जव्हार संस्थान
जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले[१][२] जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थान चे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य - जयहर असे पण म्हटले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.[३][४]
इतिहास
मुकणे गावातील जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार/सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगड ला जव्हार संस्थान ची राजधानी करण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.
इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661 ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई होते. सावरकर आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर लगेचच सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना व त्यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.
राजधानी
संस्थानाची राजधानी ही सुरुवात-शेवट पर्यंत जव्हार होती. जयदेवराव यांनी जेव्हा जव्हार राज्याची निर्मिती केली तेव्हा भूपतगड किल्ला हीच राजधानी होती. मधल्या काळात कोहेजगड आणि गंभीरगड यांना उपराजधानीचा मान मिळाला होता. विक्रमशहा प्रथम यांच्या काळात जव्हारला भुईकोट किल्ला तयार झाला आणि तीच राजधानी केली नंतर याच किल्ल्याचा परिसरात जुना राजवाडा हा कृष्णशहा द्वितीय यांनी बांधला. याच राजवाड्यात अनेक दुरुस्ती झाली आणि येथूनच संस्थानाचा कारभार होत असे. पुढे यशवंतराव महाराज यांनी नवीन राजवाडा बांधल्यावर काही काळ येथे दरबार भरत असे आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थान भारतात विलीन झाले.
क्षेत्रफळ
मुंबई इलाख्यातील (बॉम्बे प्रेसिडन्सी) मधील ठाणे जिल्ह्यातील (एजन्सी) एकमेव संस्थान होते आणि भौगोलिक दृष्टीने जव्हार संस्थान गुजरात स्टेट एजन्सीचा भाग होता.
उ.अ.19°43'ते 20°5'व पू.रे.72°55'ते 73°20'यांच्या दरम्यान वसलेले होते.उत्तरेस डहाणू, मोखाडे हे ठाणे तालुक्यातील तालुके आणि दमण प्रदेश पूर्वेस मोखाडे दक्षिणेस वाडे व पश्चिमेस डहाणू आणि माहीम तालुके होते. यास कोळवण असे म्हणत.
सन 1818 च्या तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात लॉर्ड एल्फिन्स्टनने कॅप्टन डिफीन्सनला जव्हार राज्य जिंकण्यासाठी पाठवले. त्यावेळी जव्हार राज्यातील 10 किल्ले आणि जव्हार जिंकले.
इ.स.1821 च्या कंपनीने केलेल्या जाहीरनाम्यानुसार जव्हारच्या वतीने राणी सगुणाबाई यांनी तह केला. तेव्हा त्याना फक्त 320 चौ.किमी.एवढा प्रदेश दिला तो 1877 पर्यंत तेवढाच होता तेव्हा जव्हार संस्थानामध्ये थोरली आणि धाकटी पाती असे भाग होते.
सन 1877 मध्ये जव्हारचे राजे पतंगशहा चौथे यांनी इंग्रज यांनी केलेल्या सहकार्यबद्दल तसेच समाजसुधाराबद्दल जव्हारला अजून थोडा प्रदेश इंग्रज सरकार तर्फे देण्यात आला तेव्हा जव्हार संस्थानाचे क्षेत्रफळ हे 500 चौ. किमी. होते.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला केलेल्या सहकार्य बद्दल संस्थानाला अजून 300 चौ.किमी.प्रदेश देण्यात आला. तेव्हा संस्थानाचे क्षेत्रफळ हे 803 चौ.किमी. होते आणि शेवट पर्यंत तेच होते. शेवटचे महाराज यशवंतराव यांनी केलेल्या सहकार्य बद्दल इंग्रज यांनी जव्हारच्या राजाला ठाणे जिल्ह्यात मोखाडे तालुकाची जबाबदारी देण्यात आली तसेच जिल्हात असिस्टंट कलेक्टर रूपात कारभार करावा असे आदेश देण्यात आले.
जव्हार संस्थानात एकूण तीन महाले/तालुके होते.मलमाड(150 चौ.किमी) कर्यात हवेली(350चौ. किमी) आणि गंजाड/कराडोह(100 चौ.किमी) असे होते. पुढे कुडाण(100चौ.किमी) हा अजून एक तालुका तयार करण्यात आला.
संस्थानात जव्हार,विक्रमगड आणि आशागड ही तीन शहरे होती.संस्थानाच्या कराडोह महालातून मुंबई-बडोदे हा रेल्वेमार्ग जात होता.संस्थानात एकही रेल्वे स्टेशन नव्हते. संस्थानाच्या हद्दीवर छोटे वाणगाव रेल्वे स्टेशन होते पण जव्हारकर मात्र डहाणू रेल्वे स्टेशनचा वापर करत असे.
संस्थानात एकूण 108 खेडी होती.नंतर त्यांची संख्या वाढली. नाशिक जिल्यातील त्रंबक आणि इगतपुरी तालुक्यातील काही गावे संस्थानकडे होती.संस्थानाचा बराच भाग हा डोंगराळ आणि पठारी प्रदेश होता. संस्थानातून अनेक नद्या वाहत होत्या. मुंबई शहरापासून सर्वात जवळ असे जव्हार संस्थान होते.
जव्हार संस्थानाची वैशिष्ट्ये
1)भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान
2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान
3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा
4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री बटालियन)
महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)
महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)
5)भारतातील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान
6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान
7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण
10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान
11)ब्रिटिशांकित जव्हार संस्थानास 9 तोफा (9-Gan salute) सलामी होती.
जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात.
मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबरे, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते.
जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधबा आहे. जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट, हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
१ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आज घडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत आहे. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.जव्हार राज्यातील किल्ले
अलंग-कुलंग
अशेरीगड
आसवगड
इगतपुरीचा किल्ला
इंद्रगड
कमानदुर्ग
काळदुर्ग
कोहेज किल्ला
गंभीरगड
गुमतारा किल्ला
टकमक किल्ला
तांदूळवाडी किल्ला
तारापूर चा किल्ला (जलदुर्ग)
त्रंबकगड
त्रिगलवाडी किल्ला
पट्टागड
बल्लाळगड
किल्ले बेलापूर
भास्करगड
भूपतगड (राजधानी)
मदनगड
माहुलीगड
रांजणगिरी किल्ला
विवळवेढे किल्ला
संजान किल्ला (जलदुर्ग)
सिद्धगड
सेगवा किल्ला
सेवागड
हरिहरगड
No comments:
Post a Comment