विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 26 March 2024

कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांचे निवासस्थान म्हणजे 'नवीन राजवाडा'.

 


कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांचे निवासस्थान म्हणजे 'नवीन राजवाडा'. 
 लेखन :पांडुरंग सुरवसे
कोल्हापूरमध्ये कसबा बावडा रोडलगत अंदाजे १०० एकरहून अधिक परिसरावर छत्रपतींच्या या राजवाड्याचे आवार आहे. या राजवाड्याचे नाव जरी 'नवीन राजवाडा' असे असले तरी हा राजवाडा जवळपास दिडशे वर्षे जुना आहे. सन १८७७ साली करवीर राज्याच्या श्रीमंत अहिल्याबाई छत्रपती महाराणीसाहेब यांच्या देखरेखीखाली नवीन राजवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. मेजर चार्ल्स मँट हे या बांधकामावर आर्किटेक्ट म्हणून काम पाहत होते. मराठा, राजस्थानी, मुघल व पाश्चिमात्य वास्तुशैलीचे मिश्रण असणाऱ्या 'इंडो-सारसेनिक' वास्तुशैलीमध्ये हा राजवाडा साकारलेला आहे. बांधकामासाठी लागणारे दगड हे खास जोतिबाच्या डोंगरातून घडवून आणलेले आहेत, त्यामुळे छत्रपतींच्या या राजवाड्यास एक अस्सल रांगडा बाज दिसून येतो. राजवाड्याचे बांधकाम पूर्ण होण्यास सात वर्षे लागली. सन १८८४ साली श्रीमंत छत्रपती महाराज व राजपरिवार या राजवाड्यामध्ये वास्तव्यास आले.
यापूर्वी छत्रपती महाराज कोल्हापूर शहराच्या मधोमध असलेल्या व अंबाबाई मंदिरालगत असलेल्या राजवाड्यात राहत असत. त्यामुळे शहराच्या बाहेर बांधलेल्या नव्या राजवाड्यास सगळेजण 'नवीन राजवाडा' म्हणून संबोधू लागले व पुढे तेच नाव अधिकृतपणे रूढ झाले व ओघानेच छत्रपती नवीन राजवाड्यात वास्तव्यास गेल्यानंतर शहरातील पूर्वीच्या राजवाड्यास लोक 'जुना राजवाडा' म्हणून ओळखू लागले. स्वराज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन भाग झाल्यानंतर छत्रपती महाराज हे पन्हाळगडावर रहायचे. पुढे छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांनी कोल्हापूर शहराभोवती भक्कम तटबंदी उभारून मधोमध राजवाडा बांधला व सन १७६६ च्या दरम्यान छत्रपती महाराज पन्हाळगडावरून कोल्हापूरास रहायला आले व कोल्हापूर हि करवीर राज्याची राजधानी झाली. सन १८८४ पर्यंत छत्रपतींचे निवासस्थान हेच होते. पुढे छत्रपती नवीन राजवाड्यात गेले तरी, जुन्या राजवाड्याचे महत्वदेखील अद्याप अढळ आहे. याचठिकाणी छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक खाजगी देवघर आहे. करवीर छत्रपतींची ऐतिहासिक राजगादी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पन्हाळगडावरील तख्तही याच राजवाड्यात आहे. आजही छत्रपती घराण्यातील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या तख्ताला मुजरा करुनच होते. शिवाय छत्रपती घराण्याचे सर्व परंपरागत धार्मिक विधी जुन्या राजवाड्यातच पार पडतात.
मूळ विषयावर परत येऊ. तर, छत्रपती महाराजांचे अधिकृत निवासस्थान म्हणून नवीन राजवाडा ओळखला जातो. नवीन राजवाड्यात वास्तव्यास येणारे पहिले छत्रपती हे राजर्षी शाहू महाराज होत. सन १९७४ साली शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांचे नातू, कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांनी नवीन राजवाड्याच्या तळमजल्यावरील एक तृतीयांश भागात संग्रहालय सुरु केले. या संग्रहालयात छत्रपतींच्या वापरातील जुने ऐतिहासिक फर्निचर, वेगवेगळ्या कलात्मक वस्तू, दागिने-अलंकार, दुर्मिळ छायाचित्रे अशा ऐतिहासिक वस्तू पहायला मिळतात. याशिवाय या संग्रहालयात एक सुसज्ज शस्त्रागारही आहे. यामध्ये सर्व प्रकाराच्या तलवारी व वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक बंदुका पहायला मिळतात. या म्युझियममधील सर्वात प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे 'दरबार हॉल'. छत्रपतींचा दरबार पूर्वी जशा पद्धतीने भरायचा, आजही तशीच मांडणी या ठिकाणी केलेली आहे. या दरबार हॉलच्या खिडक्यांवर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग काचेवर चितारलेले आहेत. याच्या पुढेच 'शिकारदालन' आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...