विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 May 2024

भुसावळ

 

भुसावळ
एकोणिसाव्या शतकात इंग्लंडची जवळपास एक चतुर्थांश जगावर सत्ता होती. अमेरिकेत पिकलेल्या कापूसापासून मँचेस्टरच्या औद्योगिक वसाहतीतील कापड गिरण्या दर्जेदार कापड उत्पादन करत होत्या. इसवी सन १८४६ मध्ये अमेरिकेत कापूस उत्पादन फार कमी झाले आणि कापूसासाठी इंग्लंडला त्यांच्या इतर वसाहतींचा विचार करावा लागला. काळ्या मृदेचा भारत तेव्हाही कापूसाचा प्रमुख उत्पादक होता. साहजिकच गोऱ्या साहेबांची नजर भारताकडे वळली. पण भारतात कापूस गोळा करण्यामागे एक आव्हान होते. भारताच्या कानाकोपऱ्यात पिकलेला कापूस शेवटी मुंबई किंवा कलकत्त्याच्या बंदरांवर मोठमोठ्या जहाजात भरण्यासाठी आणावा लागणार होता आणि याकरिता बरेच दिवस लागायचे. कापूसाची आणि अन्य उत्पादनांची वाहतूक जलद करण्याच्या उद्देशातूनच भारतात रेल्वेचा जन्म झाला.
इसवी सन १८५३ मध्ये मुंबईच्या बोरीबंदरपासून ठाणेपर्यंत पहिली पॅसेंजर ट्रेन धावली. ही तर सुरुवात होती एक मोठं जाळं विण्याची. ही रेल्वेलाइन पुढे इगतपुरी, नाशिक, मनमाड, नंतर भुसावळ व पुढे खंडवा, इटारसी, जबलपूरहून अलाहाबाद आणि शेवटी कलकत्तापर्यंत नेण्यात आली. ही मुंबई-अलाहाबाद-हावडा रेल्वेलाइन - त्या काळाची भारतातील सर्वात लांब रेल्वेलाइन. आणि त्यातलाच एक भाग आहे; १८६० मध्ये इंग्रजांनी वसवलेलं भुसावळ जंक्शन. भुसावळला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे divisional headquarter आहे, रेल्वेचे ZTI आणि POH हे महत्वाचे विभाग आहेत. ZTI म्हणजे Zonal Training Institute. हे भारतातले रेल्वेचे सर्वात मोठे Training Institute आहे. येथे लोकोपायलटला म्हणजे ड्रायव्हरला इंजिन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अद्ययावत simulators आहेत. करोडो रुपयांचे सामान असो किंवा २०००-३००० माणसं, सर्वांना वेळेत व सुरक्षितपणे भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवणारा लोकोपायलट पहिल्यांदा इथंच पाटीवर पेन्सिल गिरवतो.
जसे आपल्या कारचे, बाईकचे servicing करावे लागते, तसे इंजिनचे overhauling करावे लागते. भुसावळच्या Electric Locomotive Workshop मध्ये दरमहा १२ इलेक्ट्रिक इंजिनाचे POH म्हणजे periodic overhauling (संपूर्ण परिक्षण) होते. इंजिनाच्या स्प्रिंग आणि चाकांपासून तर वरच्या तारांतून म्हणजे overhead wire मधून वीज वाहून आणणाऱ्या pantograph पर्यंत सगळे व्यवस्थित तपासले जाते (त्या त्रिकोणी तारांच्या संचाला pantograph म्हणतात, ज्यातून २५००० volts AC voltage वाहते. आपल्या घरातल्या उपकरणांना २३० volts AC पुरतात). इंजिनाची सगळी चाचणी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण केली जाते आणि मगच इंजिनाला रुळांवर धावायचे फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. भुसावळच्या पश्चिमेला जळगाव आणि तिथून पुढे सुरत लाइन व मनमाड लाईन, मनमाडहून पुढे पुणे व मुंबई लाईन जातात. तसेच पूर्वेला नागपूर लाइन आणि इटारसी लाईन आहेत. म्हणजेच भारतात कुठल्याही दिशेला जाण्यासाठी सहज ट्रेन मिळते. या सगळ्यावरून आपल्याला दळणवळणाच्या दृष्टीने या स्थानाचे महत्व कळेल.
भुसावळहून इटारसी लाईनवर जाताना ट्रेन तापीचा पूल ओलांडून दुतर्फा केळीच्या बागांचे दर्शन घडवते. या पुलाच्या आधी डावीकडे संरक्षण मंत्रालयाची Ordnance Factory म्हणजे आयुध निर्माणी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे सैन्याला दारूगोळा पुरवणारे कारखाने. वरणगाव व भुसावळ हे दोन आयुध निर्माणीचे कारखाने आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहेत. भुसावळला मिलिटरीचा दारुगोळा व बुलेट्स ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे ammunition boxes म्हणजे दारुगोळ्याचे दणकट स्टील बॉक्स बनतात. तर वरणगावला रायफलच्या गोळ्या (bullets) बनतात. या गोळ्या अमेरिकेला देखील निर्यात केल्या जातात. लडाख, कारगिल आणि काश्मीर खोऱ्यापासून तर हिंदी महासागरावरील विशालकाय जहाजांवर वापरल्या जाणाऱ्या अनेक बुलेट्सचा जन्म वरणगावचा आहे.
तापीच्या पुलावरून उजवीकडे पाहिले तर २ मोठ्या चिमण्या दिसतात - औष्णिक विद्युत केंद्राच्या गगनचुंबी चिमण्या. येथे तापीच्या पुलाचा ऑर्डनन्स फॅक्टरी आणि औष्णिक विद्युत केंद्रासाठी संदर्भ दिला कारण कुठल्याही industrial plant ला भरपूर पाणी लागते. पाण्याच्या वाफेवरच औष्णिक विद्युत केंद्राचे बॉयलर चालतात. मालगाड्या विदर्भातून, छत्तीसगडमधून कोळसा भरून आणतात, कोळसा जाळून आग निर्माण होते, या आगीने पाण्याची स्टीम/वाफ बनते, वाफेने turbine फिरते आणि turbine च्या माध्यमातून generator फिरते - अश्या प्रकारे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. तापीच्या पाण्यापासून आणि मालगाड्यातून उतरलेल्या कोळशापासून भुसावळला वर्षाला १२०० Mega Watt ऊर्जेची निर्मिती होते. भरपूर पाणी आणि कोळशाचा निरंतर पुरवठा - या कुठल्याही औष्णिक विद्युत केंद्राच्या दोन lifelines आहेत, आणि म्हणूनच दीप नगरच्या चिमण्या १२ महिने २४ तास धगधगत राहतात.
भुसावळकरांच्या नळाला रोज गोड पाणी देणारी तापी नदी मध्य प्रदेशात मुलताई येथे जन्म घेते आणि गुजरातच्या सुरतजवळ खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते. माझं सौभाग्य असं की मला या दोन्ही राज्यात राहायला मिळालं आणि या दोन्ही स्थळांना बघायला मिळालं. मुलताईला गेल्यावर तर मूल आईला भेटते तसा आनंद झाला. इथंच ताप्तीचा उगम होतो. मध्य प्रदेशात आपल्या तापीला ताप्ती म्हणतात. उगमस्थानाजवळ दोन मंदिरं आहेत - एक जुने ताप्ती मंदिर आणि एक नवे ताप्ती मंदिर, शेजारी गजानन महाराजांचे देखील मंदिर आहे. जुन्या मंदिरातली मूर्ती स्वयंभू आहे तर नव्या मंदिरात, तापीमाता देखण्या मूर्तिरूपात विराजमान आहे. मूर्तीच्या मागे सूर्य आहे. तापीला सुर्यपुत्री म्हणतात. एका पौराणिक कथेनुसार सूर्याच्या तापाला शांत करण्यासाठी ज्या पाण्याच्या प्रवाहाचा जन्म झाला तो प्रवाह म्हणजे तापी नदी. म्हणून नावात ताप शब्द असावा. दुसर्या एका कथेनुसार महाभारतात एक राजा होते ज्यांचे नाव होते कुरु, जे कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते, आणि त्यांच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव कुरुक्षेत्र पडले. या कुरूच्या आईचे नाव तापी होते. त्या देवीच्या नावावरून आपल्या नदीचे नाव तापी पडले असावे. नर्मदा तिची समांतर मोठी बहीण. भारतात या दोनच नद्या पश्चिमवाहिनी आहेत. दोघे आपल्या चवदार पाण्याने करोडो लोकांची तहान भागवून शेवटी अरबी समुद्रात एकमेकांना भेटतात.
तापीच्या काठावर आणखी एक ऐतिहासिक ठिकाण वसलेले आहे. औरंगझेब आणि शाहजहान - दोघे शेहेनशाह जवळपास अर्धा शतक म्हणजे जीवनकाळातले ५० वर्ष ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ते स्थान - बऱ्हाणपूर. भुसावळपासून ट्रेनने फक्त 35 मिनिटात बऱ्हाणपूर येते. बऱ्याच लोकांना माहित नसेल की जिच्यासाठी ताज महाल बांधला गेला, त्या राणी मुमताज महलचा मृत्यू इथला. खान्देशाची काळी मृदा पाणी शोषून घेते आणि त्यामुळे तिच्यावर वजनदार इमारत बांधता येत नाही. या एकमेव कारणामुळे शाहजहानला बऱ्हाणपूरमध्ये ताज महाल बांधण्याचा बेत रद्द करावा लागला आणि राजस्थानच्या अरावली पर्वतरांगातले सगळे संगमरवरी दगड मोठमोठ्या हत्तींच्या पाठीवर बसून आग्र्याला पोहोचले. बाकी सगळा इतिहास सर्वश्रुत आहे.
रेल्वे जंक्शन, औष्णिक विद्युत केंद्र, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि तापी नदी नंतर भुसावळ famous आहे इथल्या food साठी. माझ्या आतापर्यंतच्या थोड्याफार भारत भ्रमणात मला असे अनेक जण भेटले ज्यांच्या मनात भुसावळचे खास स्थान आहे. कारण मनाची वाट पोटातूनच जात असावी. कॉलेजमधील गोंदियाच्या मित्रापासून तर ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या हैद्राबादच्या सिनियर सायंटिस्ट पर्यंत - सगळ्यांनी त्यांच्या ट्रेनच्या प्रवासात भुसावळ स्टेशनला उतरून केळी खाल्लीयेत. पुणे रेल्वे झोनच्या बनारसी assistant DRM बाबूपासून तर उदयपूरच्या रिक्षाचालकापर्यंत, सगळ्यांना इथल्या शेवभाजी पार्टी आठवतात.
असे माझे जन्मस्थान सोडून मला आता १४ वर्ष होतील (रामाचा वनवासदेखील १४ वर्षांचा होता). आजही अनेकदा भुसावळच्या आठवणी यावल रोडवरील तापीच्या पुलावर वाहणाऱ्या हवेसारख्या हळूच स्पर्श करून जातात.
सुरेंद्र चौधरी
भुसावल
दि. १६-०५-२०२४

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...