विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज

 


हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज
शहाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करतांना त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता शहाजी महाराजांनी केलेले कार्य निश्चितच अतुलनीय आहे. शहाजी महाराजांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर अनेक निष्कर्ष मांडता येतात .
शहाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता, बहामनी राज्याचे पाच शाह्यांमध्ये विघटन झाले होते. त्यांच्यामध्ये सत्तासंघर्ष सुरू होता. या सत्तासंघर्षात सत्ताधिशांना बाहेरून सैन्य आणणे शक्य नव्हते. परकीय सत्ताधिशांना स्थानिक सैन्याची फळी उभारणे आवश्यकच होते.
निजामशाही दरबारात अंतर्गत सत्तास्पर्धा सुरू होती. मलिकअंबर व मियान राजू या दोघांमघील सत्तास्पर्धेला निजामशहा मुर्तूजा कंटाळला होता. त्यात मराठ्यांचा तिसरा पक्ष निर्माण झाला. या तिसर्या पक्षाचे नेतृत्व मालोजीराजे भोसले यांच्याकडे आले. त्यांनी ते नेतृत्व यशस्वीपणे केले. मालोजी नंतर या पक्षाचे नेतृत्व शहाजी महाराजांकडे आले.
शहाजी महाराजांनी कर्तबगारीने आपले राजकीय शहाणपण पणास लावून, तत्कालीन राजकीय परिस्थिती लक्षात घेत सन्मानाने व कर्तव्यदक्षतेने वेगवेगळ्या राजदरबारांत नोकरी केली.
शहाजी महाराजांनी निरनिराळ्या शाह्यांमरध्ये नोकरी करत असतांना आपला स्वाभिमान आणि वैभव सांभाळले. मुसलमान दरबारी चाकरी करित असताना देखील त्यांनी आपल्या स्वाभिमानास, मोठेपणांस इजा पोहोचू दिली नाही. ज्यावेळी काही मानहानीचे प्रसंग निर्माण झाले त्यावेव्ठी त्यांनी नोकरीवर लाथ मारली आणि आपले स्वत्व जपले. स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक धन, हत्यारे, सैन्य, प्रभावळ आणि आपली जहागीरी कायम आबाधित ठेबली.
शहाजी महाराजांनी मराठ्यांचे महत्व जाणले. मराठ्यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही शाहीस दक्षिणेत स्वतंत्रपणे अंमल प्रस्थापित करणे अशक्य आहे हे धूर्त शहाजीमहाराजांनी ओळखले. त्याचप्रमाणे शहाजीमहाराजांना स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची जाण होती. आणि त्याबळावर आपण कोणत्याही शाही दरबारात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो असा विश्वास त्यांना होता. म्हणून वेळप्रसंगी त्यांनी नोकरी बदलूनही आपले वर्चस्व सिध्द करून दाखविले. यामुळे इस्लामी सत्तेचा जो दरारा मराठ्यांच्या मनात घर करून होता, तो हळूहळू कमी झाला. मराठयांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास, आत्मभान निर्माण झाले, त्या सर्व सुप्त भावनांचा हुंकार शहाजीराजे होते.
शहाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे काही वैशिष्टयपूर्ण पैलू म्हणजे त्यांची प्रखर बुध्दीमत्ता, चातुर्य, सामर्थ्य , दूरदर्शीपणा, शौर्य, लढय्येपणा , धाडस, आत्मविश्वास, आत्मभान, राष्ट्रीयबाणा, धर्मनिष्ठा, न्यायनिष्ठूरता हे होते. हेच गुण आपणास शिवाजीराजांच्या अंगी पहावयास मिळतात. शिवरायांना हा मौलिक ठेवा आपल्या पित्याकडूनच मिळाला. सर्वच भोसले शुर आणि युध्दोत्सूक होते. संकटातून मुक्त होण्याची युक्ती शोधून त्यासाठी लागणारी ही बुध्दीमत्ता ही भोसल्यांची पिढीजात संपत्ती होती. तीच शिवरायांना वंशपरंपरागत मिळाली.
शहाजी महाराजांची राजनीती, कुटनीती, वेळप्रसंगी माघार घेणे, गनिमी काव्याने विजय संपादन करणे, मनुष्य स्वभावाची पारख करणे, लोकांना संघटीत करून कार्यकर्ते निर्माण करणे, यांचा अवलंब करून, आपल्या 'राज्यांतर्गत राज्या' ची स्थापना करून ती यशस्वीपणे टिकविली. त्याचप्रमाणे शिवाजी राजांनीही आपल्या पित्याकडून उपर्युक्त धडे घेऊन आपले स्वतंत्र स्वराज्य स्थापिले आणि ते यशस्वीपणे टिकविले.
शहाजी महाराजांनी शिवाजीराजे, जिजाऊ, आणि दादोजी कोंडदेव यांना बेंगलोरला मुद्दाम बोलावून घेऊन बराच काळ स्वतःजवळ ठेवून घेतले. त्यानंतर स्वत:च्या विश्वासातले निवडक अधिकारी, भारी सरंजाम, स्वतंत्र ध्वज, बरोबर देऊन पुण्यास सन्मानाने पाठविले. त्यावेळी त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचा कानमंत्र त्यांना दिला.
स्वराज्य स्थापनेसाठीचे मुलभूत घटक जसे जहागिरी, सरंजाम, धन, ध्वज, हे शहाजी महाराजांकडून शिवाजीराजांना मिळाले. त्यामुळे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार झाली. या तयार झालेल्या पायावर शिवरायांनी स्वराज्याची इमारत उभारली,
शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावरील प्राणांतीक संकटाच्यावेळी, अटीतटीच्या प्रसंगी सर्व तयारीनिशी शिवाजीराजांच्या पाठीमागे खंबीरपणे राहण्याची शहाजी महाराजांची तयारी होती आणि या गोष्टीची कल्पना शिवरायांनाही होती. शहाजी महाराजांचे नैतिक धैर्य कायमच शिवरायांच्या पाठीशी होते.
अखिल भारतात तीन चार शतके ठाण मांडून बसलेल्या परदेशी इस्लामी सत्तेला उलथवून पाडण्याचा, राज्यक्रांती घडवून आणण्याचा मान महाराष्ट्राला प्रथम लाभला आणि या राज्यक्रांतीचे नेतृत्व भोसले घराण्यातील तीन पिढ्यांनी केले. मालोजीराजांनी स्वराज्याचे बीज रोवले. शहाजी महाराजांनी त्यास खतपाणी घालून त्याच्या विकासासाठी चांगली मशागत केली आणि शिवरायांनी त्याचे वटवृक्षात रूपांतर केले.
हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज या थोर प्रभूतीस त्रिवार वंदन!!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...