विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 20 March 2024

#जयसिंगराव_तथा_आबासाहेब_घाटगे

 


#जयसिंगराव_तथा_आबासाहेब_घाटगे
कोल्हापूर जवळ असलेल्या कागल येथील घाटगे हे एक इतिहास प्रसिध्द घराणे. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे कागल जहागिरीचे सुविख्यात अधिपती होते .
आबासाहेबांच्या आई बाळाबाई या कोल्हापूर छत्रपती घराण्यातील होत्या . आबासाहेबांचा विवाह मुधोळच्या राजकन्या राधाबाई यांच्याशी झाला.
आबासाहेबांचे पुत्र यशवंतराव म्हणजेच कोल्हापूर संस्थानचे सुविख्यात अधिपती *राजर्षी छत्रपती शाहू महाराज*
जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे अत्यंत बुध्दीमान , दूरदर्शी व महत्वाकांक्षी होते. दिसायला अत्यंत रूबाबदार व तडफदार होते. कुस्ती , क्रिकेट व मैदानी खेळ याची त्यांना आवड होती.
आबासाहेबांना इंग्रजी भाषा अवगत होती. ते सफाईदारपणे इंग्रजी बोलत असत.
१८८५ साली आबासाहेब इंग्लंडला गेले असताना त्यांना ब्रिटनची साम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया यांच्याशी भेटीचा योग आला. या भेटीत आबासाहेबांचे रूबाबदार व्यक्तिमत्व आणि बुध्दीमत्ता यामुळे प्रत्यक्षपणे राणी व्हिक्टोरिया देखिल प्रभावित झाल्या.
कागल या आपल्या जहागिरीत आबासाहेबांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. वहातुकीसाठी रस्ते बांधले , रस्त्याच्याकडेने सावलीसाठी झाडे लावली , खेड्यापाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे म्हणून विहिरी व तलाव बांधले. लोकांच्या आरोग्यासाठी दवाखाने सुरु केले . त्याकाळात कागल सारख्या छोट्याशा जहागिरीत मुलांच्या शाळांबरोबरच मुलींसाठीही शाळा सुरु करण्याचे मोठे धाडसाचे काम आबासाहेबांनी केले.
यासर्व कामगिरीमुळे एक उत्कृष्ट प्रशासक असा आबासाहेबांचा सर्वत्र लौकिक झाला. कागल या आपल्या जहागिरी साठी आबासाहेबांनी जिवापाड मेहनत घेतली.
या सुमारास कोल्हापूर गादीवर असलेले शिवाजी महाराज ( चौथे ) यांना मनोरुग्ण ठरवून इंग्रजांनी त्यांची रवानगी अहमदनगरला बंदीवासात केली.
छत्रपतींच्या अनुपस्थितीत संस्थानचा कारभार चालवण्यासाठी राजप्रतिनिधी म्हणजेच रीजंटची नेमणुक करण्याचे ठरले. याच सुमारास एक उत्कृष्ट कार्यकुशल प्रशासक असा आबासाहेबांचा सर्वत्र लौकिक झाला होता. तसेच कोल्हापूरच्या राजघराण्याशी त्यांचे जवळचे नातेसंबंधही होते. या कारणांमुळे कोल्हापूरच्या रीजंटपदी आबासाहेबांची नेमणुक करण्यात आली.
परंतु काही दिवसातच शिवाजी महाराज ( चौथे ) यांचा अहमदनगर येथे दुर्दैवी अंत झाला. अशा परिस्थितीत गादीला वारस नसल्याने कोल्हापूर गादी खालसा होऊन नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
परंतु आबासाहेब कोल्हापूरच्या रीजंटपदी असल्याने त्यांनी सर्व परिस्थिती मोठ्या कुशलतेने हाताळलयाने दत्तक घेण्यासाठी परवानगी मिळाली.
कोल्हापूर छत्रपती घराण्याशी रक्ताच्या नात्याने सर्वात जवळचे वारसदार असलेले आबासाहेबांचे थोरले पुत्र यशवंतराव यांची दत्तक‌ वारस म्हणून निवड करण्यात आली. राणीसाहेब आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले. दत्तक पुत्राचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले.
शाहूंचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात झाल्यानंतर आबासाहेबांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी राजकोट येथे पाठवले.
परंतु २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांवर काळाने अचानक झडप घातली . केवळ २८ व्या वर्षी अतिशय तरूण वयात आबासाहेब हे जग सोडून गेले. आपल्याला लाभलेल्या केवळ २८ वर्षाच्या अल्प आयुष्यात आबासाहेबांनी खूपच बहुमोल कामगिरी केली.
आज जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ! 🙏
- अजयकुमार जगताप

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...