मराठा सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर ते
क्रांतिवीर सत्तरीचा दिपाजी राणे...
क्रांतिवीर सत्तरीचा दिपाजी राणे...
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
सत्तरी गोव्याच्या ईशान्येला आहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत. या डोंगर दर्यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही..
सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले..
सत्तरी प्रदेशात राणे राजासरखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही. सन १७५५ मधे मोठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध..
सन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिरकोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्याऱ्या पुरुषांना व चोळी न घालणाऱ्या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपटले..
दीपाजींनी म्हादई नदीच्या किनाऱ्यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेऱ्या, सैनिकांच्या चौक्या यावर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले..
सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजींनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या. इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट.कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजींचे सैनिक तर कोठेच दिसत नसत. नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्यांना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले..
दीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत. दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानी वरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या..
२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन वसुली वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें, सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला..
लेखन माहिती साभार : गोवा संघ (ज्योति कामत).
No comments:
Post a Comment