शिवकाळात चौथाई म्हणजे काय आणि त्याची पद्धत
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
शिवकाळात चौथाई म्हणजे काय आणि त्याची पद्धत कशी होती, वसूल कसे करायचे त्या बाबत माहिती...
सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव घासदाणा/मेजवानी वसूल करतात. मराठ्यांच्या उत्पन्नाची चौथाई व सरदेशमुखी हे दोन महत्वाची साधने..
● चौथाईच्या उत्पत्तीचा इतिहास खोबरेकर पुढील प्रमाणे देतात :
"आपले संरक्षण कोळी लोकांपासून करावे म्हणून रामनगरच्या चोथिया राजास दमण प्रांतातील काही गावकरी चोथ देत असत. ती आपणास मिळावी अशी मागणी शिवरायांनी केली. तीबद्दल कैक वर्षे वाटाघाटी चालल्या. अखेरीस गोवा सरकारने शिवाजी महाराजांची चौथाईची मागणी मान्य केली, पुढे ही चौथाई मराठ्यांनी संबंध हिंदुस्थानभर लागू केली, चोथिया राजाच्या नावावरून पुढे या करास चौथाई नाव पडले.."
(खोबरेकर, १९६२ : गुजरातेतील मराठा राजवट).
चौथाई म्हणजे एकूण उत्पन्नाचा चौथा हिस्सा, तर सरदेशमुखी म्हणजे जमीन महसुलातील दहावा हिस्सा होय..!. याच पध्दतीने वाई- प्रतापगड जिंकल्या नंतर सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव प्रांतोप्रांती फिरू लागले. तेव्हा पासून घासदाणा म्हणून तिसरा एक कर घेण्याचा परिपाठ त्यांनी सुरू केला. हा कर स्वतःच्या लष्करासाठी, सैन्याला गवत व वैरण पुरविण्याच्या खर्चासाठी शत्रुच्या प्रदेशातून वसूल करीत. हे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात रामचंद्रपंत, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी सुरू केला. हा सुमारे २ टक्के पैसा किंवा धान्याच्या स्वरूपात असे. यास मेजवाणी असेही म्हणत. (कित्ता) पुढे पेशवेकाळात हा कर वसुलीचा अधिकार बहुधा नागपूरकर भोसल्यांकडे असावा..
घासदाणा हा नवा कर सुरू करण्यात धनाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा उद्देश होता की, दक्षिणेत मोगलांच्या धाडीने मराठ्यांवर युध्द लादले गेले, प्रदेश उजाड बनला, मोगल छावणीतही अन्नधान्य, गवत, वैरण यांचा तुटवडा भासत होता तर मराठ्यांनाही त्याची चणचण भासत होती. याला सर्वस्वी जबाबदार मोगल होते. तेव्हा त्यांच्याच ताब्यातील प्रदेशातून घासदाणा/मेजवाणी हा नवा कर वसूल करून संताजी व धनाजींने लढाऊ जनावरे पुष्ट केली. त्या आधारे मोगलांशी प्रखर संघर्ष देणे सुलभ झाले. स्वराज्यातील जनावरांचा वैरण / गवताचा खर्च अशारितीने त्यांनी परस्पर काढला. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या वऱ्हाड, गोवळकोंडा प्रदेशातील मोहिमांना जिंजीतून छत्रपती राजाराम महाराज अथवा पन्हाळ्याहून रामचंद्रपंताने पैसा पुरविणे अशक्य होते. अशा परिस्थितीत चौथाईची पध्दत म्हणजे मराठा लष्करास वरदान ठरली. त्यास घासदाणा या नव्या कराची जोड देऊन मराठ्यांनी सुवर्ण कळस गाठला..
संदर्भ : सरसेनापती संताजी घोरपडे.
इतिहासकार : डॉ.जयसिंगराव पवार.
―――――――――――――
Ram Deshmukh
No comments:
Post a Comment