सुर्यवंशी मराठा गौरव आणि बाणा असलेला कुंक्कळीचा (गोवा) शिलालेख!!!!
लेखन व माहिती:अनिल दुधाणे....,लेखन .श्री सचिन मदगे. गोवा
शिलालेखाचें वाचन
Devanagarı text in the original Kunkalı Inscription, 1579 A. D.
१ स्वस्ति श्री सके १५०१ प्रमाथी
२. शवछरे वैशाक सुध दस
३. मी वार बुधवारी रामेस्वर लिंग
४ ची थापना वीटलदास वीठोजी
५बिन मेगोजी लोकरा (?) सुरेव
६. सी थापना केळी हे स्थानक
७ मुसल्मान होऊन तोडी तै तलाची
८ सव मऱ्हाटा होऊन मोडी तऱ्ही त्या
९ ब्रम्हहत्येचे पातक मोडळे करी तै
१० मुसलमानासी मके गेली याचे
११. फळ मऱ्हाटा होऊनु कासी
१२ यात्रेचे फळ
कुंकळ्ळीचा शिलालेख आणि इतिहास!!!
गोव्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय असणारे कुंकळ्ळी गाव. या गावातील सन १५७९ मधील रामेश्वर महादेवाच्या मंदिराच्या स्थापनाप्रसंगी बसवलेला मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील शिलालेख हा अवघा बारा ओळीचा आहे. हा शिलालेख छोटा असला तरी कुंकळ्ळी गावच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाचा आणि शौर्यपराक्रमाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे.
पोर्तुगीजांचा अंमल साष्टी महालावर सन १५४३ मध्ये सुरू झाला. इब्राहीम आदिलशहाने बादशहा होण्यासाठी पोर्तुगीजांनी केलेल्या मदतीप्रित्यर्थ पोर्तुगीजांना साष्ट व बारदेश महाल दिले. साष्ट व बार्देश पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर गोवा बेटातील पोर्तुगीजांच्या मुख्य राजधानीला लष्करी संरक्षण आपोआप प्राप्त झाले. गोव्यातील सत्ता मजबूत होताच पोर्तुगीजांना आपले जुलमी धार्मिक धोरण राबवायला सुरुवात केली त्याच सुमाराम सन १५०२ मध्ये प्रसिद्ध धर्म प्रचारक फ्रान्सिस झेवियरचे गोव्यात आगमन झाले. पोर्तुगीज राजा तिसरा
दोंजुआंव हा या काळात पोर्तुगीज सिंहासनावर होता. ह्या राजाने गोव्यातील हिंदूंच्या धर्मपरिवर्तनासाठी अनेक धर्म-अधिकारी पाठवले. या धर्म-अधिकाऱ्यांनी सरकारी आदेश काढून हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. साष्ट व बार्देश हे दोन्ही महाल जेजुईट मिशनऱ्याकडे कडे सोपवले गेले. सन १५६७ मध्ये पोर्तुगीज विजरईच्या आदेशाने राशोलचा किल्लेदार दियोग रुद्रोगोश याने साष्ट महालातील दोनशे ऐशी मंदिरे उद्ध्वस्त केली. साष्ट महालात त्यामुळे प्रचंड' हाहाकार उडाला होता. पोर्तुगीजांनी हिंदूपुढे दोनच पर्याय ठेवले होते; एक तर धर्मातर करा किंवा घर गाव सोडून निर्वासित व्हा. जीवाच्या व जमीनजुमल्याच्या बचावासाठी अनेक गावांतील लोकांनी नाईलाजाने धर्मातर केले. अनेक लोक निर्वासित होऊन परागंदा झाले. परंतु यास एकच गाव अपवाद ठरले, ते म्हणजे कुंकळ्ळी.
पोर्तुगीजांनी साष्ट महालातील बहुतेक गावांवर आपली जुलमी धार्मिक सत्ता लादली परंतु अत्यंत मानी, स्वाभिमानी अशा कुंकळ्ळीच्या गावकरांनी स्वधर्मासाठी आपल्या एकजुटीच्या बळावर पोर्तुगीजांचे सर्व प्रयत्न उध्वस्त केले. एक छोटा गांव पोर्तुगीजांच्या धर्मसत्तेला जुमानत नाही, ही बाब पोर्तुगीजांना भयंकर अपमानजनक वाटू लागली. पोर्तुगीज गव्हर्नरने ईश्तेव्हांव रुद्रिगोश या सैनिक अधिकाऱ्यास कुंकळ्ळीवर आक्रमण करण्यास पाठवले असता कुंकळ्ळीच्या गावकरांनी रुद्रिगीश व त्याच्या सहकाऱ्यांना असोळणा येथील चकमकीत ठार केले. कुंकळ्ळीच्या गावकरांनी खुद पोर्तुगीज राजालाच आता आव्हान दिले होते. तेव्हा विजरईन कुंकळ्ळी व असोळणा गावांवर सैन्य घातले आणि दोन्ही गावे जाळून गावातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त केली. कुंकळ्ळीच्या गावातील मंदिर उध्वस्त झाले असले तरी गावकरांची मने स्वधर्मासाठी त्वेशाने पेटून उठली. पोर्तुगीज सैन्याची पाठ वळताच लगेच गावातील घरे व मंदिरे परत जोमात उभी करण्यास सुरवात झाली. याचीच साथ देणारा अस्सल पुरावा म्हणजे कुंकळ्ळीचा शिलालेख.
पोर्तुगीज धार्मिक जुलमांचा वरवंटा साष्टीवर फिरवत असतानाही कुंकळ्ळी गावातील गावकरांनी रामेश्वर महादेवाच्या लिंगाची स्थापना काली, शके १५०१, वैशाख शुद्ध दशमी, बुधवारी, विठ्ठलदास ऊर्फ विठोजी यांनी रामेश्वर लिंगाची स्थापना केली. या मंदिरास उपद्रव देणाऱ्यास शापवाणी कोरली आहे, ती अशीः "मुसलमान होऊन तोडिल त्यास अल्लातालाची शपथ, महऱ्हाटा होऊन मोडील त्यास ब्रह्महत्येचे पातक लागेल." मंदिर संवर्धन करणाऱ्यास शेवटी कोणते फळ मिळेल, तेही शेवटच्या दोन वाक्यांत कोरले आहे. मुसलमानास मक्का गेल्याचे फळ मिळेल आणि मऱ्हाटा असल्यास काशी यात्रेचे फळ मिळेल, असा आशीर्वाद दिला आहे.
सोळाव्या शतकात आजच्या महाराष्ट्र व गोवा भागांत हिंदू धर्मियांस मराठे म्हणून ओळखले जाई. हिंदूधर्माचा महाराष्ट्र धर्म असा उल्लेख सोळाव्या, सतराव्या व अठराव्या शतकात अनेक ठिकाणी आला आहे. कुंकळ्ळीचा शिलालेख गोवा राज्य वस्तु संग्रहालयाच्या पणजी येथील दालनांत प्रदर्शित केला आहे. सध्या गोवा वस्तुसंग्रहालय आदिलशहा पैलेस म्हणजेच जुन्या सचिवालयाच्या इमारतीत आहे.
असा हा गोव्याच्या धगधगत्या पर्वातील कुंकळ्ळी गावच्या गावकरांच्या दुर्दम्य आशावादाचा, स्वाभिमानाचा अस्सल साक्षिदार. आजच्या पिढ्यांनाही आपल्या पूर्वसुरींच्या मर्दुमकीची साक्ष पटवतो आहे. शके १५०१ मधील प्रमाथी संवत्सर, वैशाख शुद्ध दशमी, म्हणजे साधारणतः एप्रिल, सन १५७८. कुकळ्ळी गावातील मंदिर स्थापनेनंतर पुढे पाच वर्षांनी १५ जुलै १५८३ रोजी कुंकळ्ळीच्या गांवकरांनी जो अभूतपुर्व लढा दिला, त्याला जगाच्या इतिहासातही तोड नाही. पुढली चार शतकेही कुंकळ्ळीच्या गावकरांनी स्वधर्म, स्वदेश याबाबतीत पोर्तुगीजांशी कोणताही तडजोड केली नाही.
कुंक्कलीचा किल्ला:-
जानेवारी १७३९ च्या गोवा स्वारीत मराठ्यांनी मडगाव (Madgaon) चा किल्ला जिंकून घेतला. सोबत पोर्तुगीजांच्या साष्टी प्रांतांचा बराचसा भाग सहज जिंकून घेतला. या स्वारीत कुंक्कळी (Cuneolim) कोटाचा उल्लेख सापडतो. मराठ्यांनी जेव्हा मडगाव किल्ला काबीज केला तेव्हा कुंक्कळी ठाण्यातील पोर्तुगीज सैन्याचा स्थानिक कॅप्टन तुकू नाईक आपल्या फलटणीसह स्वतःहून मराठ्यांना येऊन मिळाला होता. आज मडगाव आणि कुक्कळीचे कोट यांचे कोणतेही अवशेष आपल्याला सापडत नाहीत, ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत. इ.स. १६७५ मध्ये फौंडा स्वारीच्या वेळी शिवछत्रपतींनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी कुंक्कळी, असोळणे या गावांवर हल्ला केला होता. कुंक्कळी गावाबद्दल अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या गावाने १५ जुलै १५८३ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध केलेले पहिले बंड! गोव्यातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध !
स्वधर्माच्या रक्षणासाठी आणि पोर्तुगीजांनी चालवलेल्या धार्मिक अत्याचारांना जशास तसे' उत्तर देण्यासाठी स्थानिक जनतेने परकीय सत्तेविरुद्ध हा बंड केला होता, राशोल किल्ल्याचा कॅप्टन दिएगो रॉड्रिगीज ह्याने कुकल्लीवर अनेक हल्ले करून मंदिरे तोडली, घरांना आगी लावल्या, गाईच्या कत्तली केल्या, लोकांचा धर्म भ्रष्ट केला, पोर्तुगीजांच्या या धार्मिक अत्याचाराला कुंकळ्ळीच्या लोकांनी भीक घातली नाही, त्यांनी पुन्हा नव्याने मंदिरे उभारली आणि न डगमगता पोर्तुगीजांविरुद्धचा लढा असाच चालू ठेवला. शेवटी १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पोर्तुगीज कुंकळ्ळीत आले, या गावातील मंदिर तोडून तिथे चर्च बांधण्याचा मिशनऱ्यांचा मानस होता. कुंकळ्ळीच्या संतप्त लोकांनी हे मंदिर तोडायला आलेल्या २० पोर्तुगीज हस्तकांना कंठस्नान घातले, त्यात पाच जेजुईट पाद्री होते, चवताळलेल्या पोर्तुगीजांनी सैन्याच्या जोरावर हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोकाना ख्रिशचन करून टाकले, काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात गेले, सोबत आपापली दैवतंही घेऊन गेले, सततच्या हल्ल्याला कंटाळून कुंकळ्ळीकरांनी पोर्तुगीजांशी बोलणी करायचे ठरवले, पोर्तुगीजांनी कुंकळ्ळी गावाच्या १६ नेत्त्यांना फसवून, खोटी आश्वासने देऊन असोळण्याच्या किल्ल्यात तहासाठी बोलावले आणि ठार केले. त्यांच्यातला एकजण कसाबसा निसटण्यात यशस्वी ठरला,
आज कुंक्कळीचा कोट अस्तित्वात नाही, पण कुंकळ्ळीच्या गावकऱ्यांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध दिलेल्या या पहिला लढ्याचे 'स्मारक' आहे. या लढ्याची आठवण सर्वसामान्यांना सतत होत राहावी म्हणून इ.स. १९९९ मध्ये कुंकळ्ळीच्या गावात धारातीर्थी पडलेल्या लोकांच्या आणि गावकऱ्यांनी केलेल्या उठावाच्या स्मरणार्थ युद्धस्मारक उभारण्यार आले, आता १५ जुलै हा दिवस गोव्याचा 'राष्ट्रीय युद्ध स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो. कुंकळ्ळीचा हा उठाव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे इतके महत्वपूर्ण असलेले कुंक्कळी गावातील पहिल्या लढ्याचे हे स्वातंत्र्य स्मारक आवर्जून पाहण्यासारखे आहे ...
संदर्भ
1) लेखन .श्री सचिन मदगे. गोवा
24जुलै 2022 पूर्ण जसाच्या तसा लेख दैनिक गोमांतक
2) गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर .श्री संदीप मुळीक पा. न 175
3)Maratha history seminar ..Y .T Gune page 3 ,4
अनिल दुधाणे.....
No comments:
Post a Comment