विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

होनाजी बाळा यांचा महादजी शिंदेवरील अनोळखी पोवाडा

 



होनाजी बाळा यांचा महादजी शिंदेवरील अनोळखी पोवाडा 
लेखन :

Pramod Karajagi

मित्रांनो, 'इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे' हे पुस्तक एका इंग्रज व्यक्तीच्या पुढाकाराने पुण्यात इसवी सन १८८१ मध्ये प्रसिद्ध झाले हे वाचून आपल्याला आश्चर्य जरूर वाटेल. या इंग्रज इसमाचे नाव आहे 'ह्यारी अर्बुथनाट'. कोण होता हा गृहस्थ? हा मनुष्य त्याकाळात मुंबईच्या अँथ्रॅपोलोजिकल सोसायटीचा (मानववंशशास्त्रीय संस्थेचा)उपाध्यक्ष होता. तसेच या पुस्तकाची प्रथम आवृत्ती निघण्यासाठी तत्कालीन मुंबई नगरपालिकेचे कमिशनर एच. ए. मॅक्क्वर्थ साहेब यांचा ही हातभार लागला होता.या पुस्तकात मराठ्यांच्या अनेक लढायांचा, वीर पुरुषांचा, अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊन त्यावरील पोवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पोवाड्याच्या संकलनाचे कठीण काम श्रीयुत शंकर तुकाराम शाळीग्राम यांनी नेटाने पार पाडलेले होते.
शाळीग्राम साहेबांनी त्या काळात ठिकठिकाणी जाऊन पुष्कळ पोवाडे ऐकिले व समशेरपूर,पिपळवंडी,आळे,ओतूर,जुन्नर,खेड,चास,अकलूज,अहमदनगर,पाटस, पुणे,सातारा,फलटण,मिरज,सांगली,शिरोळ इत्यादी ठिकाणी जाऊन ते कष्टाने शब्दबद्ध केले.मराठीतील पोवाड्यापासून आपला इतिहास समजण्यास ज्या प्रकारे मदत होते तशीच त्याकाळातील जनसामान्यांचे रीतिरिवाज, आवडीनिवडी,अभिरुची, रागव्देष कळण्यास हातभार लागतो.या खेरीज मराठी भाषेचे शब्द वैचित्र्यही स्पष्ट होते असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे ते अगदी योग्य आहे.
इतिहास समजून घेणाऱ्यास मराठ्यांच्या बखरींचा लाम्बटपणा पाहून कंटाळा येण्याचा संभव आहे. तसा पोवाड्यांचा मुळीच येणार नाही.असे इंग्रज आक्वर्थ साहेबास वाटून त्यांनी पोवाड्याचा जिद्दीने पाठपुरावा केला.या पोवाड्या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक त्यांनी एप्रिल १८८७ मध्ये त्या काळातील सर्व प्रमुख सरदार, उमराव, मान्यवर मंडळींना पाठवले होते, तसेच ते पत्रक २६ फेब्रुवारी १८८७च्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात सुद्धा छापलेले होते.राजस्थानात भाट लोक जसे शूरांची कथावर्णने सांगून राष्ट्रात स्फुरण निर्माण करतात तसाच परिणाम पोवाड्यातून महाराष्ट्रात होतो.
'इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे' या पुस्तकातील अनेक पोवाड्यापैकी एक पोवाडा खाली दिला आहे.
महादजीवरील पोवाडा: महादजी शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तर हिंदुस्थानांत मराठ्यांची सत्ता पुनर्प्रस्थापित केली व दिल्लीच्या मोंगल सम्राटाने वकील ए मुतलक हा 'किताब दिला. जुलै १७९२च्या सुमारास महादजी पुण्यात आले आणि त्यांनी हा 'किताब पेशव्यांना अर्पित केला. त्याकाळात पुण्यातील रंगपंचमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. अशी रंगपंचमी उभ्या मराठेशाहीत’ ना भूतो, ना भविष्यती’ अशीच होती. अशा या उत्सवावर कवी होनाजी बाळा यांचा हा पोवाडा आधारलेला आहे.
चाल - मराठी राज्य जोरदार, घोड्यावर स्वार, होते शिपाई I जबरसद्दी कैकांनी पहिली, शत्रू ठेविले नाही II
पोवाडा रंगपंचमीचा:
द्वापारी श्रीमाधवविलास भागवती प्रत्यय पहावा I तसे कलीमध्ये रंग खेळले श्रीमंत व पाटीलबावा II धृपद II
पुण्यासारखे दुजे शहर या दक्षिणेत कोठे नाही I धर्मराज श्रीमंत धन्याचीं त्रैलोक्यामध्ये अवाई I धन्य रणवीर पाटीलबावा पराक्रमी जाणती शाई I नवखंडामध्ये कीर्ती गाजती धनी रावसाहेब सवाई I यशवंत अति श्रेष्ठ तपोबळी साजती ब्रम्ह बादशाही I दिल्लीपतीने माहीमरात दिली नालकी लवलाही IIचालII स्वामी प्रताप अद्भुत वर्णु कुठवरी I सारे हिंदुस्थान पाटीलबावाचे करी I घेवीले असून स्वस्थानी परात्परी II मी वर्णू कुठवरी हा प्रादुर्भाव स्नेहाचा ऐकावा II द्वापारी II१ II
शके सतराशे पंधरा चैत्र नाम प्रमादी संवत्सरी I अत्वादरे हा रंग खेळले उभयपक्षी हर्ष अंतरी I बंब भरुनी रंगाचे ठेविले ठाई ठाई शहराभीतरीं I गुलालाचे हौदे भरूनिया खूप कसले हत्तीवरी I तक्तराव्यावर पात्रा नाचती परोपरी I रंग भरुनी पिचकाऱ्या घेतल्या सर्वांनी आपले करी II चाल II एक एकावरी चालले रंग टाकीत I नानांनी बंब ठेविले जिथे I त्या ठाई येता श्रीमंत स्वारी अवचित I सत्व भिजविले तेथे हा कुठवर घोष कीर्तीचा वर्णावा II द्वापारी II२II
सर्व मुत्सद्दी मानकरी यांच्या हौद्याचे जमावा निशीI हस्ती सेवकासुद्धा सकळही लाल रंग रसी I रविवार पेठेमध्ये पाहा तात्यांचे दरवाजाशी I दोन बंब रंगाचे ठेविले होते अति सायाशी I नीट बुधवार पेठेतून श्रीमंत स्वारी गेली त्या ठायाशी I खूप गर्दी रंगाची केली तात्यांनी अति उल्हासी II चाल II ते दिवशी सफेद असा कोण नाही राहिला I रंगाविरहित नाही दृष्टीने पाहिला I लौकिक रंग हा पृथ्वीवर पसरला I पौत्रपुत्राशी सांगायाशी जाहला I हा टांग सुवदावा II द्वापारी II ३II
नानापरी गोकुळ क्रीडले श्री माधवजी कुंजवनी I ते साक्षात दृष्टी पहिले पुणे नगर पुण्यस्थानी I नाना पतीचे हरीचे विलास शास्त्री ऐकिल्या श्रवणी I पुणे ग्राम गोकुळ क्रीडले त्यांत कृष्ण श्रीमंत धनी I अधिक देह आमचे आम्हांला भासतसे आपले ध्यानी I स्वामीपद अवलोकुन दैवी उल्हास होत नित्यानि II चाल II होनाजी बाळा पदरचा आहे किंकर I विज्ञप्ती श्रुत करितो जोडुनी कर I अक्षई असावी कृपा सेवकावर I धनी बक्षीस देणार I रामा अंदु वांछी स्वामी सेवा II द्वापारी II ४ II
मित्रांनो, आजकाल पोवाडा हा प्रकार बराच मागे पडत चालला आहे. इंग्रजी भाषेत वाघिणीचे दूध पिणाऱ्या आजकालच्या पिढीला पोवाडा प्रकार माहिती असणे दुरापास्तच ! त्या काळातील इंग्रजी अधिकाऱ्यांनी नेमके याच व्यथेवर बोट ठेवले आहे. इसवी सन १८८७ सालात अनेक महत्वाच्या सरदारांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, पोवाड्यापैकी अनेक पोवाडे अमूल्य आहेत. त्यास जर यावेळी शाश्वत स्वरूपात जतन करून ठेवण्याचे झपाट्याने प्रयत्न झाले नाहीत तर थोड्याच काळात ते गडप होण्याचा बराच संभव आहे.
गांवोगांवी हिंडून त्यांनी जमा केलेल्या या अमूल्य ठेव्यांकडे केवळ अनास्थेपायी आपण दुर्लक्ष करून कसे चालेल ??
_____________________________________________________________________
संदर्भ: इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे , संकलन व लेखन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...