून दिली.सयाजीने महाराजांना सेवकास दिलेली सनद रद्द करण्याचे किंवा त्याची थकीत रक्कम वीस हजार रुपये परत करण्याची मागणी केली.त्याने यासंबंधी महाराजांबरोबर वादही घातले.परंतु सयाजीच्या मागण्यांकडे दरबारातील कुणीही लक्ष दिले नाही.त्यामुळे संतापून तो १६ जुलै १८२१ रोजी आपल्या तीन मुले,एक नातू व अन्य एक इसम घेऊन राजवाड्यात गेला.अचानकपणे ह्या सगळ्या हत्यारबंद लोकांना आपल्याकडे आलेले बघून महाराज विचारणा करण्यासाठी उठले तोच सयाजीने महाराजांचा हात धरून आपल्या अर्जाचा निकाल आताच्या आता लावा असे सांगितले.महाराजांनी सयाजीच्या उद्धट,अरेरावीच्या वर्तनामुळे त्याला राजवाड्यातून हुसकावून लावण्यासाठी आपल्या पहारेकऱ्याना फर्मावले.त्यावेळी झालेल्या झटापटीत सयाजी मोहितेच्या एका साथीदाराने महाराजांवर तमचा(पिस्तुल)झाडले.महाराज जमिनीवर कोसळले,सयाजी जंबिया उपसून त्यांच्या बाजूला बसला होता.काही वेळाने महाराजांचे प्राणोत्क्रमण झाले.
या प्रसंगाविषयी दुसरे पण version,हकीकत आहे.त्यानुसार महाराज अंबाबाईच्या चौकातून जात असताना सयाजी आणि महाराज यांच्यात बोलाचाली होऊन सयाजीचा मुलगा बाबजी ने महाराजांचे मनगट पकडले आणि कट्यार महाराजांच्या कुशीत खुपसली,सयाजी चा नातू भाऊ मोहित्याने महाराजांवर तमचा झाडला.महाराजांचा हुजऱ्या आबाजी भोसले मध्ये आला असता त्याला बाजी मोहित्याने ठार केले.अन्य दोघे मारेकरी महाराजांचा धाकटा भाऊ बुवासाहेब यांस पण मारण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेले.बुवासाहेबानच्या जयसिंग ह्या रक्षकास पण मारेकर्यांनी ठार केले.बुवासाहेब सावध होऊन तेथून निसटून भाऊ महाराज पंडितांच्या वाड्यात गेले.मारेकऱ्यांनी आपली वीस हजार रुपयांची थकबाकी लगेच देऊन टाकावी आणि आपल्या नातेवैकाना अभय द्यावे अशा मागण्या भाऊ महाराज पंडितांकडे केल्या.तसेच जामीन म्हणून काही बड्या असामी पण ओलीस देण्याची मागणी केली.भाऊ महाराजांनी सर्व अटी मान्य केल्या.हे सगळे होईतो आबासाहेब महाराजांच्या जखमेतून रक्तप्रवाह होत होता.महाराजांना ग्लानी येऊन तीन तासांनी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
भाऊ महाराज पंडितांनी सयाजी मोहित्याचे देणे देऊन टाकले व तेथून जाण्यास सांगितले.आपल्या बरोबर भाऊ महाराजांनी पण यावे असा नवीन हट्ट सयाजी ने सुरु केला.शेवटी त्यांचा सदाशिवपंत आबा नावाचा कारकून घेऊन सयाजी रातोरात लैलगडाकडे निघून गेला.हि बातमी राणी साहेबाना कळताच त्यांनी जिवाजीराव खानविलकर व जप्तनमुलुख ह्यांस मारेकऱ्यांच्या पाठलागावर धाडले.त्यांनी येळगुड गावाजवळ मारेकऱ्याना गाठून त्यांना ठार मारून त्यांची डोकी कोल्हापुरात आणली.केर्लीहून मोहितेच्या कुटुंबातील काही माणसाना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले.इतरांना कैदेत ठेवले.
आबासाहेबांच्या खुनाशी संबंधित सर्व लोक ठार झाल्यामुळे त्या कारस्थानात आणखीन कोण कोण सामील होते ते गुलदस्त्यातच राहिले.आबासाहेबाना राज्य करण्यास केवळ नऊ वर्षे मिळाली.त्यातील जेमतेम शेवटची तीन चार वर्षे ते कारभारात लक्ष घालू लागले तोच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...