विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 February 2024

मराठा साळवी घराण्याचा इतिहास.

 


मराठा साळवी घराण्याचा इतिहास.
***साळवी घराण्याच्या उगमाची माहिती**
कोकणात मराठ्यांच्या ९६ कुळीतील सुप्रसिद्ध अशा साळवी कुळाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. आहे. या घराण्याच्या उगमाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. पण इतिहासाच्या कसोटीवर उतरलेला मतप्रवाह मी मांडत आहे. त्याबाबत जाणकारानी आपली मते मांडावीत अशी मी अपेक्षा करतो. संगमा वंशातील हरिहर व बुक्कराय या दोन बंधूनी विजयनगर हिंदू साम्राज्याची स्थापना कर्नाटकात केली हे आता सर्वमान्य झाले आहे.हे दोघे बंधू होयसाळचा (कर्नाटक) राजा तिसरा बल्लाळ याच्या सैन्यात अधिकारी होते.
राजा बल्लाळ तिसरा याच्या मृत्यूनंतर या दोन्ही बंधूनी विजयनगरचे राज्य सांभाळले.सन १३४६ मध्ये संगमा घराण्यातील पाच भावानी मिळून एक मोठा समारंभ करून बुक्करायाला राज्याचा शासक व भावी वारस म्हणून नेमले.पहिला हरिहर राय(१३३६-१३५३) हा राजा विजयनगरच्या सत्तेवर होता. हरिहरानंतर त्याचा लहान भाऊ बुक्कराय (१३५६-१३७७) सत्तेवर आला. नंतर दुसरा हरिहर (१३७७-१४०४ पहिल्या बुक्करायाचा मुलगा)गादीवर आला. दुसर्या हरिहराच्या मृत्यूनंतर प्रथम विरूपाक्ष (१४०४-१४०५) व नंतर दुसरा बुक्कराय (१४०४-१४०६), नंतर पहिला देवराय १४०६-१४२४) हे राजे झाले. नंतर देवराय दुसरा (१४२४-१४४६) हा राजा झाला. याने दुसरा अल्लाऊद्दीन बहामनी सुलतानाचा पराभव केला होता. नंतर दुसर्या देवरायाचा मुलगा वीर मल्लिकार्जुन (१४४७-१४६५) राया सत्तेवर आला. हा अनुभवहीन असल्याने कृष्णा नदीच्या उत्तरेकडील भागात विजयनगर साम्राज्याचे सामंत ( सरदार) असलेल्या साळुवांचा प्रभाव वाढू लागला. पहिला हरिहर ते मल्लिकार्जुन पर्यंत या 'संगमा' घराण्याचे राज्य होते. दुसर्या देवरायाचा पुतण्या विरूपाक्ष (१४६५-१४८५) याने मल्लिकार्जुन राजा व त्याच्या नातेवाईकाना ठार मारून सत्ता काबीज केली.
विरूपाक्ष दुसरा हा भ्रष्ट व कमजोर राजा असल्याने त्याच्या कारकिर्दीत बहामनी सुलतान अदिलशाह तिसर्याचा प्रधान महमूद गावनने विजयनगर साम्राज्यातील चौल, दाभोळ, आणि गोवा ही महत्वाची व्यापारी बंदरे काबीज केली विजयनगर साम्राज्यातील बेळगाव शहर १४७२ साली बहामनी सुलतानाने बळकावले. ओरिसाचा राजा पुरूषोत्तम गजपतीने तिरूवन्नमलैवर आक्रमण केले. या सर्व प्रकारांमुळे विजयनगरचे साम्राज्य कमजोर व असहाय्य झाले होते. तेव्हा विजयनगर साम्राज्यातील सामंत व चंद्रगिरीचा शासक साळुवा नरसिंम्हाने विजयनगर राज्याची सुत्रे हाती घेऊन गेलेले किल्ले व मुलुख परत मिळवला. यावेळी विजयनगर साम्राज्यावर त्याचेच नियंत्रण होते. विरूपाक्षाचा भोंगळ कारभार व दुष्टपणा वाढला होता. त्याने विजयनगर साम्राज्यातील अनेक सरदाराना नाहक मारले. त्यामुळे त्याचाच मुलगा प्रौढ देवराया (याचे नावच प्रौढ देवराया असे होते) त्याचा१४८५ साली खून झाला.
यामुळे विजयनगरचे सामंतराजे एकापाठून एक असंतुष्ट झाले होते व साम्राज्य मोडून पडण्याच्या स्थितीत असताना साळुवा नरसिंम्हाने सर्व सरदाराना विश्वासात घेऊन एकत्र केले व नरसा नायक नावाच्या अनुभवी व पराक्रमी सरदाराला प्रौढ देवरायावर आक्रमण करण्यासाठी विजयनगरला पाठवले. नरसा नायकाने एकापाठून एक प्रदेश पुन्हा जिंकून घेत विजयनगरात प्रवेश केला तेव्हा प्रौढ देवराया पळून गेला. सरदार नरसा नायकाने कोषागार, व प्रशासकीय यंत्रणेवर ताबा घेतला व विजयनगरचा नवीन राजा म्हणून साळुवा नरसिंह याचे नाव १४८५ मध्ये घोषित केले. या साळुवा घराण्याची विजयनगर साम्राज्यावर १४८५ ते १५०३ पर्यंत सत्ता होती. हाच खरा साळवी कुळाचा उगम आहे. आजचे साळवी हे विजयनगर साम्राज्याचे राजे होते.
साळुवा ही एक लष्करी उपाधी (पदवी) आहे. साळुवाचा अर्थ बहिरी ससाणा किंवा गरूड ( गरूडाप्रमाणे पराक्रमी ) असा होतो. १४९० मध्ये साळुवा नरसिंहाचे निधन झाले. त्यानंतर राजा साळुवा तिम्मा (१४९१) हा राजा झाला. त्यानंतर नरसिंगराय दुसरा उर्फ इम्माडी नरसिंहराव उर्फ धम्म तिम्मराय (१४९३-१५०६) हा तिसरा व शेवटचा 'साळुवा राजा' झाला. याच 'साळुवा' पदवीचा अपभ्रंश होऊन 'साळवी' असे आडनाव निर्माण झाले व ते आजतागायत कायम राहिले आहे."साळुव" राजे हे यदुवंशीय(भगवान श्रीकृष्णाच्या कुळातील) असल्याच्या शिलालेख व अन्य स्वरुपातील नोंदी आढळून आल्या आहेत. त्यानंतर नरसा नायक हा ( तुळुवा वंशीय) विजयनगरचा राजा झाला. विजयनगर साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवराय हा नरसा नायकाचा मुलगा होता. त्यानंतर अनेकांनी विजयनगर वर राज्य केले.
शेवटी १५६५ सालात राक्षस तागडी येथील युद्धात विजयनगर साम्राज्य नष्ट झाल्यानंतर याच साळुवा घराण्यातील व्यक्ती बहामनी व नंतर अदिलशाही मुस्लीम सत्तेत सरदार झाले. नंतर सरदारकी करत करत त्यांचा कोकणात प्रवेश झाला, त्याना जहागिर्या मिळाल्या व ते कायमचे कोकणात स्थाईक झाले. फणसोप, कसोप, टेंब्ये, काजुर्ली, मालगुंड, जयगड, वाशी तर्फे संगमेश्वर, नाणीज,जामसूद,असुर्डे व इतर अनेक गावात साळवी कुळांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. "आमचा गांव , आमचा देव" या श्री.गणपतराव सदाशिवराव साळवी यानी संकलित केलेल्या साळवी कुळाबाबत पुस्तकात पृष्ठ क्र. ६३ व ६४ वर विजयनगर येथील त्यांच्या उगमाची माहिती दिली आहे ( खालील फोटो पहावेत) .
त्या पुस्तकाच्या संकलनाच्या वेळी जी माहिती त्याना उपलब्ध झाली होती ती कुळवंशात त्यानी दिली होती. कृष्णदेवरायांवर अस्सल एेतिहासिक साधने, कागदोपत्री पुरावे, व विविध ग्रंथ, शिलालेख, पोर्तुगीज, मुस्लीम लेखक यांच्या लेखनावर आधारित हे नव्याने जे पुस्तक प्रसिद्ध झाले त्यातील साळवी कुळांचा संदर्भ साळवी कुळवंशातील नोंदींशी जुळत असल्याने साळवी हे विजयनगरातून आले या माझ्या दाव्याला साधार पुष्टी मिळते. या साळवी वंशातील 'रवळ साळवी' हा मूळ पुरूष फणसोप येथे स्थाईक झाला. पुढे याच साळवी वंशातील फणसोप येथील पराक्रमी रूद्राजीराव साळवी सरदारानी जिंजीच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला होता. जिंजीच्या लढाईत पराक्रम केल्यामुळे रूद्राजीराव साळवी याना छत्रपति राजाराम महाराजानी १६९६ सालात तेव्हा 'फणसद' नावाने व आताचे फणसोप गाव इनाम दिले होते. याच रूद्राजीराव साळव्यांचे लहान बंधू गंगाजीराव साळवी यानी कसोप गावी जाऊन प्रथम वस्ती केली. म्हणून ते कसोपचे संस्थापक मानले जातात. सर्वप्रथम वस्ती केली म्हणून त्याना 'पहेलून घराणे' असे नाव पडले.यातून पुढे कसोपमध्ये चौसोपी व सातभाय घराणी निर्माण झाली.ही सर्व घराणी एकच आहेत.
विजयनगरच्या पाडावानंतर नायक हे कर्नाटक व लगतच्या राज्यात स्थाईक झाले. नायक, नाईक अशी या क्षत्रियांची आडनावे आज आहेत.
****"*या पोस्टबाबत आपणा सर्व समाजबांधवांचे व साळवी कुटुंबियांचे अभिप्राय कमेंट रूपाने प्रार्थनीय आहेत.
पोस्ट संकलन :- सुरेंद्र माने
संदर्भ : १.श्री कृष्णदेवराय, लेखक : वेंकटेश देवनपल्ली , स्वरूपदीप प्रकाशन, सोलापूर.
२.'आमचा गाव, आमचा देव',
संकलक: श्री. गणपतराव सदाशिवराव साळवी.
(१९९५ आवृत्ती)
३. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्स.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...