विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

कासीमखान आणि संताजी घोरपडे यांचे युध्य

 


कासीमखान आणि संताजी घोरपडे यांचे युध्य
कासीमखान हा बादशहाचा एक हुशार सरदार. मराठ्यांच्या हालचाली वर सक्त नजर ठेवण्याचा त्याला शाही हुकुम होता. कासीमखानास एकट्याने हे निभावणार नाही म्हणून बादशहाने त्याचे भरवशाचे सरदार खानजादखान, सफशिफनखान, महंमद मुराद खान यांना कर्नाटकात पाठवले. त्यांचे सोबत स्वतः चे खास संरक्षक सैन्य ही भरपूर दिले. हे सर्व जण कासीमखानास सामील झाले. खानजादखान हा बादशहाचा बक्षी रूहुल्लाखान याचा पुत्र आणि उमराव. त्याचे आदर सत्कारास उणेपणा राहू नये म्हणून कासीमखानाने अडोणीच्या किल्ल्यातून राहण्यासाठी तंबू , भोजणाचे भारी सामान आणले. स्वागतासाठी जागा तयार केली. गुप्त हेरांचे कडून संताजी घोरपडे यांना या खबरा कळत होत्या. त्यांनी हाताखालच्या सैन्यांच्या तीन तुकड्या केल्या. कासीमखान मुक्कामावर दाखल होण्यापुर्वी मराठ्यांनी दिवस उगवताना मौल्यवान तंबूस आग लावली. कासीमखानास बातमी लागताच लगबगीने तयार होऊन मराठ्यांच्या तुकडीवर तो चालून गेला.
खानजादखान हा बडा बादशाही उमराव यावेळी झोपला होता. तो ही गडबडीने जागा झाला. आणि कासीमखानाच्या साहाय्यास धावून गेला. मराठ्यांबरोबर लढाईस तोंड लागले. तो पर्यंत संताजी घोरपडे यांच्या दुसऱ्या राखीव तुकडीने मुक्कामाच्या भागावर धाड घातली. या भयंकर घटनेची खबर खानजादखान आणि कासीमखान यांना लागताच आपला पराभव होणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळच असलेल्या दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. तेथे पाण्याची सोय होती. लढत लढत हे दोघे उमराव तेथे पोच झाले. पण ती गढी अगदीच लहान असल्याने तेथील अंमलदाराने त्यांना आत घेतलेच नाही. रात्र झाली. मग पुन्हा संताजींच्या फौजेने त्यांना गढी बाहेर वेढून गोळ्यांचा वर्षाव केला. मोगल सैन्य बहुतेक मारले गेले. भयंकर प्रसंग पाहून दोघे खान चोर दरवाज्याने गढीत गेले.
संताजीनां बातमी लागताच दोड्डेरीच्या गढीस मराठ्यांनी वेढा घातला. तेथुन आतील फौजेचे हाल सुरू झाले. आत अन्न नव्हते. भुकेने फौजेचा जीव कासावीस झाला. कासीमखानास अफुची चटक ती त्याला मिळेना. अफुविना तो तडफडू लागला. त्याच स्थितीत त्यास 20 ऑक्टोबर 1695 रोजी मृत्यु आला. अशी स्थिती पाहून खानजादखानाने संताजींकडे माणसे पाठवली. प्राणांची याचना केली. संताजीनीं वीस लाख रूपये दंड व जवळचे मौल्यवान सामान घेऊन एक घोडा व अंगावरील वस्त्रानिशी खानास व त्याच्या लोकांना सोडून दिले या वेळी एकूण पन्नास साठ लाखाचा ऐवज संताजी घोरपडे यांना मिळाला. खानजादखानास संताजी घोरपडे यांनी स्वतः चे खास पहारेकरी देऊन बादशहा कडे पोच केले.
रणमार्तंड रणधुरंदर संताजी घोरपडे यांचा विजय असो.
-रवि मोरे
#sarsenapati #santajighorpade

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...