मराठेशाहीतील व्यायाम, फिरंग्यांच्या नजरेतून
लेखन ::Pramod Karajagi
Pramod Karajagi
उत्तर मराठेशाहीतील मराठे लोक शरीर कमावण्यासाठी आणि बलदंड होण्यासाठी कसा व्यायाम करीत याबद्दलचे वर्णन एका इंग्रज गृहस्थाने दिले आहे. या गृहस्थाचे नाव आहे थॉमस बौटन (Thomas Boughton) आणि त्याने इसवी सन १८०९ मध्ये सर्व साधारणपणे एक वर्षभर मराठ्यांच्या (शिंद्यांच्या) छावणीत व्यतीत केला आणि त्याने आपले अनुभव पत्राद्वारे लिहिलेले आहेत.
या पत्रांचे संकलन इसवी सन १८१३मध्ये लंडन येथे पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले. या पत्र संचयापैकी एका पत्रात मराठ्यांच्या व्यायामाबद्दलची माहिती दिलेली आहे. (पत्र क्रमांक १९, मुक्काम निमारा, दिनांक २१जुलै १८०९). ती माहिती केवळ मनोरंजक आहे असे नाही तर आजच्या काळाशी बरीच मिळतीजुळती आहे. त्या पत्रात लेखक म्हणतो की भारतातील रहिवाशांना व्यायाम प्रकारची खूप आवड आहे आणि व्यायाम काही शिष्टाचारांसह, नियमानुसार केले जातात.
व्यायामशाळेची(तालीमीची) जागा : तालिमींसाठी गावातील पुरेशी मोठी सपाट जमीन निवडली जाते, शक्य आल्यास तेथे मोठ्या वृक्षाची छाया असेल तर चांगलेच आहे. अशी जमीन खणून त्यातील बारीक खडे, दगड वेचून काढून बाजूला केले जातात आणि अशा खड्यात मऊसर माती टाकली जाते. अशा प्रकारे तयार केलेल्या जागेला ‘आखाडा’ म्हणतात आणि त्याचे आवश्यक असे पावित्र्य जपले जाते. त्यामध्ये चप्पल वा वहाण घालून कोणी जात नाही तसेच त्याच्या आसपास केरकचरा टाकला जाणार नाही यावर कटाक्षाने लक्ष दिले जाते. एका बाजूला मातीचा छोटासा ढीग ठेवला असतो आणि तेथे प्रत्येक जण नतमस्तक होऊन तेथील माती अदबीने हातात घेताना दिसतात.
तालमीतील व्यवहार: या व्यायामशाळेत (तालिमीत) येणाऱ्यांपैकी जो सर्वात जास्त अनुभवी व कुशल असेल त्याला मुख्य (उस्ताद) म्ह्णून नेमले जाई. (लेखकाने त्याला खलिफा संबोधले आहे). तालिमीत येणाऱ्यांना 'पठ्ठा (पठ्ठया )' म्हणत आणि उस्ताद त्यांच्याकडून शरीरयष्टीला योग्य असा व्यायाम करून घेत. प्रत्येक जण तालिमीत आल्यावर धोतर सोडून बाकीचे सर्व कपडे काढून ठेवत आणि धोतर सुद्धा अगदी मांडीच्यावर पर्यंत करकचून बांधलेले असे.कपडे काढल्यावर पठ्ठा आपल्या शरीरावर तेथे ठेवलेली एक प्रकारची पांढरी माती चोळत असे. पहिला व्यायामाचा प्रकार सर्वसाधारणपणे 'दम' नावाचा असे. (दम मारणे).
जोर मारणे: आपल्याकडे ज्याला जोर मारणे म्हणतात त्याचे रंजक वर्णन लेखकाने केले आहे ते असे: व्यायामकर्त्याने हात आणि पायाची बोटे यावर स्वतःला संतुलित करून, हात आणि पाय मध्ये प्रत्येकी साधारण दोन फूट अंतर ठेऊन , त्याचे शरीर पुढे फेकले जाते , जोपर्यंत छाती जमिनीपासून चार इंच अंतर येते आणि यात त्याचे कोपर मोकळे तर त्याचे गुडघे घट्ट असतात. असे करून तो पुन्हा आपल्या मूळ स्थितीत येतो. आणि अशा प्रकारे याची पुनरावृत्ती केली जाते. सुरुवातीला दहा ते बारा वेळा असे प्रकार केले जातात पण पुढे सवय होईल तसे शंभर किंवा दोनशे पर्यंत देखील हे प्रकार केले जातात. या प्रकारामध्ये शरीराच्या सर्व स्नायूंना व्यायाम होतो आणि काही वेळातच पठ्ठा घामेघूम होतो.
कुस्ती :पुढील व्यायामाचा प्रकार म्हणजे कुस्ती होय. या प्रकारात हिंदुस्थानी लोक अतिशय वाकबगार व पट्टीचे आहेत. सुरुवातीला एकमेकांचा उजवा हात हातात घेऊन सलामीची झाल्यावर पैलवान शड्डू ठोकतात व हाताचा पोकळ पंजा धरून त्याचा जोरात आवाज करतात. जो पर्यंत प्रतिस्पर्धी आपल्या पाठीवर निश्चल (हालचाल न करता) काही वेळ पडून रहात नाही तो पर्यंत कुस्ती संपत नाही व विजेता जाहीर होत नाही. कुस्ती प्रकारात शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त चांगला उपयोग होतो. तरी पण या दरम्यान एखाद्याचा हात किंवा खांदा निखळून इजा होणे नवे नाही.
मुद्गल व लेझीम :व्यायामाचा अजून महत्वाचे प्रकार म्हणजे मुद्गल व लेझीम होते. मुद्गलचे वर्णन करताना असे म्हंटले आहे की साधारण १४ ते २० पौंडाचा सुमारे दोन फूट लांबीचा एका बाजूला निमुळता असा लाकडाचे आयुध होय. लेझीम म्हणजे बांबूचे धनुष्याच्या आकाराचे ज्यामध्ये लोखंडी चकत्या बडवून त्यातून आवाज निर्माण होतो. लेझीमचा व्यायाम करणाऱ्याला आपल्या कुवतीनुसार लेझीमचे वजन कमीजास्त करता येत असे.
या सर्व व्यायाम प्रकारात स्नायू मजबूत होतात, छाती विस्तारते आणि शरीराचा आकार संतुलित होतो. व्यायामाच्या एका हंगामानंतर एखाद्या तरुणाच्या अंगावर दिसणारा परिणाम निश्चितपणे विस्मय करणारा असतो.
व्यायामाची सांगता: व्यायाम झाल्यानंतर सर्वजण एका व्यक्तीच्या भोवती गोल करून उभे राहतात आणि तो सांगेल त्या श्लोकाचा पुनरुच्चार करतात. नंतर आधी आपल्या गुरूला आणि नंतर एकमेकाला नमस्कार करतात. त्या नंतर सर्वजण गुरूच्या मागे उभे राहून एकत्रित जोर मारतात. त्यात उस्ताद सुद्धा सामील होतात. निघण्यापूर्वी एखादी मिठाई किंवा धान्याचा पदार्थ वाटून खातात व मगच व्यायाम संपतो.
कुस्तीगिरांची तयारी :ज्या व्यक्तीला कुस्तीत नाव कमवायचे असते, त्याला निश्चित ठरलेला आहार घ्यावा लागतो. रोजच्या आहारात ठराविक प्रमाणात दूध आणि तूप आणि मांसाहारी असेल तर बकरीचे मटण खुराक म्हणून घ्यावे लगे. त्यासाठी वाढीव भत्ता देण्यात येई. त्या कुस्तीगीराने कलेत विशेष प्राविण्य प्राप्त केल्यावर व त्याची शरीरयष्टी ठराविक प्रमाणात तयार झाल्यावरच उस्ताद त्याला पैलवान म्हणून घोषित करीत. राजे महाराजे अशा पैलवानांना आपल्या पदरी आश्रय देत आणि त्यांच्या मांसाहार व दररोजच्या वीस शेर दुधाची व्यवस्था करत असत. एके दिवशी मथुरेहून एक पैलवान आला आणि त्याने मराठ्यांच्या दरबारातील पैलवानास कुस्तीचे आव्हान दिले. या कुस्तीत मराठ्यांच्या पैलवानाचा विजय झाला आणि अर्थातच शिंदे सरकारना आनंदाचे भरते आले. त्यांनी ताबडतोप आपल्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस दिले.
हिंदुस्थानातील महान राजे आपल्याकडे असे पैलवान पदरी बाळगण्यात मोठेपणा घेतात. त्या पैलवानांना त्यांच्या इच्छेनुसार राजाचे हत्ती, घोडे, रथ इत्यादी वापरण्याची पूर्ण मुभा असे. केवळ पुरुषच नाही, तर गावातील स्त्रिया सुद्धा आपले शरीर कमवीत असत आणि इतर गावी जाऊन कुस्तीचे आव्हान देत फिरत असत. स्त्री पैलवान बऱ्याच वेळेस पुरेसा आहार व खुराक घेऊन आपले शरीर एव्हढे बलदंड करीत असत की आसपासच्या पुरुष पैलवानाला कुस्तीचे आव्हान देण्यास मागे पुढे पहात नसत. परंतु एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे बहुंताशी पुरुष पैलवान अशा आव्हानांपासून दूर रहात कारण स्त्रीकडून पराभव जास्ती जिव्हारी लागणारा असे.
एका इंग्रज माणसाने मराठेशाहीतील व्यायामशाळेचे,व्यायामाच्या पद्धतीचे व कुस्ती प्रकारचे बारीकसारीक बारकावे दाखवत केलेले वर्णन मनोरंजक व कौतुकास्पद आहे यात शंका नाही.
संदर्भ: Letters from Mahratta Camp by Thomas Boughton, अनुवाद व लेखन : प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment