मराठेशाहीत असंख्य पराक्रमी,धाडसी पुरुषांनी आणि सामान्य सैनिकांनीही आपापल्या शक्ती प्रमाणे स्वराज्य उभारणी,संरक्षणात योगदान दिले.त्यांच्या पुढील पिढ्यांनी पण पूर्वजांच्या पराक्रम,बलिदान,स्वामिनिष्ठा कायम ठेवून मराठ्यांचा भगवा हिंदुस्थानभर प्रदीर्घ काळ फडकवत ठेवला. पवार,भोसले,पांढरे,बंडगर,कोकाटे,देवकाते,कडू,काकडे,थोरात,भट,चिटणीस,प्रतिनिधी आदी घराण्यांच्या पराक्रम आणि स्वामीनिष्ठा यांची इतिहासाने पण दखल घेतली आहे.आजचा काहीसा प्रदीर्घ लेख मराठेशाहीच्या सेवेत सहा पिढ्या खपविणाऱ्या चित्रे उर्फ चिटणीस घराण्याच्या योगदानावर आहे.
चिटणीस घराण्याची पूर्वपीठीका: मराठेशाहीच्या सेवेत असलेल्या चिटणीस घराण्यातील प्रारंभिक व्यक्ती बाळाजी आवाजी चिटणीस हे होय. यांचे वडील आवजी हरी चित्रे (मूळ आडनाव,चिटणीस हा हुद्दा होता.) कोकणात जंजिऱ्याच्या सीद्धीचे दिवाण होते.काही कारणाने आवजी यांच्यावर सिद्दीची इतराजी होऊन त्याने आवजी आणि त्यांचे बंधू खंडोबा यांना ठार मारून आवजींच्या बायकामुलांस मस्कत इथे नेऊन गुलाम बाजारात विकण्याचे आदेश दिले.परंतु आवजी यांना बाळाजी,चिमणाजी आणि श्यामजी अशी तीन मुले होती. आवजींची पत्नी गुलबाईने सिद्दीच्या खलाशांचे मन वळवून त्यांना राजापूर इथे विसाजी शंकर नावाच्या भावाकडे सोडून देण्यास राजी केले.विसाजी मामानी तिन्ही भाच्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन तयार केले. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना राजापुरावर घातलेल्या धाडीच्या दरम्यान पकडलेल्या लोकांत बाळाजी सापडले.मातोश्री गुलबाईनी महाराजांच्या पायांवर लोटांगण घालून आपल्या कुटुंबाची कर्मकहाणी बयान केली. चिटणीस कुटुंबीय आश्रय देण्यायोग्य असल्याची खात्री पटल्यावर महाराजांनी त्यांना आश्रय दिला. इ.स.१६५८ पासून बाळाजी महाराजांचे चिटणीस झाले. चिटणीस हे अष्ट प्रधानातील पद नसले तरी त्याचा राज मंडळात समावेश होता.
१—बाळाजी आवजी चिटणीस: छत्रपती शिवाजी महाराजांकडे इ.स.१६५८ पासून बाळाजी चिटणीशीचे काम पाहू लागले.चिटणीस हा महाराजांचा मुख्य लेखनिक असून राज्यातील सर्व राजपत्रे लिहिण्याचे तसेच आलेल्या पत्रांना उत्तरे देण्याची जबादारी चिटणीसांवर असायची.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापना तसेच विस्तार कार्यात बाळाजी आवजीनी खूप महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांनी ह्या भेटी दरम्यान आपले काही बरे वाईट झाले तर काय करावयाचे ह्याविषयीच्या सूचना मातोश्री जिजाबाई,अण्णाजी दत्तो,बाळाजी आवजी व अन्य मुत्सद्द्यांना देऊन ठेवल्या होत्या.महाराज आग्रा इथे गेले असताना त्यांच्या बरोबर असलेल्या शाही लवाजम्यात बाळाजी आवजी पण होते. औरंगजेबच्या कैदेतून महाराज निसटल्यानंतर औरंगाबाद इथे औरंगजेब पुत्राशी तहाची बोलणी बाळाजी आवजीनीच केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर राज्याभिषेक विधीची माहिती तसेच भोसले कुळाची पूर्वपीठीका जाणून घेण्यासाठी महाराजांनी बाळाजी आवजी यांना उत्तर हिंदुस्थानात-राजपुतान्यात-पाठविले.बाळाजीनी पण आवश्यक ती माहिती जमवून राज्याभिषेकात कुठल्याही तांत्रिक अडचणी,विघ्ने येऊ नये याची व्यवस्था केली.परिणामी महाराजांचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे आणि शास्त्रोक्त रित्या पार पडला.(जून १६७४)हि बाळाजींची अत्यंत महत्वाची कामगिरी होती.राज्याभिषेकानंतर महाराजांनी काढलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत(ऑक्टोबर १६७६) पण बाळाजी आवजी सहभागी होते.
दुःखद शेवट:छत्रपती शिवाजी महाराजांचा अनपेक्षितरीत्या एप्रिल १६८० मध्ये मृत्यू झाला. दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून चार वर्षांनी महाराज महाराष्ट्रात परतले. आपला मृत्यू इतक्या जवळ आल्याचे त्यांना कळले नाही.म्हणून त्यांनी आपल्या उत्तराधिकारी कोण असेल ते ठरविले नव्हते. महाराणी सोयराबाई आणि मंत्री परिषदेतील काही मंत्री संभाजी राजांऐवजी त्यांचे धाकटे सावत्र बंधू राजाराम यांस पुढील छत्रपती बनविण्याच्या मताचे होते. अशा विचाराच्या मंत्र्यात बाळाजी आवजी यांचा पण समावेश होता. छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या मंत्र्यांना पहिल्यांदा माफ केले होते.तरी पण त्यानी छ.संभाजी महाराजांच्या विरुद्ध कारवाया चालूच ठेवल्या.ह्या मंत्र्यांचा दुसरा कट उघडकीस आल्यावर शंभू राजांनी त्यांना देहांत शिक्षा ठोठावली.त्यात बाळाजी आवजी,त्यांचा मुलगा आवजी आणि बंधू शामजी आवजी व इतर दोषी मंडळीना 16 सप्टेंबर 1681 रोजी देहांत शासन दिले.
२-खंडो बल्लाळ: बाळाजी आवजी चिटणीस व अन्य कारभाऱ्याना छ.संभाजी महाराजांनी देहांत शासन दिल्याने त्यांची पत्नी महाराणी येसूबाईना फार दुःख झाले.त्यांनी छ.संभाजी राजांना सुनावले कि,..’ बाळाजी प्रभू मारिले हे उचित न केले. बहुत दिवसांचे इतबारी व पोख्त.थोरले महाराज कृपाळू,त्यांचे सर्व अंतरंग त्यांजपाशी होते. चिटणीस आपले व राज्याचे प्राण ऐसे म्हणत आले. त्याणी अपराध काही केला नाही. लहानाचे सांगण्यावरून हि गोष्ट कशी केली?सर्व कारकून गेले,मारिले,बेदिल जाहले,पुढे राज्य कसे चालेल?.’ शंभू राजांवर महाराणी येसूबाईनच्या बोलण्याचा परिणाम होऊन त्यांनी बाळाजी आवजी चिटणीस यांचा मुलगा खंडो बल्लाळ यास वडिलांच्या चिटणीस पदावर नियुक्त केले.खंडोजी आपल्या पित्याला शंभू राजांनी देहदंड दिला हे माहित असून सुद्धा शेवटपर्यंत छ.संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिले.छ.संभाजी महाराज गोव्यात पोर्तुगीजांच्या मागे लागले होते.मराठ्यांनी फोंडा किल्ला जिंकून पळणाऱ्या पोर्तुगिजांचा पाठलाग सुरु केला होता.ह्यावेळी खंडो बल्लाळ पण छ.संभाजी महाराजांबरोबर होते.मांडवी नदीपार पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोर्तुगीजांनी वाटेतील शेतातले सगळे बांध फोडून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती.अशात ज्या खाडीतून मराठे पाठलाग करत होते त्या खाडीला भरती येऊन पाणी वाढण्यास सुरुवात झाली.वाढत्या पाण्यात छ.संभाजी महाराजांचा घोडा वाहू लागला.कारण लगाम आणि जेरबंद मुळे तो पोहू शकत नव्हता.समस्या लक्षात आल्यावर विद्युतगतीने खंडो बल्लाळनी आपल्या आणि शंभू राजांच्या घोड्यांचे जेरबंद तलवारीने कापून त्यांची तोंडे मोकळी केली,ज्यामुळे हि घोडी पोहून सुरक्षित जागी आली.
संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्त्येनंतर छ.राजाराम महाराजांना महाराणी येसुबाईनी स्वराज्या पासून दूर जिंजी इथे पाठविले.त्यांच्या बरोबर इथून प्रल्हाद निराजी,बहिर्जी घोरपडे,मानसिंग मोरे,केशव पंडित तसेच खंडोजी बल्लाळ यांसारखी स्वामिनिष्ठ माणसे जिंजीला गेली होती.पन्हाळा(२६ सप्टेबर १६८९) ते जिंजी(२ नोवेंबर १६८९) ह्या प्रवासात छ.राजाराम महाराजांच्या सहकाऱ्यानी भयंकर हाल अपेष्टा,संकटे यांना तोंड देऊन छ.राजाराम महाराजांना जिंजीस सुखरूप आणले.त्यांचा जनानखाना मात्र विशालगडावरच होता ज्यात ताराराणी पण होत्या.ह्या सगळ्या मंडळींची जिंजीपर्यंतच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था खंडो बल्लाळ यांनी आपल्या लिंगो शंकर व विसाजी शंकर ह्या मामा द्वयींच्या मदतीने पार पडली. खंडो बल्लाळ यांच्या स्वराज्यासाठीच्या समर्पण वृत्तीवर संतुष्ट होऊन छ.राजाराम महाराजांनी त्यांना दाभोळ प्रांताची सरदेशमुखी दिली. तसेच खंडो बल्लाळ यांना पत्नी वियोग झाल्यावर महाराष्ट्रातून दोन उपवर वधू आणून त्यांच्या बरोबर खंडोजीचा जिंजी मुक्कामी विवाह लावून दिला.औरंगजेबच्या सततच्या दट्ट्यामुळे मोगली सरदार झुल्फिकार खानाने फेब्रुवारी १६९८ मध्ये जिंजीला वेढा घालुन तो ताब्यात घेतला. तत्पूर्वी १६९७ च्या अखेरीस खंडोजी बल्लाळ यांनी झुल्फिकारखानने छ.राजाराम महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांना जिंजीतून सुखरूप बाहेर पडू द्यावे यासाठी बोलणी केली होती.झुल्फिकार खानच्या हाताखाली छ.शिवाजी महाराजांचे जावई गणोजी शिर्के आणि त्यांचा(गणोजीनचा) पुतण्या रामोजी जिंजीस कार्यरत होते. खंडोजीनी गुप्तपणे गणोजी शिर्क्यांची भेट घेऊन त्यांना छ.राजाराम महाराज आणि राजपरिवारातील सदस्यांना सुरक्षितपणे जिंजीतून बाहेर पडू देण्याची गळ घातली.गणोजी यास राजी झाले पण त्यासाठी खंडोजीकडे छ.राजाराम महाराजांनी त्यांना दिलेल्या दाभोळच्या देशमुखीच्या वतनाची मागणी केली.खंडोजीनी ताबडतोब छ.राजाराम महाराजांकडून सनदा लिहून आणून गणोजीना दिल्या.गणोजीनी कबुल केल्याप्रमाणे छ.राजाराम महाराज,ताराबाई,युवराज शिवाजी,राजसबाई आणि राजकन्या सोयराबाई यांना छ.राजाराम महाराजांचे खास विश्वासू सेवक गिरजोजी यादव यांच्या हवाली केले.
औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी मराठ्यांच्या गादीवर हक्क सांगितला.दुसरीकडे छ.राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी यांनी पण मराठ्यांच्या गादीवर दावा केला.मराठे सरदार आणि मुत्सद्दी शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यात विभागले गेले.खंडो बल्लाळ,परशुराम पंत प्रातिनिधी,चंद्रसेन जाधव,हैबतराव निंबाळकर,खंडेराव दाभाडे,परसोजी भोसले,बाळाजी विश्वनाथ इ.मंडळी शाहू महाराजांच्या गटात सामील झाली.छ.शाहू महाराजांना खंडो बल्लाळ यांच्या सारखा दूरदृष्टीचा,समंजस आणि निष्ठावान मुत्सद्दी मिळाल्याने त्यांची बाजू ताराराणीन पेक्षा वरचढ झाली.खंडो बल्लाळ यांचा प्रभाव छ.शाहू महाराजांना माहित होता व ते त्यांचा योग्य तो मान राखायचे.परशुराम पंत प्रतिनिधींचा ओढा अंतर्यामी ताराराणीनकडे होता.शाहू महाराजांकडे आलेला विशाळगडपंतांच्या मुलाने पुन्हा ताराराणीना सोपविल्याचे कळल्यावर छ.शाहू महाराज खूप संतापले.यात परशुराम पंताचाच हात असला पाहिजे असा त्यांना संशय येऊन त्यांनी परशुराम पंतांचे डोळे काढण्याची आज्ञा दिली.खंडो बल्लाळना हि बातमी कळली तेव्हा ते आंघोळ करत होते.ते लगेच उघड्या,ओलेत्या अंगाने धावत दरबारात आले.त्यांनी छ.शाहू महाराजांना मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात परशुराम पंतांच्या योगदानाची माहिती देऊन शिक्षा रद्द करविली.
स्वामिनिष्ठ खंडोजीनचे आयुष्याच्या अखेरीचे दिवस मात्र आर्थिक विवंचनेत गेले.वृद्धापकाळात आंग्रेकडून आपली वतने सोडविण्यास ते कुलाब्याला वर्षभर राहिले.मोठ्या खुशामतीने वतनपत्रे घेऊन साताऱ्याला आले.पण कबूल केल्या प्रमाणे आंग्रे यांनी शब्द पाळला नाही,दहा हजार रुपयांचे देणे झाले,कोणाचे मिंधे राहिले नाही वा स्वार्थ पाहिला नाही,म्हणून दैन्य राहिले...निष्कांचन अवस्थेत त्यांचा २१ सप्टेंबर १७२६ रोजी मृत्यू झाला.
३-४-गोविंदराव आणि रामराव चिटणीस:खंडो बल्लाळ यांच्या नंतर त्यांचा मुलगा गोविंदराव आणि नातू रामराव यांनी पण चिटणीशी केली.पण त्यांच्यावेळी मराठ्यांचे सत्ताकेंद्र साताऱ्याहून पुणे येथे पेशव्यांकडे सरकले होते.छत्रपती रामराजेच नामधारी झाल्याने ह्या दोघांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला नाही.
५-मल्हार रामराव चिटणीस-हे रामरावांचे पुत्र आणि खंडो बल्लाळ यांचे पणतू होय.यांनी चिटणीस बखर ह्या नावाने ओळखल्या जाणारे छ.शिवाजी महाराजांचे सात प्रकरणे असलेले चरित्र १८१३ साली लिहिले.यात छ.शिवाजी महाराजांपासून धाकट्या शाहू महाराजान पर्यंतचा (इ.स.१८०८) पर्यंतच्या घटनांचा उल्लेख आहे. ह्या व्यतिरिक्त रामरावानी छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचे चरित्र नावाच्या आणखी दोन बखरी लिहिल्या.मल्हारराव लिखित बखरींची भाषा शुद्ध,सुबोध आणि ठसकेदार आहे.साहित्यिक अंगाने जरी ह्या बखरी वाचनीय असतील तरी ऐतिहासिक अचूकतेच्या बाबतीत जास्त विश्वसनीय मानल्या जात नाहीत.मल्हारराव हे राघोबा दादांचे परममित्र सरदार सखाराम बापू गुप्ते यांचे जावई होते.त्यामुळे मल्हारराव चिटणीस पण राघोबा दादांच्या गटात असल्याच्या संशयावरून नाना फडणीसांनी इ.स.१७८८ साली त्यांचा सरंजाम जप्त केला होता.इ.स.१७९८ साली महादजी पुत्र दौलतराव शिंदे आणि त्यांच्या सावत्र मातांमध्ये झालेल्या संघर्षात मल्हार रावांचा जैतापूर गावातील वाडा लुटला गेला.इ.स.१८०२ मध्ये मल्हारराव पुण्यात राहत होते.विठोजी होळकरांचे सैन्य ऑक्टोबर १८०२ मध्ये पुण्यावर चाल करून आले.यशवंतरावांनी पुणे घेतल्यावर मल्हारराव चिटणीसांच्या घराण्यावर एक लाखाची पट्टी(दंड)बसवला. यातून कसा मार्ग काढायचा ह्या विवंचनेत मल्हारराव असतानाच यशवंतराव होळकरांनी विनायक अमृतरावासाठी(अमृतराव राघोबा दादांचा दत्तक पुत्र होता,दुसऱ्या बाजीरावाचा सावत्र भाऊ) पेशवाईची वस्त्रे आणण्यास साताऱ्याला पाठवलेल्या मंडळीत मल्ह्रारावाना पण पाठविले.पण यामुळे दुसऱ्या बाजीरावांचा मल्हारराव यांच्यावर कधी विश्वास बसला नाही.कुठलाही राजाश्रय न मिळाल्याने ते कायम दरिद्रावस्थेतच राहिले.बाजीराव द्वितीयची इंग्रजांनी उचलबांगडी करून छ.प्रतापसिंह महाराजांना पुन्हा सातारा गादीवर बसविल्या नंतर मल्हाररावाना बरे दिवस आले.त्यांचा मुलगा बळवंतराव महाराजांच्या मर्जीतला होता.
६-बळवंतराव चिटणीस-यशवंतराव चिटणीस—हे दोघे मल्हाररावांचे पुत्र तथा खंडो बल्लाळ यांचे खापर पणतू होय.छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात यशवंतराव सुमंत पदावर होते तर यशवंत चिटणीस पदावर होते.प्रतापसिंह महाराजांच्या इंग्रज विरोधी लढ्यात बळवंतरावांनी त्यांना तनमनधनाने साथ दिली,त्यांच्यासाठी तुरुंगवासही पत्करला आणि इंग्रजांच्या कैदेत असतानाच प्राणत्याग केला.छ.प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी सप्टेंबर १८३९ मध्ये छत्रपती पदावरून पदच्युत करून डिसेंबर १८३९ मध्ये त्यांची काशी इथे रवानगी केली.छ.प्रतापसिंह महाराजांचा काशिमध्येच ऑक्टोबर १८४७ मध्ये मृत्यू झाला.महाराजांच्या काशी वास्तव्यात पण यशवंत मल्हार त्यांचे चिटणीस म्हणून काम पाहत होते.
चिटणीस घराण्यातील पुढील पिढ्यातील वंशज चिटणीस आडनाव लावून साताऱ्या जवळील बोरगाव इथे स्थायिक झाले.
लेखक-प्रकाश लोणकर
संदर्भ:मराठी रियासत –गो.स.सरदेसाई-खंड १ आणि २
२-मराठ्यांचा इतिहास-संपादक अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे-खंड दोन आणि तीन
३- मंतरलेला इतिहास-ले.हर्षद सरपोतदार
४- करवीर रियासत-ले.स.मा.गर्गे
५-खंडो बल्लाल-श्रीधर पराडकर लिखित हिंदी चरित्र.
६-भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची-ले.पराग लिमये
No comments:
Post a Comment