क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 4
औरंगजेबाच्या बापासोबत त्याचे नेहेमी खटके उडत असत. शहाजहान ला पण औरंगजेब काही इतका पसंत करीत नसे. यात भर म्हणून की काय सतत बादशहा सोबत असणारा दारा शूकोह, त्याचे सेनानी, त्याचे मंत्रीलोक हे सतत बादशहाचे कान औरंगजेबाविरोधात भरत असत. प्रसंग तर एव्हढा आला होता की औरंगजेब, बापाकडून आणि मुख्यत्वे दिल्लीतून होणाऱ्या या त्रासाला इतका कंटाळला होता की तो फकीर व्हायचा विचार करीत होता. त्याने काही दिवस शस्त्रत्याग ही केला आणि तो फाकिरसारखा वावरू ही लागला. याची शिक्षा म्हणून शहाजहान ने त्याला त्याच्या दख्खन सुभेदारी पासून बरखास्त केले.
विचार करा , खरंच जर औरंगजेब बादशहा न होता फकीर झाला आता तर आज इतिहासाच्या पुस्तकातून येणाऱ्या करोडो गैर इस्लामी लोकांच्या आर्त हाका, लाखो स्त्रियांचे शिल, लाखो लेकरांचे जीवन आणि समस्त हिन्दुस्तान आणि त्याच्या यातना या सर्व कधी त्यात जमाच झाल्या नसत्या. पण नियतीचा फेरा किती वाईट असतो, आणि या प्रकरणात तर तो किती अनपेक्षित असा होता.
याचवेळी औरंगजेब त्याची बहीण , जहानआरा हिला भेटायला तो आग्र्याला गेलेला होता. याचे कारण असे की तिच्या कपड्यांना आग लागून तीला बरेच होरपळले होते. जगते का मरते अशी तिची परिस्थिती होती. राजवैद्याच्या औषधांनी तिला काहीएक गुण येईना तेव्हा एका गुलामाने तयार केलेल्या अंजनाने ती एकदम ठीक झाली. याचा आनंद म्हणून शहाजहान याने आग्र्यात आनंदोत्सव साजरा केला. यातच सम्मिलित होण्यासाठी औरंगजेब आग्र्याला गेला होता. हिनेच मग या आनंदाच्या वेळी शहाजहान शी बोलून औरंगजेबाला त्याच्या मर्जित परत आणले.
काय दैवाचा फेरा असतो बघा. आम्ही म्हणजे जे फक्त आवड आणि उत्सुकतेपोटी इतिहास वाचतो त्यांना अनेकदा असे होते की अमुक गोष्ट समजा अशी न होता अशी झाली असती तर किती बरे झाले असते पण इतिहास हा विषयच असा आहे. तो पोळावा लागतो, तो वाचताना बऱ्याच गोष्टींचा धित्कार आपल्याकडून होतो. आपल्याला या बाबतीत काहीच करता येणार नाही म्हणून बऱ्याच वेळा स्वतःविषयीच घृणा निर्माण होते पण ही सर्व "इतिहास अंगात भिनतो आहे" त्याची लक्षणे आहेत. तो भिनलाच पाहिजे, त्याचा त्रास झालाच पाहिजे. त्याने तुम्हाला 4 गोष्टींचे बाळकडू पाजलेच पाहिजे. आपल्या पूर्वजांना ज्या यातना झाल्या त्या अंश रूपाने का होईना पण तुम्हालाही झाल्या पाहिजेत त्या शिवाय इतिहास समजत नाही आणि इतिहास जर समजला नाही तर भविष्य उमगत नाही. त्यामुळे हा त्रास झालाच पाहिजे नव्हे ती इतिहास ऐकतानाची गरज आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
सन १६४४ मध्ये औरंगजेबाची रवानगी शहाजहान ने गुजराथेंत केली परंतु तीनच वर्षात त्याला तिथूनही बदली करून बाल्ख प्रांतात धाडले.
बाल्ख मोहीम , 1647:
काबूलच्या उत्तरेस हिंदकूश पर्वतांच्या रांगांच्या पलीकडे पसरलेले बाल्ख आणि बदक्शान प्रांत हे बुखाराच्या राज्याच्या अमलाखाली होते. बुखाराचा राजा नजरमहमदखान हा एक दुबळा आणि नालायक राज्यकर्ता होता जेणेकरून साऱ्या प्रजेची सहानुभूती त्याने गमाविली होती. तो गादीवर आल्याला जेमतेम तीन वर्षे झाली न झाली तोच त्याच्या प्रचंड साम्राज्यात सर्वत्र बंडाळी माजली (१६४५). या संधीचा फायदा घेऊन शहाजहानने बाल्ख आणि बदक्शान काबीज करण्यासाठी त्या प्रांतांत मोहीम पाठविली. कारण हे दोन प्रांत म्हणजे बादशहा बाबर याचा वारसा होते आणि मोगल घराण्याचा संस्थापक तिमूर याची राजधानी जे समरकंदच्या वाटेवरच होते.
या मोहिमेत विशेष म्हणजे पहिल्यांदाच औरंगजेबाला त्याच्या शत्रू व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीचा ही त्रास झाला आणि ती तिसरी आघाडी म्हणजे उजबेक टोळ्या. उझबेकिस्तान च्या परिसरातील गुंडांच्या टोळ्या मोघली सैन्यावर अचानक हल्ला करून त्यांची नेमकी रसद मारत असत जेणेकरून सैन्याच्या पोटवरच हल्ला होत असे. हे हल्ले इतके तीव्र होते की मोगली सैन्याचे लोक एकतर उपाशी होते आणि त्यांना दिवस दिवस आळीपाळीने युद्ध करावे लागत असे. एक म्हणजे बुखाऱ्याच्या राज्याच्या सैन्याशी आणि दुसरे म्हणजे या ऊजबेक टोळ्यांशी. हालत इतकी वाईट होती की हत्तीच्या पाठीवर सैनिकांना अन्न शिजवावे लागत होते कारण त्यांना युद्धापासुन वेळच मिळत नसे. एका भाकरीची किंमत तेव्हा 1 रुपया किंवा 2 रुपये इतकी प्रचंड झाली होती. पाणीही महागले.
याही परिस्थितीत औरंगजेब मात्र माघार घेण्याचा विचार तर सोडाच पण त्याच्याकडे तक्रार करायला जाणाऱ्या सैनिकांची मुंडकी उडवीत होता.
औरंगजेबाची एक प्रसिध्द आणि सर्वश्रुत कथा याच युद्धातून पुढे येते ती अशी की अश्याच एका संध्याकाळी , भर युद्ध चालू असताना त्याच्या नमाजची वेळ झाली. काहीही विचार न करता तो ताडकन स्वतःच हत्तीवरून उतरला. अंगात ना चिलखत होते ना कसले कवच. तो उतरला , त्याने खाली चादर अंथरली , गुडघे टेकले आणि भर युद्धभूमीवर शांतपणे नमाज पडला.
बाजूला भीषण युद्ध चालू आहे आणि हा आपला विचित्र प्रतिस्पर्धी असा रणांगणावर कशाचीही तमा न बाळगता नमाज पढतो आहे हे पाहून बुखाऱ्याच्या सैन्याची पुरती गाळण उडाली. त्यांचा नायक अब्दुल अजीज ने सुलाह करण्याचे निमंत्रण धाडले आणि तह झाला. बादशहाची माफी मागून हा प्रांत जश्याच्या तसा त्याच्याच हाती ठेवण्याचे कबूल झाले.
वरच्या प्रसंगावरून आपल्याला औरंगजेबाचा विक्षिप्तपणा दिसून येतो. त्याचे हे असेच गुण त्याला त्याच्या भावांपेक्षा वेगळे ठरवीत होते आणि बरोबर कारणांसाठीच त्याच्या भावांपासुन ते शहाजहान च्या मंत्र्यांपर्यंत सर्व जण त्याला आग्र्यापासून दूर ठेवू पाहत होते पण ते कितीक दिवस शक्य होते ?
हे आपण पुढील प्रकरणात पाहूच..
क्रमशः
ॲड. वेदांत विनायक कुलकर्णी (मुरूंबेकर)
९२८४९९६५०२
पुणे / बीड
No comments:
Post a Comment