विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

छत्रपतींच्या सिंहासनाची रचना – भाग दुसरा

 


छत्रपतींच्या सिंहासनाची रचना –
भाग दुसरा

छत्रपतींच्या सिंहासनाची रचना

(भाग दुसरा = इतर साधने व सिंहासनाची आवश्यकता)
शहाजी राजे अहमदनगरच्या सुलतानाकडे मनबदार म्हणून लष्करी सेवेत होते. त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली की त्यांनी अहमदनगरची सुलतानशाहीचे तख्त राखले. वयाने अल्पवयिन असलेल्या सुलतानाला घेवून शहाजी राजे तख्तावर (सिंहासनावर) बसत होते. शहाजी राजे स्वतःचे सिंहासन स्थापन करणार इतक्यात उत्तरेकडील मुघल आणि दक्षिणेकडील आदिलशहा यांनी युती करुन शहाजी राजांच्या मनसुबा उधळून लावला. मुघल आणि शहाजी राजे यांच्यातील झालेल्या तहा नुसार त्यांना कर्नाटक प्रांती राहून आदिलशाहीच्या चाकरी राहणे अपरिहार्य होते. शहाजी राजे कर्नाटक प्रांती गेले आणि शिवाजी महाराजांना आपले कतृत्व सिध्द करण्याची योग्य अशी संधी मिळाली. आणि ती त्यांनी योग्य प्रकारे उपयोगात आणली व आपले नेतृत्व सिध्द केले. पुण्याची जहांगीरी सांभाळत असतांना त्यांनी सर्व प्रकारे स्वतःस राजा म्हणून रयतेच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र यत्न केले. जावळीच्या मो-याने महाराजांच्या विरोधात करघोडी केली, महाराजांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने महाराजांना उद्धट निरोप पाठविला, तुम्ही स्वतःला राजे म्हणविता, तुम्ही कसले राजे ? राजे तर आम्ही कारण आम्हाला खुद्द आदिलशहाने ‘सिंहासन’ दिले आहे. पुढे तर महाराज स्वतःस राजे घोषीत करुन ‘सिंहासना’वर बसू लागले हे जेव्हा आदिलशहास समजले तेव्हा त्यानी अफजल खानास स्वराज्यावर मोहिमेस पाठविले. शिवाजी कैद करुन आदिलशहाच्या ‘सिंहासना’ समोर टाकतो अशी ग्वाही दिलेला आफजलखान आदिलशाहीत परतलाच नाही. ज्या औरंगजेबाने आपल्या भावंडांचा खून करुन दिल्लीचे तख्त बळकावले, तो पृथ्वीपती औरंगजेब महाराज आग्रा भेटीवर वर आले असताना आपल्या सिंहासनावर म्हणजेच ‘मयुरासना’वर खास व्यवस्था करुन शस्त्रानिशी आणि संरक्षकांच्या हमीवर बसला होता. महाराजांनी स्वराजाचे सिंहासन स्थापन करताना घडलेल्या अनेक हकिकती आणि किस्से इतिहासात भर भरुन उपलब्ध आहेत, परंतू प्रत्येकाची माहिती येथे देणे शक्य नाही. तरीही भविष्यात पुस्तक स्वरुपात आपणा समोर ते मी ठेवेनच. असो.
शब्दांच्या मर्यादेत बसवायचे म्हटले तरी ते शिवचरित्र आहे, ठराविक शब्दा आणि मोजून व्यक्त होणे अवघडच आहे हे मान्य करायला हवे. म्हणूनच एक गागाभट्ट आणि सिंहासन या संबंधाने एक हकिकत येथे नमूद करतो. महाराज राज्याभिषेक करुन सिंहासनाची स्थापना करावी वा कसे या विचारात होते. त्यासाठी राज्याभिषेकाच्या सशास्त्र विधी कसे व्हावेत व कोण करणार याबद्दल चाचपणी चालू होती. त्या तयारीचा भाग म्हणून गागा भट्टा खास आपल्या शिष्य आणि सहकारी विद्वानांसह गडावर आले. त्यांची आणि महारांजांची भेट झाली. या भेटीच्या अनुषंगाने सभासद आपल्या बखरीत लिहतो, “पुढें वेदमूर्ति राजेश्री गागाभट म्हणून वाराणशहून राजियाची किर्ति ऐकून दर्शनास आले. भट गोसांवी, थोर पंडित, चार वेद-साहा शास्त्रे-योगाभ्याससंपन, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येनें निपुण, कलयुगीचा ब्रह्मदेव असे पंडित, त्यांस राजे व सरकारकून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्मानें आणिलें. त्यांची पूजा नाना प्रकारें रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन, द्रव्यहि उदंड देऊन पुजिलें. गागाभट बहूत संतुष्ट जाले. भट गोसांवी यांचे मतें, मुसलमान बादशहा तक्तीं (सिंहासनी) बसून, छत्र धरुन, पातशाही करितात, अणि शिवाजीराजे यांनीहि चार पादशाही दबाविल्या. आणि पाऊण लाख घोडा लष्कर गडकोट असें (मेळविलें) असतां त्यास तक्त (सिंहासन) नाही. याकरितां म-हाठा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें. आणि (ते) राजियांसहि मानिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करतां सर्वांचे मनास आलें. तेव्हा भट गोसांवी म्हणूं लागले कीं, तक्ती (सिंहासनी) बसावें.” महाराजांनी पुर्ण विचार करुन सिंहासन स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
सिंहासन स्थापन करावयाचे तर ते शास्त्रांप्रमाणेच स्थापन करावे लागणार. येवढे प्रमाणात सोन्याची कारागीरी करणारे कारागीर कोठे मिळणार याचा विचार महाराजांनी केला आणि या कामी महाराजांनी चित्रे यांची निवड केली. त्यांनीही आपली सार्थ निवड सिध्द करत कमी कालावधीत xxxxxxxx येथून कारागीर बोलावले. गागाभट्ट आणि अनंतदेव यांनी सिंहासनाच्या रचने बद्दल शास्त्रातील उल्लेख दाखवत अशा प्रमाणेचे सिंहासन बनविण्याच्या सुचना केल्या. सिंहासन हे राज्याभिषेक विधीतील महत्वाची बाब आहे. या अभिषेक विधिमध्ये आसंदी , भद्रपीठ व सिंहासन यांचा वापर होतो. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आसंदी , भद्रपीठ व सिंहासन शास्त्रांनुसारच बनविण्यात आले होते. हे सशास्त्र बनविण्यात आलेले सिंहासन कसे होते याबद्दल मल्हार रामराव चिटणीस आपल्या ‘सप्तप्रकरणात्मक चरित्रा’त नमूद करतो, “सिंहासनसभा केली. तेथें क्षीरवृक्षाची वेदीआ वट औदुंबराची करावी तशी करुन त्यास सुवर्णेकरुन तगडें मढवून रत्नखचित केलें. प्रमाण आहे तसें केलें. त्याजवरी चित्रें प्रथम ओळ वृषभांची, त्यावर मार्जारांची. त्याजवर तरसांची, त्याजवर सिंहांची, त्याजवर व्याघ्रांची, अशी एका बाजूस आठ याप्रमाणे बत्तीस चित्रें चहूंकडे मिळून काढून त्यास सिंहासन असें म्हणावें, तसें सिद्ध केलेंच होते. त्याजवरी मृगचर्मे घालून त्याजवरी कांही सुवर्णादि द्रव्य घालावे; त्याजवरी वाघ्रचर्म घालून, त्याजवरी कार्पास आसने मखमलीची मृदु ऐशी घालून, बादली जरी वस्त्रें घालून उदबैन म्हणजे लोडें व तक्के, मागें प्रभावळ करुन, त्यास मुक्ताफळांचे घोंस ऐसें सुशोभित केलें होते.”
मल्हार रामराम चिटणिस हे बाळाजी आवजी चिटणिसांचे वंशज, सातारकर शाहू महाराज आणि प्रतापसिंहाच्या दराबारातील चिटणिस होत. त्यांनीच शिवाजी महाराजांची बखर ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’ लिहले आहे. त्याच बरोबर त्यांचे इतरही लेखन उपलब्ध आहे, परंतू ते शिवाजी महाराजांच्या समकालीन नसल्यामूळे व इतर विविध आक्षेपामुळे त्यांचे लेखन विवादित आहे. तरीही त्यांच्या ‘सप्तप्रकरणात्मक चरित्रातील सिंहासनाचा उल्लेख अभ्यासकांसाठी दुर्लक्षित करण्यासारखा नाही. माझ्या दृष्टीने सिंहासनावरील चित्रांबद्दलचा उल्लेख अवास्त असून तो इथे नमूद करणे चुकीचे ठरेल. आता आपण फक्त त्यांच्या “क्षीरवृक्षाची वेदीआ वट दुंबराची करावी तशी करुन त्यास सुवर्णेकरुन तगडें मढवून रत्नखचित केलें” या अनुषंगाने विचार करु. शास्त्रीय स्वरुपात सिंहासन बनवतांना औदुंबर या वृक्षाला अन्यनसाधाराण महत्व आहे.

अथ यदौदुम्बर्यासन्दी भवत्यौदुम्बरश्र्वमस

उदुम्बरशाखोर्ग्वा अन्नाद्यमुदुम्बर

उर्जमेवास्मिंस्तदन्नाद्यं दधाति ।

(ऐतरेय ब्राह्मण)

“आसंदी (सिंहासन) हे औदुम्बराच्या लाकडाचे बनवितात, कारण औदुम्बर हा सामर्थ्य आणि पोषणतत्वांचे प्रतिक आहे. आसंदीसाठी (सिंहासन) औदुम्बर वापरल्याने त्यातील सामर्थ्य आणि पोषणाचे गुण राजामध्ये उतरतात.”
ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेकाचे पुनराभिषेक आणि ऐंद्र महाभिषेक असे दोन प्रकार सांगितले आहेत. ऐंद्र महाभिषेक इंद्राच्या राज्याभिषेक विधीशी संबंधित असून पुनराभिषेकात राजाचा राज्याभिषेक आणि आसंदी (सिंहासन) आरोहण विधी सांगितला आहे. ऐतरेय ब्राह्मणात नमूद केल्याप्रमाणेच सिंहासनाच्या रचनेत औदुम्बर म्हणजेच उंबराच्या वृक्षाच्या खोडाचा उपयोग केला जातो, त्यामुळे मल्हार रामराम चिटणिस यांनी नमूद केलले सिंहासनाच्या रचनेचा उल्लेख यथार्थ वाटतो. राज्याभिषेकासाठी सिंहासनाची बांधणी करताना आधार म्हणून पवित्र वृक्षांच्या लाकडाचा उपयोग केला गेला. सुवर्णाच्या पत्र्यांनी मढवून हे सिंहासन बनवले गेले होते. सिंहासन हे संपुर्णा सोन्याचे नव्हते असे एक क्षणासाठी मान्य केले, तर मग प्रश्न निर्माण होतो की सिंहासन 32 मण सोन्याचे होते का ? सिंहासनामध्ये इतके सोने वापरले असेल ?
हा भाग येथेच कम्रशः समाप्त करतो, पुढील भागात आपण पाहू हिंदुपदपादशाहीचे सिंहासन इतके मुल्यवान होते. महाराजांच्या सिंहासनात किती सोने होते या आगोदर इतके मुल्यवान सिंहासन बनविण्याची प्रेरणा महाराजांना कोठून मिळालेली असेल ह्या बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...