विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 April 2024

!!! देवगिरीचा राजा महादेव!!! आणि परिंचेकर जाधव !!!!

 


!!! देवगिरीचा राजा महादेव!!!
आणि
परिंचेकर जाधव !!!!
राजा कृष्ण उर्फ कान्हरदेव (इ सन १२४७-१२६०) याच्या मृत्युनंतर त्याचा छोटा भाऊ महादेव गादीवर आला.. याचा काळ इ सन १२६०-१२७० राहिला. याने तेलंगणा, गुजराथच्या राजा विसलदेवचा पराभव केला. याची नोंद पैठणच्या सनदेत आहे. राजा महादेव हा स्त्री व लहान मुल आणि आपणास शरण आलेल्या राजास ठार मारत नसे. ही किर्ती ऐकुन राजा महादेव च्या पराक्रमाच्या भीतीने आंध्रच्या राजाने एका स्त्रीस गादीवर बसवून आपल्या राज्याचे संरक्षण केले. तसेच माळव्याच्या राजाने एका लहान मुलास गादीवर बसवुन आपल्या राज्याचे संरक्षण केले. तसेच आंध्रच्या राजाची कन्या रुद्रमा हिस राजा महादेवच्या भितीने गादीवर बसवले होते.. राजा महादेवाने ती स्त्री आहे जाणून तिचा पराभव केल्यानंतर कैद न करता सोडून दिले.. याचे वर्णन विद्यानाथकृत "प्रतापरुद्रिका" काव्यात येते.. त्याबद्दलचा श्लोक पुढीलप्रमाणे :-
"!! एवमेतत्! अन्यथा कथमीश्वरप्रसादादते निरंकुशं स्त्रीव्यक्तिविशेषस्य लोकाधिपत्यम् ! एवं मानुषशम्भुना गणपतीमहाराजेनाभ्यन्तरस्यानुभावस्य सदृशमत्र पुत्र इति व्यवहार : कृतस्तदनुगुणा च रुद्र इत्याख्या!!
तसेच राजा महादेवाने कोकणातील शिलाहारवंशी सोमठाणाच्या सोमराजाचा देखील पराभव केला. पुढे राजा सोमेश्वराने समुद्रावरील आरमार उभे केले.. परंतु आरमार लढाईत देखील राजा महादेवाने राजा सोमेश्वराचा पराभव करून ठार मारले. यावेळेपासुनच यादवराजांनी कोकणपट्टी आपल्या राज्यास जोडली, हे विशेष राजा महादेवाच्या काळात घडले. शिलाहारवंशी राजा सोमेश्वरास राजा महादेवाने इ सन १२४९ साली ठार मारले, हा शिलाहार वंशाचा शेवटचा राजा होय.
तसेच इ सन १२६० च्या एका शिलालेखात महादेव हा देवगिरी येथे राज्य करीत होते. त्यांच्या राज्यास अद्याप सेऊणदेश म्हणत होते व सेऊणदेशाची राजधानी देवगिरी ही दंडकारण्याच्या सिमेस लागुन होती, असा उल्लेख आढळतो.
तसेच पंढरपुरास शके ११९२ म्हणजे इ सन १२७० च्या प्रमोदनाम संवत्सरातील एक शिलालेख आढळला आहे. त्यामध्ये राजा महादेव हा त्यावेळचा राज्यकर्ता होता असे लिहिलेले आहे व "प्रौढ प्रताप चक्रवर्ती सार्वभौम राजा" असे गौरवयुक्त उपपद त्याच्या नावाला जोडलेले आहे व त्यातच "अप्तोर्याम " नावाचा यज्ञ राजा महादेवाने केल्याबद्दल लिहिले आहे. हा यज्ञ वैदिक धर्मानुसार करून महादेवाने वैदिक धर्मास उत्तेजन दिले.
राजा महादेवाचे राज्य नर्मदेपासुन मैसुरपर्यंत पसरलेले होते.
राजा महादेव यांचा मृत्यू इ सन १२७०-७१ साली झाला त्याचा मुलगा अभान गादीवर बसला, परंतु राजा महादेवास ही गादी त्यांचा मोठा भाऊ राजा कृष्ण यांच्यापासून मिळाली असल्यामुळे राजा महादेवानंतर त्यांचा मोठा बंधुचा म्हणजे राजा कृष्णदेव उर्फ कान्हरदेव यांचा मुलगा राजा रामदेवराय गादीवर आला.
राजा रामदेवराय यांची वंशजशाखा ही पुढे राजे लखुजीराव जाधवराव यांच्या रुपाने राजे जाधवराव म्हणून प्रसिद्धीस पावली तर राजा महादेव यांची वंशजशाखा ही गोंदजी जाधव व गणोजी जाधव यांच्या रुपाने परिंचेकर जाधव नावाने मध्ययुगीन काळात प्रसिद्धीस पावली. परिंचेकर जाधव यांच्या परंपरागत भाटाच्या रेकॉर्डमध्ये ही माहिती मिळुन येते.. देवगिरीच्या यादव राजांच्या या दोन वंशजशाखांची वंशावळ आजपर्यंत पुढे आलेली आहे.. यावर अधिक संशोधन करून पुढील संशोधन करून या शाखांवर प्रकाश टाकला जाईल.
लेख :- राजेनरेश जाधवराव.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...