मार्टिन क्लाउड हा एक असा फ्रेंच अवलिया होता की तो फ्रेंच असून त्याने मरेपर्यंत इंग्रजांची नोकरी केली, त्याने सैनिकी पेशा सोडून नकाशा करणारा ड्राफ्ट्समनची जबाबदारी घेऊन,बंगाल आणि औंध संस्थानाचे नकाशे भारतात प्रथमतः तयार करण्याचा मान मिळवला,तसेच उत्तरेतील औंधच्या नबाबाच्या खाजगी सल्लागाराची भूमिका अनेक वर्षे उत्तमरीत्या वठवली,आशिया खंडामध्ये गरम हवेचा फुगा यशस्वीरीत्या उडवण्याचा पराक्रम केला, आणि आपल्या मृत्यूआधीच आपल्या थडग्याची सुशोभित जागा स्वतःच्या महालात तयार करून ठेवली. व शेवटी मृत्यूनंतर आपली आयुंष्यभर जमलेली माया सामाजिक कार्याला दान करून टाकली. अशा या अवलियाची ही संक्षिप्त कहाणी.
मार्टिन क्लाउड (Martin Claude): मार्टिन क्लाऊड हा एक फ्रेंच होता, १७३२मध्ये लॉयन (फ्रान्स) येथे जन्मलेला होता, त्याच्या वडिलांचा रेशमी कापडाचा व्यवसाय होता. आपल्या पिढीजात धंद्यात त्याने लक्ष घालावे अशी त्याच्या वडिलांची अपेक्षा असताना त्याचा साहसी स्वभाव त्याला गप्प बसू देईना आणि लहान वयातच घरातून पळून जाऊन त्याने फ्रेंच नौदलात प्रवेश घेतला.त्याच्या हुशारीमुळे त्याची पायदळातुन घोडदळात नेमणूक झाली.१७५७मध्ये फ्रेन्च सेनापती कौन्ट दे लाली याची हिंदुस्थानात पॉण्डेचेरीचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली तेव्हा त्याच्या अंगरक्षका च्या कामासाठी मार्टिनची निवड झाली. लाली बरोबर १७५८मध्ये तो भारतात आला, अशा प्रकारे मार्टिनचे हिंदुस्थानात आगमन झाले.
भारतात आगमन आणि पुढील प्रवास: भारतात आल्यावर लवकरच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. फ्रेन्च सेनापती कौन्ट दे लाली ज्याच्या हाताखाईली तो कामाला होता,आपल्या वागण्यात अतिशय शिस्तबद्ध व वक्तशीर होता आणि आपल्या खालच्या लोकांबरोबर जाचक शिस्तीने वागत असे.त्यामुळे त्याच्या अंगरक्षक दलात असंतोष होता आणि पुढे इंग्रजांच्या फ्रेंच्याबरोबरच्या लढाईत जेव्हा कुटे(Coote)नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने पॉण्डिचेरीला वेढा घातला तेव्हा लालीचे सारे अंगरक्षक इंग्रजांना सामील झाले. इंग्रजांबरोबर मद्रासला आल्यावर ईस्ट इंडिया कंपनीसाठी त्याने फ्रेंच शिकारी लोकांची (फ्रेंच भाषेत chasseurs) एक पलटण उभी केली ज्यामध्ये युद्धकैदी व इतर बेकार लोक जास्त होते. लवकरच त्याला त्याच्या सैनिकांची टोळी घेऊन कलकत्याला रवाना करण्यात आले परंतु वाटेत अचानक त्याच्या जहाजामधून पाणी शिरून बोट बुडायला लागली तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्याने छोट्या होड्यातून सर्वांची सुटका केली. शेवटी ते सारे कलकत्त्यास पोचले तेव्हा इसवी सन १७६४ मध्ये त्याची कॅप्टन म्हणून नेमणूक झाली, परंतु त्याच्या शिपायात(जे मुळातच कैदी व इतर भणंग लोक होते) बंड होऊन त्याचे दल बरखास्त केले गेले. अशा अवघड परिस्थितील मार्टिनची एकंदरीत वागणूक बघून व त्याचे नकाशातील कौशल्य पाहून त्याला कंपनीने ईशान्य बंगालमध्ये नकाशा काढण्याच्या कामावर पाठवले. बंगालमधील त्याच्या कामावर खुश होऊन त्याला तसलेच काम औंध प्रांतात करण्याची जबाबदारी मिळाली. हा त्याचा आयुष्यातील वळण बिंदू होता कारण त्याचे आयष्य अधिक अद्भुत घटनांनी भरलेलेपेक्षा अधिक फायदेशीर बनले.
लखनौमधील कारकीर्द:लखनौमध्ये मुख्य कचेरी उघडून त्याने आपला फावला वेळ इतर कामात घालवला, त्यापैकी यांत्रिकी उपकरणांचा अभ्यास ज्यात त्याला रस होता. त्या काळात त्याने आशिया खंडातील पहिला उडणारा गरम हवेचा फुगा यशस्वीपणे बनवला. या घटनेमुळे औंधच्या नबाबाच्या नजरेत तो भरला.त्याच्या कौशल्याने आणि हुशारीने प्रभावित झालेल्या औंधच्या नबाबाने कंपनी सरकारकडून आपल्याकडे खाजगी नोकरीसाठी मागून घेतले आणि त्याला आपल्या बंदूकधारीदलाचे मुख्य केले. मार्टिनने या संधीचा पूर्ण उपयोग कला व पुढील काळात नबाबाचा विश्वास संपादन करीत तो नबाबाचा मुख्य सल्लागार बनला. पुढील २० वर्षे नबाब व कंपनी मध्ये जी बोलणी झाली किंवा करारमदार झाले,त्यात तो नबाबाचा उजवा हात होता. त्याचा पगारसुद्धा पदानुसार वाढला आणि सरकारी यंत्रणेतील आपसूक येणाऱ्या भेटींचा त्याच्याकडे ओघ सुरु झाला.
नबाबाच्या दरबारातील वर्तन:मार्टिन स्वतःला दरबारातील कार्यक्रमापासून अलिप्त ठेवत असे आणि त्याचे उद्योग तो मागे राहून करीत असे. तरी पण औंध दरबारातील प्रत्येक गोष्टीत त्याचा अप्रत्यक्ष हात असे. त्याने नबाबाला युरोपातील वस्तूंची ओळख करून दिली व त्यांची आवड निर्माण केली आणि त्या मागवण्याची एजन्सी घेतली. त्यातून त्याला बरीच कमाई होत असे.नबाबाच्या जहागिरीत सतत लढाया आणि तंटे चालू असत, त्यांत मार्टिनची जागा व पद इतके सुरक्षित गणले जाऊ लागले की नबाबासकट बाकीचे लोक त्याच्याकडे मौल्यवान वस्तू आणून ठेऊ लागले, त्याचे त्याला वस्तूच्या किंमतीच्या शेकडा १२टक्के कमिशन मिळत असे. अशा आणि इतर मार्गाने त्याने लखनौमधील दीर्घ सहवासात खूप माया जमा केली. मार्टिनचे पैसे जमा करण्यात लक्ष पुरेपूर होते, परंतु पैसे खर्च करण्यात त्याला अजिबात रस नव्हता. तो आपल्या आदरातिथ्यासाठी अजिबात प्रसिद्ध नव्हता. आपले काही पैसे त्याने कुटुंबासाठी त्याचा गावी लीऑन्सला पाठवले खरे, पण आपल्याला इंग्रज लष्करात अजून वरचे पद मिळावे अशी त्याची अतीव इच्छा होती. इसवी सन १७९०मध्ये इंग्रजांची टिपूबरोबर लढाई सुरु झाली तेव्हा त्याने आपणहुन इंग्रजांना एक घोडदळाला पुरेसे चांगले हजार एक घोडे पुरविले होते. त्याच्या या मदतीमुळे कंपनीने त्याला कर्नलची पदवी बहाल केली. लष्करातील वरच्या पदाच्या त्याच्या ओढीमुळे सहा एक वर्षाने त्याला मेजर जनरलची पदवी मिळाली आणि कंपनीच्या गॅझेटमध्ये त्याचे नाव आले. त्यामुळे तो भलताच आनंदला होता.
कॉन्स्टॅन्शिया महाल:लखनौमध्ये गोमती नदीच्या किनारी त्याने आपला उल्लेखनीय अद्भुत असा राजवाडा बांधला होता, ह्याचा उपयोग ऐन लढाईच्या वेळी सुद्धा किल्ला म्हणून करता येऊ शकेल. या महालात ऋतुमानाप्रमाणे नैसर्गिक रित्या तापमान बदलेल अशा पद्धतीच्या खोल्या त्याने बांधलेल्या होत्या. त्यामुळे ऋतुमानाप्रमाणे तो आपापल्या राहायच्या खोल्या बदलत असे. तसेच त्याने या महालात बऱ्याच यांत्रिक साधनांचा वापर करून सुविधा निर्माण केलेल्या होत्या. हजारो पौंड किमतीचे सामान वापरून त्याच्या भिंती, खिडक्या नटलेल्या होत्या. त्याच्या महालाचे एक वैशिष्ठय म्हणजे त्याने सुरुवातीलाच आपल्या कबरीची जागा बांधून घेतली होती. त्या भागातील सर्वांच्यापेक्षा वरची जागा सजवून आकर्षक बनवली होती, इतकी की खुद्द नबाबाला सुद्धा हेवा वाटावा. आपल्या महालाचे नांव त्याने लॅटिन भाषेवरून ‘कॉन्स्टॅन्शिया’ ठेवले. लॅटिन भाषेत ‘Labore et Constantia ‘ म्हणजे कठोर परिश्रम आणि चिकाटी असा होतो.
मार्टिनचा मृत्यू व शेवटची इच्छा: आयुष्यातील शेवटाची १५वर्षे त्याला (मूत्र)खड्याचा त्रास झाला आणि त्याने उपचार करून सुद्धा फायदा झाला नाही. ३सप्टेंबर१८०० रोजी वयाच्या ६२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.त्याच वर्षीच्या १ जानेवारीला त्याने आपले विस्तृत मृत्यूपत्र स्वतःच तयार केले ज्यामध्ये ४० कलमे होती. जवळचे ५ लाख पौंड्स त्याने निरनिराळ्या वारश्याना दिले.त्यामध्ये कलकत्ता, चंद्रनगर व लखनौ येथील तीन धर्मादाय संस्था होत्या ज्यांना दररोजच्या ठराविक व्याजाने गरिबांना मदत करण्यासाठी काही रक्कम मिळावी अशी व्यवस्था केलेली होती. स्थानानुसार इंग्रज, फ्रेंच व पर्शियन भाषेत त्याने ते तयार केले होते. कलकत्तामध्ये एक मोट्ठी शाळा 'ला मार्टनरील' (La Martiniere) काढून त्याला देणगी दिली. आज ही ती शाळा अस्तित्वात आहे. लीऑन्स आणि कलकत्याला त्याने मोठ्या रकमांच्या देणग्या दिल्या ज्यातून गरीब लोकांचे कर्ज फेडता येईल. आपला महाल न विकता त्याचे एका संग्रहालयात रूपांतर करावे असे त्याने म्हंटले होते. अशा या या अवलिया माणसाच्या विलक्षण अटी होत्या. त्यापैकी तेरावी अट होती की त्याच्या कबरीवर खालील ओळी कोरण्याची त्याने सूचना केलेली होती. त्यामध्ये तो स्वतःबद्दल म्हणतो,'
मेजर जनरल क्लूड़े मार्टिन, लीऑन्स येथे १७३८मध्ये जन्मला, भारतात सामान्य शिपाई म्हणून आला आणि लखनौ येथे १३ सप्टेंबर १८०० रोजी मेजर जनरल म्हणून वारला', आणि याठिकाणी थडग्यामध्ये त्याला पुरण्यात आले आहे. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करावी!
सन १८३१मध्ये फिरंगी प्रवासी लेडी फॅनी पार्क यांनी जेव्हा या ठिकाणी भेट दिली तेव्हा तेथे सतत दिवे जळत होते आणि शस्त्र उलटे धरून मानवंदना देतात असे चार सैनिक पुतळे उभारलेले होते.
______________________________________________________________________
संदर्भ: युरोपिअन मिलिटरी ऍडव्हेंचर्स ऑफ हिंदुस्थान ले. हेरबर्ट कॉम्प्टन संकलन व लेखन:प्रमोद करजगी
लखनौमधील काँस्टॅन्शिया महाल
No comments:
Post a Comment