विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

धार पवारांविषयी सविस्तरपणे

 


धार पवारांविषयी सविस्तरपणे
कुलदेवता
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठ्यांमध्ये प्रत्येक कुळाचे ठराविक असे कुलस्वामी (कुलदैवत) तसेच कुलस्वामिनी (कुलदेवता) असते. मराठ्यांचे ‘कुलस्वामी’ हे प्रामुख्याने ‘शिव’ स्वरुपात असतात तर कुलस्वामिनी ही ‘शक्ती’ स्वरुपात असते.
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठा ‘पवार’ हे मुळचे धारच्या प्राचीन राजपूत क्षत्रिय ‘परमार’ राजवंशाचे वंशज असल्यामुळे धार जवळील ‘उज्जैन’ येथील ‘श्रीमहाकालेश्वर’ हा या पवार घराण्याचा मूळ ‘कुलस्वामी’ आहे. तसेच धार येथील ‘श्रीमहाकालिका’ माता हि ‘पवार’ घराण्याची मूळ ‘कुलस्वामिनी’ आहे.
उज्जैन येथील ‘श्रीमहाकालेश्वर’ हे जग प्रसिद्ध देवस्थान १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ‘श्रीमहाकालेश्वर’ मुळचे प्राचीन मंदिर ‘परमार राजवंशाने’ बांधले होते. तसेच धारच्या ‘श्री कालिका’ मातेचे मुळचे प्राचीन मंदिर सुद्धा परमार राज वंशाने बांधले होते. पुढे मराठा शाही मध्ये सदर श्री कालिका मातेच्या मंदिराचे जीर्णौद्धार करण्यात आला.
अशा प्रकारे ‘श्रीमहाकालेश्वर’ आणि ‘श्रीमहाकालिका’ हे पवारांचे मूळ कुलस्वामी – कुलस्वामिनी आहेत. परंतु पुढे धारहून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर बऱ्याचशा मराठा पवारांमध्ये मूळ कुलदेवता-कुलदेवी बदलले जाऊन येथील प्रचलित स्थानिक देवता किंवा ग्रामदेवता यांना कुलदेवता किंवा कुलस्वामिनी मानल्याचे आढळते. त्यामुळेच महाराष्ट्रातील मराठा पवार घराण्यांमध्ये ‘खंडेराय-भवानी’, ‘भैरव(भैरी)-भवानी’, ‘ज्योतिबा-भवानी’ आणि तसेच ईतर प्रसिद्ध देवी-देवता कुलस्वामी-कुलस्वामिनी म्हणुन मानले जातात.
अशा प्रकारे परंपरेने चालत आलेल्या आपल्या मूळ कुलस्वामी-कुलस्वामिनी यांचे स्मरण ठेऊन प्रत्येक मराठा पवार यांनी त्यांचे पूजन केले पाहिजे.
मराठा पवारांचे गोत्र
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठ्यांच्या परंपरेने चालत आलेल्या वैशिष्ठ्यांमध्ये ‘पवार’ कुळी संदर्भात माहिती पुढील प्रमाणे.
मुख्य कुळी : पवार
वंश : सुर्यवंश
गोत्र : वसिष्ठ
वेद : ॠग्वेद
गादी : धार नगरी
देवक : तलवारीची धार
कुलदेवता : ‘श्रीमहाकालेश्वर- श्रीमहाकालिका’, ‘खंडेराय-भवानी’, ‘भैरव(भैरी)-भवानी’, ‘ज्योतिबा-भवानी’
उपकुळे : निंबाळकर, विश्वासराव. दळवी, ढवळें, गुढेकर, देशमुख, पाटील, वाघ, बागवे, जगदाळे, धारराव, घोसाळकर, बने, धनावडे, सावंत ( पटेल ), राऊळ, पंडित, तळवटकर, झुंझारराव, औषधराव, मुकुटराव, धारराव, दुधाने, जगदाळे
महाराष्ट्रातील ९६ कुळी क्षत्रिय मराठा घराणे
महाराष्ट्रातील ९६ कुळी क्षत्रिय मराठा घराणे हे प्राचीन क्षत्रिय राजघराण्याचे वंशज आहेत. या ९६ कुळी क्षत्रिय मराठ्यांमध्ये पवार घराणे हे एक मुख्य कुळी म्हणुन गणले जाते. हे पवार घराणे प्राचीन क्षत्रिय राजपूत परमार राजवंशाची एक शाखा आहे. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचा उदय राजस्थानातील आबू पर्वत येथे झाला. तेथून हा राजवंश मध्य भारतातील उज्जैन व धारा नगरी येथे आला व पुढे आपल्या पराक्रमाने भारतातील चक्रवर्ती सम्राट पदाचा मानकरी झाला. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचे मुख्य सत्ताकेंद्र अथवा राजधानी धारानगरी म्हणजेच आजचे धार हे होते.
मध्यभारतातील माळवा प्रांतातील हि धारानगरी परमार राजवंशाच्या कालखंडात एक संपन्न व सुसंस्कृत नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धार येथील या प्रसिद्ध परमार राजवंशाच्या शाखा महाराष्ट्रात विवध कालखंडात आल्या व येथेच स्थायिक झाल्या. महाराष्ट्रात आल्यावर परमार राजवंशाला पवार संबोधू जावू लागले. तसेच धार येथून आल्यामुळे त्यांना धारचे पवार ही म्हटले जावू लागले.
इसवी सन १३ व्या शतकानंतर महाराष्ट्रातील प्राचीन क्षत्रिय राजघराण्यांचा ९६ कुळांचा एक गट अस्तित्वात आला. त्यामध्ये त्याकाळात महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या उत्तरेतील क्षत्रिय राजघराण्यांचा हि समावेश झाला. अशा प्रकारे प्राचीन क्षत्रिय राजवंशी परमार पासुन जसे पवार त्याचं प्रमाणे सोलंकी पासुन साळुंखे, चालुक्य पासुन चाळके, चौहान पासुन चव्हाण, शिलाहार पासुन शेलार, यादव पासुन जाधव, शिसोदिया पासुन भोसले, मौर्य पासुन मोरे, कदंब पासुन कदम, सेन्द्रक पासुन शिंदे, शंखपाला पासुन सकपाळ, राणा पासुन राणे, सुर्वे वैगरे मराठ्यांच्या ९६ कुळ्या अस्तित्वात आल्या.
९६ कुळी मराठा हि संकल्पना अस्तित्वात येण्याचा कालखंड हा १४ व्या शतका नंतरचा आहे. त्यापूर्वी हि सर्व राजघराणी क्षत्रिय राजपूत अथवा क्षत्रिय म्हणूनच ओळखली जात.
धारच्या या पवार म्हणजेच धार पवार घराण्याचे महाराष्ट्रात आगमन हे साधारणपणे १० व्या शतका नंतरचे आहे. त्यापूर्वी पवारांची एखाद दुसरी शाखा धारवरून महाराष्ट्रात आल्याच्या नोंदी इतिहासत सापडतात. परंतु धारमधुन पवारांच्या वेगवेगळ्या शाखेचे महाराष्ट्रात झालेले स्थलांतर हे इसवी सन १३०५ नंतरचे आढळते. कारण इसवी सन १३०५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने धार येथील परमरांचा पराभव केला व तेथील परमारांची सत्ता संपुष्टात आणली. म्हणजेच १४ व्या शतकात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांत जसे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, विदर्भ आणि इतरत्र पवारांच्या शाखा उदयास आल्या आणि तेथेच स्थयिक झाल्या.
मराठ्यांच्या इतिहासात प्रमुख धार पवार घराण्याच्या ज्या एका शाखेचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो ती म्हणजे मूळ पुरुष साबूसिंह परमार अथवा पवार यांपासून उदयास आलेली हि शाखा. धार पवारांची हि शाखा त्यामानाने काहीशी उशिराच म्हणजे इसवी सन १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात आल्याची नोंद मिळते.
धार पवार या शाखेचे प्रमुख वास्तव्य नगर जिल्ह्यातील सुपा या गावी होते. तेथूनच या शाखेचा विस्तार पुणे जिल्ह्यातील मलठण, वाघाळे, कवठे, हिंगणी, गणेगाव, पाथरे, अमदाबाद, चितेगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळे येथे झाला.
याच शाखेतील शूरवीरांनी मध्य प्रदेशातील धार व देवास येथे पवार घराण्याची पुनर्स्थापना करून मराठ्यांची धार व देवास हि संस्थाने अस्तित्वात आणली.
साबूसिंह पवार यांच्या पासुन उदयास आलेल्या धार पवार ह्या घराण्याच्या शाखेने स्वराज्य स्थापना तसेच स्वराज्याचा विस्तार या कार्यामध्ये मोलाची कामगिरी करून धार पवार घराण्याचा ठसा ईतिहासात उमटविला आहे.
धार पवारांच्या ह्या शाखेतील साबुसिंह व त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार यांनी शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहून आपला पराक्रम गाजविला. कृष्णाजींचे पुत्र बुवाजी, रायजी व केरोजी यांनी शिवकालाच्या उत्तराधार्त तसेच पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात मोठा पराक्रम गाजवून मराठ्यांच्या मोगल बादशाह औरंजेबाच्या विरुद्धच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये बुवाजी पवार यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पुढे महाराजांनी विश्वासराव हा मनाचा खिताब दिला.
बुवाजी पवारंचा पुत्र काळोजी व संभाजी यांनी छत्रपती शाहू महाराजांना साथ देत थेट मध्यभारतातील मांडवगड येथ पर्यंत धडक दिली होती. काळोजींचे पुत्र तुकोजीराव, कृष्णराव, जिवाजी व मानाजी यांनी पहिल्या बाजीरावा पेशव्यांसोबत उत्तरेतील मोहिमात पराक्रम गाजवून देवास येथे आपले ठाणे प्रस्थपित केले. तसेच संभाजी पवार यांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव, व जगदेवराव यांनी सुद्धा उत्तरेमध्ये मध्यभारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले व धार हे पवारांचे प्रमुख ठाणे म्हणुन प्रस्थापित केले. अशा प्रकारे पवारांच्या प्राचीन राजधानीचे ठिकाण त्यांच्याच वंशजांनी पुढे ४०० वर्षानंतर आपल्या पराक्रमामुळे मिळविले.
धार पवारांच्या प्रमुख शाखेव्यातारिक्त आजूनही वेगवेगळ्या शाखा उदयास आल्या व आपल्या पराक्रमाने वतन वैगरे संपादन करून महाराष्ट्रात विस्तारित झाल्या. धार पवारांच्या काही शाखांची माहिती खालील दिल्याप्रमाणे
१] निंबाळकर : हे घराणे मुळचे धारचे पवार घराणे आहे. यांचा मूळपुरुष निंबराज पवार यांनी इसवी सन १३ व्या शतकात सातारा जिल्ह्यातील फलटण येथे निंबळक गाव वसविले. याच गावाच्या नावावरून त्यांना निंबाळकर असे उपनाव प्राप्त झाले. या घराण्याला नाईक हि पदवी मिळालेली असून इतिहासत नाईक- निंबाळकर या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी यांचे पूर्वपार नाते संबंध आहेत.
२] विश्वासराव : शिवकाळात प्रसिद्ध असणारे हे घराणे मुळचे धार पवार. विश्वासराव हि पदवी ह्या घराण्याला मिळालेली आहे. शिवनेरीचे किल्लेदार विजयराव विश्वासराव याच घराण्यातील होते. या घराण्याकडे कर्नाळा किल्ल्याची सुद्धा जबाबदारी होती. या घराण्याचे वंशज सध्या कर्नाळा किल्ल्या जवळील कल्हे या गावात वास्तव्य करून आहेत तसेच राजापूर तालुक्यामध्ये झर्ये या गावात सध्या वास्तव्य करून आहेत.
३] ढवळे : या घराण्याचा मूळ पुरुष राजा रणधवल याने इसवी सन १४ व्या शतकात सातारा जिल्ह्यात ढवळ हे गाव वसविले. राजा रणधवल हा मूळच्या परमार राजवंशाचीच एक शाखा होय. अशाच प्रकारे ढवळे गावच्या पवारांना ढवळे हे उपनाव प्रात्प झाले. याच पवार घराण्यातील वंशज पुढे जाऊन नांदवळ या गावी जाऊन स्थायिक झाले. पुढे जाऊन ते नांदवळचे पवार महणून प्रसिद्ध झाले. या पवार घराण्याने नाईक-निंबाळकर यांचे सरदार म्हणुन पराक्रम गाजविला. पुढे ते अक्कलकोट येथील भोसले घराण्याचे सरदार म्हणुन तर कधी पेशव्यांचे सरदार म्हणुन पराक्रम गाजविला.
४] गुढेकर : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहे या गावी प्राचीन काळी जे पवारांचे घराणे होते त्यांना पुढे गुढेकर हे नाव प्राप्त झाले. या पवार घराण्याने प्रथम देवगिरीच्या यादव या घराण्याचे सरदार म्हणुन काम केलेले आढळते. पुढे जाऊन विजयनगर चे सम्राट यांचे सुद्धा सरदार म्हणुन नावलौकिक मिळविल्याची नोंद इतिहासात आढळते.
५] सावंत : सावंत हि पदवी असल्यामुळे अनेक मराठा सरदारांना हि पदवी मिळालेली आढळते. त्याचप्रमाणे हि पदवी पवार धार पवार घराण्याच्या एका शाखेला मिळालेली आढळते. या पवार घराण्याचा मूळ पुरुष सावंतराय हा असून त्यांचे मुळचे वास्तव्य रायगड जिल्याालतील माणगाव तालुक्यामध्ये गोवेले या गावी होते. शिवकाळात या गोवलकर सावंतांचा उल्लेख आढळतो.
६] तसेच सावंत पटेल हे सिंधुदुर्ग येथील भिखंडे येथे एक सावंत घराणे उदयास आले जे मुळचे धार पवार आहेत. या कुळाचा मूळपुरुष लखम पवार हे होते.
७] पंडित : रत्नागिरी जिल्ह्यातील तुरुंबव या गावी पंडित या घराण्याचे वास्तव्य आहे. हे घराणे मुळचे धार पवार आहेत. या गावात शारदा देवीचे (सरस्वती मातेचे) मंदिर आहे. बहुदा सरस्वती मातेचे भक्त असल्यामुळे अथवा विद्वत्तेमुळे या धार पवार घराण्याला पंडित हे उपनाव प्राप्त झाले असावे.
८] बागवे : हे घराणे मुळचे धारचे त्यांचे मुळचे वास्तव्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भासुरे ह्या गावी होते.
महाराष्ट्रातील विवध भागात स्थायिक झालेल्या मुळच्या धार पवारांविषयी जाणून घेवूया
कोकणातील धार पवार : कोकणामध्ये प्रामुख्याने सर्वच जिल्ह्यात धार पवार घराणी वास्तव्य करून आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यामधील पवार साखरी व ईतर गावे, मंडणगड तालुक्यातील शावली गाव, खेड तालुक्यातील गावे, रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्याच्या परिसरात आढळतात जसे महाड तालुक्यात बिरवाडी, पाचाड, कोंझर, माझेरी, कोकरे, फौजी आंबवडे, नांदगाव, कुर्ले, चोचींदे तसेच पोलादपूर तालुक्यामध्ये तुर्भे गावी हि ठिकाणे आढळतात. हि धार घराणी शिवकाळात उदयास आल्याची नोंद इतिहासात आढळते.
पश्चिम महाराष्ट्रातील धार पवार
सातारा जिल्ह्यातील फलटण, पवारवाडी, चितळी, नांदवळ, ढवळ, वाई, इत्यादी ठिकाणी धार पवारांचा विस्तार झालेला पाहायला मिळतो.
पुणे, नगर जिल्ह्यातील धार पवार यांच वास्तव्य प्रामुख्याने पुण्यातील मालठण येथे सापडते. याच बरोबर धार पवारांच्या उदयास आलेल्या ईतर शाखा वाल्हे, भांबुर्डे, शेडाणी, खामगाव, भोर, धारंबा आणि इत्यादी ठिकाणी वास्तव्य करून राहिल्या. नगर जिल्ह्यातील धार पवारांच्या सुपे गावातील प्रमुख शाखे व्यतरिक्त पवारांच्या ईतर शाखा इतरत्र जाऊन स्थायिक झाल्या.
खान्देशातील पवार : नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यातहि धार पवारांच्या शाखेचा उदय झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. तसेच इतरत्र म्हणजे पाचोरा, अमळथे या ठिकाणी हि धार पवारांचे वास्तव्य पहावयास मिळते.
अशाप्रकारे शिवपूर्व काळात, शिवकाळात, पेशवाई या विवध कालखंडामध्ये महाराष्ट्रातील धार पवारांनी पाटीलकी, देशमुखी, खोती, किल्लेदारी, सरदारी ते थेट जहांगिरी, सरंजामदार, आणि संस्थानिक पर्यंतची महत्वाची वतने संपादन करून महाराष्ट्रातील विविध भागात वास्तव्य करून आपल्या धार पवार घराण्याचा नावलौकिक वाढविला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...