विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

छत्रपतींच्या सिंहासनाची रचना – भाग पहिला

 


छत्रपतींच्या सिंहासनाची रचना –
भाग पहिला
छत्रपतींच्या सिंहासनाची रचना
(भाग पहिला = प्रास्ताविक)
छत्रपती शिवाजी महाराज 6 जून, 1674 म्हणजेच “ज्येष्ठ शुध्द 12, शुक्रवार घटी 21, पळे 34, विष्कंभ 38, घटिका 40, पळे सि. 42 तीन घटिका रात्री उरली’ असताना सिंहासना वर बसले. सिंहासनारोहणाचा हा विधी पहावयास रायगडावर रजपूत राजे, सरदार, मांडलिक व इतर राजे, प्रतिष्टित, पुरोहित, ब्राह्मण, अष्टप्रदान, कारखानदार, प्रतिष्टित निमंत्रितांसह स्वराज्यातील सामन्य रयत सुध्दा उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी “हिंदुपदपादशाहीचे सुवर्ण सिंहासन” स्थापन केले आणि स्वराज्यात एक नव चैतन्य निर्माण झाले. पुढे सिंहासनाचे ‘शिल्लंगण’ करण्यासाठी महाराजांनी ‘दक्षिण दिग्विजयाची’ मोहिम आखली. हिंदुपदपादशाहीच्या याच सिंहासनाचा प्रभाव धर्मांद मुगली बादशहा म्हणजेच मूहिउद्दीन महंमद औरंगजेब उर्फ आलमगीर यास आपल्या तख्तावर होईल असे वाटू लागले. आद्य बखरकार कृष्णजी अनंत सभासद लिहतात, “दिल्लीस पातशाहास(औरंगजेबास) हें वर्तमान सिंहासनाचे (बहादुरखान कोका याने) लिहिले. पातशहास कळून तक्तावरुन उतरुन अंतःपुरांत गेले. आणि दोन्ही हात भुईस घांसून, आपले देवाचें नांव घेऊन परम खेद केला. दोन दिवस अन्नउदक घेतलें नाहीं. आणि बोलिले की, ‘खुदानें मुसलमानाची पादशाई दुर करुन, तक्त बुडबून मराठियास तक्त (सिंहासन) दिलें. आतां हद्द जाली!” सभासदाच्या या शब्दातून औरंगजेबाच्या हिंदुपदपादशाहीच्या सिंहासनाच्या स्थापने नंतरच्या मानसिक स्थितीचा अंदाज तुम्ही करु शकता.
आपला शासन काळ रयतेच्या सुखासाठी व्यथित करणा-या शिवाजी महाराजांचे अकाळी निर्वाण झाले आणि स्वराज्यात विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली. याचाच फायदा घेवून औरंगजेब स्वराज्यावर चालून आला आणि स्वराजाचे दुसरे सिंहासनाधिश्वर सुध्दा एकाकी मुगलाच्या हाती सापडून त्यांचीही अमानूष हत्या करण्यात आली. या आणिबाणीच्या परिस्थितीत रायगड पडला ! होय तख्ताचा रायगड पडला. इतिकाद उर्फ झुल्फिकार खान यांने रायगड काबिज केला आणि रायगडावरील सिंहासनही फोडले. आपल्या स्थापनेच्या अवघ्या 16 व्या वर्षीच स्वराज्याचे सिंहासन भंग पावले. महाराष्ट्राबरबरच हिंदूस्थानातील तमाम जनतेच्या आशा ज्या सिंहासनाने पल्लवीत केल्या त्या सिंहासनाची शकले मुगलांनी केलीत. रायगड पडला म्हणून इतिहासाने नोंद घेतली असली, तरी मराठ्यांनी आपली राष्ट्रभक्ती, स्वराज्य प्रेम व झुंझ देण्याची शक्ती गमावली नाही. स्वाराजाची यज्ञकुंड विझु दिला नाही. या कठिण परिस्थितीत मराठ्यानी जो लढावू बाणा दाखवला त्याबद्दल पुरुषोत्तम गोखले आपल्या जागृत सातारा या पुस्तकात लिहतात, “छत्रपतींच्या घराण्याबद्दल जनतेला प्रेम वाटते, याचे कारण महाराष्ट्राचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी “धर्मासाठी आम्ही घेतली फकिरी” म्हणून जो बाण धरला तोच पुण्यश्लोक बाणा, जरी प्रतापसिंह महाराजांना राज्य गमवावे लागले तरी, छत्रपति घराण्यात कायम आहे. या बाण्यामुळेच छत्रपतींचा उत्सव महाराष्ट्रीय अंतःकरणातून होत असतो. “इंग्रज नव्हेत, कारण इंग्रज हे पुराणवस्तुसंशोधक व संरक्षक आहेत; पण दुसरे कोणी चोर हिंदुस्थानात आले तर कदाचित रायगडावरील दगडांच्या छातीचे तुझे सिंहासन सुरुंग लावून ते फोडतील; तेव्हा अढळ असे सिंहासन मी तुला देते, आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयाचे सिंहासन होय, असे देवी भवानी शिवाजीराजांना म्हणाली.” काळकर्ते परांजप्यांचे 1924 साली सातारा येथील ग. व्या. शाळेत गणपत्युत्सवात व्याख्यान झाल्यावर संदेशकार कोल्हाटकरांनी जे वरील उद्गार काढले ते छत्रपतींच्या बाण्याने महाराष्ट्रीय अंतःकरणात उत्पन्न केलेल्या कृतज्ञतेचे बोल आहेत.”
स्वराज्याचे सिंहासन हे 32 मण सोन्याचे होते, परंतू त्या सिंहासनाच्या आठवणी ह्या काही त्या 32 मण पुरता मर्यादीत नाही. स्वराज्याचे सिंहासन हे महाराष्ट्राच्या आस्मितेचे, करारी बाण्याचे, अलौकीक शौर्याचे तसेच देव, देश आणि धर्मासाठी लढणा-या मराठ्यांचे प्रतिक आहे. नुकतिच त्या सिंहासनाच्या पुर्नस्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आणि माझ्या विचारात, चित्तात एकच विषय घोळू लागला. महाराजांचे सिंहासन कसे होतं ? त्याचे स्वरुप, मांडणी, व्यवस्था कशी होती? या सारखा अनेक प्रश्नानी माझ्या मनात घरच केले. मग ठरवल की आपण याबद्दल अभ्यास करायचा आणि आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधायची. गेली 8 महिने मी संदर्भाने संकलन व लेखन करत असतांना अनेक पैलू माझ्या समोर आले, अनेक इतिहासाचे पदर नव्याने उलगडले गेले. त्यातच फेसबूकच्या माध्यमातून लोकांच्या मनात याबद्दले प्रश्न आहेत, ते माझा सारखेच आहेत याचीही जाणीव झाली. म्हणूनच ठरल की जे काही गेल्या काही महिन्यापासून संकलीत करतोय ते लोकांसमोर मांडायच. तसे पाहिल्या माझ्या लेखनाचा व संकलनाचा विषय हा मर्यादित न राहता तो “हिंदुपदपादशाहीचे सिंहासन” असा व्यापक झाला आहे. “हिंदुपदपादशाहीचे सिंहासन” हा विषय भविष्यात तुमच्या समोर येईलच. तरीही आज मी माझ्या लेखनाचा विषय “छत्रपतींच्या सिंहासनाची रचना’ विषया पुरता मर्यादेत ठेवून काही वस्तूनिष्ठ माहिती या लेखातून आपल्या समोर ठेवत आहे.
सिंहासनाबद्दल लिखित उपलब्ध माहिती काय आहे याबद्दल प्रथम मी शोध घेण्यास चालू केला. महाराजांच्या बद्दल समकालीन साहित्यात याबद्दल माहिती उपलब्ध होण्यासाठी माझ्या समोर पहिला आणि संदर्भ होता तो म्हणजे बखर होय. कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरुन लिहली ही आद्य बखर होय. यामध्ये सभासद तख्ताबद्दल्लच्या महत्वाच्या उल्लेखात लिहतात, “पुढें तक्तारुढ व्हावें. (म्हणून) तक्त सुवर्णाचें, बत्तीस मणांचें, सिध्द करविलें. नवरत्नें अमोलिक जितकी कोशांत होतीं त्यांमध्ये शोध करुन मोठी मोलाचीं रत्ने तक्तास जडाव केलीं. जडित सिंहासन सिध्द केलें.” सिंहासनाबद्दलचा उल्लेख सर्व इतिहास अभ्यासकांना, प्रेमींना माहितच आहे. आणि हीच एकमेव माहिती आपणास सिंहासना संदर्भात आज उपलब्धा आहे. कदाचीत काही जणांना याही पेक्षा अधिकच माहिती असू शकेल. असो.
आजच्या या भागात आपण सिंहासनाबद्दल प्राथमिक माहिती घेतली. पुढील भागात या सिंहासनाची रचना कशी होती, याबद्दल इतिहासात काय नोंद मिळते का ते पाहूं.
संकलन व लेखन – मुकेश मारुती वडीयार
mukeshvadiyar.wordpress.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...