विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

सम्राटाचे शोकगीत

 

सम्राटाचे शोकगीत
लेखन :

Pramod Karajagi


मित्रानो, लेखाचे हे शीर्षक आपल्याला चमत्कारिक वाटेल. मोंगल सम्राट,हिंदुस्थानाचा बादशहा हा शोक कशासाठी करेल आणि शोकगीत कशाला रचेल असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे. मित्रानो, ही कथा आहे अठराव्या शतकातील शाह आलम२ या मोंगल सम्राटाची ज्याने तत्कालीन काळातील लढायांत क्वचितच भाग घेतला असेल पण त्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना सुद्धा भावनाप्रधान कविता रचल्या. अशाच एका उत्कट कवितेत त्याने महादजी शिंदे यांची साहाय्यासाठी आळवणी केलेली दिसते. या घटनेसंबधीचा हा लेख.
आपल्याला ठाऊक असेल इसवी सन १७५६पासून १८०६पर्यंत शाह आलम २ दिल्लीचा सम्राट होता.तसे बघायला गेले तर मराठ्यांनीच शाह आलम २ याला डिसेंबर १७७१ मध्ये रीतसर पद्धतीने पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा एक मैलाचा दगड (milestone)मानला जातो. शाह आलम२ च्या दिल्लीतील अनेक अमीर उमरावांपैकी एक अत्यंत दुष्ट व कावेबाज व्यक्ती म्हणजे गुलाम कादिर होय. याच गुलाम कादिर याने संपत्तीच्या अतीव लोभाने बादशहाची त्याच्या दरबारात विटंबना केली होती. एव्हढेच नव्हे तर त्याच्या अनेक बेगम व मुलांना फटके मारून उन्हात उभे राहण्याची शिक्षा केली होती. हा प्रकार अनेक दिवस दिल्लीच्या दरबारात चालू होता.
अशाच एके दिवशी, गुलाम कादिरने बादशहाजवळ पैशाची मागणी केली. अशी मागणी तो रोजच करीत असे. या वेळी नेहेमी प्रमाणे बादशहाने पैसे नाहीत असे उत्तर दिले. या वेळी गुलाम चा बेफाम राग अनावर झाला आणि त्याने बादशहाला त्याच्या तख्तावरून खाली खेचले आणि त्याच्या उरावर तो बसला. बादशहाला हा त्रास सहन होत नसल्याने तो दयेची भीक मागत होता. तेव्हा पाशवी संतापाने बेभान झालेल्या गुलामाने बादशहाच्या डोळ्यात अरी खुपसून त्याला कायमचे आंधळे केले व त्याला कैदेत टाकले. २७ जुलै ते २ ऑकटोबर १७८८ पर्यंत दिल्लीवर गुलाम कादिरचा हा अत्याचाराचा धुमाकूळ चालू होता.
अशा प्रकारे कैदेत पडलेल्या या सम्राटाची गर्भगळीत अवस्था झाली नसेल तरच नवल ! तो त्रास सहन न झाल्याने संवेदनशील सम्राटाच्या काव्य प्रतिभेला अशा अवस्थेत अंकुर फुटला व त्याने हे शोककाव्य रचले.
या प्रसंगात शाह आलम२ यांस महादजींची आठवण प्रकर्षाने झाली आणि तो म्हणतो की या संकटातून फक्त शिंदेच मला वाचवू शकतात.शहा आलम २ याने आपली दृष्टी गेल्यावर ( अंध केल्यानंतर) उस्फुर्तपणे रचलेल्या पूर्ण शोकगीतातील महादजी शिंदे यांच्या संदर्भातील ओळी अशा आहेत:
तू सुद्धा, हे सिंदिया (शिंदे), नामवंत सरदारा,
ज्याने एकदा (मला ) मदत करण्याचे वचन दिले होते:
मी तुझी प्रार्थना करतो, तुझी उदार मदत घेतो,
आणि (तू )त्यांच्या मस्तवाल मस्तकावरून सुडाची समशेर चालव.
(Thee too, O Sindiah, illustrious chief, Who once didst promise to afford relief: Thee I invoke, exert, thy generous aid, And o’er their heads high wave the avenging blade.)
पुढील पंक्तीमध्ये सम्राट असूफुद्दौला व त्याच्या इतर सरदारांना तसेच इंग्रजांना मदतीची साद घालताना म्हणतो :
आणि तुम्ही, माझ्या राज्याच्या विश्वासू स्तंभांनो,
मैत्रीच्या बंधनाने, आणि माझ्या सामर्थ्याने,
हे असफ, आणि हे इंग्रज सरदारांनो,
(तुमच्या) जखमी सम्राटाचे दु:ख शांत करण्यासाठी शरम करू नका (मागे पुढे पाहू नका)
(And ye,O faithfull pillars of my state, By friendship bound, and by my power elate,
Hasten O Asuf, and ye English chiefs,Nor blush to sooth an injured monarch’s griefs.)
अर्थातच अपेक्षेनुसार महादजींच्या व्यतिरिक्त बादशहाला कोणीच मदत केली नाही.शोकगीताच्या अंतिम ओळींमध्ये आपल्या मनाला दिलासा व उभारी देत मोंगल सम्राट म्हणतो,
कोणा अधिक आनंदाच्या दिवशी, एक भविष्यकालीन व्यथेत
(आकाशातून) पुन्हा पडणाऱ्या ताऱ्याचे नवीन स्वरूप होऊ शकते
पुन्हा, हे राजा, तुझा वैभवशाली वंश वाढव,
तुझ्या दुःखी मनाला आनंद दे आणि तुझे दिवस शांततेत जावोत.
(Some happier day, a providential care, Again may renovate the falling star:
Again, O King, raise up thy illustrious race, Cheer thy sad mind, and close thy days in peace.)
शाह आलम २ हा योद्धा म्हणून अपयशी व परावलंबी होता परंतु तो एक शिकलेला राजा होता यात शंका नाही.शाह आलम २ बादशहाने अभ्यास आणि चिंतन करून खूप चांगले शिक्षण घेतले होते,त्याचे पूर्वेकडील सर्व भाषांवर प्रभुत्व होते आणि असे प्रभुत्व एक लेखक म्हणून त्याच्यासारख्या तत्कालीन उच्च स्थानावरील व्यक्तींनी क्वचितच संपादन केले असावे. हिंदुस्थानातील विविध राजांशी, प्रदीर्घ आणि धांदलीच्या कारकिर्दीतील त्याचे पत्रव्यवहार हे त्याच्या सुशिक्षित मनाचा पुरावा दर्शवितात आणि स्वतःची दृष्टि गेल्यानंतर अत्यंत दयनीय अवस्थेत असताना रचलेल्या काव्याव्दारे आपण त्याचे मूल्यमापन करू शकतो असे मत लेखकाने या पुस्तकात व्यक्त केले आहे.
शाह आलम याला अंध केल्यावर व उपाशी पोटी कैदखान्यात डांबल्यावर वेदनेने त्याचा जीव किती व्याकुळ झाला असेल आणि असा अवस्थेत दर्दभरे काव्य त्याच्याकडून तुरुंगाच्या भिंतीवर उतरवले जाते, ही घटना म्हणजे बादशहाच्या संवेदनशील मनाची ही पराकोटीची स्थिती म्हंटली पाहिजे.अशा अवस्थेत हिंदुस्थानाचा सम्राट महादजी शिंदेंकडे मदतीची याचना करतो आहे हे अद्भुत वाटते. या वेदनामय स्थितीतून केवळ महादजीच आपल्याला बाहेर काढू शकतील असा आत्मविश्वास बादशहाला असावा हे मराठ्यांच्या धैर्याचे आणि नीतिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि बादशहाचा हा विश्वास पूर्ण करीत पुढे काही दिवसातच मराठ्यांनी शाह आलम याची तुरुंगातून केवळ सुटकाच केली नाही तर क्रूर गुलाम कादिर याला कैद करून त्याला निजधामास पाठवले. फारसी भाषेच्या विद्वानांना उपयोगी मूळ फारशी भाषेतील काव्य सोबत दिले आहे.
___________________________________________________________________
संदर्भ:The History of Reign of Shah Alam,W.Franclin,(1798) मराठी रियासत खंड ७, सरदेसाई स. गो.,पुणे रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स,अलिजाबहाद्दर महाराज माधवराव उर्फ महादजी शिंदे यांचे चरित्र व कारकीर्द विष्णू रघुनाथ नातू,माहेश्वर दरबारची कागदपत्रे भाग १व२,Historical Papers relating to Gwalior State Vol.II संकलन,भाषांतर,लेखन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...