बहाळ येथील ऐतिहासिक गढी
खानदेशातील चाळीसगाव तालुका प्राचीन ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा तालुका आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील तो जळगाव जिल्ह्यात मोठा आहे. गिरणा नदीचा सहवास लाभल्याने पुर्वी आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी संपन्न होता व आजही आहे. पूर्वेला अजिंठा पर्वत श्रेणी च्या पायथ्याशी असलेले श्रीक्षेत्र पाटणादेवी मंदिर, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर,पाटण गाव, तसेच ठिकठिकाणी असलेली प्राचीन कालीन मंदिरे तालुक्याचे प्राचीन वैभव वाढवतात.
तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण खानदेशच्या प्राचीन इतिहासाची साक्ष असलेला बहाळ येथील गढी वारसा हरप्पा काळाशी नाते सांगतो. त्या काळातील मानवी वसाहतीच्या खाणाखुणा जमिनीच्या उदरात अवशेष रूपाने आजही अस्तित्वात आहेत.
चाळीसगाव शहराच्या उत्तरेला 19 किलोमीटर अंतरावर वसलेले बहाळ ! बहाळची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास आहे. बहाळ व परिसर पेरू, लिंबू, चिकू, केळी, जांभूळ इत्यादी फळबागांसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील फळांना महाराष्ट्रासह परराज्यातही मोठी मागणी आहे.
गिरणा नदीच्या काठी असल्याने हा परिसर प्राचीन काळापासून संपन्न व समृद्ध आहे. बहाळ कसबे व बहाळ पेठ असे गावाचे दोन भाग आहेत. सहा दशकांपूर्वी बहाळ येथील गिरणा काठी असलेल्या ऐतिहासिक गढीचे उत्खनन झाले आणि आश्चर्यकारक माहिती बाहेर आली. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात येथे मातीची खापरे, काचेचे तुकडे, पक्क्या विटा व तत्सम अवशेष सापडले. त्यांचे पृथक्करण केले असता त्यांचा कालखंड हडप्पा कालखंडाशी जुळतो. बहाळ व तरवाडे या भागात ताम्रपाषाण कालखंडापासून मानवी वसाहतीच्या खाणाखुणा संशोधकांना सापडल्या आहेत. गिरणा काठची सुपीक जमीन शेती पिकासाठी सर्वोत्तम असल्याने मानवी संस्कृती प्राचीन काळी या भागात फुलली.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट.
" खानदेशात प्राचीन काळापासून राज्यसत्ता व धर्म सत्तांचा प्रभाव राहिला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, अभीर, मैत्रक, चालुक्य, कलचूरी, राष्ट्रकूट, यादव यांची स्थापत्ये खानदेशात सापडतात. प्राचीन काळाच्या अगोदरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला भौतिक अवशेषांवर अवलंबून रहावे लागते. त्यासाठी नदीकाठच्या स्थळांचे उत्खनन करून निरनिराळ्या कालखंडाचे अंदाज बांधता येतात.
जळगाव जिल्ह्यात साठच्या दशकात बहाळ, टेकवाडे, तरवाडे या गिरणा नदीकाठचे उत्खनन झाले. येथे ताम्र पाषाण युगापासूनचे अवशेष सापडतात. पाच सांस्कृतिक कालखंड आढळतात. उत्तरेत आढळणारी काळी खापरे सम्राट अशोकाच्या काळाशी निगडित असल्याचे मानले जाते. तशी खापरे बहाळ च्या वरच्या थरात सापडली आहेत. तसेच मौर्य काळातील (इसवी सन पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक) ' आहत ' ही नाणी बहाळ, शेंदुर्णी येथे मिळाली आहेत. त्यावरून हा भाग मौर्यांच्या अधिपत्याखाली होता हे सिद्ध होते.
मौर्यांच्या नंतर सातवाहन घराण्याचे या परिसरावर राज्य होते. सातवाहन राजा पहिला सिमुक याच्या नंतर त्याचा भाऊ कृष्ण किंवा कण्ण हा गादीवर आला. कण्ण वरून कण्णदेश, कानदेश अशी देखील व्युत्पत्ती काही विद्वान करतात. सातवाहन यांची राजधानी पैठण, पितळखोरा यांच्या सरळ रेषेत बहाळ आहे. हा परिसर सातवाहनांच्या काळात चांगलाच भरभराटीस आला असावा.
त्यांच्यानंतर वाकाटक, आभिर, मैत्रक, चालुक्य यांनी या परिसरावर राज्य केले. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या इसवीसन 630 च्या ताम्रपटात गिरणा नदीचा उल्लेख ' गिरीपर्णा ' असा आला आहे.
यादव कालखंडात देखील या भागाचे बरेच महत्त्व होते. बहाळ येथील गढीवर असलेले सारजा मंदिर याचा पुरावा आहे. येथे एक शिलालेख आढळतो. त्यानुसार शके 1144 चैत्र आद्य प्रतिपदा चित्रभानु संवत्सर म्हणजे इसवीसन 1222 -23 असा या मंदिराचा निर्माण काल आहे. हा शिलालेख यादव नृपती सिंघनदेव याच्या कारकीर्दीतील आहे.
या लेखाचा उद्देश यादव राजा सिंघणदेव याचा ज्योतिषी अनंतदेव याने द्वारजा (सारजा देवी) भवानी देवीच्या देवालयाचा पाया बांधला हे नमूद करण्यासाठी होता. या लेखाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अनंतदेव व त्याचे पूर्वज यांची माहिती दिली आहे.
1.अनंतदेव - हा देऊळ बांधणारा ज्योतिषी.
2. महेश्वर- हा अनंत देवाचा भाऊ, प्रशस्ती रचणारा व देऊळ बांधण्यासाठी आर्थिक मदत देणारा.
3. शांडिल्य - हा अनंतदेवाच्या घराण्याचा मूळ पुरुष.
4. मनोरथ - हा शांडिल्य याच्या वंशातील अनंतदेवाचा पूर्वज.
5. महेश्वर - हा ज्योतिष्य जाणारा मनोरथाचा पुत्र.
6. श्रीपती- हा महेश्वराचा पुत्र, अनंतदेवाचा पितामह.
7. गणपती- हा श्रीपतीचा पुत्र, अनंतदेवाचा पिता.
लेखाच्या दुसर्या भागात सिंघणदेव त्याचा पिता, पितामह यांची स्तुती केलेली आहे.
1. सिंह - सिंघण यादव नृपती.
2. जैत्रपाल - यादव नृपती सिंगणचा पिता.
3.भिल्लम - यादव नृपती, सिंघणचा पितामह.
4 गणपती- जैत्रपाल याने संरक्षण दिलेला आंध्रप्रदेशचा राजा.
5.अर्जुन - सिंघण राजाचा प्रतिपक्षी राजा.
या लेखामध्ये पुढे जैत्रपालाने (सिंघणचा पिता) गणपतीला आंध्रप्रदेशचा प्रमुख केल्याचा उल्लेख आहे.
लेखाच्या शेवटी गंगाधर, लेख लिहिणारा नागर ब्राह्मण याचा उल्लेख आहे, तर या मंदिराच्या संपूर्ण बांधकामाचा सूत्रधार थालू याचाही उल्लेख केला आहे.( साभार संदर्भ : कान्हदेशातील - खानदेशातील शिलालेख. आभार डॉ.भुजंगराव बोबडे,गांधीतीर्थ जळगाव , संचालक दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र हैदराबाद भारत सरकार)
गढीवरील प्राचीन अवशेष पाहता प्राचीन काळी या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व होते. यादव कालखंडात खानदेशातील सत्तेचे हे एक प्रमुख केंद्र असावे. एका बाजूला गिरणेचा प्रवाह, अर्धचंद्रकोरीत फिरवला आहे. त्यामुळे तिन्ही बाजूंनी पाणी चिखल दलदल व पूर्वेकडे मुख्यद्वार अशी या गढीची रचना केलेली दिसते. यादव कालखंडात व नंतर महानुभाव संप्रदायाचा देखील या परिसरावर प्रभाव राहिला आहे. चक्रधर प्रभू व त्यांचे अनुयायी यांचा सहवास या परिसराला लाभला आहे. महानुभव साहित्यातही या परिसराचे वर्णन आलेले आहे.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच .
©संजीव बावसकर
नगरदेवळे
जि.जळगाव
9975281275
( आपणांस ही पोस्ट कशी वाटली, लाईक करा, कमेंट करा आवडल्यास अशीच शेअर करा.)
No comments:
Post a Comment