भाग - 2
मराठा कालखंडात बहाळ हा एक स्वतंत्र परगणा होता. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या उत्तरेत मोहिमा सुरू झाल्या आणि खानदेशातील अन्य प्रांतांप्रमाणेच बहाळ परगण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले. थोरले बाजीराव पेशवे माळवा स्वारीवर जात असताना बहाळ येथे मुक्कामी थांबले याची नोंद मराठी रियासत या ग्रंथात आहे.
बहाळ येथील गढीवारसा या पोस्टचा पूर्वार्ध आपण वाचला नसेल तर या लिंकला अवश्य भेट द्या..https://m.facebook.com/story.php...
त्या वेळेस बहाळ परगणा नगरदेवळेकर सरदार पवार यांच्या अखत्यारीत होता. नगरदेवळे येथील पवार घराण्याचे संस्थापक केरोजी पवार यांचे सुपुत्र धीराजी पवार यांना तीन मुले होती.
1 शिवराव (पहिले)
2 केरोजी (दुसरे)
3 रामचंद्रराव
यांपैकी शिवराव पवार (पहिले) यांच्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
केरोजी (दुसरे) व रामचंद्रराव पवार इ.स.1750 च्या कालखंडात मराठेशाहीच्या फौज सरंजामात यांची नावे आढळतात. त्यावेळेस भडगाव परगण्यातील नगरदेवळे व बहाळ परगणा पवार घराण्याकडे जहागीर म्हणून होता.
दि.29 सप्टेंबर 1775 मध्ये बारभाईचे सेनापती हरिपंत फडके यांनी आपल्या एका सरदाराला लिहिले आहे - " परगणे बहाल येथील जागिरीचा अमल राजश्री रामचंद्रराव पवार यांजकडे सरंजामास आहे...... यांस महालास काडीमात्र उपसर्ग लागो न द्यावा........"
(संदर्भ : पेशवे दफ्तर)
यावरून हे सिद्ध होते की रामचंद्रराव पवार यांना नगरदेवळे व्यतिरिक्त बहाळ येथील सरंजाम प्राप्त झाला होता.
केरोजी( दुसरे) हे बहाळ परगण्याचा कारभार पाहत असावे. त्यांच्याच काळात गढीवर किल्लेसदृश्य बांधकाम झाले. येथे एक शिलालेख यांनीच तयार करवून घेतला असावा.
केरोजी (दुसरे) केव्हा व कुठे मरण पावले याविषयी उल्लेख नाही. त्यांना पुत्रसंतती नव्हती. त्यांचे धाकटे भाऊ रामचंद्रराव यांना चार पुत्र होते. त्यांपैकी शिवराव (दुसरे) व केरोजी(तिसरे)यांना खानदेशातील सरंजाम असल्याबद्दल चा उल्लेख सन 1786-87 च्या फौज सरंजाम यादीत आढळतो.शिवराव (दुसरे) यांना नगरदेवळे तर केरोजी(तिसरे) यांना बहाळ परगण्याचा सरंजाम नाना फडणवीस यांनी वाटणी करून दिला.असा उल्लेख पेशवे दफ्तरात आहे.
बहाळ येथील गढीवरच्या भिंतीत असलेल्या शिलालेखात एक शिलालेख होता. त्यातील मजकूराचा सारांश असा- " सन 1769 मध्ये सरदार केरोजी पवार विश्वासराव हे बहाळ येथे जहागीरदार असतांना त्यांनी या गढीचे किल्लेसदृश्य बांधकाम केले. बहाळ प्रांताचे तत्कालीन फौजदार घनश्याम त्रिंबक यांच्या सहाय्याने वाघळीच्या उत्तरेकडील करमडु येथील कारागिरांकडून हे बांधकाम पूर्ण केले. शके 1691 मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी विरोधीनाम संवत्सर इसवीसन 6 डिसेंबर 1769 " ( शिलालेख वाचन संदर्भ : मराठेशाहीतील शिलालेख. संपादक: मो.ग. दीक्षित पृ.क्र. 56 साभार डॉ. भुजंगराव बोबडे)
बहाळ येथील गढीवर आढळणार्या दोन शिलालेखांपैकी यादवकालीन सारजा देवी मंदिरातील शिलालेख आज उपलब्ध आहे. परंतु गढीच्या भिंतीवरील शिलालेख मात्र तेथे आढळत नाही.(हा शिलालेख धुळे येथील वस्तू संग्रहालयात आहे असे कळते.)
पुढे इंग्रज आमदनीमध्ये दुसरे शिवराव पवार नगरदेवळेकर यांना कॅप्टन जॉन ब्रिग याने कंपनी सरकारातून दिनांक 28 मार्च 1820 रोजी सनद दिली. त्यानुसार त्यांना भडगाव परगण्यातील सोळा व बहाळ परगण्यातील चौदा गावे व सरदेशमुखीच्या सनदा दिल्या.बहाळ परगण्यातील चौदा गावे व सरदेशमुखी तनखा आठ हजार आठशे चौऱ्यांणव रुपये सव्वा तीन आणे असा सरंजाम दिला.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ताम्रपाषाण कालखंडापासून अगदी इंग्रज आमदनी पर्यंत बहाळ परिसराचे अनन्यसाधारण महत्त्व होते. किंबहुना असे म्हणता येईल की बहाळ परिसर वगळून खानदेशचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. इतके या परगण्याचे महत्त्व आहे.
आता आपण प्रत्यक्ष गढी परिसराचे अवलोकन करू या.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. बहाळ कसबे या गावात प्रवेश करण्याअगोदर चाळीसगाव रस्त्यालगतच तटबंदी व दोन भक्कम बुरुजांचे बांधकाम डोळ्यात भरते. हे बांधकाम कोणी केले ?कधी केले? याबाबत निश्चित माहिती नसली तरी केरोजी पवार जहागीरदार यांच्या आमदनीतच त्याचे निर्माण झाले असावे.
दोन्ही बुरुज आतून पोकळ आहेत. वरच्या बाजूला आतमध्ये हवा खेळती रहावी, म्हणून झरोके ठेवलेले दिसतात. पैकी एका बुरुजात भुयार असल्याचे समजते. तेथून भुयारी मार्ग दोन किलोमीटर लांब असलेल्या एका शेतातील पायबारव मध्ये निघतो. असे गावकरी सांगतात. कदाचित संकटकाळी गढीतून सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली असावी, अशी शक्यता आहे.
गावात प्रवेश करताना वेशीच्या मजबूत दगडी भिंती आपले स्वागत करतात. गावातील बहुतेक घरे चिरेबंदी आहेत. घरांची दगडी ओटी, त्यावरील जोतरे,जोत्र्यांवरील सागवानी खांब, त्यावर असलेले सरे, सऱ्यांवरीलवरील नक्षीकाम केलेली विमाने, मोहठी सगळं कसं सजवून तयार केलेलं आहे. काळ बदलला. घरांचे वैभव गेले पण आजही त्या गतवैभवाच्या खुणा कशाबशा तग धरून आहेत. कापा गेल्या अन भोकं राहिली, अशी काहीशी अवस्था काही घरांची झाली आहे. गावकऱ्यांना गढीविषयी माहिती विचारल्यावर ते प्रथमतः आपल्याकडे संशयाने पाहतात. तुम्ही कोण? कुठून आलात? काय काम होतं ? कशाला आलात? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. आपल्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली तरी ते पुरेशी माहिती देत नाहीत. त्याला कारणेही भरपूर आहेत.
पूर्वी गावातील सर्व गुरेढोरे व शेळ्या चारण्यासाठी गढी परिसर गुरख्यांना हक्काचा होता. गुरे चारतांना काहींना चार-पाच नाणी सापडली आणि एका वेगळ्याच मार्गाने काही टोळ्या सक्रिय झाल्या. गुप्तधनाच्या आशेने अनोळखी लोकांनी गढीचा परिसर बऱ्याचदा पोखरून काढायला सुरुवात केली. त्यात काही स्थानिकांची देखील त्यांना साथ असतेच! त्यामुळे आलेली व्यक्ती कोणत्या उद्देशाने आली आहे याबाबत गावकऱ्यांच्या मनात संशयाचे वादळ निर्माण होणारच ..
गढी व परिसरात असलेली पांढरी शुभ्र माती हे गढीचे वैभव आहे. तेथील बरीचशी माती शेती शिवारात गेली. गढी परिसरात अतिक्रमण सुरू झाले. पायथाच खणायला सुरुवात झाली, तेव्हा कुठे पुरातत्त्व विभागाला जाग आली. त्यांनी संपूर्ण गढीच्या पायथ्याशी लोखंडी पोल गाडून मजबूत कुंपण घातले.त्याचा परीघ दोन किमी पर्यंत येईल. आता एक कर्मचारी कायमस्वरूपी पहाऱ्यासाठी म्हणून नियुक्त केला. (विभागाचे मनापासून धन्यवाद !!!) परंतु ही गढी प्राचीन स्मारक व पुरातत्त्वीय अवशेष आहे. हे सांगणारा नामफलक गढीपासून दोन किलोमीटर अंतरावर बहाळ पेठ भागात लावण्यात आला. तो आज रस्त्याच्या कडेला अडगळीत धूळ खात उभा आहे. त्याचे वाईट वाटले.
गढीवर प्रवेश करताना उजव्या बाजूने वर चढून गेल्यावर बहुळा देवी म्हणून एक मंदिर (ओटा व त्यावर पत्र्याची शेड) लागते. येथे दोन संगमरवरी दगडांवर कोरीव काम केलेल्या विलोभनीय मूर्ती आहेत. पैकी एक महिषासुरमर्दिनी तर दुसरी गणपतीची आहे. मूर्ती कामातील बारीक कलाकुसर व आयुधे खूपच बोलकी आहेत. बाजूला गणपतीची पाषाणमूर्ती आहे. ती मात्र बरीच प्राचीन असावी. ओट्याचे बांधकाम अलीकडच्या काळातील असले तरी मुर्त्यांचे अस्तित्व मात्र अगोदरपासून तिथेच असावे. मूर्त्यांच्या पायथ्याशी समाधी पादुका दिसतात. परंतु त्या पादुका कुणाच्या याविषयी समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
ओट्याच्या उजव्या बाजूला पंधरा फूट उंचीची व 20 फूट लांब अशी भिंत शेवटच्या आचका देत उभी आहे. तिचा बराच भाग नदीपात्राच्या दिशेने कोसळला आहे. मघाशी उल्लेख असलेले केरोजी पवार जहागीरदार यांनी गढीवर केलेले बांधकाम कदाचित हेच असावे. गढीला कोट बांधून येथे त्यांनी निवास व्यवस्था केली असावी.
या मंदिर ओट्यापासून सरळ चालत गेल्यास चुना व विटांच्या बांधकामाचे काही अवशेष आपले लक्ष वेधून घेतात. पक्क्या विटा व चुना यांमध्ये बांधलेला एक हौद आपल्याला चकित करतो. साधारणतः पंचवीस बाय पंचवीस लांबी रुंदी व दहा फूट खोली असलेल्या या हौदाचे प्रयोजन काय असावे ? हे कोडे लवकरच सुटते. चौकाच्या आसपास मातीच्या पाईप लाईनचे अवशेष चुन्यात गाडलेले दिसतात. चक्क चुन्यात गाडलेली मातीच्या पाईपांची पाईपलाईनच आपल्याला दिसून येते. मातीचे ' टी ' एल्बो ' यातून संपूर्ण गढी परिसरात पाइपलाइनने पाणी फिरवण्याची त्याकाळातील तंत्र पाहून आपण चक्रावून जातो.हैदराबाद गोवळकोंडा येथील मातीच्या पाईपलाईनचे कौतुक करतांना गाईडच्या तोंडाला फेस येतो, अन बहाळ येथील पाईपलाईन बाबत मात्र आजही आपण अनभिज्ञ आहोत.
येथील हौदाला स्थानिक लोक ' हत्ती हौद ' म्हणतात. पूर्वी येथे हत्तीची मोट होती. गिरणेतील पाणी हत्तींच्या साह्याने या हौदात ओतले जाई. व पाइपच्या साह्याने गढी परिसरात पोहोचवले जात असे. असे स्थानिक लोकांनी त्यांच्या वाडवडिलांकडून ऐकले आहे.
हत्ती हौदाच्या परिसरात चुना व विटांचे बांधकाम केलेले अनेक अवशेष आपल्याला दिसतात. पूर्वी येथे सिंहासन होते राजा व त्याचा परिवार संध्याकाळच्या वेळेस येथे बसून गिरणा काठाचे सौंदर्य न्याहाळत असे. अशीही माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली.
हौदाच्या उजव्या बाजूला गिरणेचे विस्तृत पात्र व पलीकडचा टेकवाडे गाव बघतांना आपण विस्मित होतो. हौदाच्या डाव्या बाजूला दोन मोठ-मोठे खड्डे आढळून येतात. हे खोदकाम पुरातत्व विभागाने केले की स्थानिकांनी केले हे सांगता येत नाही. प्राचीन बांधकामाचे अवशेष जमिनीत गाडलेल्या भिंती, त्यावर असलेली मातीची पाईपलाईन डोक्यात अनेक कोडे निर्माण करून जाते.
या परिसरात आजही विपुल प्रमाणात मातीची खापरे आढळतात. पक्क्या विटांच्या भिंती जमिनीत आजही गाडल्या गेल्या आहेत. विटांची साईज 18 बाय 12 इंच आढळली. सामान्य विटांपेक्षा या विटा वेगळ्या आहेत.
हत्ती हौदावरून समोर गिरणा पलीकडच्या काठावरील टेकवाडे गाव दिसतो. या परिसरात ताम्रपाषाणकालीन सभ्यतेचे अवशेष सापडल्याचे वाचनात आहे. त्यात मृतांचे शरीर मातीच्या भांड्यात ठेवून वरतून मातीच्या भांड्याचे झाकण ठेवून दफनविधी करण्याची प्रथा होती असे आढळून आले आहे. कृषी व्यवसायाशी संबंधित अवजारे, धान्य साठवून ठेवण्याच्या जागा, मातीची कोठारे, मातीची भांडी, काचेचे तुकडे या परिसरात आढळले आहेत केवळ गढी परिसरच नव्हे तर आजूबाजूच्या शेतातील माती देखील पांढरी आहे.
कधी काळी हा संपूर्ण परिसर खूप मोठी मानवी वस्ती असल्याचे त्यातून सूचित होते. हत्तीहौदाच्या समोर पुन्हा एक उंच टेकडी आहे. बालेकिल्ल्यासारखी. हा गढीचा सर्वात उंच भाग आहे. येथे पोचल्यावर मोठमोठ्या पाषाण शिळा आढळतात. त्यांच्या मध्यभागी वीरगळ सारखी स्मृतीशिळा रोवलेली आहे. त्यावर चंद्र आणि सूर्य प्रतिमा ठळकपणे दिसतात.शिळेचा खालचा बाकीचा भाग मातीत गाडला गेला आहे.त्यामुळे त्याचा बोध होत नाही.
येथे एका प्राचीन मंदिराचे अवशेष दिसतात. नदीपात्रापासून या टेकडीची उंची हजार फुटांपर्यंत असावी. त्यामुळे सभोवतालचा विस्तृत प्रदेश सहजपणे डोळ्यांच्या कक्षेत सामावतो. उंच टेकडीवरून गढीच्या दोन भागांपैकी समोरचा भाग स्पष्टपणे दिसतो. त्यावर असलेली यादवकालीन सारजाई मंदिर ठळकपणे दिसते.आज या गढीचा संपूर्ण परिसर आज वेड्या बाभळींनी वेढला गेला आहे. त्यामुळे अभ्यासकांशिवाय या परिसरात कोणीही फिरकत नाही.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच !
©संजीव बावसकर
नगरदेवळे
जि. जळगाव
9975281275
(आपणांस ही पोस्ट कशी वाटली, जरूर कळवा. कृपया वरील लिखाणाशी छेडछाड न करता असेच पाठवा.)
No comments:
Post a Comment