विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 May 2024

* मराठा सरदार बापू गोखले समाधी.... एक शोध**

 

* मराठा सरदार बापू गोखले समाधी.... एक शोध**
 
लेखन :शिवा  कराड










स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेले , असंख्य मावळ्यांनी आपल्या देहाची लक्तरे करून सांभाळ केलेले हिंदवी स्वराज्य इस सन 1818 रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
बाळाजीपंत नातू या मराठी माणसाने शनिवारवाड्या वरील भगवा ध्वज खाली उतरून त्या ठिकाणी आपल्या हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. शेवटी त्याला त्याचे फळ मिळाले तो तडफडून गंगाजल विना मेला.
असो हा इतिहास सर्वांना माहीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई २० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाले१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता हे अनेकांना माहीत नसावे त्या लढाई मधील असे एक व्यक्तिमत्व की ज्याच्या नशिबी मृत्यूच्या नंतर ही उपेक्षाच आली.मात्र राजा खचला तरी त्यांचे सैन्य व सेनापती मात्र खचले नव्हते. मूठभर सैन्य घेऊन नरवीर बापू गोखले त्यांच्या सोबत होते. या सैन्याचा तळ मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पडल्यानंतर इंग्रज सैन्य जनरल स्मिथ येथे धडकले. प्रसंग बाका होता. पेशवे अजूनही संभ्रमात व गोंधळलेले होते; मात्र नरवीर बापू गोखले यांनी पेशव्यांना मी एकटाच इंग्रजांना सामोरे जाणार असून, लढताना मरण आले तर बहुमान, याउपर श्रीमंतांचे दर्शन झाले तर उत्तम; अन्यथा हे अंतिम दर्शन असे सांगून जनरल स्मिथच्या सैन्याशी मूठभर मराठे प्राणाची बाजी लावून लढले. घनघोर लढाई झाली.
आष्टीच्या लढाईत मेजर स्मिथ सोबत लढत असताना जखमी अवस्थेतून बापू गोखले बाहेर पडले. अनेक इतिहासकारांच्या मते ते आष्टीच्या लढाईतच धारातीर्थी पडले. पण असे झाले नसावे
त्याची अनेक कारणे संदर्भासहित स्पष्ट करता येतील.
1) जर बापू गोखले आष्टीच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडले असतील तर त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव शरीर मिळावयास हवे होते तसे घडताना दिसून येत नाही.
2) जर आष्टीच्या युद्धामध्ये बापू गोखले धारातीर्थी पडले असते तर पुढे सुमारे 25 वर्ष त्यांच्या पत्नीने सौभाग्याचे अलंकार धारण केले नसते. त्यांच्या पत्नीस आपले पती जिवंत आहेत याची जाणीव असावी त्याचबरोबर सरदार बापू गोखले यांची पत्रही जात असावीत पण सध्या तशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्याकडे उपलब्ध नाही.
याउलट त्यांनी संन्यास धारण केलेला असावा. असावा म्हणण्यापेक्षा तसे पुरावेही उपलब्ध आहेत
इतिवृत्तांत असा की काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका असलेल्या खरोळा या गावी जाण्याचा योग आला. गावाच्या मध्यभागी अत्यंत सुंदर रेखीव अशा स्वरूपाचे दत्त मंदिर आहे. गावात चौकशी केली असता त्या मंदिरास" बापूची हवेली" असे म्हटले जाते हे कळाले आम्ही ज्यावेळेस मंदिरात पोहोचलो त्यावेळी श्री दत्ताची आरती चालू होती मंदिरामध्ये मंदिरा मध्ये हात-पाय धुवून आम्ही आरतीच्या ठिकाणी पोहोचलो. दत्ताच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी काही पायऱ्या होत्या त्या पायऱ्या चढून आम्ही गाभाऱ्याच्या जवळ पोहोचलो. त्यावेळी मंदिराचे नियुक्त पुजारी दत्ताची आरती करीत होते. बाहेर त्याच संस्थेमध्ये
अध्ययन करणारे विद्यार्थी मधुर स्वरात आरतीला साथ देत होते. आरती संपल्यानंतर मी पुजाऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि करावी म्हणून आणि इतिहासाची आवड असल्याने सहज चौकशी केली असता आश्चर्यचकित अशी माहिती समोर आली ती अशी की मुळात श्री दत्त मंदिर नसून मराठ्यांचे शेवटचे सरदार बापू गोखले यांच्या शेवटचे 25 वर्ष राहण्याचे हे ठिकाण किंवा त्यांनी संन्यास धारण केलेला असल्यामुळे त्याला आपण मठ ही म्हणू शकतो. तशी दत्त संप्रदायात किंवा नाथ संप्रदायात ज्या पद्धतीने गादी परंपरा चालू आहे त्याच पद्धतीची गादी परंपरा या ठिकाणी अस्तित्वात होती त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. तशी गादी पुजाऱ्यांनी आम्हाला दाखवली. त्याचबरोबर त्याच गादीवर दोन महान व्यक्ती जे बापू गोखले यांचे शिष्य असावेत स्वामी सहजानंद सरस्वती व स्वामी परमानंद सरस्वती यांच्या फोटो उपलब्ध आहेत तशा त्यांच्या समाधी ही या मठात उपलब्ध आहेत या तिन्ही समाधी तळघरात असणाऱ्या 10 बाय 10 च्या खोलीत उपलब्ध आहेत. बापू गोखले यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी त्या खोलीत प्रवेश केल्यानंतर एकच लहान खोली मध्ये त्यांची दगडी समाधी दिसून आली.
त्याचबरोबर बाहेरच्या पण बाजूच्या खोलीत स्वामी सहजानंद सरस्वती स्वामी परमानंद सरस्वती यांच्या समाधी आढळून आल्या.
ही वास्तू सुमारे 200 वर्ष प्राचीन असल्याचे पुजाऱ्याची म्हणणे आहे. मी तेथील नियुक्त पुजाऱ्यांना सरदार बापू गोखले यांच्या वास्तव्याचे काही पुरावे आहेत का असे विचारले असता त्यांनी आता मला थोडे काम आहे तुम्ही निवांत मध्ये आलात तर मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवीन असे आश्वासन दिले. याच दत्त मंदिराच्या बाजूस श्री विनायकाचे अतिशय सुंदर पण उघड्यावरचे छोटेसे मंदिर आहे. हा श्री विनायक पाहता काय कारण आहे माहित नाही पण अचानक डोळ्यासमोर पेशवे काळ उभा राहिला कारण पेशव्यांच्या काळात श्री गणेशाची अनेक ठिकाणी स्थापना केल्याचे आढळून येते. याच बाजूला थोडे पुढे गेल्यावर श्री शंकराचे अतिशय सुंदर, दगडी ,गावकर यांच्या म्हणण्यानुसार राक्षसी बांधकाम आहे. ज्यास आपण हेमांडपंथी असे म्हणतो. मंदिरातील नंदी हा अतिशय सुंदर असून शिव पिंड ही अत्यंत सुरेख अशी आहे. सोबत या मंदिराच्या परिसरात घेतलेल्या काही फोटो आहेत.
आता या मठासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून रेणापुर चे तहसीलदार या मठाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
या मंदिराचे पुजारी गत 12 वर्षांपासून सेवेत आहेत.
या ठिकाणाला भेट द्यावयाचे असल्यास आष्टामोड पासून हे ठिकाण केवळ 10 किमी. तसेच रेणापूर पासून 10 ते 12 किलो किलोमीटर एवढे आहे.
इतिहासात अजरामर असणाऱ्या आणि मराठा अँग्लो युद्धात प्राणाची शर्थ करणाऱ्या आणि मृत्यूनंतरही उपेक्षा सहन करणाऱ्या या महान मराठा सरदारास शतशः नमन

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...