विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

शिवाजीमहाराजांचे दुर्गविज्ञान

 


शिवाजीमहाराजांचे दुर्गविज्ञान
post by
हे सुंदर चित्र बघून शिवाजीमहाराजांच्या सखोल दुर्गज्ञानाविषयी अनेक गोष्टी आठवल्या. ह्या चित्रात किल्ल्याचा दरवाजा दिसतो आहे आणि त्याचा 'ऍप्रोच रोड' असा ठेवला आहे की, त्या दरवाजाकडे जाताना गड उजव्या बाजूला आहे. ह्यामागे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा शत्रूसैन्य चाल करून येईल तेव्हा त्यांच्याकडे (हातांत) प्रामुख्याने ढाल तलवार असे. म्हणजे उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल. पूर्वी गडाच्या वरील तटबंदीवर दगडधोंडे जमा करून रचून ठेवलेले असत. शत्रूसैन्याचा हल्ला झाल्यावर वरून ते दगडधोंडे खाली लोटण्यात येत. आता जर उजवीकडून अंगावर दगडधोंडे आले तर ते डाव्या हातातील ढालीने उजवीकडे करून त्याचा मारा वाचवणे खूपच अवघड. ( ढाली ह्या डाव्या हाताला पट्ट्याने बांधलेल्या असत. ) परिणामी ते दगडधोंडे अंगावर तरी येणार किंवा उजव्या हातातील तलवारीवर पडून त्याची धार कमी होणार.
तसेच महाराजांनी बांधलेल्या / डागडुजी केलेल्या बऱ्याच किल्ल्यांचा मुख्य दरवाजा मोठ्या सरळ रस्त्यानंतर नसे तर, एक लहान व अरुंद वळणदार रस्ता काढुन त्या रस्त्याच्या टोकाला दरवाजा असे. (उदा. रायगड, राजगड). ह्यामागे कारण हे की - हे दरवाजे फोडण्यासाठी हत्तीने किंवा मोठ्ठ्या ओंडक्याने धडका दिल्या जात. जर लांबून पळत येऊन दरवाज्यावर धडक दिली तर त्याचा जोर ( मोमेंटममुळे फोर्स) खूप असणार. पण जर तिथे लांब रस्ता नसेल तर जास्त जोर ( मोमेंटम ) देणे अवघड. एवढेच नव्हे तर रायगड, राजगड ह्या किल्ल्यांच्या दरवाजाजवळच्या पायऱ्या एकसमान नसून , वेगवेगळ्या उंचीच्या आहेत. एक पायरी 2 इंच उंचीची , दुसरी 6 इंचाची - म्हणजे एकसमान पायऱ्या नसल्याने खाली बघितल्याशिवाय वेगाने पुढे जाणे केवळ अशक्य.
रायगडावर तर अजून एक विलक्षण योजना महाराजांनी केली होती. त्याचा उलगडा अगदी अलीकडे झाला.
रायगडावर महादरवाज्याच्या बाजूला काही उंचीवर चार टाकी बांधली होती. अशा दुर्गम ठिकाणी टाकी बांधण्याचा उद्देश लक्षात येत नव्हता कारण तेथून पाणी वाहून आणणे तर दूरच पण तिथे नुसते जाणे पण दुरापास्त होते. पण १७८० साली, त्यातील एक टाके अतिवृष्टीने फुटले आणि त्यातील सर्व पाण्याचा लोंढा जेव्हा बरोब्बर मुख्य दरवाजापाशी वाहत आला आणि तिथे पूर्ण चिखल झाला तेव्हा ते तळे बांधण्यामागचा उद्देश लक्षात आला.
खरेतर, शहाजी महाराजांनी त्यांची पहिली लढाईदेखील अशीच युक्ती वापरून न लढता जिंकली होती. ते निजामशहाचे सरदार असताना त्यांना नगर जिल्ह्याजवळ औरंगजेब आणि आदिलशहा ह्यांच्या संयुक्त फौजेशी लढण्याचा हुकूम मिळाला. शत्रूसैन्याचा मुक्काम नदीच्या पात्राजवळ होता. शहाजीराजांनी तिथल्या भूभागाची बारकाईने पाहणी केली. आणि त्या नदीपासून दूर आणि उंचावर असलेला एक बंधारा अशा वेळी उध्वस्त केला की तो पाण्याचा लोंढा दगडगोटे, झाडेझुडपे ह्यासकट रात्री दोन अडीचच्या सुमारास नदीकाठी असलेल्या सैन्याच्या राहुट्यांमध्ये घुसला आणि तिथल्या सैन्य, शस्त्रे, दारुगोळा ह्यांची पूर्ण वाताहत झाली. त्या सैन्याने बिनशर्त शरणागती पत्करली.
गडांवरील जलनियोजन हे शिवाजीमहाराजांचे बलस्थान होते. उत्तरेकडील किंवा परदेशातील बहुतेक किल्ल्यांतील जलपुरवठा हा मध्यवर्ती स्वरूपाचा (सेंट्रलाईज्ड) आहे. म्हणजे गडावरील एका ठिकाणी एक मोठा तलाव / टाके बांधून तेथून सर्व भागांत पाणी पुरवणे. सकृतदर्शनी हे योग्य वाटते. पण रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात लिहितात , " भांडी वाजवल्याने झरे स्वल्प होतात ! " भांडी म्हणजे तोफा वाजवल्याने जमिनीला हादरे बसतात आणि त्यामुळे त्या परिसरातील पाण्याच्या झऱ्यांचा झिरप मार्ग बदलून , त्या एकमेव तलावात पाणी झिरपणे बंद होऊ शकते. म्हणून महाराजांनी बांधलेल्या गडांवर पाण्याची टाकी विखुरलेली ( डिस्ट्रीब्युटेड ) आहेत.
महाराजांनी कुलाबा हा जलदुर्ग बांधला. त्याची जी दीड किलोमीटरची तटबंदी आहे त्यात चुना न वापरता, चिऱ्यांमधील फटी तशाच मोकळ्या ठेवल्या. समुद्राच्या तटबंदीवर जोरदार लाटा आपटून तो चुना निघून जाण्याऐवजी त्या फटींमध्ये पाणी शिरते आणि त्याचा तडाखा कमी होतो. हेच तंत्र अगदी अलीकडच्या काळात आपल्याला मरीनड्राईव्हला दिसते. ( तिथल्या खूप टेट्रापॉडसवर - (त्रिकोणीदंडगोल) पहिले आदळून त्यापुढील रस्त्याची धूप कमी होते). त्या दगडांमुळे लाटांचा तडाखा अलिबागजवळ महाराजांनी बांधलेल्या खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूस खूप मोठमोठे खडक टाकलेले आहेत. त्यामागील उद्दिष्ट तटबंदीवर आदळणाऱ्या लाटांचा तडाखा कमी करून झीज थोपवणे.
शिवरायांचा आठवावा प्रताप 🙏🏻🙏🏻🙏🏻
- Mumbai The Dream City

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...