क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 3
औरंगजेबाचा कुटुंब विस्तार : औरंगजेब जेवढा कट्टर मुसलमान होता, त्याने त्याच्याच चौकटीत राहून त्याने लग्न ही केली आहेत. त्याला ४ बायका होत्या
१) दिलरसबानू बेगम : ही शहानवाजखानाची मुलगी. (शहानवाज खानाचा पणजा हा पर्शियाचा राजा शहा इस्माईल सफवी याचा धाकटा मुलगा होता.) तिचा औरंगजेबाबरोबर मोठ्या थाटाने ८ मे १६३७ रोजी आग्रा येथे विवाह झाला. महमद अकबर याच्या जन्मानंतर झालेल्या आजारामुळे ती ८ आक्टोबर १६७७ रोजी औरंगाबाद येथे मरण पावली. तिला शहराबाहेर पुरण्यात येऊन तिला रबिया उद दौरानी म्हणजे आधुनिक संत रबिया अशी पदवी देण्यात आली. दक्षिणचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध असलेली तिची कबर म्हणजेच "बिबिका मकबरा" औरंगजेबाच्या हुकुमावरून तिचा मुलगा आजम याने दुरुस्त केली. ती अतिशय मानी स्वभावाची असून तिला आपल्या अंगामधील पर्शियाच्या शाही रक्ताचा अभिमान होता. औरंगजेब हा तिला वचकून असे.
२) रहमत उन्निसा उर्फ नबाब बाई : औरंगाबादेचे एक उपनगर वैजीपुरा म्हणजे आत्ताचे वैजापूर याची स्थापन या बाईंनीच केली.
३) औरंगाबादी महल : हिला असे नाव पडण्याच कारण म्हणज औरंगाबाद शहरी हीचा औरंगजेबाच्या जनान्यात प्रवेश झाला हे होय .
आणि
४) उदेपुरी महल: ही राजपुत्र कामबख्श याची आई. तिचा उल्लेख समकालीन व्हेनेशियन प्रवासी मनूची हा दाराशुकोच्या जनान्यातील जॉर्जियन गुलाम असा करतो. दाराशुकोचा औरंगजेबाने काटा काढल्यावर विजयी औरंगजेबाच्या जनान्यात तिला घालण्यात आले. ती त्यावेळी अतिशय तरुण असली पाहिजे. कारण तिला पहिले मातृत्व इ. स. १६६७ मध्ये प्राप्त झाले. बादशहावर तिची मोहिनी आणि प्रभावही अखेरपर्यंत टिकून राहिली आणि बादशहाच्या अखेरच्या दिवसांत ती त्याचा कंठमणी होऊन राहिली होती. तिच्या आधीन होऊन औरंगजेबाने कामबख्शचे अनेक अपराध माफ केले आणि कट्टर मुसलमान असूनदेखील तिच्या मद्यपी स्वभावाकडे दुर्लक्ष केले. यावरून लक्षात येते की जरीही तो कट्टर असला तरीही त्याच्या जनाण्यातील एका स्त्रीवरील प्रेमाखातर त्याने त्याच्या राजपुत्र जो मद्यपी होता त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. एकीकडे तत्वनिष्ठ म्हणावं तर औरंगजेब हा असा मध्येच त्याच्या तत्वांपासून फारखत घेणारा दिसतो. धूर्त म्हणतात ना , अगदी तसा. कोणाला खरे वाटेल की त्याने चक्क कुराणाच्या खोट्या शपथा घेतल्या आहेत? तोही प्रसंग पुढे येईलच.
या व्यतिरिक्त स्वतः औरंगजेबाच्या काही दंतकथा सांगितल्या जातात ज्या हिराबाई उर्फ जैनाबादी हिच्यासोबत तिचे प्रेम होते अश्या सांगितल्या जातात. औरंगजेबाच्या या प्रेम
प्रकरणाची हकीकत ही घटना होऊन गेल्यानंतर ५० वर्षांनी बादशहाचा आवडता सेवक हमिद उद्दीन खान याने "आलमगिर बादशाहाच्या संबंधी दंतकथा" या आपल्या पुस्तकात दिली आहे त्यामुळे यावर तत्कालीन दस्तऐवजाणं एवढा विश्वास ठेवावा का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
औरंगजेबाची मुले :
औरंगजेबाला दिलरस बानू कडून पांच अपत्य झाली.
१) जेबुंनिसा ,
२) जिनत उन्नीस उर्फ पादशहा बेगम ,
३) जुब्दत उन्नीस ,
४) महंमद आझम : सन 1655 रोजी बुऱ्हाणपूर मध्ये याचा जन्म झाला. वारसा युद्धात जाजाऊ येथे 1707 मध्ये लढाईत मारला गेला.
आणि
५) महंमद अकबर : सन 1657 मध्ये औरंगाबाद येथे याचा जन्म झाला. औरंगजेबाची नामर्जी झाल्याने हा निर्वासित झाला. संभाजी महाराज छत्रपती असताना हा स्वराज्यात त्यांच्या रक्षणाखली आला तेव्हा संभाजी महाराज यांनी याला तिकोना किल्ल्यावर ठेवले होते. पुढे हा पर्शिया मध्ये पळून गेला आणि तिथेच 1704 मध्ये मरण पावला.
औरंगजेबाला नबाबबाई कडून तीन अपत्य झाली.
१) महंमद सुलतान : मथुरेजवळ 1639 मध्ये याचा जन्म झाला. 1676 मध्ये तुरुंगवासात असतानाच याचा मृत्यू ही झाला.
२) महंमद मुअज्जम उर्फ शहा आलम पहिला : बुऱ्हाणपूर येथे सन 1643 मध्ये याचा जन्म झाला. वारसायुद्ध जिंकून पुढे याने बहादूरशहा नाव धारण करून हा मुघलांचा पुढचा बादशाह झाला. लाहोर येथे त्याचा पुढे मृत्यू झाला.
आणि
३) बद्रून्निसा
औरंगजेबाला औरंगाबादी महल कडून एकच अपत्य झाले तिचे नाव मीहिरुंनिसा तर उदेपुरी महल कडून त्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव कामबक्ष. याचा जन्म दिल्ली येथे 1667 साली झाला. तो वारसायुद्धा दरम्यान हैद्राबाद जवळ मारला गेला.
या सर्वांचा उल्लेख जसा जसा पुढे येईल तो तसा केला जाईल.
ज्या प्रमाणे स्वतः औरंगजेब ह्याला बादशहा औरंगझेब होण्यासाठी त्याच्याच बापाच्या , भावांच्या , भावकीच्या मुंडके उडवलेल्या धडांच्या जिन्यांहून चढावे लागले अगदी तसेच त्याच्याही बाबतीत झाले. त्याच्या मुलांमध्ये घनघोर वारसा युद्ध लढले गेले आणि महंमद मुअज्जम उर्फ शहा आलम याने बहादूरशहा हा किताब स्वतःला देऊन तो पुढचा मुघल शासक बनला. परंतु औरंगजेब नंतर मुघल साम्राज्याला जी उतरती कळा लागली तिला आवरता घालणे पुढे कोणालाही शक्य झाले नाही. औरंगजेबाचा हेकेखोर स्वभाव , त्याचा आडमुठेपणा , व्यवहारातील डोळेझाक न करण्याची त्याची सवय या सर्व गोष्टी मुघल साम्राज्याला हानी करून गेल्या. प्रदीर्घ काळ दक्षिणेत उभारलेले लढे , मराठ्यांचा त्याला प्रतिकार , त्यांचा बीमोड करण्यासाठी त्याने पाण्यासारखा वाहिलेला पैसा , सैनिकांचे नैराश्य या सर्व गोष्टी त्याच्या राज्यकारभारात त्याची दुर्दशा कशी झाली हे सांगण्यासाठी दत्त म्हणून उभ्या होत्या. इथे नाही पण मी एका ठिकाणी ऐकले होते की जेव्हा औरंगजेब मराठ्यांचा बीमोड करण्यासाठी दक्षिणेत उतरला होता तेव्हा त्याचे भलेमोठे असे सैन्य , जनाना, राहुट्या , स्वयंपाकी , खानसामे, सैन्यातील इतर लोक ही तो दक्षिणेत पोहोचल्यावर पण दीड वर्ष येतच होती. इतका प्रचंड लावजमा घेऊन दिल्लीहून दक्षिणेत मोहम्मद तुघलका नंतर औरंगजेबच आला होता आणि त्याच्या सोबतही तेच झाले जे तुघलका बरोबर. फरक एवढाच की तुघलक जिवंत दिल्लीपर्यंत जाऊ तरी शकला पण मराठ्यांना संपवू पाहणारा हा औरंग्या याच मातीत गाडला गेला..
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
क्रमशः
ॲड.वेदांत विनायक कुलकर्णी ( मुरुंबेकर )
९२८४९९६५०२
पुणे / बीड
No comments:
Post a Comment