सिंदखेडचे जाधवराव व वेरूळचे भोसले ही आपसात नातेसंबंध असलेली निजामशाहीतील दोन मातब्बर सरदार घराणी
लखुजीराजांची कन्या जिजाऊंचा विवाह मालोजींचे पुत्र शहाजीराजेंशी झाल्यामुळे या दोनही घराण्यात नातेसंबंध निर्माण झाले . लखुजीराजे शहाजींचे सासरे झाले तर शहाजीराजे लखुजींचे जावई झाले !
हे दोघेही महान सेनानी निजामशाहीचे आधारस्तंभ तर होतेच परंतु त्याचबरोबर मोगल व आदिलशाहीसाठी त्यांनी मोठी कामगिरी बजावली . लखुजीराजे व शहाजीराजे यांच्या पराक्रमावरच या शाह्यांचे महाराष्ट्रातील सत्ताकारण चालले होते .
या सासरे — जावयांसाठी २५ जुलै हा मोठा घातवारच ठरला !
निजामशहाच्या दरबारात घडलेल्या सरदार खंडागळेंच्या हत्ती प्रकरणामुळे जाधवराव व भोसले यांच्यात वितुष्ट आले होते .
तशातच निजामशहाकडून आपल्याला दगाफटका होणार आहे अशी कुणकुण लागल्याने लखुजीराजे निजामशाही सोडून मोंगलांना मिळाले .
कालांतराने लखुजीराजे पुन्हा निजामशहाकडे आले परंतु निजामशहाकडून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला !
दि . २५ जुलै १६२९ या दिवशी लखुजीराजे आपल्या अचलोजी , रघोजी व यशवंतराव या तीन पुत्रांसह दरबारात निजामशहाच्या भेटीस गेले असता ..... निजामशहा काही न बोलता एकदम दरबारातून उठून आत गेला ... झाल्या अपमानाने लखुजीराजे व्यथित झाले ... व माघारी निघाले !
पण तेवढ्यात ..... ठरल्या प्रमाणे मारेकर्यांनी तलवारी उपसल्या व बेसावध असलेल्या जाधवरावांवर हल्ला केला ! जाधवरावांनीही आपल्या तलवारी उपसल्या , पण ..... तो पर्यंत खूप उशीर झाला होता ... ! लखुजीराजे , अचलोजी , रघोजी व यशवंतराव यांची शव रक्ताच्या थारोळ्यात पडली ! महान सेनानी लखुजीराजेंचा अशारीतीने अतिशय दुर्दैवी अंत झाला ... ! ( दि . २५ जुलै १६२९ )
आज लखुजीराजेंचा ३९४ वा स्मृती दिन आहे .
.
शहाजीराजेंच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आणि त्यादिवशी देखिल तारीख होती .... २५ जुलै ...!
पण शहाजीराजे मात्र यातून सुदैवाने वाचले !
लखुजीराजेंच्या हत्येमुळे शहाजीराजेंनी बंड केले व अदिलशहाच्या ताब्यातील पुणे परिसरावर ताबा मिळविला .
परंतु हे बंड फार काळ टिकले नाही शहाजीराजांना नाईलाजाने मोंगलांची सरदारकी पत्करावी लागली .
इ. स. १६३३ मधे मोगलांनी निजामशाही बुडवल्यानंतर शहाजीराजांनी निजामाचा वारस उभा करून निजामशाही पुनरूज्जिवीत केली व ते कारभार पाहू लागले !
पण राजांचे हे स्वातंत्र्य देखिल फार काळ टिकले नाही ! राजांचा पराभवकरून मोगल व आदिलशहाने निजामाचा प्रदेश वाटून घेतला !
शहाजीराजेंनी आदिलशाहची सरदारकी पत्करली पण मोगल बादशहा शहाजानने आदिलशहाला अट टाकली की शहाजीराजेंना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटक प्रांतात कामगिरीवर पाठवा .
कर्नाटकात शहाजीराजांनी अतिशय कुशल कारभार केला . कर्नाटकातील मांडलिकराजे व प्रजा राजांचा आदर करू लागली शहाजीराजेंशी त्यांचा स्नेह जुळला . राजांना मान मिळू लागला हीच बाब काही असंतुष्टांना खुपू लागली.
बाल शिवाजींनीही याच सुमारास स्वराज्य स्थापनेची वाटचाल सुरू केली होती . त्यामुळे शहाजीराजेंचे वर्चस्व वाढेल या भितीने आदिल शाहीतील दरबारी सरदार , वजीर या लोकांनी शहाजीराजें बद्दल बादशहाचे मन कलुषित केले ! शहाजीराजांना कैद करण्याचा कट रचला गेला !
आदिलशहाचा वजीर मुस्तफाखान हा मोठ्या सैन्यासह विजापूरहून दूर कर्नाटकात शहाजीराजांना भेटण्याच्या निमित्ताने गेला ! भेटीत तो राजांशी खूप गोडीगुलाबीने वागला !
परंतु एके दिवशी रात्रीचे वेळी वजीर मुस्तफाखान , अफझलखान व इतर सरदारांनी शहाजीराजे बेसावध असताना राजांच्या छावणीवर हल्ला करून राजांना कैद केले . यादिवशी तारीख होती २५ जुलै १६४८ !
आज या घटनेचा ३७५ वा स्मृती दिन आहे !
या प्रसंगातून शहाजीराजे सुखरूप सुटले ! या नंतर काही दिवसातच या घटनेचा पुढील भाग म्हणजेच पुरंदर किल्ल्यावरील स्वराज्याचे पहिले युध्द लढले गेले !
लखुजीराजे जाधवराव व शहाजीराजे भोसले हे मध्ययुगातील महान सेनानायक होते !
स्वराज्य स्थापना हे शहाजीराजे व लखुजीराजेंचे धेय होते !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून त्याची पूर्तता केली !
लखुजीराजे जाधव व शहाजीराजे भोसले या महान सेनानींना त्रिवार वंदन !
- अजयकुमार जगताप , पुणे.
No comments:
Post a Comment