जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत
जव्हार संस्थानच्या राष्ट्रगीताला दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाली. हे राष्ट्रगीत, बडोद्याचे राजकवी कवी यशवंत यांनी रचले. त्याचे पहिले गायन जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धावरून परत आल्यानंतर त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त झाले. जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद, राजांची शौर्यगाथा, मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संस्थानाचा गौरव करणारे हे राष्ट्रगीत आहे. ते दि.१३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणापर्यंत, प्रत्येक समारंभात गायले जात असे.
जय मल्हार ! जय मल्हार !
गर्जू या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचेही वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहारII३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सूर्यांकित I
दावी राज्य हे जव्हारII ४ II
प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होऊ जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो I
राजा वीरहो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II
No comments:
Post a Comment