भाग 3
आता आपण गढीच्या दुसऱ्या भागावर जाणार आहोत. गढीवर प्रवेश करताना डाव्या हाताला असलेला परिसर बराच रुंद व सपाट आहे. इतिहासात प्रसिद्ध असलेले सारजादेवी मंदिर याच भागात आहे. किंचितशी चढण चढत असतांना पक्क्या विटा जमिनीत गाडल्याचे जागोजागी दिसते. या विटांची लांबी रुंदी 18 बाय 12 इंच आहे तर जाडी चार सेंटीमीटर पर्यंत आहे. अशा विटा कुठेच आढळत नाहीत.या पोस्टचा पूर्वार्ध आपण वाचला नसेल तर या लिंकला भेट देऊ शकता.
वर चढल्यावर समोर दृष्टीस पडते यादव कालीन प्राचीन मंदिर! इ.स. 1222 मध्ये या मंदिराचे बांधकाम करताना मंदिराच्या परिसराचा पाया मजबूत दगडी चिर्यांनी बंदिस्त केलेला दिसतो.या पायाची रुंदीच पाच फुटांपेक्षा जास्त आहे. मंदिराच्या बाह्यभागात बऱ्याच अंतरापर्यंत पक्क्या दगडांचा मजबूत पाया ठळकपणे नजरेत भरतो.यावरून हे सिद्ध होते की त्याकाळी येथे देखील पक्के बांधकाम केले असावे.
येथील माती कमालीची पांढरीशुभ्र आहे. गढीच्या पायथ्याशी असलेल्या बहाळ कसबे या गावातील घरे आतमध्ये घुसल्यासारखी वाटतात.( नशीब, पुरातत्व खात्याने लोखंडी पोलचे कुंपण घातले.)
यादवकालीन सारजा मंदिर परिसरात प्रवेश करतांनाच उजव्या हाताला दोन ध्वस्त मंदिरांचे अवशेष समोर दिसतात. दगडी तुळया, नक्षीदार खांब, भिंतींचे लांबलचक पाषाण, अर्धवट उभ्या असलेल्या भिंती, मोठमोठ्या पाषाण शिळा यांचा प्रचंड ढिगारा पाहताना मन विषण्ण होते. सुंदर रेखीव काम केलेल्या या अवशेषांवरुन नजर फिरवताना मनाला वेदना होतात. या कलाकृती घडवतांना कारागिरांच्या पिढ्यांनी रक्त आटवले, जीवापाड मेहनत करून हे सौंदर्य फुलवले, त्याचा अक्षरशः ढिगारा झालेला पाहताना पूर्वजांना किती यातना होत असतील ?
हे कारागीर केवळ पोटार्थी काम करणारे होते काय ? केवळ गवंडीकाम करणारे बिगारी होते काय ? मोलमजुरी करून उदरनिर्वाह साधणारे होते काय? तर नाही, ते स्थापत्यशास्त्र विषयात पारंगत होते.प्रत्येक दगडाची अचूक मोजमापे घेऊन त्याचे ताशीव पाषाणात रूपांतर करणे हे केवळ पोटासाठी काम करणाऱ्या मजूर लोकांचे काम नाही. कला व विज्ञान विषयाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. हाच वारसा परदेशात राहिला असता तर त्या लोकांनी व सरकारने तळहाताच्या फोडासारखा जपला असता. आपल्याकडे प्राचीन लेण्या व मंदिरे यांना लागलेले ग्रहण काही केल्या सुटायचे नाव घेत नाही. सगळीकडे खूप काही उद्ध्वस्त झाले आहे.
या मंदिराचा आवाका बघता केवळ आता दिसत आहेत तेवढ्या चार दगडांवर मंदिर उभारले गेले नसेल. येथील बरेचशे चौकोनी ताशीव कोरीवकाम केलेले पाषाणच नाहीसे झाले आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. या उद्ध्वस्त मंदिरापासून शंभर फुटाच्या अंतरावर असलेले सारजा मंदिर पाहताना मन हेलावून जाते. या मंदिराचा केव्हा एकदा उकिरडा होतो याची जणू आपण वाटच पाहत आहोत असे दिसते. मंदिराचे शिखर कधीच गायब झाले आहे.
कधीकाळी या मंदिराला तीन शिखरे असावीत.कदाचित शिखररचना पक्क्या विटांमध्ये केली असावी. आज सभागृह, गर्भगृह व सभागृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेली दोन उपगर्भगृहे हे अवशेष रुपात शिल्लक आहेत. मंदिराच्या तळखड्याची रचना श्रीयंत्रासारखी आहे. बाहेर आलेले चार मुख्य चौकोन त्यांच्या आतील उपचौकोन अशी भौमितिक संरचना मंदिराची आहे. श्रीयंत्रात बाहेरच्या बाजूला असलेल्या चौकोनांना भूपुर असे म्हणतात. मंदिराच्या बाह्यसीमा भूपुरसदृश्य आहेत.वरील शिखररचना कशी असेल हे आज सांगता येत नाही. परंतु मंदिराचे निर्माण शास्त्रशुद्ध पद्धतीने केले असावे.हे मात्र ठामपणे सांगता येते.
आज सभागृह आठ स्वतंत्र खांबांवर कसेबसे तग धरून आहे. त्याच्या छतावर माती व दगड गोट्यांचा ढिगारा आहे. सभागृहाच्या दोन्ही भिंती पाषाणचिऱ्यात उभारल्या असल्या तरी त्या भिंतींच्या फटीत दगडधोंडे माती कोसळली आहे. त्यामुळे पाषाण सांध्यांमध्ये दोन- दोन फुटांचे अंतर वाढले आहे. सांध्यांमध्ये पडलेल्या या अंतराने चिरे केव्हा निघतील याची भरवसा नाही. आज आहे त्या परिस्थितीत याचे संवर्धन केले नाही तर या मंदिराचा देखील ढिगारा व्हायला वेळ लागणार नाही. पुरातत्व विभागाने यात जातीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलावी ही कळकळीची विनंती!
सभागृहाच्या आतमध्ये भिंतीवर डाव्या बाजूला एक शिलालेख आहे. एकसंध दगडावर कोरून त्याला भिंतीत बसवला गेला आहे. (त्याची माहिती पहिल्या पोस्टमध्ये दिली आहे.)आजही तो शिलालेख सुस्थितीत आहे परंतु मंदिराची दुरावस्था बघता तो फार काळ टिकेल असे वाटत नाही. गर्भगृह वितानावरील एक अर्धचंद्राकृती व एक गोलाकार शिखरशिळा केव्हाच कोसळली आहे. त्यामुळे गर्भगृहात दगडगोटे मातीचा खच पडला आहे.
कधीकाळी जेथे पवित्र मंत्रोच्चाराच्या उद्घोषात विधिवत पुजा संपन्न होत असेल तेथे आज अक्षरशः उकिरडा झाला आहे. दुर्दैवाचे दशावतार कशाला म्हणतात हे अनुभवायचे असेल तर एकदा या वास्तूकडे बघावे.
मंदिरात आज एकही मुर्ती नाही. कारण मंदिराची अशी स्मशानावस्था पाहता येथील मूर्ती बहाळ पेठ भागातील रथ गल्लीत नव्याने बांधलेल्या मंदिरात हलवण्यात आल्या असाव्यात. या मुर्ती कधी व कोणी हलवल्या हे माहित नाही. नेमक्या इथे किती व कोणत्या मूर्ती होत्या याची कल्पना येत नाही, परंतु तीन गर्भगृहे पाहता तीन मूर्ती असाव्यात. मंदिराची हळूहळू होत असलेली दुरावस्था बघता पुजाऱ्यांनी हा निर्णय घेतला असावा.
तेराव्या शतकात समृद्ध संपन्न वैभव पाहिलेल्या या मंदिराने अनेक सत्ता स्थित्यंतरे अनुभवली. यादवसत्तेच्या ऱ्हासानंतर मंदिराचेही वैभव संपत गेले. कालौघात मंदिराच्या कपाळी देखील वनवास आला. संपन्न असा हा वारसा हळूहळू लय पावत गेला. परकीय सत्ता आक्रमकांच्या काळात मुर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून त्यांना पेठ भागात हलविण्यात आले असावे. आज मंदिर खंडहर रुपात कसेबसे तग धरुन उभे आहे. हे दृश्य पाहताना मन गलबलून जाते.
सभागृहाच्या बाजूला असलेल्या उपगर्भगृहांचे वितान बर्यापैकी शाबूत आहे. ही उपगृहे नेमकी कोणत्या देवतांसाठी होती हे आज सांगता येत नाही. आज त्यांचा दुरुपयोग होत असेल तर तेही नाकारता येत नाही. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर सय्यद चाँदशाहवली बाबा नावाचा पीर दर्गा आढळतो. हा अगदी अलीकडच्या काळातील आहे. त्याविषयी पुराव्यांऐवजी कपोलकल्पित कथाच जास्त आहेत. का? कधी? कसा? कुणी?.... अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. दर्ग्याचे बांधकाम ज्या टेकडीवर केले आहे त्याच्या पायथ्याशी प्राचीन मंदिराच्या पायथ्याचे दगड दिसतात. दर्ग्याला केलेले तारेचे कुंपण, वरतून पत्र्याची शेड, दर्ग्याची रंगरंगोटी सगळे शिस्तबद्ध केलं आहे. इथून सारजा मंदिर मरणासन्न झालेल्या गाईसारखे किलकिले डोळे करत करूण नजरेने आपल्याकडे पाहते. ते भग्नावशेष पाहतांना वैषम्य वाटते आणि लाजही.
एकंदरीत गढी परिसरातून फेरफटका मारताना मनाची खुप घालमेल होते. हजारो वर्षांची मानवी संस्कृतीचे अवशेष आपल्या पोटात सांभाळणारा हा गढी वारसा आज स्मशान झाला आहे. पुरातत्व विभागाने तत्परतेने परिसराला कुंपण घातले, गढीची माती बचावली पण आजही तिच्या माथी असलेला वनवास संपलेला नाही. एकेकाळी नांदता असलेला हा परिसर आज शापित असल्यासारखा वाटतो. इतिहासाप्रति असलेली आपली उदासीनता किती भयानक आहे, यासारखे दुसरे विदारक उदाहरण नाही.
मंदिर हे कधीही केवळ धार्मिक दृष्ट्या बघू नये. त्या काळातील स्थापत्य, पाषाणशिळा घडवतांना, चढवतांना, उभारतांना वापरलेले तंत्रज्ञान, त्या काळातील स्थापत्य विज्ञान, स्तंभ घडवतांना, मंदिर उभारतांना तयार केलेली भौमितिक संरचना या सर्वांचा अभ्यास व्हायला हवा. प्राचीन मंदिरांना धार्मिक चौकटीत बंदिस्त करून हा वैज्ञानिक वारसा आजही आपण काळाच्या पडद्याआड दुर्लक्षित करीत आहोत.
पुरातत्व विभागाने यात जातीने लक्ष घालून यांच्या संवर्धनासाठी पावले उचलावीत. त्याचे पुनर्निर्माण करणे शक्य नसले तरी भिंतींना आधार देण्यासाठी पोलादी कठडे उभारले तर अजूनही नवीन पिढ्यांसाठी हे स्मारक सुरक्षित राहील. लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती की पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावावा.शासकीय अनुदान व लोकांना विश्वासात घेऊन नवीन मंदिर उभारण्यासाठी वापरण्यात येणारा लाखोंचा निधी इकडे वर्ग केला, त्यांना हे महत्त्व पटवून दिले तर आठशे वर्षांपूर्वीचा समृद्ध वारसा नवीन पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल. यात तीळमात्र शंका नाही.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच !
© संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव
9975281275
( आपणांस ही पोस्ट कशी वाटली, जरूर कळवा. कृपया वरील लिखाणाशी छेडछाड न करता असेच पाठवा.)
No comments:
Post a Comment