तब्बल ८-९ महिने वेढा देऊन प्रचंड नुकसान सहन करत मोगलांनी जून १७०२ मध्ये विशाळगड ताब्यात घेतला. औरंगजेब याने ८ जून १७०२ साली विशाळगडाला भेट देऊन किल्ल्याचे नाव सकरलना असे बदलले. औरंगजेब हा १० जून रोजी विशाळगडावरून पन्हाळगडाकडे परत फिरला.
सव्वा तीन कोसाचा प्रवास करून औरंगजेब हा आंबाघाट येथे आला. पावसामुळे तेथे त्याला सहा दिवसाचा मुक्काम करावा लागला, साकी मुस्तैदखान हा त्यावेळी हजर होता तो म्हणतो " घाटाचा रस्ता उन्हाळ्यात पार करण्यास मोगल सैन्याला जर कित्येक दिवस लागले तर रात्रंदिवस पाऊस पडत असता हा रस्ता पार करण्यास किती काळ लागला असेल याची कल्पनाच केलेली बरी. सामान वाहून नेणाऱ्या जनावरांची स्थिती काय वर्णावी ? लष्करातील बैल गुजरातेत तर गाढव खुरासनात पळून गेले. हत्ती गाढवाप्रमाणे चिखलात रुतून बसू लागले. लष्कराचे सामान माणसांना वाहावे लागले. तुम्ही म्हणाल की, ही माणसे होती. छे, हे तर बिनशेपटाचे बैल आणि गाढव म्हणावे लागतील "
अशी ही मोगल सैन्याची अवस्था, १६ जून रोजी औरंगजेब हा आंब्याहुन निघाला वाटेत त्याला एक ओढा लागला त्याने तो पार केला आणि शेवटी तो मलकापूरला पोहचला, त्याच्या पुढील ओढयावर त्याला पाण्याच्या पुरामुळे अडकून पडावे लागले. पाऊस रात्रंदिवस पडत होता. त्यासंदर्भात २७ जून रोजीची एक नोंद अशी की " काल बादशहाने विचारले, सरदारांपैकी कोणी माझ्या निवस्थानाभोवतीच्या चौकी पहार्यावर आहेत की नाही, उत्तर मिळाले, काही पाहरेकरी सोडले तर कोणी नाहीत. बादशाह चिडून म्हणाला, आम्ही ओढ्याच्या या बाजूला तर आमचे सरदार त्या बाजूला हा काय प्रकार आहे ? "
त्यानंतर काही सरदारांना बादशहाच्या निवासस्थानाभोवती गस्त घालण्यासाठी आदेश देण्यात आले, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ जूनची नोंद पहाण्यासारखी आहे " बादशहाचा मुक्काम सततच्या पावसामुळे व पुरामुळे ओढ्याच्या काठी होता. काल रात्री रहुल्लाखान, हमीदुद्दीखान, सियादतखान, कामयाबखान व मनीमखान हे चौकी पहाऱ्यावर हजर होते. मुदपाकखान्यातुन त्यांना जेवण पाठविण्यात आले. काल रात्री फकिरांनी बादशाहच्या निवासस्थानाभोवती जमून खैरात मोठ्याने ओरडून मागणी केली. बादशहाच्या कानावर तो आवाज आला. बादशाह म्हणाले " कामयाबखान असली कसली गस्त घालीत आहे ? "
औरंगजेबाने या फकिरांना खैरात तर दिलीच नाही उलट गस्त घालणाऱ्या कामयाबखान याची मनसब पन्नास स्वारांनी कमी केली.
याच प्रवासात औरंगजेबाची परिस्थिती किती दयनीय झाली होती यासंदर्भात एक नोंद खूप उद्बोधक आहे. एका कर्मचाऱ्याने बादशहाला विनंती केली की, मला उपास पडत आहेत. घरात एक माणूस मरून पडले आहे. पगार मिळत नाही. पाच महिन्याचा पगार बाकी आहे. पगार मिळाला म्हणजे मुडद्यासाठी कफनाची व्यवस्था करता येईल..
सैन्याला लागणारा खजिना, सामान इत्यादी ब्रह्मपुरी तळावरून हत्तीसह पाठवण्यात आले होते. ४ जुलै १७०२ रोजी औरंगजेब याने हत्तीवरून ओढा ओलांडला पण ओढा ओलांडताना औरंगजेब मरता मरता वाचला. हा ओढा ओलांडताना औरंगजेबाचा एक हत्ती ३००० अश्रफ्या घेऊन येत होता, हा हत्ती पुराच्या पाण्यात अडकला आणि ३००० अश्रफ्या पाण्यात वाहून गेल्या. पाणबुड्या माणसांनी अश्रफ्या शोधण्यासाठी बुड्या मारून पुष्कळ तपास केला पण हाती काही लागले नाही.
वाहून गेलेल्या अश्रफ्या संदर्भात पुढे एक नोंद मिळते, ती नोंद अशी " १६ जुलै रोजी खजिन्याचा अधिकारी फतेह दौलत कौल याने कळविले की, कमाल मुहंमद वैगरे पाच फकिरांनी पाण्यातून अश्रफ्या काढल्या. त्यांनी तीनशे अश्रफ्या एका मशालजीपाशी अमानत ठेवल्या. त्याने आपल्याला ही बातमी दिली. मी फकिरांना पकडून आणले. मशालजीकडून तीनशे अश्रफ्या व फकिरांकडून दोनशे रुपये ही रक्कम काढून घेतली. बादशहाने आदेश दिला की जोपर्यंत सगळ्या अश्रफ्या निघत नाही तोपर्यंत फकिरांना कैदेत ठेवा.
१६८१-८२ साली मराठा स्वराज्य जिंकून घेऊ हे मृगजळ स्वप्न घेऊन दक्षिणेत उतरलेल्या आलमगीर औरंगजेब आणि मोगल सैन्याविरुद्ध मराठ्यांनी तब्बल २६ वर्ष आपल्या चिवटपणाने लढा तर दिलाच पण निसर्गाने आणि सह्याद्रीने देखील औरंगजेबाची अतिशय दयनीय परिस्थिती करून ठेवली होती. फकिरांना सुद्धा खैरात देऊ न शकणारा असा हा स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा बादशाह औरंगजेब !!
- राज जाधव
No comments:
Post a Comment