चव्हाण घराण्याचा इतिहास ( डफळापूर व जत संस्थान )
डफळापूरचे चव्हाण (डफळे घराणे) माणदेशातील पराक्रमी घराणे म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या घराण्याने माणदेशाच्या आग्नेय भागावर सुमारे ३०० वर्षे राज्य केले. महाराष्ट्रातील संस्थानांचा विचार करता, एकूण १८ संस्थानांपैकी जत हे एक महत्त्वाचे संस्थान होते.
श्रीमंत सटवाजी राजे चव्हाण-डफळे यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या जत संस्थानाला स्वतंत्र इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभला आहे.
श्रीमंत सटवाजी राजे चव्हाण-डफळे यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या जत संस्थानाला स्वतंत्र इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभला आहे.
अहमदनगर (निजामशाही)
१. राव जाधव
२. राजे भोसले
विजापूर (आदिलशाही)
१. चंद्रराव मोरे (चंद्रराव हा 'किताब आहे )
२. फलटणचे राव नाईक निंबाळकर
३. झुंझारराव घाडगे
४. राव माने
५. घोरपडे
६. डफळे (डफळापूरकर)
७. सावंत बहादुर,वाडीचे देखमुख.
चव्हाण-डफळे- या घराण्याकडे जत परगण्याची देशमुखी होती.डफळे यांचे मूळ आडनाव चव्हाण होते.डफळापूरचे चव्हाण हे वंशपरंपरागत पाटील असल्यामुळे डफळे हे आडनाव पडले. शिवपूर्वकाळ ,शिवकाळ ते स्वातंत्र्योउत्तर काळापर्यंत चव्हाण यांनी जत परगण्याची देशमुखीचे कामकाज पाहिले आहे.
महाराष्ट्रातील क्षत्रिय मराठा कुळ प्रणाली व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने ९६ मराठा कुळांचा समावेश होतो.
डफळापूरातील चव्हाण मराठा कुळ हे स्थलांतरित मराठा कुळ असल्याचे इतिहासातून दिसून येते. सन १६५० च्या सुमारास, अथणीचे यलदोजी हाडा चौहान असा उल्लेख काही पत्रांमध्ये आढळतो. नंतर यलदोजी उर्फ यलदेव हे अथणीमध्ये कसे आले? मूळचे ते कुठले होते? हा संशोधनाचा विषय बनला, आणि त्यावेळी हाडा नावाची चावी आपल्या हाती सापडली. आपल्याला ठाऊक आहे की, हाडा चौहान हे राजस्थानमधील बुंदी आणि कोटाचे अनेक वर्ष शासक राहिले आहेत. राजस्थानातील पराक्रमी दुदावत हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर या घराण्याचा इतिहास निगडीत आहे.
भारतात गेल्या सहस्रावधी वर्षांत अनेकदा मानवी स्थलांतरण झाल्याचे इतिहासातून दिसून येते. पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा याच्या विरुद्ध दिशेसही. वास्तवात, असे म्हणता येईल की अशा काही निवडक किंवा अपवादात्मक समूहांशिवाय इतर सर्वांनी शेकडो वर्षांत स्थलांतरण केले आहे. दुष्काळ, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विस्तार, नवीन व्यवसाय, राजाश्रय, परकीय आक्रमणं, विवाहसंबंध आणि असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे भारतीय इतिहासात स्थलांतरण होत आले. उपरोल्लेखित कारणांमुळे लोकांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर काहींनी दक्षिणेकडून उत्तर दिशेसही स्थलांतरण केले. हिंदुस्तानात, विशेषतः इस्लामी राजांनी राज्य करायला सुरुवात केली असता, उत्तरेकडील राजपूत लोकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली, तर काही राजपूत राजांनी तिकडेच राहून सेवा स्वीकारली. परकीय मुसलमानी आक्रमणं होऊ लागली, त्यावेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे लोकांनी स्थलांतरण केले हे एक ऐतिहासिक सत्य आहे. दक्षिणेकडे आल्यावर त्यांनी स्थानिक मूळ निवासी असणाऱ्या लोकांशी अन्नोदक, रोटीबेटी संबंध प्रस्थापित केले आणि येथील भाषा व संस्कृती स्वीकारली. अशाच प्रकारे चौहानांचे एक हाडा कुळ, जे राजस्थानातून दक्षिणेकडे येऊन डफळापूरचे चव्हाण म्हणून ओळखले जातात.
राजस्थानातील हाडा राजपूत चौहान (चव्हाण) घराणे बुद्धिमत्ता, लढाऊ वृत्ती, देशभक्ती आणि पराक्रमासाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुघल तक्ताशी सशस्त्र संघर्ष या घराण्याने वेळोवेळी केला. मुळात, बुंदीचे हाडा चौहान हे मेवाडच्या अधीन होते आणि मेवाडच्या सेवेसाठी हाडांची तलवार नेहमी सुसज्ज असायची. चित्तोडच्या पाडावानंतर, अकबराने ८ फेब्रुवारी १५६८ रोजी रणथंभोरला वेढा दिला, आणि त्या वेळी राव सुर्जन हाडा यांच्याकडे रणथंभोरचा किल्ला होता. सुरुवातीला राव सुर्जन हाडा यांनी किल्ला शर्थीने लढवला, पण त्यानंतर मुघल सैन्याने उंचवट्यांवरून तोफेचा मारा सुरू केला. किल्ल्याचा तट फोडण्यासाठी दोनशे बैलांनी मोठ्या तोफांना ओढून आणले. हल्ला बरेच दिवस चालू राहिला, पण किल्ला घेण्यात यश येत नव्हते. शेवटी, अकबराने अंबरचा राजा भगवानदास याला रणथंभोरचा राजा राव सुर्जन हाडा यांच्याकडे तहाच्या बोलणीसाठी पाठवले. तहाच्या अटी ठरवल्यावर, उभयपक्षांनी शिक्क्यामोर्तब केले. बाहेरील बलाढय मुघल सैन्य, अपुरा धान्यपुरवठा, तोफगोळ्यांच्या प्रखर माऱ्यामुळे ढासळलेले बुरुज आणि होणारा नरसंहार यांचा विचार करून राव सुर्जन हाडा यांनी तह मंजूर केला."
राव दुदादेव हाडा
बुंदी संस्थानचे राजे राव सुर्जन यांना तीन मुलं होती. राव दूदादेव हे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते, त्यानंतर राव भोज आणि राव रायमल होती. आपल्या वडिलांनी अकबराशी केलेल्या तहामुळे बुंदीचे स्वातंत्र्य गमावल्याची खंत राव दूदा यांना होती. राव दूदा हाडावतीचे (बुंदीचे) स्वातंत्र्य अबाधित ठेवू इच्छित होते. राव दूदा यांनी महाराणा प्रताप यांच्याशी हात मिळवणी केली आणि आसपासच्या भागावर ताबा मिळवण्यासाठी सहकार्य केले. रावांनी बंड पुकारल्यावर त्यांना त्यांच्या साम्राज्यातून बेदखल करण्यात आले. अबुल फजल लिहितो की, बुंदीच्या राव सुर्जन हाडाचा मोठा मुलगा राव दूदा हाडा महाराणा प्रताप यांच्या सांगण्यावरून बुंदीमध्ये बंडाचा झेंडा उभारतात. मोघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहून सेवा करण्याचे त्यांनी स्वीकारले नाही. परिणामी, राव दूदा यांना हाडावतीच्या प्रदेशामध्ये त्यांच्या विरोधकांच्या मोर्च्यांना सामोरे जावे लागले. महाराणा प्रताप यांनी राव दूदा यांना मदत केली, परंतु हल्दीघाटीच्या युद्धानंतर राव दूदा यांचे सैन्य फारच कमी झाल्यामुळे त्यांनी हाडावतीच्या प्रदेशावर आपला अंमल परत मिळवण्यासाठी विजापूरच्या बादशहाची मदत घेण्यासाठी दक्षिणेकडे कूच केली. परिणामी,राव दूदा यांना नर्मदा नदी पार करण्याआधी विश्रांतीसाठी छावणी करून थांबलेल्या ठिकाणी त्यांच्या स्वकीयांनी विषबाधा करून मारले. दूदा यांना विषबाधा झाल्याची वार्ता समजताच, मोघल व राव सुर्जन यांचा लहान मुलगा भोज याने राव दूदाच्या छावणीवर हल्ला केला. या प्रसंगी, दूदाचे दोन सुपुत्र आणि अनेक अनुयायी या युद्धात मारले गेले. राव दूदा यांचा तिसरा मुलगा श्यामलसिंह याने मृत्यूप्रसंगी आपल्या वडिलांना वचन दिलं की, मुघल व भोजावत हाडा यांच्याशी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल."
श्यामलसिंह दुदावत हाडा-
श्यामलसिंहने आपल्या उरलेल्या ५० सहकाऱ्यांसोबत दक्षिणेकडे मोर्चा वळविला. नर्मदा नदी पार करून त्यांनी असीरगड आणि गाविलगड यांच्यामध्ये असणाऱ्या प्रदेशातील घनदाट जंगलात आपले निवास्थान निवडले. त्यांनी गुप्त पद्धतीने मुघल प्रदेशावर आक्रमण केले, लुटपाट केली आणि नंतर परत जंगलात शरण घेतले. मुघलांच्या दक्षिणेकडे निघणाऱ्या अनेक मोर्चांवर श्यामलसिंह यांनी हल्ला केल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. श्यामलसिंह यांनी आजम खान, राव भोज हाडा, शाहनवाज खान आणि राव रतन सिंह हाडा यांच्याविरुद्ध लढाया केल्या. श्यामलसिंह व अमरकंवर राणीबाई यांच्या पोटी शार्दूलसिंहाचा जन्म झाला. जन्म दिल्यानंतर काही दिवसात श्यामलसिंह यांच्या पत्नीचे निधन झाले.
शार्दूलसिंह दुदावत हाडा-
शार्दुलसिंहाने मुघलांच्या विरोधात अत्यंत प्रखरपणे लढण्यासाठी विजापूरच्या राजवटीमध्ये प्रवेश केला. बहलोलखान याने शहाजी भोसले यांना लिहिलेल्या दोन पत्रांमध्ये शार्दुलसिंह श्यामलसिंह हाडा असा उल्लेख केलेला आहे. त्याच्या कारकिर्दीतच शार्दुलसिंहाची अथणीच्या फौजदाराशी ओळख होऊन, अदिलशहाकडून जहागीर म्हणून काही जमीन मिळाली. यामुळे पुढे त्याची ओळख अथणीचे जमीनदार म्हणूनच झाली.
यलदोजी चव्हाण –
डफळापूरचे पाटीलकीचे वतन मोरे घराण्याकडे होते.डफळापूरचे मोरे हे जावळीच्या घराण्यातील एक शाखा होती.शिवपूर्वकाळात काळात मोरे हे एक मात्तबर मराठा क्षत्रिय घराणे म्हणून अस्तित्वात होते..दुदा हाडा यांचा नातू शार्दूलसिंह याला आदिलशाही कडून अथणीची जमीनदारी मिळाली. शार्दूलसिंह यांचे आदिलशाहीतील मराठा सरदार डफळापूरचे लखाजी मोरे,आटपाडीचे आप्पाजी सोमवंशी यांच्याशी ओळख निर्माण झाली होती.पुढे शार्दूलसिंह यांचा मुलगा यलदोजी उर्फ यलदेव व लखाजी मोरे पाटील यांची मुलगी रखमाबाई यांचा विवाह होतो.लखाजी मोरे यांना मुलगा नसल्याने यलदेव हे डफळापूरचे वंशपरंपरागत पाटीलकीचे वारसदार झाले. लखमोजी चव्हाण हे यलदेव व रमाबाई यांचे थोरले सुपुत्र. रमाबाई यांचे वडील लखाजी मोरे हे डफळापूरचे पाटील होते. लखाजी मोरे यांना मुलगा नसल्यामुळे लखमोजी चव्हाण हे डफळापूरचे पाटील बनले.
सटवाजीराव चव्हाण { डफळापूर व जत संस्थानचे संस्थापक}
सटवाजीराव चव्हाण यांचा वीर युद्धकौशल्य असलेला इतिहास अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये विखुरलेला आहे. त्यांच्या लष्करी कारकिर्दीला चुकीच्या प्रकारे प्रस्तुत केले गेले आहे आणि त्यांना फक्त काही छोट्या परिच्छेदांमध्ये किंवा कधी कधी पूर्णपणे अनुल्लेखित केले गेले आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक स्रोतांमध्ये संदर्भाशिवाय तुकड्यांतून माहिती मिळते, मात्र त्याची एक सुसंगत आणि अखंड ऐतिहासिक कथा अजूनही उपलब्ध नाही.
एक दिवस, अब्दुल कादिर खान कर्नाटक मोहिमेवर असताना, आदिलशाहीविरुद्ध बंड करण्याची योजना आखत होता. तो सापडला आणि त्याविरुद्ध आदिलशाहीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अब्दुल कादिर खानचा भाऊ, अब्दुल रहीम खान, याच्याशी चर्चा करून बंकापूरच्या जहागिरीचे अधिकार त्याच्या नावे करण्याची योजना तयार केली आणि अब्दुल कादिरला ठार करण्याचे आदेश आदिलशहा बादशाहने दिले.
अब्दुल करीम खानवर विश्वास ठेवून, सटवाजीराव चव्हाण यांच्या वडिलांनी, यलदोजी यांनी त्याला मदतीचा हात दिला. एक दिवस, अब्दुल रहीम खान यांनी यलदोजीजवळ त्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला, अब्दुल करीम खानला जहागिरीसाठी सहाय्य करण्याची विनंती केली. अब्दुल रहीम खान यांच्या मृत्यूनंतर, यलदोजीरावांनी आदिलशाही दरबारात अब्दुल करीम खानचा समर्थन केला.अब्दुल करीम हा जहागिरीचा मालक झाल्यामुळे अब्दुल मोहम्मद(अब्दुल कादीरचा मुलगा) नाराज झाला आणि विजापुरी दरबारातून बाहेर पडल्यावर, त्याने मोघलांची मदत घेऊन सूड घेण्याच्या उद्देशाने यलदोजींच्या डफळापूर गावावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक घरांना आग लावली.
हल्ल्याच्या प्रतिकारासाठी, यलदोजीरावांचा मुलगा लखमोजी चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसोबत पुढे गेला. लखमोजीरावांच्या आगमनापूर्वीच शेकडो लोक मारले गेले होते. लखमोजीरावांनी आपल्या भाऊ सटवाजीरावाला घरातील स्त्रियांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, लखमोजीरावांनी अब्दुल मोहम्मद याच्याशी धैर्याने लढा दिला. अनुभव नसतानाही, त्यांनी प्रखर प्रतिकार केला. मात्र, हल्ल्याच्या वेळी मागून हल्ला झाल्यामुळे, लखमोजीरावांना गंभीर जखमा झाल्या, आणि त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मागे आणले. गंभीर दुखापतींमुळे, त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीला सांगितले की, "सटवाजी याला पुत्र मानून उर्वरित आयुष्य जगणे."
लखमोजी चव्हाण यांच्या मृत्यूनंतर, लखाजी मोरे यांच्या नातेवाइकांनी डफळापूरच्या जहागिरीची अकार्यक्षमता जनतेसमोर उघड केली. गावात शेकडो लोकांचा मृत्यू, जाळपोळ आणि लुटपाट झाल्या, आणि त्याच वेळी मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करत, यलदोजीराव शांत झाले.
पुढे काही वर्षानंतर १६६७-६८ मध्ये यलदोजीराव यांचा मृत्यू झाला व सटवाजीराव चव्हाण यांनी डफळापूरच्या जहागिरीचे पालकत्व स्वीकारले. सटवाजीरावांचा जन्म १६५४ च्या आसपास झाला. आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुरूप, तो शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्दीतेने ओळखला जात होता. लहानपणीच त्यांना राजकीय डावपेचांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्याची नेतृत्व क्षमता आणि चातुर्य तीव्र झाली. डफळापूरवरील हल्ल्यामुळे त्यांचा लढाऊ स्वभाव आणखी प्रगल्भ झाला, ज्याने त्याच्या सैन्य धोरणांमध्ये एक नवा आकार घेतला.
डफळापूरचे सटवाजीराव चव्हाण हे विजापूर येथील प्रख्यात आणि प्रभावशाली मराठा सरदार होते, ज्यांना वजीर या प्रतिष्ठित किताबाने गौरवण्यात आले होते. सटवाजीराव चव्हाण यांनी आपल्या सैन्यात सुमारे १०,००० बंदूकधारी सैनिक तयार केले होते, ज्यांना 'काळा प्यादा बरकंदाज ' म्हणून ओळखले जात होते. हे त्यांच्या सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीकोनाची नोंद आहे. सेनापती राजश्री संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक लढायांमध्ये जे बर्कंदाज सहभागी होते, त्यांच्यातील बरेच जण प्रत्यक्षात सटवाजीराव चव्हाण यांच्या सैन्याचे भाग होते, हे इतिहासकारांनी मान्य केले आहे.
१६७२ मध्ये पाच वर्षांच्या वयात सिकंदर आदिलशहाला (१६७२–१६८६) विजापूरच्या गादीवर बसवण्यात आले. या कालावधीत विजापूरमध्ये आंतरकलह आणि गृहयुद्धांचे सत्र सुरू झाले.
इ.स. १६७२ च्या नंतर स्तत:ची फौज जमवून विजापूरच्या आसपासच्या मुलखात स्वतंत्र सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे बादशाही मुलखात उपद्रव होऊ लागला.
सटवाजीराव दिवसेंदिवस आपली लष्करी क्षमता वाढवत गेले.
अदिलशाहीचा सुलतान सिकंदर अदिलशहा याच्या कानी त्याच्या शुरत्वाच्या व पराक्रमाच्या गोष्टी गेल्यामुळे त्याने सटवाजीस आपल्या भेटीस बोलविले व लष्करी सैन्यात दोनशे स्वरांची मनसब व प्रमुख सरदाराचा हुद्दा दिला. सटवाजीरावांनी सिकंदर अदिलशहास ३००० होन नजराना देऊन परगणे जत ,काराजगी, बारडोल आणि व्हनवाड अशा चार महालाची देशमुखी वतन इनाम करून घेतले व जकातीचे वगैरे हक्क मिळविले.या संबंधीची सनद आदिलशहाने इ.स. १६८० रोजी सटवाजीस दिली.
आदिलशाहच्या दरबारात त्यांचे स्थान अधिक उंचावले. अखेरीस, त्यांच्या ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण सेवेची दखल घेत, सिकंदर अली आदिलशाहने १६८१ साली एक अत्यंत महत्त्वाचा सनद, म्हणजेच फर्मान जारी करून वझीर किताब दिला.
डफळापूर शहराभोवती एक तटबंदी होती. सटवाजीराजे चव्हाण यांच्या काळातच ही तटबंदी उभारली गेली असावी. आजही डफळापूर शहराचा मोठा भाग या कोटाच्या अंतर्गत वसलेला आहे. जरी आज ही तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी, काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष, बुरुज, कोटाचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्या शेजारील ढासळलेले बुरुज तसेच कोटाचा लाकडी दरवाजा याचे स्मृतीचिन्हे अद्याप शिल्लक आहेत. डफळापूर गावामध्ये पेठ स्थापन करून महाजन व,शेटे यांना बाजारपेठेचे अधिकार दिले.
सटवाजीरावांनी आपल्या फौजेमध्ये बंदूकधारी सैनिकांची भरती केली होती त्या काळात बंदूक चालवणे म्हणजे आधुनिकतेचे प्रतीक होते. या सैनिकांना काला प्यादा बरकंदाज असे संबोधले जात होते. सर जदुनाथ सरकार यांच्या मते सैन्याची संख्या जवळपास १०,००० पर्यंत होती तर व्ही. एस. श्रीवास्तव्य यांच्या मते ही संख्या १६००० पर्यंत होती असे दोन्ही इतिहासकारांनी मान्य केले आहे.
सटवाजीरावांच्या कर्नाटकी बरकंदाजाच वैशिष्ट्य असे कि हे बरकंदाज उंच झाडावर चढून बसत व तेथूनच गोळीबार करीत असत . उंच झाडावर चढून बसल्यामुळे मराठी सैन्य कोठे आहे आणि मोघल सैन्य कोठे आहे हे दिसत असे.त्यामुळे त्यांचा मोघलांवर अचूक गोळीबार होई. मोघलांच्या आणि बरकंदाजांच्या मध्ये मराठी सैन्याची फळी असे. त्यामुळे या बरकंदाजास संरक्षण मिळे. त्यामुळे त्यांना जागा बदलायला कारण पडत नसे. एकाच जागेवरून गोळीबार ठेवता येई. फक्त बंदुकांची तोंडे थोडी खालीवर किंवा इकडे तिकडे केली कि काम भागत असे आणि अचूक निशाना हा ठरलेलाच असायचा. यामुळे राजाराममहाराजांच्या काळात सटवाजीराव आणि त्यांचे कर्नाटकी बरकंदाज मराठ्यांच्या सैन्याचा कणाच बनली होती.
या बरकंदाज फौजेचे सटवाजीराव चव्हाण नेतृत्व करत होते. मोगलांना सटवाजीरावांच्या सैन्यापासून फार नुकसान होऊ लागले परिणामी औरंगजेब यांनी सटवाजीरावास जिवंत अथवा मृत पकडण्यास आदेश दिले. डफळापूर मध्ये सटवाजी यांचे लहान बंधू धोंडजीराव चव्हाण यांस मोघलांनी पकडून नेले. पुढे डफळापूरची ठाणेदारी अमानुल्लाखान याला देण्यात आली. सटवाजीरावांनी मोगली ठाण्यावर मोठे हल्ले करून ठाणेदारांवर चांगली भीती निर्माण केली होती.
दिल्लीचा बादशहा औरंगजेबने साम्राज्य विस्तारापोटी इ.स. १६८१ ला दक्षिणेत येऊन १६८६ साली विजापूरची आदीलशाही जिंकून घेतली त्यावेळी विजापूरच्या दरबरातील बरेचसे सरदार औरंगजेबच्या (मोगल) आश्रयास गेले पण सटवाजीराव हे औरंगजेबाच्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतंत्र वृत्तीने वृत्तीने रहाण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ वर्षे त्यांनी स्वतंत्र राज्यसत्ता उपभोगली. जत सारख्या पठारी प्रदेशावर मोगलांना तोंड देणे फार कठीण होते.
स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रायगड येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले सुपुत्र संभाजी महाराज यांनी १६८० ते १६८९ स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज यांना कपटाने औरंगजेबाने पकडले व त्यांची अमानवी क्रूर हत्या केली. ह्या अमानुष घटनेनंतर हत्येचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रातील रयत पेटून उठली. छत्रपती संभाजी महारांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू राजाराम हे गादीवर बसले. त्यांनी मराठा स्वराज्याचा लढा तसाच पुढे चालू ठेवला. छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडलं होत. संताजी व धनाजी यांच्या कामिगरी मध्ये सटवाजीरावांचा मोलाचा सहभाग राहू लागला.
संताजी घोरपडे हे सटवाजीराव चव्हाण यांच्याशी संपर्कात होते. याप्रकारे, सेनापती संताजी घोरपडे हे सटवाजीराव चव्हाण यांसाठी एक महत्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत होते.
सटवाजीराव चव्हाण यांची कारकीर्द-
जून १६९०-लुत्फुल्लाखानची साताऱ्याजवळील मोहिम-पिलिवची लढाई
शहाजहान बादशहाचा सुप्रसिद्ध वजीर सादुल्लाखान यांचा मुलगा लुत्फुल्लाखान हा एक नामांकित सरदार असून तो मराठ्यांच्या विरुद्ध लढत होता. लुत्फुल्लाखानची बहीण ही मोगल सरदार शहाबुद्दीन ऊर्फ गाजिऊद्दीन फीरोजजंग याची बायको आणि पुढे प्रसिद्धीस आहेला निजामल्मुल्क याची आई होय.
लुत्फुल्ला खान खटावच्या दिशेने येत असताना, म्हसवडजवळच्या महादेव डोंगरात त्याला मराठ्यांनी घेरले. मराठा सैन्याचे नेतृत्व सटवाजी चव्हाण करीत होते. खानाशी तीव्र लढाई झाली, जी दिवसभर चालू होती. शेवटी संध्याकाळी सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी यांचे सैन्य लुत्फुल्ला खानावर हल्ला करण्यासाठी आले.
जून, १६९२- रहिमतपूरजवळ कृष्णेकाठी लढाई
नीरा नदी ओलांडून खान सातारा भागात पोहचला. तेथे त्याला समजले कि, मराठ्यांचे डफळे,माने इत्यादी सरदार कृष्णेच्या परिसरात १५-२० हजार सैन्यानिशी फिरत आहेत. खान आपल्या पत्रात लिहतो, कि आमच्या सैन्याच्या धाकाने ते पळू लागले,या धावपळीत ते कृष्णेच्या परिसरात असणाऱ्या रहिमतपूर या गावी गेले. मी त्यांचा पाठलाग केला. ते कृष्णा नदी ओलांडीत होते. याच वेळी मी त्यांच्यावर तुटून पडलो. मराठे मागे वळले आणि आमच्या सैन्यावर बाण व बंदुकीचा मारा करू लागले. त्या काफर सटवाजी डफळेपाशी दोन हजारपेक्षा अधिक कर्नाटकी बर्कंदाज यांचे पायदळ होते. त्याने धाडसाने आमच्यावर आक्रमण केले त्याच्या बर्कदाजांच्या माऱ्यामुळे प्रलयकाळाचा भास झाला.आमचे सरदार अब्दुल कादर, खुदावंदखान, अचलसिंग चौहान , तोफखान्याचा दारोगा आशूर बेग इत्यादी अधिकारी मैदानात ठाण मांडून राहिले. त्यांनी चांगलेच शौर्य गाजवले. त्यांनी शत्रूंपैकी अनेकांना ठार मारले. मराठ्यांचे सैन्य संख्यने अधिक होते. पण त्यांचा पराजय होऊन ते पळू लागले. नदी ओलांडून जाताना अनेक जण बुडून मेले.मराठ्यांचे सुमारे पाचशे सैनिक ठार झाले. शंभर माणसे कैद झाली. त्यांची हत्या करण्यात आली.
जून १६९४ - इंडीचा मुघल ठाणेदाराने औरंगजेबाला सटवाजी चव्हाण यांच्या बंडखोरीच्या गतिविधींची माहिती दिली. यावरून हे स्पष्ट होते की, १६९४ मध्ये सटवाजी चव्हाण हे औरंगजेबाच्या बाजूने नव्हते.
१६९५- दोड्डेरीची लढाई-या लढाईमध्ये १०-१२ कसलेले व शूर सरदार-सेनापती आणि ३५ हजार सैन्य होते तर या उलट सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याकडे सगळी मिळून १२ हजार फौज होती,यात सुद्धा २ हजार सटवाजी चव्हाण यांचे कर्नाटकी बर्कान्दाज होते.
सर जदुनाथ सरकार यांनी योग्यपणे म्हटले आहे की, सटवाजी चव्हाण डफळे १६९५ च्या आधीच मुघल साम्राज्याचा त्याग करून त्याच्या प्रतिकारात लागले होते आणि त्यानंतर अनेक वर्षे मुघलांच्या प्रदेशात लुटमार करत राहिले. सटवाजी डफळे मुघलांच्या बाजूला राहिले नाहीत आणि ते पळून गेले.औरंगजेबाने त्यांचा पाठलाग करण्यासाठी तरबियात खान, मीर आतिश, सय्यद खान खगारी आणि इतर अधिकारी पाठवले. तथापि, सटवाजी डफळे यांनी त्यांचे पाठलाग करणाऱ्यांना पराभूत केले आणि मुघलांच्या प्रदेशात आपली लूटमार मोहीम चालू ठेवली.
मुघल अधिकारी सटवाजी चव्हाण याला पकडण्यात अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी त्याचा सख्खा भाऊ धोंडजी याला बंदी करून बादशहा औरंगजेबाकडे पाठवले.औरंगजेबाने आदेश दिला की, जर सटवाजी एका महिन्याच्या आत शरण आला नाही, तर त्याच्या भावाला जिवंत गाडले जाईल किंवा त्याच्या शरीराचे अंग तुकडे करून कापले जाईल. आपल्या भावाच्या संकटाची बातमी मिळाल्यावर, सटवाजी डफळे यांनी मुनिम खान यांच्या माध्यमातून समर्पणाची तयारी दर्शवली आणि आश्वासन दिले की, जर त्याच्या भावाला मुक्त केले गेले आणि त्याला संरक्षण दिले गेले, तर तो दरबारात हजर होईल
सटवाजी चव्हाण यांना मुनिम खान यांनी औरंगजेबसमोर सादर केले, आणि मे १६९८ रोजी औरंगजेबाने एक फर्मान जारी केले. या फर्मानाद्वारे, औरंगजेबाने सटवाजी डफळे यांचे जत ,काराजगी,बारडोल आणि होनवाड या चार महालाचे देखमुखीचे हक्क मान्य केले आणि सटवाजींचे अधिकार पुन्हा एकदा प्रमाणित केले.
सटवाजी चव्हाण यांच्यासमोर वेळ अत्यंत प्रतिकूल होती, सटवाजींना दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, कारण त्यांचा भाऊ धोंडजी आणि त्यांची जहागीर दोन्ही संकटात होती. म्हणूनच, सटवाजींनी व्यवहारिक निर्णय घेतला आणि आपली जहागीर कायम राखली. तीन वर्षे कैदेत असलेला भाऊ धोंडजी औरंगजेबाने अखेर मुक्त केला."
२ ऑगस्ट १६९९- गढीसंख (संख,जिल्हा सांगली )
. गढीसंख (संख,जिल्हा सांगली ) येथील ठाणेदार अली याने कळवले की : सटवाजी चव्हाण-डफळे हा गढीला वेढा घालण्यासाठी येत आहे. चारशे बंदूकची आणि कोणीतरी अधिकारी पाठवून येऊन माझे सहाय्य करावे. विनंती मान्य करण्यात आली आणि खानजहानची माणसे व शेख गुलाम महंमद,मुशरफ कौलार हैदराबादी यांना हिकडे (संखकडे) पाठवण्याची आज्ञा झाली.
बादशहांनी तरबियतखानाला मध्यरात्री बोलविले फातिया पढून त्याला सटवाजी चव्हाण याच्या परिपत्यासाठी रवाना केले. तरबियतखान यांनी सटवाजी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी ५२०० घोडेस्वारांच्या पथकासह पुढे पाठवले.
१९ ऑगस्ट १६९९ रोजी सटवाजी चव्हाण आणि त्यांचा पुत्र बावाजी यांची राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे प्रमुख, यांच्यासोबत भेट झाली. या भेटीत राजाराम महाराजांनी त्यांना मानाची खिलतीचे वस्त्रे दिली.
१५ नोव्हेबर १६९९-सटवाजी चव्हाण आणि त्यांचा पुत्र बावाजी हे औरंगजेबाला भेटण्यासाठी निघाले होते, हे ऐकून राजाराम महाराज यांच्या सैनिकांनी सटवाजी आणि बावाजी यांना पकडले आणि साताऱ्यात बंदी केले.सटवाजी चव्हाण यांनी सातारगडावरून कशीबशी सुटका करून घेतली. पुढे सटवाजीराव नेहमी अस्वस्थ राहू लागले, त्यांना मुघल सैन्यात अपमानित होण्याचा भास होऊ लागला. याच दरम्यान, सटवाजी दिलेल्या कार्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. या अफवा बादशाहाच्या कानी गेल्या आणि त्याने सटवाजींची जहागीर व मनसब रद्द करून टाकल्या. त्यानंतर, सटवाजींनी विश्रांती घेतली आणि आपल्या पुत्र बावाजी याला औरंगजेबाच्या सैन्याच्या मदतीसाठी पाठवले.
डिसेंबर १६९९-जानेवारी १७००- सटवाजी चव्हाण यांचा मुलगा साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिला असताना मोगलांच्या बाजूने.अजिंक्यतारा किल्ला घेताना सर्वात पुढे असणारा बावाजी यांचा भीषण स्फोटामुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू.
२४ मार्च १७०१ मोगलांच्या काफिल्यावर डफळापूर (जत तालुका सांगली जिल्हा ) जवळ सटवाजी चव्हाण यांचा हल्ला. -हरकाऱ्यांच्या तोंडून कळले ते असे. ‘ब्रह्मपुरीच्या तळावरून प्रवाशांचा काफीला बादशाही छावणीकडे येत होता. त्यांच्याबरोबर बलुची सैनिक होते. काफिला डफळापूरच्या अलीकडे आला, सटवाजी चव्हाण हा सैन्य घेऊन त्यांच्यावर चालून आला. बलुच्यांपैकी अनेक माणसे ठार अगर जखमी झाली. याच सुमारास मुगलखानचे मुगल सैनिक मुर्तजाबाद मिरजेहून त्या स्थळी पोहचले.शत्रू पळून गेले.बलुची सैनिक व काफिला हे मुर्तजाबाद मिरजेला पोहचले आहेत.
जुलै १७०६ -सटवाजी चव्हाण यांचा ब्रम्हपुरी येथे मृत्यू.....डफळापूर संस्थान.
No comments:
Post a Comment