वाईचे नवाब!!
सत्यार्थाने या नवाबास पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जाते, तथापि भारतात अनेक ठिकाणी वाईचे नवाब या नावानेही यांचे उल्लेख येतात.
वाई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो दक्षिण काशी या बिरूदावलीने नटलेला हिंदू तीर्थक्षेत्राचा समृद्ध प्रदेश ! कृष्णमाईच्या पवित्र काठावर मंदिरांच्या दाटीवाटीने वसलेल्या या शहराच्या अगदी जवळच मुस्लीम शासकांचे संस्थान नांदत होते हे अगदी अविश्वसनीय वाटावे असे सत्य आहे. वाई शहराला अगदी खेटून महाबळेश्वरला जाणाऱ्या घाटात पसरणी नावाच्या टुमदार गावात या नवाबांची राजधानी होती. या घराण्यास
"शेखमिरा" संस्थान म्हणूनही ओळखले जाते.
"शेखमिरा" संस्थान म्हणूनही ओळखले जाते.
या घराण्यास शेखमिरा हे नाव त्याच्या मूळपुरुषावरुन पडले. स्वराज्याच्या सैन्यातील शेखमिरा हा एक मावळा. इ.स.१७०७ साली शंभूपुत्र थोरले शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून मुक्त झाले आणि स्वराज्यात आले. छत्रपती पदावरून शाहूमहाराज व ताराराणींचा खटका उडाला व शाहू महाराजांनी आपला अधिकार घेण्यासाठी युद्धाची सुरुवात केली. मजल दर मजल करत शाहू चंदन-वंदन किल्यावर येऊन पोहोचले तेव्हा राजधानी अजिंक्यतारा ताराबाईंच्या बाजूने परशुराम पंत प्रतिनिधींच्या ताब्यात होता. प्रतिनिधी शाहू महाराजांस शरण येत नव्हते. १७०९ मध्ये शाहूराजेंच्या सैन्याने अजिंक्यताऱ्यास वेढा घातला. तेव्हा किल्याचा हवालदार होता शेखमिरा!
शेखमिराचा पसरणी/वाई येथील कुटुंबकबिला कैद करुन महाराजांनी साताऱ्यात आणला व आठ दिवसांत किल्ला ताब्यात न दिल्यास सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ अशी धमकी दिली. शेखमिराने घाबरुन पंतप्रतिनिधींना विनंती करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत. त्यामुळे पंतप्रतिनिधींनाच कैद करुन शेखमिराने शाहू महाराजांसाठी अजिंक्यताऱ्याचा दिंडी दरवाजा खुला केला. आठ दिवसांत राजधानी ताब्यात घेण्याचा कयास सार्थकी लागल्याने तेव्हापासून विजयदिवस म्हणून दर शनिवारी 'फत्तेची नौबत' वाजवण्याचा प्रघात पडला.
या प्रसंगातून शेखमिरा शाहूंच्या सैन्यात दाखल झाला. खूष होऊन शाहू महाराजांनी त्यास पसरणी व आजूबाजूच्या परिसरातील मोठी जहागिरी दिली. महत्वाच्या १७१८-१९ च्या दिल्ली स्वारीत तसेच जंजिऱ्याच्या सिद्दीवर काढलेल्या मोहिमेत शेखमिरा मराठा सैन्यात सहभागी होता. साठ स्वारांच्या मनसबीसह चाळीस हजारांची नेमणूक व दरमहा १८०० रुपयांचा सरंजाम त्याच्याकडे होता. पुढे यात एरंडोल व दर्यापूर महालाच्या मोकाश्याची सुद्धा भर पडली. शेखमिरा नंतर त्याचा दत्तकपुत्र खानमहंमद हा जहागीर पाहू लागला.
११ फेब्रुवारी १८१८ रोजी क्रांती होऊन पेशव्यांची हुकुमशाही मोडून इंग्रजांच्या मदतीने छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नेतृत्वाखाली 'सातारा' राज्याची स्थापना झाली. २५ सप्टेंबर १८१९ रोजी छत्रपती महाराज व इंग्रज कंपनी यांच्यात ११ कलमी तह करण्यात आला. ज्या अनुषंगाने चौदा पेठांचे स्वतंत्र सातारा राज्य प्रतापसिंह महाराजांच्या स्वाधीन करण्यात आले, तसेच पुढील सहा जहागीरदार छत्रपतींच्या नियंत्रणात अंशतः स्वतंत्र कारभार पाहू लागले.
१) नाईक निंबाळकर - फलटण
२) पंतप्रतिनिधी - औंध
३) सरदार डफळे - जत
४) पंतसचिव - भोर
६) शेखमिरा - पसरणी वाई
शेखमिरा संस्थानास अंशतः स्वतंत्र संस्थानचा दर्जा प्रथमच या तहात मिळाला. पुढे पेशवाईचे तथाकथित देवराज्य बुडाल्याने काही जातीयवादी जात्यांधांनी याचे दोषी प्रतापसिंह महाराजांना मानून इंग्रजांना बाप म्हणायला सुरुवात केली. यांनी स्वतःस संपूर्ण राज्याधिकार मागणाऱ्या प्रतापसिंह महाराजांना इंग्रज सरकारविरुद्ध पोर्तुगीज आणि नागपूरकर भोसल्यांशी हातमिळवणी केल्याच्या खोट्या आरोपात गुंतवून कुटील इंग्रज ओव्हान्सच्या मदतीने राजद्रोहाचा खटला भरला. या खाटाटोपाचा पुढारी होता भुईंज जवळील पाचवडचा महा-हरामी बाळाजीपंत नातू आणि त्याचा जोडीदार सांगलीकर चिंतामणराव पटवर्धन. पुढे नमकहरामी करत भोरचा पंतसचिव सुद्धा या कटात सामील झाला. या सर्वांनी छत्रपतींचे बंधू आप्पासाहेब यांना वेड्यात काढून घोड्यावर चढवले आणि छत्रपती प्रतापसिंहांचा तख्तापलट केला.
पुढे ४ सप्टेंबर १८३९ रोजी झालेल्या कटकारस्थानाने शहाजीराजे उर्फ आप्पासाहेब सातारा राज्याचे छत्रपती झाले. त्याचवेळी इंग्रज कंपनी सरकारने नवीन तहनामा करुन वरील सहा जहागीरींचा ताबा स्वतःकडे घेतला व या जहागीरी संस्थान (princely State) म्हणून उदयास आल्या. याच कारणाने शेखमिरा संस्थान एक छोटेखानी पण स्वतंत्र पसरणी संस्थान म्हणून उदयास आले व ते पुढे भारत स्वतंत्र होण्यापर्यंत टिकले.
पुढे १८२८ मध्ये खान मोहम्मद हा नवाब म्हणून गादीवर आला त्याने कर्जबाजारी होत बराच सरंजाम घालवला. १८६१ मध्ये खान मोहम्मद व त्याचा भाऊ गुलाम कादर यांच्यात संस्थानची वाटणी होऊन खान मोहम्मदचा दत्तक पुत्र सुलतान सानी यांचा सरंजाम सरकारजमा करुन घेण्यात आला.
नवाब गुलाम कादरच्या गादीवर नवाब म्हणून 'नवाब गुलाम जिलानी बिजली खान' आला. याचे उत्तरेत अनेक मोठ्या मुस्लीम संस्थानांशी नातेसंबंध होते. त्यातील सर्वात प्रमुख संस्थान म्हणजे कुर्वाई संस्थान (मध्यप्रदेश). विशेष म्हणजे हे संस्थान देखील पुर्वाश्रमी मराठ्यांच्या अधिपत्याखाली असलेली अफगाण पश्तूनवंशी जहागीर होते. तसेच दुसरे नातेवाईक संस्थान म्हणजे मध्यप्रदेश मधील जावरा. जावराचा नवाब मोहम्मद इस्माईल खान याची मुलगी सहाबजादी मुअज्जम सुलतान जहान बेगम ही नवाब गुलाम जिलानीची पहिली पत्नी होती. तर त्याची दुसरी पत्नी असलेल्या मुजम्मील जहान बेगम हिच्यापासून झालेली मुलगी आयशा हुमारीया बेगम ही कुर्वाई संस्थानचा नवाब अनिस उद दौला मोहम्मद सरवार याची पत्नी व संस्थानची राणी होती. आयशाचाच मुलगा मोहम्मद जफर हा पुढे कुर्वाई संस्थानचा नबाव झाला. नवाब गुलाम जिलानीची धाकटी मुलगी असिफ सुलतान बेगम ही जुनागढचा नवाब अमिर उस्मान याची पत्नी होती.
गुलाम जिलानी नंतर त्याचा मुलगा नवाब सैदुद्दीन हैदर जिलानी बिजली खान वाईचा (पसरणी) नवाब झाला. त्याची पत्नी झियाउन्नीसा बेगम ही खानदेश जवळील सचिन संस्थानच्या नवाबाची पुतणी होती. याची मुलगी आयेशा हिचा विवाह कुर्वाईचा नवाब सरवार अली खान व भोपाळची नवाब अबिदा सुलतान (सुरैय्या जहाँ, नवाब गौहर-ए-ताज) यांचा मुलगा असलेल्या शहरयार खान याच्यासोबत झाला. १९५० मध्ये अबिदा सुलतान भोपाळच्या गादीवरील आपला हक्क सोडून मुलासोबत पाकिस्तानात गेली. तिथे तीने काही काळ परराष्ट्र खात्यात काम केले. पुढे वाईच्या नवाबाचा जावई असलेला शहरयार खान पाकिस्तानचा परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन सुद्धा झाला. नवाब सैदुद्दीन हैदरला पाचगणी येथील जमीन विक्री घोटाळ्यात वाई-पसरणी-पाचगणी येथील आपली सर्व संपत्ती राहत्या घरासह घालवावी लागली.
नवाब मोईनुद्दीन हैदर जिलानी बिजली खान हा सैदुद्दीन हैदरचा एकुलता एक मुलगा सद्यस्थितीत पसरणीचा (वाईचा) नवाब आहे. त्याची पत्नी कामील जमान बेगम ही कुर्वाईचा नवाब मोहम्मद जफर याची मुलगी आहे.
इंग्रज काळात स्वतंत्र संस्थान (राज्य) म्हणून मान्यता असलेले, तत्कालीन प्रतिष्ठीत संस्थानांसोबत थेट नातेसंबंध असलेले व मराठा राज्याचा एक भाग असून अगदी राजधानी जवळ असलेले हे पसरणी (वाई) संस्थान आज दुर्दैवाने पुर्णतः विस्मृतीत गेले आहे.
शेख मिरा नवाबांची आजमितीस शेवटची खूण शिल्लक आहे ती म्हणजे पसरणीचा नवाब बंगला ! जवळपास सहा एकरांवर पसरलेला दगडी तटबंदीने युक्त असा इंग्रजकाळीन वास्तू प्रकारात बांधलेला बंगला आज शेवटच्या घटका मोजतोय.
मागच्या महिन्यात वाई वरुन वाट वाकडी करून मुद्दाम पसरणीला गेलो ते नवाबाचा बंगला बघण्यासाठीच ! गावाबाहेरच कोराळा ओढ्याच्या काठी सहा एकरांवर वसलेला नवाब बंगला दगडी तटबंदीने भव्यतेची आठवण करुन देतो. पडलेलं पण अस्तित्वाची खूण संभाळून ठेवलेलं प्रवेशद्वार आतील मुख्य बंगल्याची झलक दाखवतं. बाजुच्या खोल्या वैगरे सोडल्यास मुख्य बंगला छोटेखानीच वाटतो पण तरीही त्यातून तो इंग्रज आमदानीतील आपली श्रीमंती दर्शवतो. पारंपरिक जाळीदार दरवाजा असलेली नमाजाची खोली, टेहाळणीचा मनोरा आणि एकंदरीत बंगल्याचा लूक नवाबी श्रीमंतीची अनुभूती (vibe) देतात. संस्थानकाळातील नवाबाच्या घरी आपण आहोत हे पदोपदी तिथे जाणवतं.
नेहमीप्रमाणे नवाब बंगल्यातही भुईंजचा विषय रंगलाच, तो म्हणजे सध्या बंगला नवाबाच्या मालकीचा नसून तो धोम पुनर्वसन मधिल धरणग्रस्तांनी विभागून खरेदी केला आहे आणि तो मिळवून देण्यात आमच्या भुईंज गावचे स्व.खा.प्रतापरावजी भोसले यांचा फार मोठा वाटा आहे.
आज बंगला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी झाल्याने किती काळ तग धरेल याची शाश्वती नाही. पसरणी आणि वाईची ही गौरवशाली ओळख जपायची असेल तर स्थानिक व प्रशासनाने सक्रिय प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.
स्वप्नील महेंद्र जाधवराव.

फोटो: नवाब बंगला पसरणी
संदर्भ: .स्थानिक माहिती
. छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी - प्रबोधनकार
ठाकरे
. छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज -
गणपतराव साळुंखे
. The Royal Ark
No comments:
Post a Comment