छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर .. रायगडावर असलेले छत्रपती राजाराम महाराज व राजघराण्यातील लोकांना कैद करण्यासाठी औरंगजेबाने आपला सरदार झुल्फिकारखान यास रवाना केले .
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडून दक्षिणेतील जिंजी येथे जावे असा निर्णय घेण्यात आला ..
इकडे झुल्फिकारखानाच्या मदतीसाठी रायगडकडे निघालेला शहाबुद्दीनखान मात्र फारच झपाट्याने रायगड जवळील कावल्या बावल्या खिंडीनजीक पोचला .
शहाबुद्दीनखानाच्या फौजेने रायगडला वेढ्याचा फास आवळण्यापूर्वीच छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडणे अत्यंत महत्वाचे होते . शहाबुद्दीनखानाच्या फौजेचा वेढा पडल्यावर गडावरून बाहेर पडणे केवळ अशक्य होते .
मोंगलांची फौज कावल्या बावल्या खिंडीकडे येत आहे व पुढे रायगडकडे जाणार आहे ही बातमी सांदोशी गावातील जिवाजी नाईक सरखेल यांना समजली . अचानक आलेल्या संकटाचा धोका ओळखून .. जिवाजी नाईकांनी सांदोशी गावात असलेल्या गोदाजीराजे जगताप यांना निरोप धाडला ... गोदाजीराजे जगताप आपल्या सहकारी मावळ्यांसह त्वरेने कावल्या बावल्या खिंडीत आले.
छत्रपती राजाराम महाराजांना रायगडा बाहेर पडून जिंजीकडे जाण्यासाठी अवधी मिळावा यासाठी शहाबुद्दीनखानाला कावल्या बावल्या खिंडीतच रोखायचे असे ठरले . अतिशय अरुंद असलेली खिंड व अडचणीचे ठिकाण यामुळें लढण्यासाठी ही जागा योग्य होती .
मोंगलांचा सेनासागर खिंडीच्या जवळ पोचला .. मावळे संख्येने खूपच कमी होते .. पण .. अचानक आलेल्या संकटाने गोदाजीराजे जगताप व जिवाजीराव नाईक सरखेल जराही डगमगले नाहीत ..
२५ मार्च १६८९ या दिवशी कावल्या बावल्या खिंडीत घनघोर रणसंग्राम झाला . गोदाजीराजे जगताप व जिवाजीराव नाईक सरखेल आणि त्यांच्या शूर वीर साथीदारांनी पराक्रमाची शर्थ केली . खिंडीत ३५० पेक्षा अधिक गनिमांची कत्तल केली . रायगडाकडे जाणारी मोगल फौज रोखून धरली .
या लढाईत लढताना जिवाजीराव नाईक सरखेल यांना वीरमरण आले .. त्यांचे काही सहकारी धारातीर्थी पडले . जिवाजीराव नाईक सरखेल .. गोदाजीराजे जगताप व त्यांच्या सहकार्यांच्या पराक्रमाने कावल्या बावल्या खिंड पावन झाली ..
शहाबुद्दीनखानाला कावल्या बावल्या खिंडीत रोखून धरल्याने .. छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी महाराज रायगडावरून सुखरुप बाहेर पडून जिंजीकडे रवाना झाले .. आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दाच्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाला ....
- अजयकुमार जगताप , पुणे.
No comments:
Post a Comment