विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा

 

By Damodar Magdum
जागर इतिहासाचा







भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा
कान्होजीं आंग्रेच्या कोकणातील कार्यास सन १६८१ च्या दरम्यान सुरुवात झाली. सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला व मराठ्यांच्या आरमाराचे मुख्याधिकारी केले. सन १६९६ मध्ये कान्होजींनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले.छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (तारीख २ मार्च १७००) त्यांच्या पत्नी ताराबाईंनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेऊन मोगलांविरुध्द आघाडी उघडली. कान्होजींनी सन १७०० ते १७१० मध्ये अनेक विजय मिळविले. औरंगजेबच्या मृत्युनंतर मोगलांनी शाहूंची सुटका केली. शाहूंनी सन १७०७ साली स्वतःस राज्याभिषेक केला. त्या दरम्यान ताराबाई व संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांच्यामध्ये गादीबद्दल तंटा सुरू झाला. ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून कान्होजींना नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. सन १७१३ साली शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यास धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यास कैद केले. त्यामुळे छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस कोकणकिनारपट्टीचे सर्व किल्ले मिळाले व त्यांनी छत्रपती शाहूंचे अंकित बनून सालाना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्यांची सरखेली कायम ठेवण्यात आली. तसेच मराठी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यास दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले (फेब्रुवारी १७१४) व अखेरपर्यंत छत्रपती शाहूंकडे निष्ठेने राहिले.
कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून ते त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी संयुक्तरीत्या कान्होजींवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कान्होजींनी पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर आदी अनेक देवस्थानांना इनाम तसेच देणग्या दिल्या. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. कान्होजी प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्नी होत्या. त्यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी असे सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे तारीख ३ जुलै १७२९ रोजी मरण पावला.
कान्होजीनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल झाले. ते कान्होजी सारखेच पराक्रमी होते. त्यांनी जंजिरेकर सिद्दीचा चांगलाच बंदोबस्त केला होता. छत्रपती आणि पेशवे या दोघांबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांनी मराठ्यांच्या आरमाराचा उत्कर्ष केला. दुर्दैवाने त्यांना अल्पायुष्य लाभले. सन १७३३ साली ते मरण पावले. सेखोजी मरण पावल्यावर संभाजी आणि मानाजी यांच्यात सरखेलपदावरून कलह निर्माण झाला. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दोघा बंधूत मध्यस्थी करून सन १७३५ मध्ये संभाजीस ‘सरखेल’ हा किताब आणि सुवर्णदुर्ग किल्ला तर मानाजीस ‘वजारत-म-आब्’ हा किताब आणि कुलाबा किल्ला दिला. संभाजी सन १७४२ साली मरण पावल्यावर त्यांचे बंधू तुळाजी ‘सरखेल’ झाले (सन १७४२-१७५६).तुळाजी हे आपल्या पित्यासारखेच पराक्रमी होते. त्यांनी सिद्दीच्या प्रदेशावर आक्रमण करून त्याचे गोवळकोट आणि अंजनवेल (गोपाळगड) हे किल्ले जिंकले. त्यांनी इंग्रजांच्या जहाजांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास लावले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला. तुळाजींनी इंग्रजांची Charlotte of Madras, William of Bombay, Svern of Bengal and, Darby, Restoration, Pilot, Augusta and Dadabhoi of Surat अशी एकाहुन एक बलाढ्य जहाजे पकडली होती.
एका इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजींचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, "तुळाजी रंगाने निमगोरे, उंच आणि रूबाबदार होते. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मूर्तिमंत शौर्याची कल्पना येते. त्यांची कृतीही त्यांच्या रूपास साजेसी आहे. कोणतेही जहाज त्यांच्या तावडीत सापडले की, ते सहसा सुटून जात नसे. इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यांचा इतका धसका घेतला होता की, देवापासी ते तुळाजीस पकडून आमच्या ताब्यात आणून दे असा धावा करीत असे.तुळाजींची शक्ती आणि तयारी कायम परिपूर्ण असे. त्यांची बंदरे भरभराठींत असून रयत सुखी आहे. तीस हजार फौज त्यांच्यापाशी असून त्यांची तयारी नेहमी जय्यत असे. त्यांच्या तोफखान्यावर अनेक कुशल युरोपीय लोक, लष्करी आणि आरमारी कामे झटून करीत होते. त्यांच्या आरमारात साठांवर अधिक जहाजे आहेत शिवाय हत्ती, दारूगोळा व शस्त्रास्त्रे असंख्य आहेत." (संदर्भ : राजवाडे खंड १, २, ३, ६, आंग्रे हकीकत.).
तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते.कैदेतच त्यांचे निधन झाले. ज्यांच्या नावाने फिरंगी घाबरायचे, त्यांना पेशव्यांनी कैदेत ठेवुन काय साधले.? इंग्रज, सिद्दी, पोर्तुगीज, फ्रेंच या परकीय सत्तेविरूध्द लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले आरमार नानासाहेब पेशव्यानी आपल्या कोत्या दृष्टीने बुडविले. आंग्रेंचा पराभव केल्यावर इंग्रजांनी यशवंतगड आणि सिंधुदुर्ग थोड्याच अवधीत आपल्या ताब्यात घेऊन कोकण किनारपट्टीवरचे आपले स्थान बळकट केले. इंग्रजांना सामील होऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार नष्ट करण्याची नानासाहेब पेशव्यांची ही चूक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणता येईल. कारण यामुळे इंग्रजांना पश्चिम किनारा आपल्या साम्राज्यविस्तारासाठी खुला झाला आणि त्यांचे भारतातील पाय अधिक घट्ट झाले. मराठ्यांचे बलाढ्य आरमार नष्ट झाले नसते तर इंग्रजांची सत्ता भारतात कधीच प्रस्थापित झाली नसती. अडमिरल वॅटसनच्या विजयदुर्गावरील विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याचे स्मारक ईस्ट इंडिया कंपनीने Westminster abbey (इंग्लंड) या ठिकाणी बांधले आहे.त्याची समाधी कोलकत्ता येथे आहे.(संदर्भ : History of the Konkan By Alexander Kyd Nairne ,पान ९५)
विजयदुर्ग युध्दाची माहिती
युध्द तारीख : फेब्रुवारी १७५६
युध्दबलाबल
मराठा आरमार
सेनानी सरखेल तुळाजी आंग्रे
आरमारी सैनिक २०००
तोफा २५०
छोटी मोठी जहाजे २००
इंग्रजी आरमार
सेनानी अडमिरल वॅटसन ,कर्नल क्लाइव्ह
नेता नानासाहेब पेशवा
आरमारी सैनिक ५००
मराठा सैनिक १००० (नानासाहेब पेशव्याचे अंकित)
मोठी जहाजे २०
दुसरा बाजीराव पेशवा (ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास कारणीभूत पेशवा)
विठोजी होळकरांच्या ( डिसेंबर १८०१ साली), दुसऱ्या बाजीराव पेशव्याने केलेल्या अमानुष हत्येमुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करायचा निर्णय केला व पुण्याच्या दिशेने चाल केली. दिनांक ८ ऑक्टोबर १८०२ रोजी पेशव्याच्या फौजेचा बारामतीजवळ त्यांच्या फौजेने पराभव केला. होळकरांचा फौजफाटा पाहून घाबरलेल्या दुसऱ्या बाजीरावाने दिनांक १४ ऑक्टोबर, १८०२ रोजी पुणे येथील तत्कालिन रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्याशी बोलणी करण्यासाठी आपला दुत पाठविला.पण बोलणी पुर्ण होण्याअगोदरच परत पुण्याजवळ हडपसर येथे होळकर आणि पेशव्यांच्या सेनेचे २५ ऑक्टोबर, १८०२ रोजी युद्ध झाले ज्यात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीराव २६ ऑक्टोबरला पळून महाडला गेला. व तेथुन सुवर्णदुर्गच्या आश्रयास गेला. तेथून त्याने मुंबईच्या गव्हर्नरशी आश्रयासाठी निरोप पाठविला. डिसेंबरमध्ये होळकरांची तुकडी सुवर्णदुर्गला पोहचली पण तत्पुर्वी तो १७ डिसेंबर १८०२ रोजी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून वसईला पोहचला. यशवंतराव होळकरांनी त्यास समजाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तो इंग्रजांना जाऊन मिळालाच.कर्नल क्लोजने त्याचे स्वागत करून ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसईचा तह दुसऱ्या बाजीरावाबरोबर केला. या तहामुळे मराठ्यांच्या हालचालीवर मोठी बंधने आली. इंग्रजाचा भारतातील सर्वात मोठा शत्रू स्वतःहून मांडलिक झाल्यामुळे इतर राजसत्तांनी पण घाबरून हेच धोरण स्विकारले व काही वर्षातच संपुर्ण भारतात इंग्रजाचे साम्राज्य विस्तारले.
-या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० लढवय्ये) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.
-या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रूपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.
-या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.
-कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.
-पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
-इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.
नानासाहेब पेशव्याच्या घोडचुकीमुळे उदयास आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास परत एक पेशवाच कारणीभूत ठरला. थोरले बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे सोडले तर इतरांचे कर्तुत्व मराठेशाहीला बुडविण्यास साह्यभुत ठरले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...