#चित्ता_शिकार / Cheetah Hunting
छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे 'चित्ता शिकार' होय. चित्ता शिकार अथवा ज्याला Cheetah Hunting या नावाने ओळखले जायचे ती म्हणजे चित्त्याची शिकार नसून चित्त्याकडून केली जाणारी काळवीटाची शिकार होय. शाहू महाराज एक निष्णात शिकारी होते. चित्ता हंटींग, हाउंडस् हंटींग, कोळसुंदा हंटींग असे नानाविध शिकार तंत्र स्वतः महाराजांनी विकसित केले होते. तूर्त आपण चित्ता हंटींग बद्दल माहिती घेऊ....
'चित्त्याचा पळण्याचा वेग असामान्य असतो आणि त्यात एक शास्त्रोक्तपणाही असतो. नजरेने टिपता येणार नाही इतका त्याचा वेग असतो. निसर्गातील अति वेगवान प्राणी हरिण जर पूर्ण शक्ती एकवटून पळायला लागला तरी त्याला पकडण्यासाठी चित्त्याला फारसे प्रयास पडत नाहीत.' चित्त्याचे हेच वैशिष्ट्य हेरुन काळवीटांच्या शिकारीसाठी महाराजांनी चित्त्यांचा खुबीने उपयोग केला. महाराजांकडे शक्यतो आफ्रिकन चित्ते असायचे. पूर्वी चित्त्यांना शिकारीसाठी बैलगाडीतून नेले जाई. पण हि पद्धत सोयीस्कर नव्हती. त्यामुळे महाराजांनी खास चित्त्यांसाठी "ब्रेक" नामक चार घोड्यांच्या गाड्या विकसित केल्या. विशेष म्हणजे ह्या ब्रेक गाड्या दूमडून ठेवता येत असत व गरज पडताच काही वेळात परत जोडता येत. बैलगाडीत एकच चित्ता बसू शकत असे तर ब्रेक गाडीत दोन चित्ते व तीन ते चार स्वार बसायचे. खडकाळ प्रदेश असो अथवा चढऊतार, या ब्रेक गाड्या वेगात चालायच्या. स्वतः शाहू महाराज ब्रेकचे सारथ्य करीत असत.
चित्त्यांच्या छाव्यांना पकडणे, त्यांना माणसाळविणे व विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण देणे यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागायचा. अशाप्रकारे चित्त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या व त्यांना हाताळणाऱ्या लोकांना 'चित्तेवान' म्हणून ओळखले जायचे. हे चित्तेवान चित्त्यांना काटेकोर प्रशिक्षण देत असत. चित्त्याला हरणांच्या कळपातील काळवीट हेरुन फक्त त्याचीच शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. त्यातही ते काळवीट नर असेल तरच चित्त्याने त्याची शिकार करायची, मादीची शिकार केली जात नव्हती. चुकून एखाद्या नवख्या चित्त्याने मादीची शिकार केलीच तर त्या दिवशी त्याला उपाशी राहण्याची शिक्षा दिली जायची. पण असे प्रकार छत्रपतींच्या चित्तेखान्यात दुर्मिळच घडायचे, कारण छत्रपतींचे चित्ते इतके काटेकोरपणे प्रशिक्षित केलेले असत की उपाशी चित्त्यापुढे मादी काळवीट नेऊन जरी सोडले तरी तो तिच्याकडे ढुंकूनही पाहत नसे.
पूर्वी कोल्हापूर राज्यात हरणांचे कळप जागोजागी मोठ्या प्रमाणात दिसून यायचे. हे कळप शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासधूस करायचे, त्यामुळे वेळोवेळी हरणांची शिकार करुन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे व राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे रक्षण करणे गरजेचे असायचे. चित्ता हा फक्त काळवीटाची शिकार करण्यासाठीच वापरला जात असे. हरणांच्या कळपातील काळवीट हेरुन त्याच्याच मागे धावणे व तेवढ्या वेळात ते काळवीट नर आहे की मादी हे ओळखणे आणि तो नर असेल तरच त्याची मान जबड्यात धरुन त्याला गतप्राण करणे हे चित्त्याचे काम असायचे. हरणांच्या कळपातील नेमके काळवीट कसे ओळखायचे, ते नर आहे कि मादी हे कसे ओळखायचे याचे खास प्रशिक्षण विशिष्ट पद्धतीने चित्त्याला दिले जायचे. कल्पना करा, काय ते प्रशिक्षक असतील ! काय ते प्रगत तंत्र असेल व काय त्या चित्त्याची बुद्धिमत्ता असेल...! शिकार म्हणजे काय साधासुधा खेळ नव्हे, हे यावरुनच आपल्या ध्यानात येईल.
'ब्रेक'मध्ये बसवून चित्त्याला शिकारीच्या ठिकाणी नेले जायचे. यावेळी चित्त्याच्या डोळ्यांवर चमड्याची झडप लावलेली असे. हरणांचा कळप दिसताच चित्त्याला ब्रेकमधून खाली उतरविले जाई, त्याच्या डोळ्यांवरील झडप काढून महाराज हरणांच्या कळपाच्या दिशेने इशारा करताच चित्ता झेपावून पुढच्या काही क्षणांचत त्यातील काळवीटाला एका झडपेत जायबंदी करत असे. मग चित्तेवान धावत त्याठिकाणी जाऊन चित्त्याच्या डोळ्यांवर परत चामड्याची झडप बांधत व त्याला व त्याने शिकार केलेल्या काळवीटाला 'ब्रेक'मध्ये घेऊन येत. यानंतर चित्त्याने शिकार केलेल्या काळवीटाचे मांस हे त्यालाच खायला दिले जायचे, यामुळे पुढच्या वेळी तो अधिक जोमाने शिकार करायचा.
शिकारीसाठी शाहू महाराजांनी असे वीसहून अधिक चित्ते पाळले होते. चित्ता हा महाराजांचा अत्यंत आवडता प्राणी. सोनतळी बंगल्यावर महाराज असत तेव्हा महाराजांच्या बाजूलाच महाराजांचे आवडते दोन चित्ते खुलेपणाने बसायचे. इतरवेळीही महाराजांबरोबर नेहमी एक चित्ता असायचा. कोल्हापूर राज्यातून बाहेर दिल्लीस वगैरे जाताना महाराज सोबत एक दोन चित्ते घ्यायचे. महाराजांनी त्यांना इतका लळा लावला होता की महाराजांबरोबर असताना चित्ते मुक्त असायचे. असे जरे असले तरी महाराजांनी पाळलेल्या कोणत्याही चित्त्याने, बिबट्याने अथवा वाघाने कोणत्याही माणसावर हल्ला केलेला नव्हता. चित्ता, बिबट्या, वाघ हे हिंस्त्र प्राणी महाराजांसोबत असताना जरी एखाद्या मांजराप्रमाणे राहत असले तरी ते केवळ महाराजांसाठी ! इतरांसाठी तो वाघच. महाराजांनी त्यांच्या कोणत्याही प्राण्याला त्याचे 'स्व'त्व हरवू दिले नव्हते. महाराजांचा प्रत्येक चित्ता, वाघ, बिबट्या, हत्ती स्वतःचा आब, दरारा व दहशत राखून असायचे.
पुढे राजाराम महाराजांनीही वीसभर चित्ते पाळले होते. राजाराम महाराजांनी आपल्या पित्याप्रमाणे प्राणीप्रेमाचा वारसा जपला होता. राजाराम महाराजांनंतर मात्र कोल्हापूर राज्यातून चित्ता हंटींग शिकार तंत्र नामशेष झाले. अलिकडच्या काळात शहाजी महाराजांनी वाघ व बिबटे पाळले होते. महाराज निष्णात शिकारी होते व साहजिकच प्राणीप्रेमी होते. राजाराम महाराजांबरोबर शहाजी महाराजांनीही अनेक चित्ता शिकारींमध्ये सहभाग घेतला होता. पण नंतर चित्ता शिकार नामशेष झाली व भारत सरकारने शिकारीवर बंदी आणली, आता उरल्या आहेत त्या केवळ रम्य व थरारक आठवणी....
ते वैभवशाली दिवस आता निघून गेले... छायाचित्रांच्या रुपात आपल्या पाऊलखुणा मागे सोडून....
No comments:
Post a Comment