साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी. वसई किल्याच्या समोरील खाडीच्या दुसर्या तीरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी. मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजीअप्पांना लिहिलेल्या पत्रांतून स्पष्ट होते. पत्रांतील मजकूर पुढीलप्रमाणे - "धारावी समुद्रामुळें व बंदरामुळें दुसरा जंजिराच! शिवाय दाणागल्ला तेथून चांगला लवकर वसईस पोचवितां येतो. शिजले अन्न निवलें नाही तोंच तेथे पोचवितां येतें." "सर्वांच्या विचारें, धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील." "धारावीची बंदिस्त म्हणजे बंदोबस्त पाथरवट आणून चहुबुरूजी आधीं सत्वर बांधवावी मग पुढें मोठा कोट बांधवावा तेंव्हाच कार्यास येईल." - शंकराजीपंत फडके.
"धारावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इभ्रत पाडावी." - बरवाजी तापकीर
मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले.
१९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर २२ फेब्रुवारी १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर २६ फेब्रुवारी १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला २७ फेब्रुवारी १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
३ मार्च १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. २४ एप्रिल १७३९ रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता. मुख्य अधिकार्यांपैकी मार्टिन आणि अल्फेरिस एस्तव्हो मार्टिन्स हे दोन अधिकारी ठार झाले.
अशा रीतीने धारावी २४ एप्रिल १७३९ काबीज झाली. वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगाणातून उखडून काढली.
No comments:
Post a Comment