विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 April 2024

शाहु पर्व : महसुल प्रशासन

 


शाहु पर्व : महसुल प्रशासन
छत्रपती शाहु महाराजांच्या दिर्घ राजकीय कारकिर्दीच्या यशात त्यांचे कुशल व मजबूत महसुल प्रशासनही महत्वाचे आहे. राज्यकारभाराची सुरुवात करताना हाताशी साधने कमी होती . पण कर्तबगार माणसे होती त्यांच्या सहायाने त्यांनी त्यावर मात केली .
प्रथम प्रशासनात लक्ष घातले . सर्व व्यवहार जातिने पाहायला सुरुवात केली . सर्व निर्णयास छत्रपतिंची संमति अनिवार्य केली . सर्व अज्ञा , सनदा छत्रपतिंच्या नावेच द्यायला सुरुवात केली . कामकाजात सुलभता यावी यासाठी कामाची विभागणी केली , पण छत्रपतिंना कोणताही निर्णय अज्ञात राहू नये याचीही काळजी घेतली .
छत्रपती शाहु महाराजांच्या कारकिर्दीत समस्त आदेश, नियोजन, रणनिती , मोहिमांचे नियोजन, सरंजाम, इनाम, मोकासे देणे , सरदार व प्रधानांकडून देखिल मोहिमेवरील सर्व घडामोडी दररोज मागवुन घेऊन त्यांना त्यानुसार सुचना देणे हे सर्व स्वत: छत्रपती शाहु महाराज करायचे . ही शाहुनिती मराठा स्वराज्य विस्ताराची जनक होती व मराठा सरदारांच्या मुलुखगिरीची प्रेरणा .
तदनंतर स्वराज्य विस्ताराचे निश्चित धोरण तयार करुन अंमलाखाली आणायच्या प्रदेशांची यादी केली व त्यानुसार अंमलबजावणीस सुरुवात केली .
तोपर्यंत राज्यकारभार व राज्यविस्तारासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी आवश्यक ती महसुली प्रणाली कार्यांन्वित झालेली होती .
सरदेशमुखी व चौथाई हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत होते . सरदेशमुखी निश्चित भूभागासाठी असायची . तेथील निरनिराळ्या गावात देशमुखांची नेमणुक होई . कर वसुली देशमुख करीत . सरदेशमुखांचे या सर्वांवर नियंत्रण असे . जमा झालेल्या करातून महसुली व्यवस्थेच्या खर्चासाठी दहा टक्के रक्कम सरदेशमुख स्वत:कडे ठेवून उर्वरीत रक्कम सरकारजमा करीत असत .
शिवरायांच्या काळात स्वत: छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे सरदेशमुख होते . शाहु महाराजांनी हीच प्रथा पुढे चालू ठेवली . परंपरेने भोसले राजघराण्याकडे अनेक सरदेशमुखी वतने होती , पण शाहु महाराज राज्याचे सरदेशमुख होते .
एकूण उत्पन्नात चौथाई महत्वाची होती . ही व्यवस्था इतर महसुली व्यवस्थेसारखी नव्हती . चौथ ही संरक्षण पुरविण्यासाठी दिलेली रक्कम असे . अनेक राजांनी शाहु महाराजांशी संरक्षण पुरवावे यासाठी करार केले होते . त्यानुसार संरक्षण दिले जायचे व चौथ वसूल केली जायची . ही रक्कम त्या राज्याच्या एकूण उत्पन्नाचा चौथा भाग अशी ठरवलेली होती .
खाफीखान म्हणतो, " शाहुने मोघलप्रांतात प्रत्येक १०० मैलावर चौथ, सरदेशमुखी व संरक्षणाच्या नावाखाली एक गढी बांधुन त्यावर एक चौथ वसुली करणारा, एक सरदेशमुखी वसुली करणारा व एक रहदारी कर वसुल करणारा अधिकारी ससैन्य ठेऊन आम्ही या प्रांताचे सरक्षणकर्ते
आहोत , अशी पद्धत अवलंबीलेली दिसुन येते. "
दक्षिणेतील मुघलांच्या सहा सुभ्याची चौथ शाहु महाराज वसुल करीत होते . तशीच भारतातील अनेक भूभागातून वसुल केली जात असे . हा उत्पन्नाचा मोठा भाग होता . चौथाईसाठी मराठा सरदारांचा मुक्त संचार देशभर वाढला . मुलूखगिरीचे उत्पन्न त्याच क्रमाने चढत गेले .
चौथ वसुल करण्यासाठीची ही मुलूखगिरी पुर्वीही औरंगजेबाशी दिर्घकाळ लढा देण्याच्या कामी उपयुक्त ठरली होती .
याबाबतची एक आज्ञा छत्रपती शाहु महाराजांनी १७०९ सालीच आपल्या सरदारांना दिली होती ,
" सरदेशमुखी वतन आपले आहे . तुम्ही उत्तरप्रांतातून त्याचा वसूल आणा . चौथाईचाही वसूल आणायचा , तो आला नसेल तर बादशाही खजिने लुटून भरपाई करुन घ्या "
शाहूंनी सरदारांना दिलेला आणखी एक संदेश असाच उल्लेखनीय आहे .
" तुमच्या हातात पैसा नाही . आमच्याही नाही . मुलुख सगळा तुमचा आहे . फौजा जमवा . सोयीस येईल तिकडे संचार करा . ठाणी बसवा . वाडे बांधा. वसाहती करा . उद्योगधंदे , व्यापार , सावकारी चालू करा . अत्याचार , द्वेष करू नका म्हणजे देव तुम्हास पावेल . तुमचे दैन्य फिटेल . राज्याचे भाग्य उदयास येईल . पैसा नाही तर कर्ज काढा आणि उद्योग वाढवून ते फेडा " [#शाहुपर्व #जागर_इतिहासाचा ( रवि पार्वती शिवाजी मोरे यांची पोस्ट ) ]
छत्रपती शाहु महाराजांनी उत्पन्न वाढेल याची काळजी घेतली तसेच ते योग्य पध्दतीने विभागुन देण्याची व्यवस्थाही लावली .
भोसले राजघराणे राज्याचे सरदेशमुख असल्याने एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के रकमेवर केवळ त्यांचाच अधिकार होता .
राज्याच्या एकूण महसुलापैकी , सरदेशमुखी व चौथ यातून येणारी रक्कम , चवथा भाग राज्यकारभार व प्रशासन खर्चासाठी नियोजित होता .
उरलेले तीन भाग राजकोशात जमा होत .( मोकासा )
मोकासामधील दोन भागांवर , ' साहोत्रा ' व 'नाडगौडा' , राजाचे नियंत्रण होते . साहोत्रा उत्पन्नाच्या सहा टक्के व नाडगौडा तिन टक्के होता .
साहोत्रा सचिवांसाठी होता . नाडगोडा मात्र शाहु महाराज अनेकांना विविध कारणास्तव देत असत .
प्रशासन खर्च २५% ,
साहोत्रा व नाडगौडा ९% ( ६ + ३ )
सर्वमिळुन राज्यकारभाराचा खर्च ३४% होत असे .
उरलेला ६६% मोकासा सरदारांना , जहागीर म्हणुन , वाटुन दिला जात असे .
जहागीर मिळाल्यानंतर सरदारांनी एकमेकांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये असे सक्त निर्देश असत .
प्रत्येक सरदारास आपल्या मुलुखगिरीचा वृतांत महाराजांना वेळोवेळी द्यावा लागे व कर भरणा करावा लागे . ही व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी महाराजांनी प्रत्येक जहागिरीत नायब देशमुख नेमले होते . ही जमा व्यक्तिपरत्वे व परिस्थितीनुसार कमी जास्त असायची . ठराविक सरदार ठराविक रक्कम राजकोशास द्यायचे .
उदा. फत्तसिंह भोसले वर्हाड प्रांतातून दहा लाख रुपये पाठवायचे , तर आंग्रे कोकणातून दोन - तीन लाख रुपये द्यायचे .
शाहु महाराजांनी वतने प्रामुख्याने अष्टप्रधानास ; सरंजाम दरखदार व कारखानदारास ; आणि गरजेनुसार अनेक गावे सैन्याच्या खर्चासाठी वाटून दिली होती .
आवश्कतेनुसार जास्त खर्च करण्याची सरदारांना मुभा होती पण त्यासाठी महाराजांची पुर्व अनुमती आवश्यक असायची . शाहु महाराजांनी स्वराज्य सोडून शत्रुप्रदेशातही सरदारांना जहागीर दिल्या व ते राज्यविस्तार व पराक्रमाला वाव देणारे ठरले .
छत्रपती शाहु महाराजांनी सरदाराना मुभा
देऊन देखिल राज्यकारभाराची
केंद्रीय सत्ता पद्धत वापरत....यात सर्व सरदार , प्रधान, सचिव, पंतप्रतिनिधी आदीना देखिल छत्रपती शाहु महाराज यांच्या परवानगी शिवाय काहीही स्वतंत्र करता येत नसे.....तसेच मोहिमेवरील सरदाराना, पंतप्रतिनिधी, प्रधान आदीना रोजच्या घडामोडींचा वृतांत छत्रपती शाहु महाराजांना देणे अनिवार्य असे .
हिशोब व पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी चिटणीस , फडणीस व पोतनीस यांच्या नेमणुका प्रत्येक सरदार व सुभेदाराकडे असत . अशीच व्यवस्था शाहु महाराजांकडे व अष्टप्रधानांकडे होती . यांना दरखदार म्हणायचे .
चिटणीसाकडे पत्रव्यवहार , फडणीसाकडे हिशोब , व पोतनीसाकडे कोशागार व्यवस्था होती . सर्व द्रुष्टिने विचार करता , बळकट प्रशासनासाठी ही व्यवस्था उत्तम होती .
शाहु महाराजांचे चिटणीस , फडणीस व पोतनीस अष्टप्रधानांकडील दरखदाराच्या नेमणुका करायचे . सर्व राज्यांच्या चिटणीसांच्या नेमणुका शाहु महाराजांचे चिटणीस करीत असत . त्यामुळे कर्तबगार माणसांच्या नेमणुका होत .पुढे या नेमणुका वंशपरंपरागत झाल्या .
सरंजाम पध्दती बद्दल बरेच बोलले जाते .
सरंजामदारी म्हणजे सरदारांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास मुभा असणे व या खर्चासाठी काही मुलुख नेमून देणे .
शिवरायांच्या काळात सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अख्यत्यारीत होते . तेच प्रमुख होते .
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात परिस्थितीच अशी होती की वतनदारीला महत्व आले . ही वतनदारी पध्दत पुढे सरंजमदारी म्हणून प्रचलीत झाली . सैन्य आणि वित्त यांचा समतोल साधवा यासाठी छत्रपती शाहु महाराजांनी हेच धोरण आपल्या पध्दतीने राबविले .
सरंजामामुळे सरदार स्वतंत्र वाटत असले तरी शाहु काळात महाराजांनी
त्यांना वरचढ होऊ दिले नाही . नियंत्रण स्वत: शाहुंचेच होते . या सरंजामाच्या माध्यमातून तो मुलुख प्रत्यक्ष स्वराज्याच्या अंमलाखाली आणला गेला हे विसरता येणार नाही .
हा सर्व विचार करता शाहुनिती स्वराज्यास बळ देणारी ठरली . राज्यविस्ताराचे निश्चित धोरण , उत्तम महसुली व्यवस्था , बळकट प्रशासन , समंजस व अजातशत्रु व्यवहार ही दिर्घ शाहु पर्वाची व शाहुनितीची ठळक वैशिष्ठे बनली.
लेख :- Suresh Jadhav sir

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...